Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

इमारत कुणाची....

इमारत कुणाची....

15 mins
130


       मी सोफ्यावर बसून एक छान कादंबरी वाचत होतो. नेहमीप्रमाणे समोर टीव्ही सुरु होता. ही माझी नेहमीची सवय होती जी माझ्या बायकोला बिलकुल सहन होत नसे, पटत नसे, सहन होत नसे. टीव्ही लावायचा आणि इतर कामे करीत बसणे, ह्या गोष्टीला बायकोचा कायम विरोध होता. कधी नव्हे ते बायको टीव्हीवरील बातम्या पाहताना किंचाळली,

"अहो, आपल्या राज्यात हे काय चालले आहे?"

"कुठे काय चालले आहे? सारे कसे व्यवस्थित पार पडत आहे. या राज्यात कुणी उपाशी राहत नाही, कुणी भीक मागत नाही, कुणी आत्महत्त्या करीत नाही, कुणावर बलात्कार होत नाही, कुणाचा विनयभंग होत नाही. सारे कसे आलबेल आहे..."

"तुम्ही स्वप्नात तर नाहीत ना? नाही म्हटलं ह्या साऱ्या बाता स्वप्ननगरीतील आहेत म्हणून म्हटलं..."

"ते काहीही असले तरीही तू त्या स्वप्ननगरीत मला क्षणभर तरी रमू देशील का?"

"ते जाऊ द्या हो... बघा. सरकारमधील दोन मंत्री कसे बेताल वागत आहेत. एकमेकांना नग्न करुन झाडाला बांधून मारायची भाषा करीत आहेत. आई-बहिणीवर शिव्या देत आहेत. शोभते का यांना असे वागायला? एका सुसंस्कृत राज्याचे हे दोन मंत्री आहेत ना?"

"आता कळले का तुला, मी टीव्ही लावून का इतर कामांमध्ये का मन रमवतोय ते?"

"बघा तर खरे. हे बघा, खडतर नावाचे मंत्री असा आरोप करीत आहेत की, फडतर या मंत्र्याने त्याच्या गावी असलेल्या स्मशानात म्हणे अकरा इमारती बांधल्या आहेत..."

"अग, ह्याच विषयावर दोन्ही मंत्री स्वतःची बाजू रेटत आहेत. आरोप खरा ठरला तर राजकारण सोडेन असे फडतर म्हणतो आणि खोटा ठरला तर खडतरला त्याच स्मशानभूमीत गाडायची भाषा करतो. महिना झालाय या एकाच बातमीचे रवंथ होत आहे. खडतर- फडतर दोघेही दररोज त्रिकाल कागदरुपी पुराव्यांची जंत्री पत्रकारांसमोर फडकवत आहेत परंतु त्याची सत्यता कुणी पडताळून पाहताना दिसत नाहीत. फडतराची पत्रकार परिषद चालू असतानाच तिकडे खडतर त्याच्या विरोधात कागदांची पुरचुंडी हलवताना दिसतो..."

"थांबा. थांबा. ऐका ना... खडतर म्हणत आहेत की, फडतराने ज्या अकरा इमारती बांधलेल्या आहेत. त्या इमारतीजवळ मी पत्रकार, जनता यांना नेणार नाही तर भ्रष्टाचारातून मिळविलेल्या अब्जावधी बेहिशोबी रकमेतून फडतराने बांधलेल्या इमारतीची वास्तुशांती करुन जमलेल्या सर्वांना जेवण देईल... माझ्या खर्चाने!... "

"अग, ते बघ बाजूच्या चौकोनात फडतर काय म्हणतात ते... तो म्हणतोय खडतराला म्हणावे, इमारती सापडल्या तर जेवण देण्याची जी डरकाळी फोडतोस त्यासाठी लागणारा पैसाही खडतराने भ्रष्टाचाराच्या मार्गानेच आणलेला आहे. नाहीतर याची... रोजाने काम करायला जाणाऱ्या मजुराची काय औकात? दहा वर्षांपूर्वी बायकोला मजुरीला पाठवणारा हा गृहस्थ आज करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या आलिशान इमारतीत राहतो. याची स्वतःची इमारत काचेची आहे, याने दुसऱ्याच्या घरात घुसायचा प्रयत्न करु नये. माझे कार्यकर्ते याच्या घरात घुसले ना तर काचेला नुसते तडे जाणार नाहीत तर काचा चकनाचूर होतील..."

"अग बाई, काय हा उद्दामपणा, केवढा हा निर्लज्जपणा, असे कसे ताळतंत्र सोडले म्हणावे. बरे, मला एक सांगा, मी आज बातम्या ऐकतेय तुम्ही तासनतास ऐकताय तर इतरांचे सोडा पण घसा खरडणाऱ्या, घसा ताणून बोलणाऱ्या वाहिन्यांच्या लोकांनी वातानुकूलित खोलीच्या बाहेर पडून ज्या गावी, ज्या बोळीत त्या इमारती आहेत असा दावा करीत आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन इमारती आहेत किंवा नाही त्याचे रवंथ करावे ना, म्हणजे सोक्षमोक्ष होऊन जाईल, कोण खोटा, कोण खरा ते समजेल ना. किंवा त्या गावच्या लोकांनी आणि हो अहो, त्या गावच्या नगरपालिकेत अकरा इमारतींच्या नोंदी असतील ना..."

"आहेत की. अर्थात खडतराने फडकालेले कागदी घोडे फुरफुर करीत सांगतात की दरवर्षी फडतर या इमारतीचे सारे कर अगदी शौचालय करही भरतो..."

"अहो, मग झाले की, इमारती असल्याशिवाय का कुणी कर भरणार आहे?"

"महत्त्वाचे म्हणजे त्या इमारती फडतराच्या बायकोच्या नावाने आहेत..."

"त्यात विशेष ते काय हो? सारेच भ्रष्टाचारी बायकोच्या पदराआडून भ्रष्टाचाराचे खेळ करतात. इतकेच काय पण तुमच्यासारखे 'लाचरुपी चारीमुरी' खाणारे लोकही बायकोच्या नावे प्रॉपर्टी खरेदी करतात, दागिने जमवतांना स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही साधे कारकून असूनही माझ्या नावे काय काय घेतले आहे ते मला सोडा पण तुम्हाला तरी आठवते का? मी काय म्हणते जिच्या नावावर ह्या अकरा इमारती आहेत ती फडतराची पत्नी काय म्हणते? तिला कुणी विचारले का? तिचे मत जाणून घेतले का?"

"अग, इकडे फडतर-खडतर हे एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत तर दुसरीकडे दोघांच्याही बायका टीव्हीवर भांडत आहेत. त्यांची भांडणे म्हणजे जणू गल्लीतल्या नळावर होणाऱ्या भांडणाप्रमाणे... अग... अग थांब! तिकडे बघ. फडतरचे आव्हान खडतरने स्वीकारले आहे. तो म्हणतोय मी वास्तुशांतीची तारीखही गुरुजींकडून ठरवून घेतली आहे..."

"अहो, इमारती फडतरांच्या आणि वास्तुशांती करणार खडतर कसे जमणार? ज्याचा नावे वास्तू त्याच जोडप्यालाच पूजेला बसावे लागते."

"अग, मुळात इमारती कुठे आहेत तर स्मशानात, मग तिथे कसले आलेत धार्मिक नियम..."

"दुसरे बघा, पूजेची तारीख काय तर एक एप्रिल... जेवणाची वेळ आहे दुपारी बारा ते तीन... झाले! इथेही खडतरने फडतरला मुर्ख बनवले आहे. अहो, हा जागतिक मुर्ख दिन आहे..."

"ते बरोबर आहे, पण अशा वादाच्या प्रसंगी कुणी असे मुर्ख बनवणार नाही. बघ. स्मशानभूमीकडे सामानही नेत आहेत. टेबल, खुर्च्या, पडदे..." मी बोलत असताना बायको मध्येच म्हणाली,

"अहो, एक एप्रिलला... आज तीस मार्च म्हणजे दोनच दिवस राहिलेत की. मी काय म्हणते..." बायकोने मधाळ आवाजात, मदहोश करणाऱ्या नजरेने म्हटले, बायकोने लाडात येऊन अशी विनवणी केली म्हणजे नक्कीच नवऱ्याच्या खिशाला चाट बसणार हे मला अनुभवातून माहिती झाले होते.

"अहो, आपण वास्तुशांतीच्या जेवणाला गेलो तर..." माझ्या अपेक्षेप्रमाणे बायकोने तिचा हेतू सांगितला. बायकोचा लाडिक हट्ट पूर्ण करावाच लागणार होता परंतु तो खर्च टाळण्याचा एक शेवटचा प्रयत्न करावा म्हणून मी म्हणालो,

"अग, जायलाच पाहिजे का? एक तर जेवणाची वेळ दुपारी बारा ते तीन...भर दुपार... वैशाख ऊन्हाचा कडका... वास्तुशांती कुठे तर स्मशानात! तिथे जायचे म्हणजे... भुताबिताने धरले म्हणजे..."

"काही धरणार नाही. हजारो लोकांमध्ये त्याचे तुमच्याकडे लक्षही जाणार नाही..."

"ते बरोबर आहे म्हणा कारण तू सोबत असली म्हणजे कुणाची काय ताकद आहे मला धरायची..."

"मी काय म्हणते मी ब्युटीपार्लरला जाऊन येऊ का? नाही म्हणजे जातेच... कसे आहे, तिथे खडतर, फडतर असणार कदाचित मुख्यमंत्री, मंत्री अजून खूप सारे नेते येणार. तेव्हा थोडं चांगलं दिसायला हवे ना.."

"आता कसं बोललीस? कसे आहे, आधीच तू अत्यंत सुंदर आहेस आणि त्यात ब्युटीपार्लरला जाऊन आली की, तुझ्या सौंदर्याला चार चाँद लागणार. अशी सौंदर्य सम्राज्ञी तिथे गेली तर सर्वांच्या नजरा तुझ्याकडेच वळतील..."

"ते तर होईलच पण तुम्हाला का जलन होत आहे?"

"नाही. नाही. मला जलन होत नाही उलट अभिमान वाटतो पण सोबतच एक भीती..."

"भीती? ती कोणती?" बायकोने संशयाने विचारले.

"अग, खडतर म्हणजे मुलखाचा स्त्री लंपट माणूस आहे. त्याच्या नजरेत तू..." मला पूर्ण बोलू न देता पत्नी कडाडली,

"काय ताकद आहे त्याची माझ्या सावलीजवळ यायची? उभा चिरुन टाकीन..." बायकोचा तो अवतार पाहून मलाच कापरे भरले. मी मनात म्हणालो, 'बायकांनी असे धाडस, असा संताप दाखवला तर गुंडगिरी करणाऱ्या माणसांचे काही चालणार नाही. या जगात विनयभंग, लैंगिक शोषण, बलात्कार औषधालाही उरणार नाही.' तरीही विषय बदलण्यासाठी मी म्हणालो,

"ठीक आहे. जाऊन ये, ब्युटीपार्लरला... पण आपण कुणाकडे वास्तुशांतीच्या जेवणाला जात नाहीत ना?"

"जाऊ द्या हो. काय घेऊन बसलात? श्रीमंताच्या घरी जेवणाचा आस्वाद घेण्याची अशी संधी वारंवार मिळत नसते. त्या दोघांच्या भांडणात का होईना एक संधी मिळते आहे तर तुमचे आपले काहीतरी... अहो, बघा तर! स्मशानात सामान घेऊन जाणाऱ्या टेंपोवर फलकही लावलाय की." "काय भारी नियोजन आहे, खडतराचे! लगोलग तयारीला लागत आहेत. फलकावर लिहिले आहे, 'वास्तुशांती... इमारती फडतराच्या, वास्तुशांती खडतराची!' आणि हे वाहिनीवाले बघ कशी जाहिरात करत आहेत ते..."

"फोडण्यासाठी अकरा नारळ स्वच्छ करुन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वास्तुशांतीसाठी जाणारे सर्व सामान सॅनिटाइज करुन नेण्यात आहे. निघाला... पहिला टेंपो निघाला. अकरा इमारती असल्यामुळे अकरा टेंपोतून साहित्य नेण्यात येत आहेत. अकरा गोड पदार्थांची रेलचेल असणार आहे. अकरा भाज्या, अकरा प्रकारच्या डाळी, अकरा प्रकारचे भात असे सारे काही अकराच्या प्रमाणात करण्यात येणार आहे..." वाहिनीवाली तरुणी सांगत असताना बायकोने विचारले,

"अहो, येणारांना अकरा प्रकारचे आहेर करतील का? म्हणजे अकरा प्रकारची वस्त्रे त्यातल्या त्यात महिलांना पैठणी, शालू..."

"नक्कीच घेतील. पुरुषांनाही शेरवानी, सफारी असे अकरा प्रकारचे ड्रेस घ्यायलाच पाहिजेत. कसे आहे, खडतर असो की फडतर असो दोन्ही पार्ट्या गडगंज संपत्ती बाळगून आहेत..." मला अडवून बायको म्हणाली,

"तुमचे शेरवानी, सफारीचे घोडे दामटू नका. अहो, शाकाहारी पदार्थ अकरा प्रकारचे आणि मग मांसाहारी पदार्थ करायचे ठरवले तर काय अकरा प्रकारचे प्राणी कापणार का? पुरोगामी राज्याचे हे मंत्री आहेत ना मग यांना प्राण्यांची आहुती चालेल का? अहो, किती वेळ झाला ही पोट्टी बडबड करतेय पण पाण्याचा घोट घेतला नाही, थकली नसेल का?"

"अग, बायका कधी बोलताना थकतात का? तुला कधीतरी थकवा जाणवतो का?"

"छे! बाई! तुम्हाला काही सांगण्यातच अर्थ नाही. काही सांगायला जावे तर विषय बरोबर माझ्याकडे वळवणार..."

"आता हे बघ, वाहिन्या बदलतोय पण बातमी एकच... खडतर-फडतर! 'हा टेंपो रस्त्यातच थांबलाय. चालक उतरलाय.इकडेतिकडे बघत त्या झाडीत तो शिरलाय. काय हेतू असेल बरे? काही सामान चोरून, लपवून ठेवायचा तर विचार नसेल ना? कदाचित त्याला शू... शी..." ती महिला ओरडत असताना बायको ओरडली,

"अहो, बदला ते चॅनल! काहीच्या काही दाखवत आहेत. काही लाजलज्जा आहे का नाही? ताळतंत्र सोडलंय यांनी. अहो, काय म्हणतात ते या बातम्यांवर सेंसॉर असत नाही का हो?"

"तेच तर जमत नाही ना या लोकशाहीत. विचार स्वातंत्र्य आहे ना..."

"म्हणून काय कसेही बरळायचे?"

"यांना अडवले की, असहिष्णुता पसरतेय म्हणून गळा काढत असतात."

"काय काय पहावे लागणार ते कुणास ठावे. चला.स्वयंपाक करावा लागणार. आज काही चूलबंद आवतन नाही..." असे म्हणत बायको आत गेली आणि मी पुन्हा पुस्तक समोर धरले पण मन लागत नव्हते कारण त्या आगळ्यावेगळ्या वास्तुशांतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती...

      दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्नान पूजा आटोपून टीव्हीसमोर बसलेलो असताना दारावरची घंटी निनादली. मी उठून दार उघडणार तितक्यात सौभाग्यवती धावतच आली. मला हळूच म्हणाली, "अं.. अं... अं..ह... तुम्ही टीव्हीसमोरुन हलायचे नाही. तुम्ही उठाल आणि नेमकी त्याचवेळी वास्तुशांतीची एखादी ब्रेकिंग न्यूज येऊन जायची..." असे म्हणत तिने दार उघडले आणि म्हणाली,

"अरे, शुभम तू! सकाळी- सकाळी! काय विशेष?"

"काकू, विशेषच आहे. पत्रिका घेऊन आलोय..."

"पत्रिका? कुणाची? तुझ्या लग्नाची? छुपेरुस्तुम निघालास रे? कळू दिले नाही. एवढ्या तातडीने लग्न करतोयस म्हणजे नक्कीच प्रेमविवाह असणार!आधी नोकरीला तरी लागायचे ना? अरे, ते नोकरीचे ठीक आहे पण आंतरजातीय विवाह तर नाही ना?..."

"काकू, तुम्ही की नाही बस्स! लग्नपत्रिका नव्हे तर वास्तुशांत पत्रिका घेऊन आलोय."

"वास्तुशांतीची? बंगला घेतला की फ्लॅट? कुठे घेतला? तुझे काय बाबा? तुझे वडील चांगल्या पदावर आहेत. कमाई रग्गड आहे. तेव्हा पैसा पाण्यासारखा ओतला तरी संपणार नाही..."

"काकू, मला वाटते तुम्ही बातम्या बघत नाहीत. आपल्या शहरात वास्तुशांतीचा एवढा मोठा कार्यक्रम होत आहे आणि तुम्हाला माहिती नाही?"

"अच्छा! म्हणजे फडतराच्या इमारतीची वास्तुशांती खडतर करीत आहेत त्याची पत्रिका आणलीस होय. बरे, आण." असे म्हणत बायकोने शुभमच्या हातातील पत्रिका घेतली आणि दार लावून घेतले.

पत्रिका बघत बघत ती म्हणाली, "अहो, पत्रिका तर छान छापली आहे पण 'आहेर, भेट' याबाबत काही लिहिले नाही."

"काही लिहिले नाही म्हणजे... काय ते ओळखून घ्यावे..."

"का हो, वास्तुशांतीला आपण जातोय तर आहेर करावा लागेल ना? पण करावा कुणाला? इमारती फडतरच्या, पूजा करतोय खडतर..."

"दोघांनाही करुया... म्हणजे दोघांनाही करावाच लागेल..."

"फडतरला कसा करणार? एवढा राडा होतोय दोघांमध्ये तर तिथे फडतर कसा असणार? खडतराने फडतराला आमंत्रण दिले असेल का हो?"

"काय सांगावे बुवा! फडतर तिथे नसला तर बरे, होईल. विना औषधाचा रोग बरा होईल."

      त्या दिवशी दिवसभर वाहिन्यांवर त्याच त्याच बातमीचे रवंथ केले जात होते. अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरही तोच विषय लावून धरला जात होता. प्रत्येक वाहिनीवर तथाकथित तज्ज्ञ आपापली मते मांडत होती, चर्चा घडवून आणल्या जात होत्या. खडतर-फडतर दोघांचेही भक्त आणि मोठमोठे नेते आपापल्या माणसाची बाजू उचलून धरीत होते, तळी उचलत होते.सोबतच कागदांचे गठ्ठे स्वतःच्या बाजूने पुरावे म्हणून सादर करीत होते. ते पाहून मी बायकोला म्हटले,

"अग, मागील काही दिवसात ही जी कागदपत्रांची उधळण होत आहे ना, ती पाहता सारी कागदपत्रे एकत्र केली तर एक ट्रक नक्कीच भरेल..."

"एक ट्रक? अहो, दहा ट्रकही कमी पडतील. का हो, अनेक वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या विरोधात ट्रकभर पुरावे गोळा केले आहेत अशी डरकाळी फोडली होती ना? काय झाले त्याचे?"

"अग, डरकाळीच ती! गेली हवेत विरुन... ते सोड गं. त्याला खूप वर्षे झाली परंतु मागील काही वर्षांपासून अशीच कागदपत्रांची वाहिन्यांसमोर उधळण केली जाते परंतु पुढे शून्य! काहीही होत नाही..."

"म्हणजे? खडतर-फडतर प्रकरणही असेच दाबले जाईल? वास्तुशांती होणार नाही? अकरा पदार्थांचे जेवण मिळणार नाही? अकरा प्रकारची वस्त्रे मिळणार नाहीत? अहो, पण मग मी केलेला ब्युटीपार्लरचा खर्च, तुमच्या हातापाया पडून खास स्मशानातील वास्तुशांतीसाठी आणलेली मोरमयी पैठणी... सारा खर्च वाया जाणार?..." पत्नी बोलत असताना मी पटकन म्हणालो,

"पैठणी मोरपंखी असली काय नि बनारसी काय एकदा स्मशानात वापरल्यामुळे पुन्हा कधी वापरणार थोडीच आहे तू? वायाच जाणार की... मी काय म्हणतो, पैठणी नेसून स्मशानभूमीत जायचे आहे ना, तर मग पैठणीवर मोरांऐवजी भुताचे, हाडांची चित्रे असती तर किती छान योगायोग जमून आला असता ना?"

"ते जाऊ द्या हो. तुम्हाला कधीही पांचट विनोद सुचतो कसा हो? खडतर एवढा खर्च करीत आहेत त्याचे काय? बघा ना, तंबू, खुर्च्या, टेबल, स्वयंपाकाचे सामान सारे काही पोहचले आहे ना? अहो, खडतराचे लाखो रुपये खर्च पाण्यात जातील ना?..."

"अग, नेत्यांचे काही पाण्यात जात नाही... ते दामदुप्पटीने वसूल करतात... जनतेकडून..."

"या सर्व सामानाचा विमा काढलाय का? म्हणजे सामान वापरले नाहीतर विमा असल्याने रक्कम मिळेल..."

"अग, एकतर दुकानदार परत नेतील किंवा कार्यकर्त्यांना वाटून देतील..."

"बाई.. बाई...! शीः... शीः...! अहो, दुकानात नेला काय किंवा घरोघरी पोहचला काय... स्मशानातून आलेले सामान ना ते, मग कसे खाणार ते?"

"बाईसाहेब, तुमची ही सारी जय्यत तयारी कशासाठी चालली आहे? स्मशानातील जेवणासाठीच ना? तिथे जेवताना काही बाधा होत नसेल तर घरी आणून खाल्ले तर कशी काय बाधा होईल?"

"तेही बरोबर आहे म्हणा. जाऊ देत, आपल्या घरी काही येणार नाही ना?" बायको म्हणाली परंतु माझे लक्ष टीव्हीवरील बातम्यांवर होते. तुम्हाला सांगू का, दोन दिवसांपासून मी नैसर्गिक विधीशिवाय टीव्हीसमोरुन एक क्षणही उठलो नव्हतो. विशेष म्हणजे बायकोनेही शब्दाने तक्रार केली नाही. उलट काम करताना अधूनमधून डोकावून विचारत असे,

"का हो, काही बदल झाला नाही ना? म्हणजे वास्तुशांतीची तारीख बदलली का? स्मशानासारख्या अपवित्र जागी मंगलमय विधी नको म्हणून ठिकाण बदलले नाही ना? पण तसे कसे करता येईल. ज्या जागेची शांत करायची आहे त्याच जागी पूजा, विधी करावी लागेल ना? पण, तुम्ही लक्ष ठेवून बसा हं. नाही तर आपण जाऊ स्मशानात आणि नेमके ठिकाण बदलले असणार. उगीच धावपळ नको व्हायला..."

     बायकोने अशी खुली छुट दिल्यानंतर मग काय विचारता, आमचे बस्तान कायम टीव्हीसमोर! रात्री शयनगृहात झोपायचे सोडून मी बायकोच्या सुचनेनुसार बैठकीत टीव्हीसमोर पथारी लावू लागलो... एकट्याची! मला रात्री चार- पाच वेळा उठायची सवय आहे, हे जाणून पत्नी म्हणाली,

"वास्तुशांती होईपर्यंत तुम्ही बैठकीत झोपा. नाही तरी तुम्ही सारखे सारखे उठत असता. उठले की बातम्या बघत जा. कार्यक्रमात काही बदल झाला तर समजेल ना! या राजकारण्यांचे सारे निर्णय रात्री उशिरा होतात..." बायकोचा आदेश म्हटल्यानंतर काय तरीही मी विचारले,

"अग, रात्रभर कशासाठी? एकतर लाईट बील वाढून येईल आणि आवाजाने झोप लागणार नाही."

"असे का? रात्र-रात्र जागून क्रिकेट पाहता त्यावेळी लाईट जळत नाहीत का?"

           त्याच रात्री मोठी गंमत झाली. मला कशाचा तरी आवाज आला. मी डोळे उघडून समोर पाहिले. टीव्ही सुरु होता. सौभाग्यवतीच्या नियोजनानुसार टीव्ही रात्रभर मी झोपलो तरी म्युट करुन सुरुच ठेवायचा होता. 'अच्छा! आवाज टीव्हीचा आहे तर!' असे मी पुटपुटत असताना अचानक बायको पुढे आली. मंद प्रकाश असल्यामुळे मी काही क्षण घाबरलो नाही परंतु गोंधळून म्हणालो,

"क.. क... कोण? तू? मला वाटले कोण आहे? पण कधी नाही ते तू उठली कशी?"

"काही नाही, झोपच लागत नाही. न पाहताही त्या अकरा इमारती सारख्या दिसत आहेत. मला वाटले एकतर तुम्ही झोपले असणार किंवा तुमचा आवडता रात्री उशिरा लागणारा सिनेमा बघत बसले असणार."

"मला एक सांग, या जन्मात तर नाहीच पण तुच मागत असलेल्या सातापैकी एका जन्मात तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल का?"

"ते जाऊ द्या. बातम्यांचे काय? खडतर-फडतर वाद मिटला तर नाही ना? अहो, किती वाजले? बाप रे! सकाळचे पाच वाजत आहेत म्हणजे स्वप्न खरे होणार तर?"

"काय बरळतेस तू? कोणते स्वप्न पडले?" मी विचारले

"अहो, मला असे स्वप्न पडले की, फडतराने खडतराच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला असून न्यायालयाने म्हणे स्मशानातील वास्तुशांतीला स्टे दिला आहे."

"अग, स्वप्नच ते. त्याचा काय एवढा विचार करायचा. बघ सकाळच्या 'सहा'च्या बातम्या पाच वाजता सांगत आहेत. त्याप्रमाणे आज ठरल्याप्रमाणे वास्तुशांती होणार आहे."

"बरे झाले, बाई! स्वप्नातल्याप्रमाणे खरेच स्टे मिळाला असता तर माझी तयारी फुकट गेली असती. बरे, मी काय म्हणते आपण आता लगेच तयारी करुन निघूया..."

"आत्ता? एवढ्या लवकर जाऊन काय ते स्मशानभूमीचे मैदान स्वच्छ करायचे आहे का?"

"समोरचा टीव्ही डोळे उघडे ठेवून नीट बघा. लोक रात्री बारा वाजेपासून स्मशानात जायला लागले आहेत. आपल्याला जायला उशीर झाला आणि स्वयंपाक संपून गेला तर?"

"बरे बाबा, तू म्हणशील तसे..."

"अहो, ही माणसे आत्तापासूनच गर्दी करीत आहेत. जेवणासाठी खूप वेळ आहे. तोपर्यंत खडतर फराळ वगैरे देणार आहेत का? अशा बातमीवर लक्ष ठेवा. नाश्ता-चहाची व्यवस्था केली असेल तर घरुन कशाला फराळ करुन जायचा?"

       आम्ही दोघे सकाळी साडेसात वाजता स्मशानभूमीकडे कुच केले. आमच्या गल्लीतून बाहेर पडायला नेहमी दोन मिनिटे लागतात. त्यादिवशी आम्हाला तब्बल दोन तास लागले. ते पाहून बायको म्हणाली, "बघा. तुम्हाला टीव्हीसमोर झोपवून काही फायदा झाला का? जेव्हा माणसे स्मशानभूमीकडे निघाली तेव्हाच मला उठवले असते तर आपणही रात्री एक- दोन वाजताच निघालो असतो. एव्हाना पोहोचलो असतो. मोफत नाष्टाही मिळाला असता. पण तुमचे आपले नेहमीप्रमाणे मी म्हणेल तेच खरे. आता पावले तरी उचला की पटपट..."

"अग, या वयात पळत असल्याप्रमाणेच चालतोय की. दम लागतोय."

"तास- दोन तास सारे विसरा. दम लागणे, गुडघेदुखी, डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे असे सारे काही बाजूला ठेवून लवकरात लवकर स्मशानात पोहोचून जेवणाचा आस्वाद कसा घेता येईल ते बघा. उशीर झाला म्हणून जेवण मिळाले नाही तर घरी जाऊन माझ्याच्याने स्वयंपाक मुळीच होणार नाही. तेव्हा जेवणावर यथेच्छ ताव मारा आणि घरी जाऊन आजची रात्र काय दोन- चार दिवस आराम करा... आता. चला. ते बघा... ते सट्टेकाका, नव्वदी पार केलेली असताना आपल्या मागून येऊन पुढे निघाले आहेत आणि तुम्ही अजून साठी गाठली नाही तर लागलात दमायला. कसे व्हावे बाप्पा तुमचे. अहो, किती वेळ आहे अजून? दमले बाई..."

"गाणे म्हण...'थकले रे खडतरा, फडतराच्या वास्तुला येऊन...' थकवा बराच कमी होईल. किती अंतर चालावे लागणार मला तरी कुठे माहिती आहे? समोर दृष्टी जाईल तिथपर्यंत माणसेच माणसे दिसत आहेत. बरे, अजून काही मागमूसही लागत नाही. म्हणजे लाऊडस्पीकरवर मंत्रघोष किंवा कुणीतरी लाऊडस्पीकरवर केलेली अँकरींग काहीच ऐकू येत नाही..."

"अहो, असे तर झाले नसेल ना की, खडतर- फडतर या दोघांमध्ये हाणामारी म्हणा किंवा तह होऊन कार्यक्रम रद्द तर केला नसेल ना?"

"तसे असते तर आधी जाणारी मंडळी वापस आली असती ना?"

"तिकडच्या दाराने हाकलून दिले असेल. शीः बाई! कुठे दोन मिनिटे सावलीत उभे राहावे म्हटले तरे झाड तर सोडा पण साधे एक रोपटेही नाही..."

"अग, कितीही केले तरी स्मशानभूमीत आहोत आपण. तिथे रखरखीतपणाच असणार.एक भयाण शांतता असते. आज गर्दीमुळे तशी स्मशानशांतता जाणवत नाही."

"अहो, इथे डोल्यांची किंवा वाहनाची व्यवस्था होते का ते विचारा ना कुणाला. आता एक पाऊलही चालवत नाही हो. टेकायला जागाही नाही. दगडावर टेकावे..."

"अग, नको. नको. दगडं आधीच गरमागरम तापली असतील त्यावर बसशील तर..."

"मग आता काय करावे?..."

"अग... अग... ते बघ. इच्छित स्थळ जवळ आलेले दिसत आहे. माणसे उभी राहून स्वागत करताना दिसत आहेत." मी म्हणालो तसे सौभाग्यवतीने दूरवर नजर टाकून पाहिले परंतु डोळे ताणलेल्या अवस्थेत, मान उंच करुन पाहताना तिला भोवळ आल्यासारखे झाले. माझा हात तिने गच्च पकडला. काय झाले ते माझ्या लक्षात आले. मी पटकन तिला सावरले...

        वास्तुशांतीला आलेले लोक स्मशानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत सहा- सात किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागत असल्यामुळे सारेच दमत होते, दम वरती होत होता. उन्हामुळे घसा कोरडा पडत होता. सोबत आणलेले पाणी कधीच संपून जात होते. काही लोकांना उन्हाच्या कडाक्यामुळे चक्कर येत होती. दुरुन फाटकाजवळ काही व्यक्ती उभे राहून स्वागत करीत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे आपण आता ठिकाणाच्या जवळ आलो ही जाणीव होऊन हायसे वाटत होते. जवळ पोहोचताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत होता कारण तिथे खडतर आणि फडतर दोन्ही मंत्री एकमेकांचे हात हातात घेऊन, जनतेच्या दिशेने जोडून म्हणत होते... म्हणजे दोघांच्या आवाजातील एक टेप सातत्याने वाजत होता,

'जनता नेहमी म्हणते की, राजकारणी आम्हाला मुर्ख बनवतात. खरेच आहे ते, आम्ही तुम्हाला नेहमीच मुर्ख बनवतो परंतु आज मुर्ख नाही तर महामुर्ख बनवले आहे. या आता. घरी जाऊन शांतपणे इथे नसलेल्या इमारतीच्या, न झालेल्या वास्तुशांतीचे जेवण करा आणि हो वास्तुशांतीचा आहेर, भेटवस्तू आणली असेल तर देऊन जा... आम्ही काही रिटर्न गिफ्ट देणार नाही." ते ऐकून पत्नी म्हणाली,

"आता यापेक्षा अजून कोणते भारी रिटर्न गिफ्ट असणार आहे? बनवलेत महामुर्ख तोच आहेर खूप जास्त आहे...चला. हो, चला. तरी मी तुम्हाला बजावत होते, आपण जाऊ नये. राजकारण्यांचे आमंत्रण म्हणजे उपाशी राहायचे आवतन! पण तुम्ही कुठे, कधी माझे ऐकलेत? बसली आता सणसणीत चपराक!" सौभाग्यवती बडबडत असताना मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत तिच्या मागोमाग निघालो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy