Swapna Sadhankar

Classics

2  

Swapna Sadhankar

Classics

काही मंतरलेले दिवस (अकरा)

काही मंतरलेले दिवस (अकरा)

3 mins
128


"एज इज जस्ट अ नंबर!" बरोबर! माणूस मनाने सदैव तरुण राहूच शकतो. मनातलं मूल जागं ठेवलं तर त्याच्यातला उत्साह कायम खेळत बागडत राहू शकतो. वयापरत्वे अनुभव तेवढे वाढत जायला पाहिजेत असं मला वाटतं. आत्ताच एक नवीन अनुभव माझ्या हाती लागलाय म्हणून हा शब्दांचा घाट. तसं तर मैत्री ह्या माझ्या आवडत्या विषयावर मी नेहमीच लिहीत असते. ह्यावेळी ह्याच्याकडे बघताना एक चाळिशीतली सर्वसामान्य घरघुती स्त्री म्हणून मला वेगळं काही सांगावसं वाटतंय..... शाळेनंतर पुढचं शिक्षण, करिअर, लग्न, संसार, मुलं आणि त्यांचं संगोपन ह्यात स्त्री अलवार रमून जाते. आपल्या जोडीदाराच्या साथीने सगळं कसं छान सांभाळत असते. स्वतःला ही! आता घर हा तिचा एक अविभाज्य हिस्सा झालेला असतो. मित्रपरिवार असतो, भेटीगाठी असतात, फिरायला जाणे असते, मौज ही करतात. हे करताना कितीही नाही म्हटलं तरी स्त्रीचं मन सतत घरातच घुटमळत असतं. ती बाहेर असो वा एखाद्या कामात तिचं एक लक्ष, हो एक लक्ष,.. तिचं घर, मुलं, नवरा ह्यावर लागलेलं असतं. एक आधुनिक स्त्री म्हणून आपली स्पेस वगैरे ती घेत असली तरी देखील घरातून पूर्णपणे पाय काढता घेणं तिला जमतच नाही. 'असं नाही करणार मी' हे तिने कितीही ठरवू देत तरी देखील. कधी कधी ह्यासाठी स्वतःचाच् अगदी तिटकारा करणारी ती काही क्षणातच परत आपल्या वृत्त्तीवर हाजिर. म्हणूनच ती आई, बहीण, बायको, मुलगी म्हणून आवडते. कित्ती टिपिकल वाक्य ना हे!? पण खरं आहे. ती सतत कुठल्या ना कुठल्या भूमिकेत सज्ज असते. मग ती तिच्या स्वतःच्या भूमिकेत कधी असते? तर तुम्ही म्हणाल की ती जेव्हा आपलं कर्तृत्व गाजवत असते तेव्हा. तर नाही. तेव्हाही ती एक भुमिकाच निभवत असते. तिला एक स्त्री म्हणून (इथे मी व्यक्ती किव्हा माणूस मुद्दामून म्हणणार नाही) पाहायचे असेल तर ती जेव्हा तिच्या सख्ख्या सख्यांनी घेरली असते तेव्हाच. इथेही ती घर मागे सोडून वगैरे आलेली नसतेच. तसं तिला करायचही नसतं. घर मनात घेऊनच आलेली असते ती. पण तिचं ते मन आज शाळेतल्या बगीच्यातलं फुलपाखरू झालं असतं. अप्लजिवी पण हलकं, मोकळं. रंगीबेरंगी फुलांवर बसून त्याचा आस्वाद घेणारं सुवासिक... तुम्हाला हे खरंच अनुभवायचं असेल तर शिरावं लागेल तिच्या त्या कोशात. मी अनुभवलं इंद्रधनुच्या सात रंगांना त्यांच्या कोशात शिरून. सात अगदी भिन्न छटांच्या माझ्या सख्यांसोबत घालवलेला तो वेळ खूप काही उलगडून गेला. आता मी आले आपल्या औकात वर... प्रत्येकीचं आयुष्य एक आगळी स्टोरी, बऱ्या वाईट अनुभवांचा बटुवा जसा. जाणवत होते हास्या पल्याड दडलेले काही सीक्रेट्स आणि खाचखळग्यातून वर आलेले यश. बरच काही होतं सांगण्यासारखं आणि काही उडवून लावण्यासारखं. शाळेपासून आजवरचा प्रवास अनोळखी होता एकमेकींना, तो मांडण्याची फारशी गरजच वाटत नव्हती. भासत होता थोडा विसावा विचारांचा आणि होती इथवरचा पडाव गाठल्यानंतर मागे वळून पाहतांना समोरच्या पर्वाची चाहूल. प्रगल्भतेच्या उम्बरठ्यावर आलोत हे स्पष्ट जाणवत होतं. तरी मन उधाण वाऱ्याचं होऊ पाहत होतं. गप्पांचा ग्राफ उंचच उंच जायला लागला होता, चढाओढ होती नुसती उंच झोका घेण्याची. विषयाला कमी नव्हतीच, शब्दांना पाझर फुटला होता. जिथे कुठेही होतो तिथे कम्फर्ट झोन मध्येच असल्यागत, उबदार घेराव्यात सुरक्षित. जे काही करत होतो त्याला आनंदाची झालर लागली होती, हास्याची वेलबुट्टी उठून दिसत होती. ही सुंदरतेची लाली चेहऱ्यावर खुलून आली होती, डोळ्यात गर्दी करणाऱ्या चांदण्या झोपेला शिरूच देत नव्हत्या. त्या गोंधळातही मन समाधानाशी शांतपणे हितगुज करू शकत होतं. आताही लिहिताना त्या कोशात शिरले तर वाटतंय लेखणी त्या भावनांना न्याय देऊच शकत नाही आहे. हुबेहूब क्रमवार वर्णन करायला शब्दांची पकड त्या वातावरणाला सीमित नाही करू शकत. बालपणीच्या परीच्या जादुई कांडीने फिरवलेला तो वेळ ना, खरंच "मंतरलेले दिवस". तिथून निघून परत आपल्या घरात समावलो खरं, पण मैत्रिणींचा हात हातात घेऊन.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics