Pratibha Tarabadkar

Comedy

3.0  

Pratibha Tarabadkar

Comedy

काय बाई सांगू, कसं ग सांगू

काय बाई सांगू, कसं ग सांगू

3 mins
226


 'ती'चं ओझरतंच दर्शन झालं.हडकलेली, किरकोळ शरीरयष्टीची.पण म्हटलं बघू तरी ही काही उजेड पाडतेय का!

 'ती' कोण याची उत्सुकता असेल ना? अहो,ती म्हणजे 'पाल'!ईsss अशीच तुमची प्रतिक्रिया असेल ना! अहो बटबटीत डोळ्यांची,मिनी डायनासोरसारखी दिसणारी पाल म्हटल्यावर कोणाचीही अशीच प्रतिक्रिया असणार ना! माझीही अगदी तशीच होती.मी तर पालीने घरात प्रवेश करू नये म्हणून जाळ्या बिळ्या ठोकून कडेकोट बंदोबस्त केला होता.'पाल और मेरे घर?कभ्भी नहीं l

   आणि गंमतच की हो झाली, आमच्या कडे खूप झुरळं झाली.तशी दर तीन चार महिन्यांनी घरात अचानक झुरळांची संख्या वाढायची पण आम्ही भरतरेषा,फिट पंप वगैरेचा मारा करीत त्यांचा नि:पात करत असू...म्हणजे जाहिरातीतल्या बाईसारख्या कोलांट्या उड्या मारत सासूमां च्या लक्षात येण्याआधी पंप मारुन झुरळ मारत,हात न धुता त्याच हाताने पाहुण्यांना सरबत देत नव्हतो बर्का पण शक्य तितकी चपळाई करत असू.

 पण या वेळेस झुरळांची फौज फारच आक्रमक होती.अगदी आमच्या नाकासमोर टिच्चून रुबाबात चालत जायची.अशावेळी केरसुणी, स्लिपर्स आणेपर्यंत चपळपणे लाकडी फर्निचरच्या सापटीत, दाराच्या फटीत,सांदीकोपऱ्यात अदृष्य होऊन जात.बरं त्यांचे प्रकार तरी किती, लहान,मोठी,काळी, तपकिरी,उडणारी,तुरुतुरु

चालणारी... अरे देवा, आम्ही अगदी हैराण झालो.मला त्या उंदीर आणि पुंगीवाल्याच्या गोष्टीची राहून राहून आठवण येऊ लागली.त्या गावातील लोक उंदरांमुळे कसे त्रस्त झाले असतील याची कल्पना आली . वाटलं, आपल्यालाही एखादा पुंगीवाला भेटला तर!

 बरं घरात बाळंतीण मुलगी आणि तान्हं बाळ.... त्यामुळे पंप मारणे,पेस्ट कंट्रोल वगैरे शक्यच नव्हते.मग काय बरं करावं? विचार करून करून डोकं शिणलं.बरं झुरळांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढत होती.आता तर ती कसबी गिर्यारोहकाप्रमाणे भिंतीवर चढत होती, बिनदिक्कतपणे जमिनीवर पकडापकडी खेळत होती आणि आम्ही मारायला गेलो की आमच्याशी लपंडाव खेळत होती.इतकी निगरगट्ट झाली होती की 'ये आम्हाला पकडायला म्हणून समोर येऊन नाचत आणि केरसुणी आणावी तर कानाकोपऱ्यात गुडूप होऊन जात.एकीकडे तान्ह्या बाळाच्या लीलांचा आनंद आणि दुसरीकडे झुरळांचा उच्छाद!कोणी म्हणे अमुक करा, झुरळं कमी होतील, कोणी म्हणे तमुक करा, सर्व उपाय करुन झाले...फक्त तांत्रिक, मांत्रिक, गंडेदोरे राहिले.

झुरळांचा नायनाट करण्याचे सर्व प्रयत्न केले पण रामा शिवा गोविंदा!

  एक दिवस बाळाच्या मच्छरदाणीत झुरळ सापडलं आणि माझा संयम सुटला.त्या तान्ह्या, कोवळ्या जीवाला काही झालं असतं तर? माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या.आमचे हे झुरळांवरचे प्रयोग आमच्या कडे कामाला असलेल्या पारुबाई रोज बघत होत्या.आज हताशपणे मी रडताना पाहून त्या म्हणाल्या,'ताई, तुम्ही आतापर्यंत इतके प्रयोग करून पाहिले, आता माझं ऐका,या सगळीकडे जाळ्या ठोकल्यात ना त्यातल्या एकीची थोडी फट उघडा.'

 'छे ग बाई ', मी घाबरुन म्हटलं,पाल आली तर?'

 'म्हणूनच तर म्हटलं,'पारुबाई बादलीत फडकं पिळत म्हणाल्या,'आमच्याकडे तुमच्या सारखं पेष्ट कोंट्रोल,पंप परवडेल का? आम्ही हाच उपाय करतो.एक पाल आली तरी हा प्राब्लम सुटंल.'

  'पण पाल विषारी असते ना,अन्नात पडली तर?'मला कल्पनेनेच शहारा आला.

 'अहो ताई,आपण अन्न उघडं ठिवतो का?कायम झाकून ठिवतो ना?आन् पाल झाकन उघडून अन्नात उडी मारणारा हाय व्हय? तिला तिचा जीव प्यारा नाही?आपन वावरत आसताना पाली लपून बसत्यात.झुरळांवानी बेशरम नसत्यात त्या!'पारुबाई म्हणाल्या.रोज झाडताना आम्ही गारद केलेल्या झुरळांची कलेवरं त्या गोळा करत होत्या ना!

 हो नाही करता करता धडधडत्या हृदयाने मी जाळीचा कोपरा उघडला आणि काही काळाने पालीने त्यातून प्रवेश केला.पारुबाईने म्हटल्याप्रमाणे वेगाने पाल झुरळांचा फडशा पाडू लागली असावी कारण त्यांची संख्या रोडावू लागली.

  लहानपणी आपण विज्ञान विषयात अन्नसाखळी शिकलो होतो.जर अन्नसाखळीची एखादी कडी काही कारणाने तुटली तर वाचलेल्या प्राण्यांची बेसुमार वाढ होते.आमच्या घरातील झुरळांचेही काहीसे तसेच झाले असावे.त्यांच्या उत्पत्तीला चाप न बसल्यानेच त्यांची अमर्याद वाढ होत होती.

काही दिवसांतच झुरळांचा नायनाट झाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.मी तर आनंदाने मी कात टाकली च्या धर्तीवर 'मी पाल पाळली 'असे गाणे गुणगुणू लागले.

 खरी मजा तर पुढेच आहे... एकदा आमच्या बाळाला मांडीवर घेऊन खेळवत बसले होते.बाहेरचं दार उघडं होतं.आमच्या समोरच्या घरात एक अहिंसावादी कुटुंब रहातं.त्यातील कुटुंब प्रमुखाने झाडूने अनेक झुरळांना बाहेर काढले.आणि चक्क एका फडक्याने त्या झुरळांना आमच्या घराच्या दिशेने हाकलू लागला.विश्वास‌ बसत नाही ना? तुम्हाला वाटेल काय फेकू बाई आहे ही! पण हे दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.आईशप्पत!

मी त्याचे हे कृत्य बघत आहे हे लक्षात येऊन समोरच्याने गडबडीने दार बंद केले.हे बरंय...म्हणजे पाहुण्याकडून साप मारणेच झाले की!

दर तीन चार महिन्यांनी झुरळांची कुमक कुठून येत असे त्याचा असा छडा लागला.

झुरळांची ती फौज मिशा परजत आमच्या घराकडे कूच करु लागली.पण आता मात्र मी त्यांच्या आक्रमणाला घाबरत नव्हते.एक दीर्घ श्वास घेतला आणि दीवारच्या शशी कपूरच्या ष्टाईलने मी त्या झुरळसेनेला म्हटले,'मेरे पास पाल है'


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy