Pratibha Tarabadkar

Drama

4.0  

Pratibha Tarabadkar

Drama

एक होती चिऊ

एक होती चिऊ

3 mins
238


एक होती चिऊ भाग -२


पहाटे मंदार आणि मनाली बाईकवरुन रवाना झाल्याचा आवाज आला आणि सुलू उठली.अंग अगदी मोडून आले होते पण 'थकना मना है ', असं स्वतः ला बजावत दमलेल्या शरीराने सुलू स्वयंपाक घरात शिरली. अर्णव उठायच्या आत दूध तापवून ठेवले पाहिजे म्हणून गुडघ्यातील कळ सोसत ती फ्रीजकडे वळली.

मंदार आणि मनाली रात्री आले ते दमूनच.'आम्हाला काही जेवायचे नाही 'असे सांगून बेडरुममध्ये गडप झाले.बिचारा अर्णव आईबाबांची वाट पहात सोफ्यावरच झोपून गेला होता.

रविवारचा दिवसही मंदार आणि मनालीने विश्रांती घेण्यात घालवला.अर्णव आईबाबांच्या सहवासासाठी आसुसला होता पण मंदार आणि मनालीने त्याला बेडरूम बाहेर पिटाळले.बिचारा एव्हढसं तोंड करून कार्टून्स बघत बसला.

'आई, मी बाहेर जातोय गं,'मोबाईलवर बोलत मंदारने चपला घातल्या.

'अरे अर्णवला बरोबर घेऊन जा ना,कंटाळलाय तो', असं सुरू मंदारला म्हणेपर्यंत तो घराबाहेर गेलासुद्धा.

'नुसता मित्रांबरोबर भटकायला जातो तर जाता जाता इस्त्रीवाल्याकडे कपडे टाकायला काय झालं होतं त्याला,'वसंतराव चिडले.

'मला कशाला सांगता? डायरेक्ट मंदारशी बोलायचं ना ',सुलूपण वैतागली होती.

 मनाली स्वयंपाकघरात शिरली ती उत्साहाने ओथंबूनच.'माझे आईबाबा येताहेत अर्णवशी खेळायला.मी झोमॅटोवरुन काही तरी मागवते.'

'मी आता विश्रांती घेणार आहे.तुला काय मागवायचं ते मागव.'सुलू थंडपणे म्हणाली आणि बेडरुममध्ये जाऊन पडली.

'अगं, सगळी कामं आऊटसोर्स केली आहेत.पोळ्यांना बाई,भांडी,केर,लादीला बाई, इतकं असूनही आमच्या आई इतक्या का दमतात तेच कळत नाही,'मनाली तिच्या आईला सांगत होती.सुलूला बेडरुममध्ये सारं काही स्पष्ट ऐकू येत होतं.सुलूचा अगदी संताप संताप झाला.एव्हढ्या गोष्टी आऊटसोर्स केल्या म्हणजे झालं?बाई गं, एक महिना घर चालवून बघ म्हणजे कळेल.लहान मुलाच्या कलानं घेऊन स्कूलबसच्या वेळेत त्याचं आवरणं, भाज्या आणणं, त्या निवडणं,घर आवरणं, घरातील वाणसामानाची यादी करून ते आलं की त्याची व्यवस्था लावणं या गोष्टी कधी न संपणाऱ्या आहेत हे माहित तरी आहे का? शिवाय घरातून थोडा वेळ जरी बाहेर जायचं म्हटलं की किती अडचणी येतात याची कल्पना आहे? यांचं परस्पर भागतंय ना म्हणून कळत नाहीए... सुलू नेहमीप्रमाणे बोलली.स्वतःशीच....

अर्णवचे खाणेपिणे, आंघोळ आटोपून तो आजोबांबरोबर स्कूलबससाठी रवाना झाला आणि सुलूने निश्वास टाकला.आता घर आवरायचे.इतस्तत:पडलेली वर्तमानपत्राची पाने क्रमवार लावता लावता तिची नजर आजूबाजूला गेली.इतकी वर्ष अभिमान वाटणारे तिचे ते भलेमोठे, प्रशस्त घर आता तिला का कुणास ठाऊक,नकोसे वाटायला लागले होते.अर्णवमागे धावताना तिची पुरेपूर दमछाक होत असे.अर्णवची खेळणी ती टबात टाकत असतानाच मोबाईल वाजला.अनुताई फोनवर होती.

'अगं आमच्या घराच्या वास्तुशांतीची तारीख ठरली आहे.तुम्ही सगळ्यांनी आदल्या दिवसापासून यायचं आहे बरं का!'अनुताईचा आनंद तिच्या स्वरातून ओथंबत होता.

सुलू एकदम सावध झाली.'किती तारखेला?वार कोणता आहे?'

'अगं येत्या महिन्याच्या पाच तारखेला आहे.गुरुवार येतोय.गुरुजींनीच तारीख काढून दिली आहे.मंदार मनालीला म्हणावं,अनुमावशीचं खास आमंत्रण आहे.एरव्ही कधी येत नाहीत, कधी फोन करत नाहीत तर निदान अशा समारंभाला उपस्थित राहिले तर नाती टिकतील, भेटी होतील हो की नाही?'अनुताई सुलूलाच सुनवत होती.सुलूला तिचं म्हणणं पटत होतं पण ती तरी काय करू शकत होती? सुलूच्या नजरेसमोर क्षणार्धात मंदार आणि मनालीचे नाराज चेहरे तरळून गेले आणि आता ही खिंड कशी लढवायची या विचाराने सुलू अस्वस्थ झाली.

एक एक घास खात अर्णव घरभर फिरत होता अन् ताटली घेऊन सुलू त्याच्यामागे फिरत होती.अर्णव मधेच थांबला आणि म्हणाला,'आजी गोष्ट सांग.'

'कुठली सांगू?'

'काऊ आणि चिऊची सांग '

'बरं सांगते हं ',सुलूने अर्णवला डायनिंग टेबलवर बसवले आणि खुर्चीवर बसून अर्णवला घास भरवता भरवता गोष्ट सांगू लागली.

'एक होता काऊ अन् एक होती चिऊ.काऊनं विचारलं चिऊताई चिऊताई काय करतेस?चिऊ म्हणाली, माझ्या बाळाला मोठं करते, नोकरी करत घर संभाळते.


काऊ म्हणाला, चिऊताई चिऊताई काय करतेस? चिऊताई म्हणाली,सणवार, नातेवाईक संभाळत बसते.

'काऊने विचारलं, चिऊताई चिऊताई काय करतेस?चिऊ म्हणाली, माझ्या बाळाचा संसार करते .काऊने विचारलं, चिऊताई चिऊताई काय करतेस?चिऊ म्हणाली,खऱ्या निवृत्तीची वाट बघते.'


सुलूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि आजीला काय झाले म्हणून बिचारा अर्णव कावराबावरा होऊन आजीकडे बघत बसला.

    

  क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama