Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

एकाच या जन्मी जणू

एकाच या जन्मी जणू

2 mins
112


"एकाच या जन्मी जणू

 फिरुनी नवी जन्मेन मी, 

लहरेन मी बहरेन मी

 हरवेन मी. 


असं एक भावगीत आहे. आणि खरोखर प्रत्येक स्त्रीचा लग्नानंतर पुन्हा एकदा जन्म होतो ना! 

तिचं नाव बदलतं, 

तिचं गाव बदलतं, 

तिचं आडनाव बदलतं

 तिची सारी नाती बदलतात. 


आई-वडिलांच्या जागी सासू-सासरे येतात, बहिणीच्या जागी नणंद येते, भावाच्या जागी दीर येतो, आणि आई बापाची लाडकी परी ,

आता कोणाची वहिनी, कोणाची सुनबाई, कोणाची बायको, कोणाची काकू, अशा अनेक रूपात त्या घरात विहरत असते. 

त्या घरात माप ओलांडून गेल्यावर खरी परीक्षा सुरू होते तिच्यासाठी! 

आल्या आल्या कोणी काही रेड कार्पेट अंथरलेले नसते, तर उलट मार्गात काटेपण असतात. 

पण त्या काट्यांच्या जागी फुल लावून त्या घराचं नंदनवन ती लिलया करते. एवढं सुखा सुखी नसतं ते! 


बऱ्याच वेळा तर भाषेचा लहेजा बदलतो ,जेवणातले पदार्थ बदलतात ,

वयाची 20 /25 वर्ष ज्या सवयी असतात ,त्या पूर्ण बदलून सगळं वेगळं आत्मसात करायचं असतं. पण ती करते काही दिवसांनी, आणि आपलं उत्तम बस्तान देखील त्या घरात बसवते, आणि सर्वांची लाडकी होते .अर्थात त्याआधीचे सारे कष्ट नंतर ती विसरून जाते.


 त्यानंतर स्त्रीचा दुसरा जन्म म्हणजे तिचं बाळंतपण, पण! हा शब्द आहे त्यामध्ये, म्हणजे एक मुल जन्माला घालणे हेच मोठे "पण" जिंकल्यासारखे आहे. आताचा काळ सोडा हो! आता बऱ्याच सुख सोयी आणि लाडही होतात. आणि आताच्या मुलींना एक मूल जन्माला घातलं म्हणजे, आम्ही केवढा पराक्रम केला असे देखील वाटते. 

पण जेव्हा जुन्या काळात वैद्यकीय सुविधा नव्हत्या, तेव्हा मुलांना जन्माला घालणे, हा दरवेळी एक पुनर्जन्मच होता. 

पण अपत्याच्या प्रेमापुढे, सुखापुढे, ती सारं काही सहन करते .

कधीतरी मूल होत नसेल तर, अजूनही सगळ्या दोष बाईवर जातो. शिवाय ज्या काही अनेक वैद्यकीय चाचण्या, आणि उपचार असतात ते सारे तिला सहन करावे लागतात. 

पण त्यातूनही एका बाळाचा जन्म झाला आणि ती आई झाली की ,आपल्या साऱ्या यातना विसरून आईपण उपभोगत असते. 

तो पण पुनर्जन्मच नाही 

का❓ 

मग एकदा अजून वीस पंचवीस वर्षांनी बाईचा पुनर्जन्म होतो, आजी या नात्याने. 

"अहो ते सुख अजून वेगळंच असतं, 

न ये वदता अनुभवी जाणती ते"

त्यामध्ये दुधापेक्षा दुधावरची साय अधिक जपावी लागते. या नात्याने जितके स्वतःच्या मुलांचे केले नाहीत, तितके लाड नातवंडांचे करते .

काही काळ ती बाकीची सारी नाती हरवून, फक्त आजीपणा उपभोगत असते. 

ते नातवंडाला न्हाऊ माखू घालणे, तिट काजळ करणे. पाळण्यात घालून जोजवणे, झोके देणे, कामावर गेल्यावर पुन्हा एकदा त्याची आई बनणे. 


त्याने गळ्यात टाकलेले ते मऊ मऊ लुसलुशीत प्रेमाचे बंध अहो एखाद्या बेडी पेक्षा भारी असतात. ते कधी तोडता येत नाहीत. 

असा एकाच जन्मात स्त्रीचा अनेक वेळा पुनर्जन्म होतो. आणि आपल्या सुगंधी वास्तव्याने ती घरच्यांच आयुष्य सुगंधी करते☺️☺️☺️


Rate this content
Log in