Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

काळ्याचं पांढरं

काळ्याचं पांढरं

6 mins
207


 कधी नव्हे ते उन्मुक्तराव घरी होते. तसे ते गावचे उप सरपंच होते परंतु सरपंच पदाचाही कारभार सांभाळत होते कारण सरपंच केवळ नामधारी होत. उन्मुक्तराव म्हणतील तेथे अंगठा लावत असल्यामुळे उन्मुक्तराव सर्वेसर्वा होते. त्यादिवशी सकाळी ग्रामपंचायतच्या कार्यालयात जाऊन आल्याबरोबर त्यांनी पत्नीजवळ बऱ्याचशा नोटा दिल्या आणि म्हणाले,

"हे आपल्या त्या 'काळा- पांढरा पैसा' या खात्यात जमा कर. व्यवस्थित सांभाळून ठेवतेस ना? नाही तर मी पंचायत लुटत राहायचो आणि तू गोरगरीबांवर लुटून मोकळी होशील..."

"नाही. नाही. तसे काही नाही. तुम्ही सांगितले ते मी पक्के लक्षात ठेवले आहे. तो काळा पैसा आहे. त्याला हात लावायचा नाही. एकदा का तो काळा पैसा पांढरा झाला की, मग बघूया. आज ग्रामसेवक आलेत वाटते?" पत्नीने अचानक विचारताच काही क्षण गोंधळलेल्या उन्मुक्तरावांनी विचारले,

"तुला कसे माहिती?"

"अहो, तो ग्रामसेवक आला की, तुमच्या हातात काळा पैसा खुळखुळत राहतो. मला सांगा, एवढा सारा पैसा काळा कसा काय होतो हो?"

"तुला सारे सांगतो, पण मला एक सांग, तू हे आपलं काळ्या पैशाचं गुपित कुणाला सांगितले तर नाहीस ना? नाही तर धुणं धुवायला गेलं, रस्त्याने कुणी भेटलं, देवाळात कुणाशी गाठ पडली आणि तुला कुणी 'सरपंचीन बाई' म्हटलं की, तुझ्यातला बेडूक लगेच टम्म फुगायचा आणि मग आपलं 'काळ- पांढरं' सांगून मोकळी होशील."

"तुमचं बरोबर आहे. बायका खोदून खोदून विचारतात पण मी कुणाला थांगपत्ता लागू देत नाही. मला एक सांगा ना, अहो, एवढा काळा पैसा मिळतो कसा हो?"

"अगं, दिल्ली आणि मुंबईहून गावचा विकास करण्यासाठी पैसा निघतो ना तो आपल्या गावापर्यंत येईपर्यंत बराचसा कमी होतो..."

"तसे का?"

"हे बघ, आपण प्रवासाला जाताना प्रत्येक स्टेशनवर प्रवाशी उतरत जातात की नाही? तसेच आहे, समजा दिल्लीहून आपल्या गावासाठी शंभर रुपयाचा निधी निघाला तर प्रत्येक स्टेशनवर उतरत- उतरत आपल्या गावात येईपर्यंत पंधराच रुपये राहतात. पंच्याऐंशी रुपये तिकडेच 'काळ्या पैशाच्या' रुपाने कमी होत जातात..."

"फक्त पंधरा रुपये? आणि मग कामाचं काय?"

"पुढे तर ऐक... आलेल्या पंधरा रुपयातून उप- सरपंचांचे म्हणजे माझे सहा रुपये, तीन रुपये सरपंच बाईचे आणि तीन रुपये ग्रामसेवकाचे! उरले किती तीन रुपये! त्यातून ज्या योजनेसाठी हा निधी आलेला असतो तो तिथे खर्च करायचा असतो."

"बाई! बाई!! बाई!!! काय पण गणित पक्के आहे हो सगळ्यांचे म्हणूनच रस्ते आठ दिवसात उखडतात, शाळेच्या खोलीवरचे पत्रे पहिल्या वावटळीत उडून जातात. बांधलेले संडास दुसऱ्या दिवशी चोक अप् होतात..."

"अगं, तू विरोधी पक्षात तर गेली नाहीस ना?" उन्मुक्तरावांनी वेगळ्याच शंकेने विचारले.

"अहो, विरोध काय आजचा आहे? आपण एकमेकांना हार घातले आणि जसे एकमेकांचे पती- पत्नी झालो तसेच एकमेकांचे कट्टर विरोधकही झालोत.'पती-पत्नीची संसारात विरुद्ध नीती असते.' असे कुण्यातरी मालिकेत सांगितले आहे. मला सांगा, आपले एखादे वेळी तरी पटकन एकमत झाले आहे, असे तुम्हाला तरी आठवते का?..."

"ते आहे मात्र! पण तू फार हुशार आहेस बरे..."

"अगं बाई, खरेच का? चला, इतक्या वर्षांनी तुम्हाला आज का होईना कळले. नशीब माझे, आज घरी आहात म्हणून कळले. तुमचे माझ्याकडे आजकाल लक्षच नाही हो."

"अगं, लक्ष असते गं पण या राजकीय धांदलीत पायाला भोवरा लावून फिरावे लागते. आता ग्रामपंचायत आहे, उद्या पंचायतसमिती असणार आहे, परवा जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी..."

"माय... माय! केवढी ही नामावली! एवढ्या बायकांशी तुमचे संबंध..."

"घातली मातीत हुशारकी! अग, ही बायकांची नावे नाहीत..."

"मला सारे माहिती आहे. शेवटी मीही निवडून आलेली नसली तरीही 'सरपंचीन बाई' आहे म्हटलं. ही एक-एक राजकीय पायरी आहे. जी तुम्हाला भविष्यात चढायची आहे. त्यामुळे तुमची कामे वाढणार, घराकडे, माझ्याकडे फारसे लक्ष असणार नाही. अहो, काय हो, तुमचा तो जिल्हा परिषद सदस्य असलेला मित्र आला नाही हो अशात..."

"कोण? जयंत? अग, त्याच्यामागे लागलीय ईडी..."

"बाप रे! ईडी? फार भयंकर की हो. 'पडता ईडीशी गाठ, मान राहत नाही ताठ!' मला सांगा, तुमचे तर त्याच्याशी काही पैशाचे संबंध आले नाहीत ना? त्याला एखादी ग्रामपंचायतची पडीक जागा कमी भावात तर विकली नाही ना? काय म्हणतात ते मनी लाँड्रीग... माहिती आहे. शब्द चुकलाय पण समजून घ्या. त्याने तुम्हाला काही रक्कम काळी- पांढरी करायला तर दिली नाही ना? आपल्या घराचे नाव आहे, आई! त्याने काही रक्कम, सोने त्याच्या आईला देताना डायरीत लिहिले असेल 'आई' ला दिले. तर तुमची आणि त्याची घनदाट मैत्री सगळ्या जगाला माहिती आहे. उगीच आपल्या मागे ईडीचा फेरा लागू नये म्हणजे झाले..."

"तुला बरीच माहिती आहे गं."

"तुम्ही घरी नसता. मग काय टीव्ही आणि मी म्हणजे जणू जीवश्च कंठश्च मित्र! सिनेमा, गाणी, मालिका पाहून कंटाळले की, लावते अधूनमधून बातम्या... त्यातही तुमच्या पक्षांशी, मित्रांशी संबंधित असलेल्या बातम्या हमखास पाहते."

"चांगले आहे. तुला सांगतो, जयंतच्या मागे तू समजतेस ती ईडी लागली नाही तर तो आता शिक्षण सभापती झालाय. ईडी म्हणजे 'एज्युकेशन डिपार्टमेंट!' कळलं?"

"आणि तुमचा तो मुंबईचा मित्र... राजेश!"

"आज काय सीबीआय चौकशी सुरु केली आहे, बाईसाहब! राजेश, चांगला आहे की..."

"का हो,त्याला अशा बायका आहेत तरी किती?"

"म्हणजे?"

"अहो, आत्तापर्यंत तुमच्या राजेशची चार लफडी उजेडात आली आहेत. प्रत्येक बाई रडू- रडू टीव्हीवर सांगते, माझे राजेशशी लग्न झाले आहे. कुणी म्हणते राजेशकडून मला दोन मुले आहेत. एक म्हणते मी राजेशच्या तीन लेकरांचा सांभाळ करते तर तिसरी म्हणते की, राजेशने लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला. काही मित्रांनाही तो घरी घेऊन येत असे. या मित्रांमध्ये तुम्ही तर नाहीत ना? मध्यंतरी मुंबईच्या चकरा वाढल्या होत्या म्हणून शंका..."

"छे! छे! तसे काही नाही गं. तुझा आपला उगाच संशय."

"संशय नाही हो, तिने काही व्हिडीओ- ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहे. त्यात म्हणे मित्रांचाही उल्लेख आहे."

"असू दे ना. कर नाही त्याला डर कशाला? बरे, आत्ता दिलेल्या नोटा ठेवल्या ना व्यवस्थित?"

"अरे, बाप रे! हे बघा, हातात घेऊन सोफ्यावर बसली आहे. ठेवून येते..." असे म्हणत सौ. उन्मुक्त घरात गेल्या. उन्मुक्तरावांनी घराचे मुख्य दार बंद केले आणि आत बघत म्हणाले,

"अगं, तुझी ती बँक बाहेर आणतेस का? किती जमलेत ते तरी मोजूया."

"अहो, बाहेर आणता येणार नाही. तुम्हीच इथे या..." बायको म्हणाली आणि उन्मुक्तराव आत गेले. तिथले दृश्य पाहून त्यांना चक्कर आल्याप्रमाणे झाले. त्यांनी घाबरून विचारले,

"हे.. हे.. काय? असे का केलेस?"

"अहो, तुम्ही तर म्हणालात ना, काळ्याचे पांढरे करायचे आहेत त्यासाठी आधी नाणी आणि नोटा यांना काळे तर करावे लागेल ना?..."

"म्हणून हे काय केलेस?"

"काही नाही, रस्त्यावर डांबर टाकून रस्ते मजबूत करण्यासाठी ज्या डांबराच्या टाक्या आणल्या होत्या, आपल्या घरासमोरील रस्त्याचे काम सुरु असताना, तुम्ही घरी नाहीत हे पाहून एक अर्धी भरलेली टाकी आणून ठेवली आणि त्यात तुमचा सारा पराक्रम टाकत होते... हा असा..." म्हणत सौ. उन्मुक्त यांनी हातातील साऱ्या नोटा एक-एक करीत टाकीत टाकल्या आणि विचारले,

"शंभरदा सांगितले होते, आपल्याला काही कमी नाही, या दोन नंबरच्या कमाईच्या भानगडीत पडू नका. पण ऐकले नाही. आज मुद्दाम घरी राहिलात. राजेशच्या त्या बाईने तुमचे नाव घेतले आहे. तुम्हाला तिच्या घशात लाखो रुपये घालायचे आहेत. म्हणून माझ्याजवळ जमा केलेल्या पैशाची आठवण झाली ना?"

"अगं पण आता तिला काय देऊ?..." उन्मुक्तरावांनी पटकन विचारले आणि एका क्षणात त्यांच्या लक्षात आले, आपण नको ते बोलून बसलो नि फसलो. ते ऐकताच बायको कडाडली,

"म्हणजे सारे खरे आहे तर..."

"हो... हो... खरे आहे. त्या राजेशने आम्हाला फसविले. मी फक्त एकदाच गेलो होतो..."

"प्रश्न कोण किती वेळ गेले होते याचा नाहीच तर तिथे गेला होता हे महत्त्वाचं आहे आणि तिने तोच धागा पकडला आहे. का हो फार सुंदर आहे का ती? असणारच म्हणा. त्यावेळी पैसे... पैसे कसले किती बंडल फेकले होते हो?

"प.. प.. पाच लाख..."

"मग तर ती खूप चलाख तर आहेच पण चाणाक्षही आहे हो. आता किती मागत आहे?"

"स... सात कोटी...आता काय करायचे?"

"आता हे..." असे म्हणत पत्नीने कपड्यात बांधलेले एक गाठोडे त्यांच्यापुढे टाकले. त्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघणाऱ्या उन्मुक्तरावांना ती म्हणाली,

"हे माझे दागिने आहेत. लवकर घेऊन जा. त्याची जाळभाज करा नि त्या वेशेच्या तोंडावर फेकून या..." तितक्यात घराचे मुख्य दार दाणदाण वाजत असल्याचे पाहून उन्मुक्तराव लगबगीने बाहेर आले. दारात उभ्या असणाऱ्या अनोळखी माणसांकडे बघत असताना त्यांच्यापैकी एकजण पुढे होत हातातील ओळखपत्र दाखवत म्हणाला,

"सीबीआय..." ते ऐकता क्षणी उन्मुक्तराव खाली कोसळत असताना पत्नीने त्यांना सांभाळले...



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy