Nagesh S Shewalkar

Others

3  

Nagesh S Shewalkar

Others

हाच नवरा हवा ग बाई!

हाच नवरा हवा ग बाई!

11 mins
985


सुट्टीचा दिवस होता. सकाळचे अकरा वाजत होते.मोनाली तिच्या खोलीत संगणकावर 'वाहनांशी' खेळत होती. लहानपणापासूनच मोनालीला वाहनांचे प्रचंड वेड होते. एकुलती एक असल्यामुळे ती सर्वांची विशेषतः तिच्या वडिलांची फारच लाडकी होती. ती मागेल ती वस्तू, खेळणी तिला तिचे वडील आणून देत असत. प्रत्यक्षात रस्त्यावर असो की, संगणकावर असो वाहन जोरात पळवणे, कट मारणे, हॉर्नचा कर्णकर्कश्श आवाज करणे, अचानक ब्रेक मारणे ही तिची वैशिष्ट्ये होती.


    त्या दिवशीही ती सकाळी उठल्यापासून संगणकासमोर बसून बाजारात आलेल्या नवीन वाहनांची प्रात्यक्षिके घेत होती. त्या वाहनांना ती मन मानेल तसे दामटत होती, भर वेगात असताना अचानक कट मारत होती किंवा ब्रेक मारत होती. असे करताना तिला मनस्वी आनंद होत होता. तिच्यासाठी वर संशोधन चालू होते. परंतु मोनालीने स्वतःच अनेक मुलांना नाकारले होते. तिची आई तिच्या 'वरास नकार' या उद्योगामुळे निराश झाली होती, कंटाळली होती. मोनाली संगणकावर खेळत असताना तिची आई तिथे येत म्हणाली,

"मोने, वाहनांशी खेळणे बंद कर. मला सांग,आज तुला एखादा मुलगा पाहायला जायचे का नाही? कालपर्यंत पाच-सहा मुलांच्या ऑफर येऊन पडल्या आहेत."

"आई, तुला मुलगा पाहायला जाणे म्हणजे एखाद्या मॉलमध्ये जाऊन दिसेल ती वस्तू उचलून आणण्या इतपत किंवा शो रुममध्ये जाऊन एखादी बाइक उचलून आणावी इतके सोपे वाटले का?"

"झाले. येऊन-जाऊन बाइक! कंटाळा आला बाई......बरे, तुझ्या बाबांनी मागच्या रविवारी चार-पाच मुलांची माहिती आणि संपर्क क्रमांक दिले होते. बोललीस का कुणाशी? कुणाशी भेटणार आहेस का आज? तुला हवा तसा कुणी वाटतो का?"

"आई, इतकी घायकुतीला येऊ नकोस. लग्न मला करायचे आहे, जीवन मला घालवायचे आहे. लग्नाच्या मांडवात तुम्ही ज्या शालीसोबत माझ्या शालीची गाठ बांधणार आहात, जी शाल माझ्या खांद्यावर पडणार आहे त्या खांद्याला खांदा लावून संसार करायचा आहे तो खांदा कितपत बलदंड, मजबूत आहे हे तपासायला नको?"

"धन्य आहे ग बाई,तुझी धन्य आहे. आमच्यावेळी......"

"असे नव्हते.... हे मी खूप वेळा ऐकलय. तुझ्याकडून, मावशी, आत्या, मामी आणि सगळ्या आज्यांकडून ! आई, खरे सांगू का, तुमच्या काळात तुम्हाला म्हणजे उपवर मुलींना स्वतःचा चॉइसच नव्हता ग. घरातील आजोबा, वडील, काका किंवा इतर कुणी व्यक्ती ज्या कुण्या मुलाचा गळा दाखवतील त्या गळ्यात वरमाला घालायची एवढेच तुम्हाला ठाऊक! आई, आज जर माझा विचार न घेता जर एखाद्या मुलाशी लग्न करायला आणि त्याच्या गळ्यात हार घालायला सांगितला तर मी काय करीन माहिती आहे....?"

मोना बोलत असताना तिला थांबवून आई म्हणाली, "चांगलेच माहिती आहे. तेच ते ऐकून सारे पाठ झाले आहे..... काय करशील तर म्हणे तो हार देईल फेकून आणि त्या मुलाच्या नरडीचा घोट घेईन......."

"बरोबर! आई, आता आमच्यापुढे चॉइसच चॉईस आहेत ग. साड्यांच्या दुकानात गेले की, कसा साड्यांचा ढीग आपल्यासमोर पडतो ना तसेच झाले आहे आज पोर बाजारात......"

"पोर बाजार? हे काय नवीन? मोठमोठ्या शहरात चोर बाजार आहेत हे ऐकलं होतं पण...."

"आई, जसा चोर बाजार, ढोर बाजार तसा हा पोर बाजार म्हणजे तुमच्या भाषेत वर संशोधन....."

"चल! वात्रट कुठली?" आई कौतुकमिश्रीत रागाने म्हणाली.

"त्यात कशाचा वात्रटपणा? आपण ज्या बाजारातून जी विशिष्ट गोष्ट विकत आणतो तो बाजार त्या नावाने ओळखला जातो. हे बघ...भाजी बाजार, मासळी बाजार, कपडा गल्ली, सोन्या-चांदीची पेठ, आता म्हणाले तो ढोर बाजार ! आई, एक सांग, पोरांना हुंडा देऊन आपण वाजतगाजत विकतच आणतो ना! म्हणून तो पोर बाजार!"

"तुझ्या जीभेला हाडच नाही...."

"आई, माझ्या डोक्यात की नाही एक भन्नाट आयडिया आलीय...."

"आता काय शिजतेय तुझ्या डोक्यात की अजून कुठला बाजार आठवला?"

"शिजत नाही ग. हे लग्नाचे डोक्यात शिरतेय माझ्या. आई, आपण की नाही, छानपैकी पोरांचा बाजार भरवू या का.....अग, असे पाहतेस काय? आपण मस्तपैकी माझ्या लग्नाचे स्वयंवर रचू या का?" मोनालीने एखादा कार्यक्रम ठेवू का इतक्या सरळ आणि साधेपणाने विचारलेले पाहून तिच्या आईला हसू आवरणे कठीण झाले. तरीही हसत हसत ती म्हणाली,

"बाई...बाई, या कार्टीच्या डोक्यातून केव्हा काय निघेल ते सांगता येत नाही ग बाई! स्वयंवर रचायला तू काय स्वतःला राजकन्या समजतेस काय?......" आई बोलत असताना मोनाली खुर्ची सोडून उठली. आईसमोर उभी राहून बाळबोध अंदाजात तिने विचारले,

"म....म..मी तुझी राजकन्या नाही? लहानपणापासूनच मला राजकन्या कोण म्हणते? तूच ना?"

तिच्या तशा लाडिक प्रश्नावर तिच्या आईने तिला कवेत घेतले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून भरल्या गळ्याने म्हणाली,

"होय ग माय, माझी राजकन्याच आहेस ग तू....."

"तर मग तू या राजकन्येची........या आपल्या राजवाड्याची महाराणी!"

"आणि मी महाराजा...." असे म्हणत मोनालीच्या बाबांनी प्रवेश केल्याचे पाहून मोनाली आईची मिठीतून बाबांच्या आलिंगनात शिरली. ते पाहून तिच्या आईचे डोळे पाणावले. ती पुटपुटली,

"कसे होईल माझे ही पोट्टी लग्न करून गेल्यावर...."

"महाराणीसाहेबा, मी मुळीच कुठे जाणार नाही. त्या पोट्ट्यालाच म्हणजे तुझ्या जावयाला 'घर नवरा' .....हो. हो. घरजावई होण्याची अट घालणार आहे. ही अट मी पहिल्या भेटीतच घातली म्हणून आतापर्यंत पंचवीस एक पोट्टे शेपूट घालून पळाले.... म्हणजे मी पळवले...."

"काय पंचवीस पोरांना नकार दिलास? बाप रे! अहो, ऐकताय ना? आता ही नवीनच काही तरी म्हणतेय...म्हणे स्वयंवर रचायचे आहे. करा तयारी आता....."

"रचूया की, माझी लेक आहेच मुळी राजकन्या! तिच्यासाठी तिच्या पसंतीचा राजकुमार आणायचा म्हणजे स्वयंवरच रचावे लागेल की....."

"आता तिला तुमची साथ मिळाली म्हणजे मी बापडी काय बोलणार? अग बाई, बरे झाले आठवले.. ये मोने, तुझ्याकडे कुण्या पेट्रोल पंपाची बाकी आहे का ग ? " आईचा प्रश्न ऐकून मोनाली खळखळून हसत सुटली. आपल्याकडे आश्चर्याने पाहणाऱ्या आईबाबांकडे पाहून स्वतःचे हसणे आवरून ती म्हणाली,

"अ...अ...आई, दोन महिन्यांपासून मी पेट्रोलचे पैसेच दिले नाहीत."

"मोनू, काय हा आगावूपणा? अग, कुणी पेट्रोल उधारीवर देईल का? आणि पोरींनी ही अशी उधारी करणे शोभते काय? अग, तो मुलगा घरी आला होता आज. " आई म्हणाली.

"कोण ? सोमेश, आपल्या घरी आला होता?" मोनालीने विचारले.

"मी बाई, नाव-गाव-धंदा विचारण्याच्या फंदात पडले नाही. मला कुठे त्याला जावाई करून घ्यायचे होते? का ग, पेट्रोल पंपावर काम करणारा होता पण तरीही भलताच स्मार्ट दिसत होता. सज धज के आला होता. भाषाही चांगली होती ग. तो त्या तुझ्या उधारीच्या पंपाचा मालक तर नव्हता?"

"मालक नाही ग. तिथे व्यवस्थापक आहे तो...."

"मोनूबेटा, हा काय प्रकार आहे?" बाबांनी विचारले.

"सांगते. बाबा, दोन, सव्वा दोन महिन्यांपूर्वी तुम्हाला एक फोन आला होता......"

"अच्छा! अच्छा! तो मुलगा होता काय?" बाबांनी विचारले.

"मला कुणी सांगणार आहे का? " आईने विचारले.

"अग ऐक. सारे सांगतो. दोन महिन्यांपूर्वी मला एका गृहस्थाचा फोन आला होता. त्यांच्याकडे चार अविवाहित मुले....."

"चार अविवाहित मुले? अहो, मग मुलाचे वय जास्तच असणार. तुम्ही चौकशी......"

"अग ऐक, चार मुलं म्हणजे चार भावांची चार मुलं. 'मुलगा-मुलगी' या वधूवर मंडळाच्या सुचक मंडळाच्या साइटवरुन त्यांनी आपल्या मोनाची निवड केली होती.थांब.ऐकून घे. एक मुलगा डॉक्टर,

दुसरा इंजिनिअर, तिसरा प्रोफेसर......"

"आणि चौथा हा पेट्रोल पंपावर काम करणारा......"

"त...त....तू हा मुलगा निवडलास? ती तीन उच्च शिक्षित आणि चांगली कमाई असणारी मुले सोडून? मोने, काय ही तुझी चॉईस?"

"अग, यापूर्वी यापेक्षा कितीतरी चांगली मुले आली होती."

"हो बाबा. पण ती मी नाकारली. हा पंपवाला मुलगा निवडण्यामागे माझे एक लॉजिक आहे."

"डोंबल्याचे आलेय लॉजिक...."

"आई, ऐकून तर घे. मी चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी करते आहे. 'हम दो और हमारा एक' अशा तिघांनाही भरपूर होईल असा माझा पगार आहे......"

"समाज काय म्हणेल? एवढी सुंदर, हुशार, भरपूर पगार असणारी मुलगी आणि पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका मुलाच्या गळ्यात बांधली? शंकेखोर समाज नाना शंका काढेल. मला म्हणवत नाही पण हा समाज तुझ्या चारित्र्यावर......."

"संशय घेईल. घेऊ देत. हे बघ, कुणाच्याही गळ्यात बांधायला मी काही बकरी नाही. सध्या सगळ्यात महाग काय आहे तर पेट्रोल! मी सोमेशला पहिली अट काय घातली आहे ते ऐक. माझ्या माहेरच्या माणसांना म्हणजे तुम्ही दोघे, मावशी, आत्या, मामा या सर्वांना सोमेशने आजीवन फुकटात पेट्रोल द्यायला पाहिजे. हाच माझा हुंडा समज......"

"हुंडा? तू घेणार? मुलाकडून? एक मुलगी असून?"

"आईसाहिबा, गया वो जमाना, जेव्हा मुलाला अवाजवी हुंडा देऊन त्याच्या अतिरिक्त मागण्या पुरविण्याचा! अब हमारा कुडियोंका जमाना है। बाबा, गेली दोन महिने माझ्या चार गाड्या आणि तुमच्या दोन गाड्यांमध्ये तुम्ही एक रुपयाचे तरी पेट्रोल टाकले आहे का? आठवा."

"नाही.आत्ता आले लक्षात म्हणजे तू सगळ्या गाड्यांमध्ये सोमेशकडून पेट्रोल टाकून घेत होतीस?"

"येस माय डियर पप्पा!"

"तरीही मी विचार करीत होतो, गाड्यांच्या टाक्या नेहमी फुल कशा?"

"ते तर काहीच नाही. दहा-बारा दिवसांपूर्वी ना मी त्याच्याकडून माझ्या गाडीत पेट्रोल टाकून घेत होते. पंप चालू करुन तो टक लावून माझ्याकडे बघत असताना टाकी फुल भरली पण त्याचे तिकडे लक्षच नव्हते. बाबा, तुम्हाला सांगते, त्यादिवशी त्या पंपावर पेट्रोलची नदी वाहिली... नदी!"

"बाई...बाई! कार्टे, तुमच्या त्या नजरेच्या खेळामध्ये पेट्रोलचा भडका उडाला असता म्हणजे?"

"लेकिन बडा जिगरवाला है, तेरा सोमेश!"

"बाबा, एक अंदर की बात सांगू का? आजकालची पोरं ना, फिगरवाली पोरगी दिसली की बडे जिगरवाले होतात..."

"अग पण, एवढा पैसा...तुझी टाकी आय मिन गाड्यांच्या टाक्या फुल करताना त्याचा खिसा रिकामा होत असेल त्याचे काय ?" आईने विचारले.

"आई, माझ्यासोबत काटा जुळावा म्हणून तो इतरांच्या गाडीत पेट्रोल भरताना काटा मारत होता..."

"अग पण, या काटाकाटीच्या खेळात तुझ्या ह्रदयात काटा घुसला की नाही...."

"तोच तर प्रॉब्लेम आहे ना! तू म्हणतेस त्याप्रमाणे मी किमान सत्तर-पंचाहत्तर पोरांना नाकारलय. अग, पाहिल्याबरोबर 'काँटा चुभा ही नही। दिल धडका ही नही। दिल से वॉव निकला ही नही'।"

"तरीही तू सोमेशला दोन महिने फिरवलेस? तो क्या दिलने धकधक नही किया?"

"तसे काही सांगता येत नाही. म्हटले तर हो, म्हटले तर नाही. पण त्याचे ठिकाण आले आणि एक विचार डोक्यात सर्रकन चमकला की, महंगाई का जमाना है, पेट्रोल के दाम आसमान छू रहे है। आपल्याला पैशाची तर कमतरता नाही. मग फुकटात पेट्रोल मिळत असेल तर एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे म्हणून..... शिवाय खरे सांगायचे तर सोमेशला पाहिल्याबरोबर दिल जोर से धडकत नसेल पण 'टिक...टिक...' मात्र करतेय. भेटायची ओढ वाटत नाही पण इच्छा मात्र जरूर होते...."

"अग बाई, बरीच प्रगती झाली की ग...."

"तुला सांगते, आतापर्यंत अनेक मुलांना पाहायला... भेटायला गेले ना की, कुणी चहावर, कुणी कॉफी, कुणी चुइंगम,चॉकलेट, कुणी कोल्ड्रिंक, कुणी गाड्यावरच्या वडापाववर, कुणी डोसा... समोसा....कुणी इडलीवर बोळवण केली. बाबा, एकाने तर चक्क एका बागेत नेले आणि चक्क खारमुऱ्याची पुडी घेऊन आला."

"ऐकावे ते नवलच! सोमेशने असा कोणता पाहुणचार केला की तू खुश आहेस?"

"होय! सोमेशने की नाही, .दोन महिन्यात किमान दहावेळा पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण दिलय..."

"मोने, हे ग काय? अग, फुकटात पेट्रोल काय, पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण काय? अग, ऊस गोड लागला म्हणून...."

"मुळासकट खाऊ नये, बरोबर आहे. आजकाल असेच करावे लागते. समज, माझी वाट पाहून किंवा आमचे सूर जुळाले नाही आणि लग्न न होता घटस्फोट घेतला तर काय मग मी कुणासोबत खारमुरे खात बसू? आई, सोमेश काही उगाचच हे सारे करत नाही. तो दाणे टाकतोय, मस्का लावतोय, दोरे टाकतोय तर मग मी का सोडू? दोनों हाथों से लुटने का यही समय और यही लडका है। तरीही मी त्याला तो एवढा खर्च कुठून करतोय हे विचारले, तर तो म्हणाला की, मी त्याला भेटल्यापासून त्याने पंपाच्या मशीनला चांगलीच वेसण घातली आहे. दिवसाकाठी चांगले पंधराशे, कधी अठराशे रुपये उरतात त्याला."

"माय ग! पुण्याचे पेट्रोल सातारला दान! अग, पेट्रोल भरणारांची दाणादाण होते की ग...."

"एरवी तरी काय कमी होते? दीडशे रुपये लिटर पेट्रोल घेताना घाम तर फुटतोच ना? बरे ते जाऊ दे. सोम्या कशासाठी आला होता ते विचारावे लागेल....." असे म्हणत मोनालीने लगेच सोमेशचा क्रमांक जुळवला आणि त्याने फोन उचलताच कडाडली,

"सोम्या, आपले काय ठरले होते. आजीवन पेट्रोल फुकटात द्यायचे. तरीही तू पेट्रोलचे पैसे मागायला घरी आला होतास?"

"मी....मी...."

"असे बकरीसारखे म्यांवाळू नकोस. खरे सांग, तू पैसे मागायलाच आला होतास ना?"

"मो....मो...मोनू, असे काही नाही. मी तुला लॉंग ड्राइवला घेऊन जाण्यासाठी आलो होतो ग..."

"मग फोन नाही करायचा? डायरेक्ट घरी आला?"

"तुझा फोन स्वीच ऑफ येत होता."

"मग मेसेज टाकायचास."

"मोना डार्लिंग......."

"ये सोम्या-गोम्या, तुला किती वेळा सांगितले की, ते मोना डार्लिंग.... मोना डार्लिंग करत जाऊ नकोस. एका खूप जुन्या सिनेमात एक खलनायक नायिकेला असेच....मोना डार्लिंग..... मोना डार्लिंग करत असतो. तू खलनायक तर नाहीस ना?"

"ओके. सॉरी! फोन स्वीच असल्याने संदेश कसा पाठवता येईल?"

"बरे. बरे. मला शहाणपण शिकवू नकोस. ये आता लवकर...."

"पुन्हा? लगेच?"

"विसरलास माझी अट? ये म्हटलं की यायचं, जा म्हटलं की, गाशा गुंडाळायचा....."

"लक्षात आहे.... वाढशील तेच आणि तेवढेच खायचे....न आवडणारेही! येतो ग बाई, येतो....."

"बाई म्हणालास? मला? आत्ताच कंटाळलास का मला? महापुरुषा, लवकर ये." मोनाली हसत म्हणाली. तसा सोमेशही हसत म्हणाला,

"थँक्स! शेवटी हसलीस तरी! येतोय लगेचच..." असे म्हणत सोमेशने फोन बंद करताच मोनालीच्या कानावर आईबाबांच्या हसण्याचा आवाज आला. आई हसत हसत म्हणाली,

"मो...मो...मोना डार्लिंग.... तुमचे गुण जुळलेत का ग? मला तर बाई, छत्तीसचा आकडा दिसतोय.."

" गुण,कुंडली सोड. एकमेकांची मनं जुळली पाहिजेत. मन की बात ओळखता आली की झाले ....."

"म्हणजे मतं जुळली नाही तरी मनं जुळली की झाले काय?"

"मातोश्री, मत वेगवेगळी असू शकतात. तो विचार स्वातंत्र्याचा भाग असतो परंतु मन जुळली म्हणजे नंतर मतं आपोआप जुळतात ग. त्यासाठी छत्तीस गुण आणि पत्रिकाच जुळावी असे काही नाही. गेला तो जमाना....."

"जाऊ देत. जावई पहिल्यांदा घरी येतोय. साडीबिडी...."

"काय म्हणालीस साडी..."असे म्हणून बाबा हसू लागले. त्यांना हसत साथ देणारी मोनिका म्हणाली,

"ये मॉम, सारखे सारखे जावई...जावई करू नकोस ग. अजून खिचडी शिजावी तशी शिजली नाही. सध्या गॅसवर आहे...." मोनाली म्हणाली.

     अर्ध्या तासात सोमेश पोहोचला. मोनालीच्या बाबांनी त्याचे स्वागत केले तर आईने जेवायचा थाट केला होता. स्वयंपाक होईपर्यंत बैठकीत सोमेश-मोनाली आणि तिचे बाबा यांच्यामध्ये मस्त संवाद रंगला होता.

"मी काय म्हणतो, तुमची मतं, तुमची मनं जुळली असली आणि तुम्ही दोघांनी लग्न करण्याचा घाट घातला असला तरीही माझी एक अट आहे....." बाबा म्हणत असताना सोमेशने मोनालीकडे पाहिले. तिने 'मला माहिती नाही' अशा अंदाजाने खांदे उडवले. तसे सोमेशने विचारले,

"अट ती कोणती?"

"मी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलाला माझा जावाई म्हणून स्वीकारणार नाही..."

"बा..बा..."

"ऐकून तर घे. सोमेशने स्वतःचा पेट्रोल पंप टाकावा....."

"बाबा, हे तेवढे सोपे नाही. फार मोठी रक्कम लागेल त्यासाठी...."

"लागू देत कितीही. हुंड्याची रक्कम आपण त्यासाठी वापरु या...."

"अहो, पण बाबा, मी हुंडा घेणार नाही. आमच्या घरातही तसेच मत आहे."

"नका घेऊ ना. सध्या उसने घे. पेट्रोलमध्ये काय कमाई असते ते आज समजले. पेट्रोलच्या चोरीच्या कमाईवर तुम्ही दोघांनी दिवाळी केली तरीही मालकाचे दिवाळे निघाले नाही. याचा अर्थ तू तुझे कर्ज काही महिन्यात फेडू शकशील."

"ते आहे. कमाईचे बारकावे मला माहिती असल्यामुळे...."

"काटा मारण्यात तुझा हात कुणी धरु शकणार नसल्यामुळे माझे पैसे परत नक्कीच करशील. त्यामुळे तू पेट्रोल पंप टाकावा ही माझी अट आणि तुझी हुंडा घेणार नाही ही प्रतिज्ञा पूर्ण होईल..."

"चला. चला. गप्पा नंतर. जेवणाचा आस्वाद घ्या आधी....." मोनालीची आई म्हणाली तसे सारे टेबलाकडे गेले.......

      त्यानंतर सोमेशने पंधरा-वीस दिवसात मोनालीच्या बाबांकडून तब्बल पंचवीस लाख रुपये पेट्रोल पंपाच्या कामासाठी म्हणून नेले. त्याच कामासाठी दिल्लीला जावे लागेल, तिथे पंधरा दिवस थांबावे लागेल असे सांगून सोमेश दिल्लीला गेला. त्यानंतर तो दोन-तीन दिवस तो मोनालीला बोलत होता. परंतु नंतर त्याने फोन करणे, संदेश पाठवणे सोडून दिले. मोनालीचा आणि तिच्या बाबांचा फोनही तो उचलत नव्हता. काळजीने म्हणा, माहिती घ्यावी म्हणून ते दोघे मित्राच्या, मैत्रिणीच्या फोनवरुन बोलण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो कुणाचाही फोन स्वीकारत नव्हता. शेवटी तर त्याचा फोन कायम 'स्वीच ऑफ' येत होता. मोनाली आईबाबांना घेऊन सोमेशच्या घरी गेले परंतु त्यांच्याशीही सोमेशने कोणताही संपर्क ठेवला नव्हता...

    तीन महिन्यांनंतर मोनालीच्या नावाने एक कुरिअर आले. पाठविणारा सोमेश आहे हे पाहून मोनालीच्या आनंदाला भरते आले. तिने घाईघाईने ते पाकिट फोडले. आत एक छोटी टंकलिखित चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते, 'लग्न जुळण्यापूर्वीच जी मुलगी तिला भेटायला आलेल्या मुलासोबत दादागिरी करते, त्याची आर्थिक लुटमार करते त्या मुलीसोबत मी अख्खे जीवन नाही काढू शकत. मला वाटते, तुला नवरा नको तर एक गुलाम हवा आहे... 'हुक्म मेरे आका...' म्हणत तुझ्यासमोर मान खाली घालून उभा राहणारा. तेव्हा विसरून जा. तुझ्यासाठी केलेला पेट्रोलचा खर्च आणि इतर उधळपट्टी लाखो पटीने वसूल करून मी पेट्रोलच्या खाणी असणाऱ्या देशात जात आहे. एक मात्र खात्रीपूर्वक सांगतो, तुझ्या बाबांकडून घेतलेले पंचवीस लाख रुपये मी नक्कीच परत करणार आहे. क्योंकि हम किसी का उधार नही रखते, ब्याज समेत चुकाते है। गुडबाय....' ते वाचताना मोनाली सोफ्यावर कोसळली...


Rate this content
Log in