Swapna Sadhankar

Classics

2  

Swapna Sadhankar

Classics

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

2 mins
697


'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!' जवळपास सर्वांनाच माहित असलेली ही एक मराठी म्हण. तरी देखील अधिकतम वेळेला आपण लगेच एखाद्या विषयी मत बनवून टाकतो, समोरच्याच्या जागी स्वतःला ठेऊन बघण्याची तसदी न घेताच. मान्य की माणसाची मूळ प्रवृत्ती नुसार त्याच्या हातून बऱ्याचदा नकळत गोष्टी घडतात. पण आपण त्यावर न्याय निवडा करून लगेच मोकळं होतो, हे कितपत योग्य आहे? जर व्यक्तीच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव नाही तर बरोबर कि चूक हे ठरवणे अयोग्य राहील. म्हणून तर म्हणतात ना बघणाऱ्याचा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा... स्वभावाला औषध नाही म्हणतात, मूळ स्वभाव बदलत नसेलही पण परिस्थिती नुरूप त्याला मुरड पडत जाते जसजशे व्यक्तीमत्व घडत जाते. आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा तर निसर्गाचा नियम, कसा नियंत्रित करणार. व्यक्तीच्या अंतरंगाचा जराही ठाव न घेता बाह्यांगी वागण्यावरून त्याच्या विषयी ठोकताळे बांधणे आणि त्याप्रमाणे वागणूक देणे वरकरणी झाले. मग त्यात नात्याची जडण-घडण मजबूत होणार तरी कशी. तसेच एखाद्या विषयाचे किंवा कार्यक्षेत्राचे देखील, जोवर त्याच्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास नसेल तोवर त्यावर ठामपणे बोलणे अथवा स्वमताचा आग्रह धरणे उथळपणाचे झाले. विचारमंथन करून मांडलेले विचार म्हणजे विचारकाची प्रगल्भता!... लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत ठेवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ते जरूर असावे. पण त्याला अहंमान्यचे ग्रहण लागलेले असेल तर त्यात दुसऱ्याच्या मताचा आदर होणे क्वचितच्. या उलट आपल्या मताला वैचारीकतेची किनार जोडली म्हणजे ते उठून दिसतील. वाद होतील पण निकोप, खऱ्या अर्थाने विचारांची देवाण-घेवाण होईल, विषयाला न्याय मिळेल. एकदा का हे जमलं कि सवयच जडते प्रत्येकदा सकारात्मकतेने बघण्याची आणि अनुषंगाने सकारात्मक तेवढेच आत्मसात करण्याची. जे अढळ आहे त्याला अभिप्रेत नाही, पण बऱ्याचदा दिसतं तसं नसतं. पडद्याआड लपलेलं बघण्याचा चष्मा लावण्याची गरज असते. तो चष्मा तय्यार मिळत नाही कुठे तर अनुभवातून चढतो डोळ्यांवर. त्या काचा कुठल्याही बुरसटलेल्या वरचष्म्या शिवाय शुभ्र असतात. त्यातून स्पष्ट बघता आलं कि मन आपसूकच म्हणतं, "कदाचित मीही असच केलं असतं, कदाचित मीही असच वागलो असतो, कदाचित असही बरोबर आहे,..." मग सगळी भिन्न मतं त्या त्या जागी बरोबरच असतील, त्यांचा अनादर होण्याची चूक होणे नाही.......



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics