parth yerne

Inspirational

3  

parth yerne

Inspirational

झगडा

झगडा

8 mins
170


  एक खेडे गाव. त्या गावाचे नाव नवरगाव होते. त्या गावात भरपूर शेतकरी राहत होते. पण त्या गावात धनगर समाजाची लोकं राहायची. त्यात काही ब्राम्हण समाजाचे लोक राहायचे. धनगरी समाजातील ‘गोमाजी' नावाचा एक माणूस आणि ‘पंढरी’ हा ब्राम्हण समाजातील दुसरा माणूस होता. त्या दोघांचे घर जवळजवळ होते. तिथेच ढिवर समाजाचे चार-पाच घरे होती. त्यातलाच एक पिंटू तिथे राहायचा. गोमाजी पंढरी आणि पिंटू या तिघांचीही शेती जवळ-जवळ होती.


  गोमाजी शेतात धान पेरणार होता म्हणून गोमाजी शहरात गेला. एका कडधान्य दुकानात जाताच त्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य दिसले. परंतु गोमाजी चिंतेत पडला की, मी आता कोणत्या प्रकारचा धान घेऊ? कारण दुकानात खूप प्रकारचे धान होते. गोमाजी चिंतातूर झाला व दुकानदारास म्हणाला, ‘मला धान घ्यायचे आहे पण ते कोणते घ्यावे काहीच सुचेना. मला काही नमुने घरी नेण्यास्तव द्याल काय? माझ्या बायकोला विचारून मी एकदाचे ठरवून परत खरेदीस येणार.’ दुकानदाराने त्याला काही प्रकारचे धान्य दिले व तो गावाकडे परत आला.


  काही वेळाने गोमाजीची पत्नी शेतावरून घरी आली. तेव्हा गोमाजी म्हणाला. ‘अगं! मैना इकडे ये.” त्याने तिला धानाचे नमुने दाखविले त्यातील तिला काळे धान आवडले होते. कारण ते नवीन प्रकारचे धान होते व बाजारात यंदा मागणीही चांगली राहणार असे तिला वाटले. शेवटी त्यांनी यंदा काळे धान पेरण्याचा विचार पक्का केला.


  आता गोमाजी विचार करू लागला. आपण धान किती घ्यायचे. दुसर्‍या दिवशी गोमाजी शहरात त्याच दुकानात गेला. तो म्हणाला. “माझ्याकडे तीन बांध्या आहेत. तर मला किती धान पेरावे लागेल.”

  “तुझ्या तीन बांध्या किती एकराच्या आहेत.” दुकानदाराने विचारले.

  “माझ्या तीन बांध्या तीन एकर आहेत.”

  “तर तुला ६० ते ७० किलो धान पेरण्यासाठी लागतील.”

   “तर ६० किलोचे पैसे किती होतील?”

  गोमाजीने दुकानदारास विचारताच त्यांनी हिशेब करून सांगितले.

  “एक हजार तीनशे वीस रुपये होतील.”

  गोमाजीने आपल्या शर्टच्या खिशातून पैसे काढून मोजले व दुकानदारास दिले.

  “हे घ्या...”


  गोमाजीनंतर गावाकडे आला. ही गोष्ट पंढरीला माहीत झाली. पंढरीही काळे धान घेण्यासाठी शहरात गेला. त्या दुकानात दुकानदाराला बरोबर दिसत नव्हते.  

 पंढरी दुकानदाराला म्हणाला, “मला काळे धान पाहिजे.” 


  पंढरीने यापूर्वी कधीही काळे धान पाहिले नव्हते. दुकानदाराला बरोबर दिसत नव्हते म्हणून काळे धान देण्याऐवजी ‘श्रीराम’ धान दिले. पंढरी पहिल्यांदाच शेती करीत असल्याने त्याला शेतीचा अनुभव नव्हता. त्याच्या बापाने त्याला एक एकर शेत हिश्श्यात दिले होते. त्यामुळे त्यांने वीस किलो धान्य घेतले. पंढरीने धान्याचे ४४० रुपये दिले. पंढरी धान्य घेऊन गावाकडे परतला.


   जुलै महिन्यात मिरुगाची सुरुवात होताच दोघांनीही आपआपल्या शेतात पहिला पाऊस येताच परे पेरले. दोघेही खूश होते. परे अंकुरले. पण आठ दिवसांनी पाऊस येईनासा झाला. ऊन तापू लागले तसेच परेही करपू लागले. दोघानांही चिंता वाटू लागली. पंढरीला शेतात पाणी लागत होते. म्हणून गोमाजीच्या शेताला चिपकून असलेल्या सरकारी नहरातील पाणी घेण्याचे त्याने ठरविले.  


   गोमाजी अगोदरच पाणी घेत होता. मग पंढरीनेही आपल्या शेतात रात्रौला पाठ वळवून पाणी केले. तेव्हा गोमाजीची पार बुजवली गेली. यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांचे भांडण झाले. गोमाजीच्या पत्नीला माहीत झाले. ती काही गावकऱ्यासह शेतावर गेली. वादविवाद सुरूच होता. कसेबसे ते भांडण थांबले.


  दुसर्‍या दिवशी मैनाबाई आणि पंढरीची बायको सखुबाई या दोघींनी नळावर पिण्याचे पाणी घेतांना वादविवाद केला. एक महिना असेच चालू राहिले. हा वादविवाद गोमाजी आणि पंढरी या दोघांपासून त्यांच्या पत्नीपर्यंत जात ही गोष्ट पोलिस स्टेशनपर्यंत गेली. 


  गोमाजीने विचार केला. आता आपण आपल्या शेतात बोअरवेल करायची. गोमाजी गावच्या बोअरवेल मशीन एजंट प्रकाश पाथोडेकडे गेला. प्रकाश बोअरवेलचे काम करायचा. त्याचे घर गावातच गोमाजीच्या घराच्या जवळ होते.

  “मला आता शेतात बोअरवेल करायची आहे. तर मला माझ्या शेतात बोरवेल केव्हा खोदून देणार?” गोमाजीने प्रकाशला विचारले.

  “हो का? ठीक आहे. आता माझी मशीन बाहेरगावी गेली आहे तर तुम्हाला आठ दिवसांनी बोअरवेल करून देतो.” प्रकाशने त्यांना सांगितले.


  नंतर गोमाजी घरी आला. गोमाजीने आपल्या बायकोस सांगितले. त्याची बायको खूश झाली. त्याने जेवण केले आणि शेतावर गेला. काही वेळात पंढरी तिकडे आला. त्याला बघून गोमाजीला रागही आला. गोमाजीने काही वेळाने घरी जायचे नाटक करीत रस्त्याने जाऊ लागला. हळूच एका झाडावर चढला आणि पंढरीकडे लक्ष ठेवू लागला.


  काही वेळाने पंढरी नहराचे पाणी आपल्या शेतात घेऊ लागला. गोमाजी झाडावरून उतरला आणि लपूनछपून शेताकडे गेला आणि पाहतो तर काय? पंढरी आपल्या शेतात पाणी घेत होता. मग गोमाजी आणि पंढरी या दोघात परत वाद झाला. या वादविवादात पंढरीने गोमाजीला खूप मारले. गोमाजीनेही पंढरीला खूप मारले. काही वेळातच गावकरी जमा झाले. त्यांना गावकरी पाहात होते. पण कुणाचीही झगडा सोडवायची हिंमत होत नव्हती. कारण पहिल्यांदा एक गावकरी त्यांना सोडवायला गेला तर त्यालाही त्यांनी खूप मारले होते आणि तो रुग्णालयात भरती झाला होता. म्हणून कोणाची हिंमत नव्हती होत की आपण यांच्या वादात पडावे.


 एका गावकर्‍याने सरपंचाला फोन केले आणि सांगितले. “सरपंचजी आपल्या गावातला गोमाजी आणि पंढरी या दोघात वादविवाद चालू आहे. या दोघांना सोडविण्यासाठी कोणीही जात नाही कारण की, एका गावकर्‍याला खूप मारले म्हणून... सध्या तुम्ही येता काय?”

 सरपंचाला माहिती मिळताच बरे वाईट होऊ नये म्हणून, “हो! मी आता दहा मिनिटात तिथे येत आहे. तुम्ही कुणीतरी त्यांनचा झगडा सोडवण्याचा प्रयत्न करा. मग मी आल्यावर काय आहे ते पाहतो?”


  सरपंच लगेच आले. दहा मिनिटातच गोमाजीने पंढरीला खूप मारले होते. त्याच्या डोक्यावरून खूप फुटले होते. रक्ताची धार दंडात सांडली होती. सरपंच त्यांना सोडवायला गेले. तेव्हा गोमाजीच्या हातात असलेली काठी सरपंचाच्या पायावर जाऊन बसली. सरपंचाचा पाय मुरगळला.  

  “आता मी काही यांचा झगडा सोडवत नाही.” सरपंच विव्हळत म्हणाले. सरपंचाने थोड्या वेळातच आपल्या मोबाईलवरुन पोलिसस्टेशन मध्ये फोन केला. त्यांचा वाद काही थांबेना. अर्ध्या तासात पोलिस आले. पोलिस येणार म्हणून सगळा वाद थांबलेला.

  लवकरच पोलिस आले. पोलिसांनी दोघांनाही समजाविले व दम दिला.

  “यापुढे तुमचे भांडण झाल्यास दोघांनाही ठाण्यात बंद करण्यात येईल.”

 पंढरी आणि गोमाजी दोघेही पोलिस खाक्या पाहून खाली मान घालून काही वेळातच मागेपुढे घरी आले. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला माहीत झाली.

  “आपण आपल्या शेतात बोअरवेल केली तर....?” सखुबाई आपल्या नवऱ्यास म्हणाली. जेवण केल्यावर पंढरी प्रकाश पाथोडेकडे आला आणि शेतात वाद झाले ते सांगत प्रकाशला बोअरवेल मारून देण्याची विनंती करतो.

 दुसऱ्या दिवशी प्रकाश बोरवेल मशीन घेऊन पंढरीच्या शेतात बोअर मारायला गेला.  

 “पंढरीच्या शेतात बोअर आली आहे तर तुझ्या शेतातही बोअर मारून देतो.” प्रकाशने गोमाजीलाही फोन करून लगेच तुझ्याही शेतात बोअर मारून देणार म्हणून बोलाविले.

 पंढरीच्या शेतात पहिल्यांदा गेल्याने गोमाजीला या बाबीचा राग आला.

 “नाही, नाही. मला माझ्या शेतात आता बोअर नको मारून देऊ. पंढरीने आता त्याच्या शेतात बोअर मारली तर तो नहराचे पाणी घेणार नाही. नहराचे पाणी मीच घेणार. म्हणून मला माझ्या शेतात बोअर मारून देऊ नको.”

  पंढरीची बोअर मारून झाली. प्रकाशने बोअरवेल मशीन परत शहराकडे पाठवली.


  पिंटू ढिवर शहराकडे काम करायचा. त्याचे वडील काही दिवसापूर्वी वारले होते. आई एकटी राहत होती म्हणून शहरातील कामधंदा सोडून नवरगाव मध्ये परतलेला. पिंटूला गावात धंदा टाकायचा होता. पिंटू शहराकडे पैसे कमवण्यासाठी गेला होता. पिंटूने शहरातून एक जेसीबी बोलावली. पिंटूने आपल्या शेतात एक मोठा खड्डा खोदला. पिंटूने नहराचे पाणी घेतले. जेव्हा पिंटू पाणी घेत होता, तेव्हा गोमाजी आला. आता पिंटूशी वादविवाद करू लागला. काही गावातले लोक गोळा झाले. त्या दोघांची मारामारी सुरू झाली. गावकरी त्यांना सोडवायचे प्रयत्न करत होते. त्यांची मारामारी सोडवण्यास काही वेळाने गावचे सरपंच आले.

  “पिंटू, तुला पाणी दररोज लागेल काय?” सरपंचाने विचारले.

  “नाही जी.. ! मला महिन्यातून एकदा पाणी लागेल.”

  “आणि गोमाजी तुला.... दररोज पाणी लागेल काय?”

  “हो, धानाला बरेचदा लागेल. सरपंच...”

  “महिन्यातील एक दिवस पिंटू तू पाणी घेऊ शकतोस.”


  सरपंचाने पिंटूला महिन्यातील एक दिवस पाणी देण्याचे ठरवले आणि गोमाजीलाही सांगितले की, “याच्यापुढे तू पिंटूशी भांडलास तर तुला पोलिसात देईन. कारण की तू अनेकदा पाण्यासाठी झगडा केलेला आहेस. म्हणून तू याच्यापुढे आपले मन शांत ठेवून कोणतेही काम करत जा.”


  त्या दिवशी पिंटू पाणी घेऊ लागला. भांडण मिटले. गोमाजीला दररोज पाणी लागत होते. पिंटूला महिन्यातून एकदा पाणी लागणार होते.

 पिंटूने शेतात मच्छी टाका तयार केला होता. म्हणून त्याला पाणी महिन्यातून एकदा लागणार होते. पिंटूने शेतातील टाक्याला पाणी दिले.

 पिंटू पैसे घेऊन शहराकडे गेला. टाक्यात मच्छी सोडायची असल्याने जाळी घेतली, डोंगा बनवण्याचे साहित्य घेतले. सोबत फारी व मोठे वडगे मच्छी ठेवण्यास विकत घेतले. नंतर पिंटू गावाकडे परत आला.


  दुसऱ्या दिवशी पिंटू जंगलात गेला. जंगलातून झाड तोडून आणले. ते झाड घरी आणल्यावर डोंगा बनवायला सुरुवात केली. पिंटू दहा-पंधरा दिवस डोंगा तयार करीत होता. मच्छीची बिजाई आणली ती टाक्यात सोडली. काही दिवसात त्याने शेतात एक झोपडी बांधली. 


  काही दिवसाने तो परत शहराकडे गेला. तो एका कारखान्यात जायचा आणि शहरात राहायचा. एका महिन्यानंतर तो गावाकडे पोहचला. पाहतो तर काय? त्याचे सगळे मासे मेलेले. त्याला वाटले की, माझ्या सगळ्या मच्छया गोमाजीने मारल्यात. पिंटू गोमाजी बाबत बोलू लागला. गोमाजीचा भाऊ महेशने हे ऐकले. आणि त्याने गोमाजीला सांगितले.

  गोमाजीला यातील काहीच माहीत नव्हते.

  “तुझ्या भावाने माझ्या सगळ्या मच्छया नहराचा पाणी घेतला म्हणून मारल्यात.” पिंटूने महेशला म्हटले.

  “पण माझा भाऊ तुझ्या सगळ्या मच्छया कशासाठी मारणार?”

  “त्याला आमचा राग असेल.”


  ही गोष्ट गावात सगळ्या गावकऱ्यांना माहिती झाली. सगळे गावकरी गोमाजीला आता टोचून-टोचून बोलू लागले होते. गोमाजी शेतात असताना पिंटू आला. यातच त्यांचा झगडा सुरू झाला. पण गोमाजी मी तुझ्या मच्छया नाही मारल्या असे सांगत राहिला. चंद्रकांत हा माणूस तेथील शेतात काम करत होता. भांडण बघून त्याने सरपंचाला बोलाविले. सोबत गावकरी आले. तेव्हा हमरीतुमरी वर येवून दोघेही शिव्या देत होती. पिंटूने गोमाजीच्या डोक्यावर दगड मारले.  


  पिंटूने गोमाजीला दगड मारल्याने डोक्यावर जखम झाली. त्याचा जीव जाता-जाता वाचला आणि सगळे लोक त्यांचे भांडण बघत होते. कुणी सोडवायला जायच्या गोष्टी करत होते पण ते घाबरत होते. कारण जे सोडवायला जातील त्यांनाच मार बसला असता. यामुळेच कुणी सोडवायला जाण्यास नकार देत होते.


  लगेच सरपंच त्यांना सोडवायला गेले. सोबत गावकरीही सोडवायला गेले. पण सरपंच सोडवायला गेले असताना एकाएकी दोघांनीही सरपंचाला ढकलले. यात सरपंच तोल जाऊन खाली पडला. त्यांचा हात तुटला आणि पाय मुरगळला. आता त्यांनाच ताबडतोब रुग्णालयात हलवावे लागले. यातच त्यांचे भांडण थांबले.


  आता पिंटू, गोमाजी व सरपंचही रुग्णालयात भरती झाले होते. त्यांना खूप मार लागला. दोन दिवसांनी सरपंच, पिंटू, गोमाजी रुग्णालयातून आपल्या घरी परत आले. सरपंचाने एका गावकर्‍याला त्या दोघांच्या घरी, त्यांना बोलवायला पाठवले. सरपंच त्या दोघांनाही बोलावून विचारू लागले.

  “तुमचा झगडा कसा झाला?”

  “मी याच्या मच्छया मारल्या नाही तरी हा माझ्या मच्छया मारल्या म्हणून मला मारायला धावला.” गोमाजी सरपंचाला आपबिती सांगू लागला.

  “सरपंच, मी कामासाठी शहराकडे गेलो होतो. त्या दिवशी मी पाणी घेतले म्हणून याने माझ्या मच्छया मारल्या.” पिंटूही सांगू लागला.

   सरपंच विचार करू लागले.

  “शहराकडे केव्हा गेलास? तेव्हा तुझ्या मच्छयांना खाद्य कोण द्यायचा?”

  “सरपंच, माझ्या मच्छीला खाद्य कोणीही देत नव्हते.”

  “आता समजलं. तुझ्या सगळ्या मच्छया खाद्य न दिल्याने मेल्यात आणि तू गोमाजीला दोषी म्हणतोस. अरे, अगोदर विचार करावा की चूक कुणाची व कशी आहे?”


   खाद्य न मिळाल्याने पिंटूच्या सगळ्या मच्छया मेल्या होत्या. पिंटूला आपली चूक लक्षात आली व गोमाजीलाही भांडण करण्याची शिक्षा काय असते ते ध्यानात आले. पुढे त्याने सरपंचासमोर स्वतःचे कान पकडत भांडण न करण्याची शपथ घेतली. दोघेही सारे काही विसरून एकमेकांकडे बघून हसू लागले.


Rate this content
Log in

More marathi story from parth yerne

Similar marathi story from Inspirational