Pratibha Tarabadkar

Drama Others

3  

Pratibha Tarabadkar

Drama Others

एक होती चिऊ भाग -४

एक होती चिऊ भाग -४

5 mins
216


'येत्या रविवारी मी माझ्या मैत्रिणींबरोबर नाटकाला जाणार आहे ', सुलूने रात्री जेवताना जाहीर केले.

त्याबरोबर वसंतराव,मंदार,मनालीचे घास हातातच राहिले.तिघेजण एकमेकांकडे टकामका बघू लागले. सुलू डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिघांच्या प्रतिक्रिया निरखत होती.

'अचानक प्लॅन केलास अगदी?'वसंतरावांच्या स्वरात नाराजी कळून येत होती.

'किती वाजताचं नाटक आहे?' मनालीने चाचरत विचारले.

'दुपारी चार वाजताचं नाटक आहे.म्हणजे मी तीन वाजता घरातून निघणार.सात वाजता नाटक संपेल म्हणजे येताना आठ साडेआठ नक्कीच होतील.

मनालीने मंदारला हळूच खूण केली.

मंदार खाकरला.'आई,मनालीच्या वाढदिवसासाठी ड्रेस घ्यायला संडे ला आम्ही मॉलला जाणार आहोत.'

'अरे मग जा की! जरुर जा.अर्णवला पण बदल होईल.आणि मॉलला जाताय तर अनुमावशीच्या वास्तूशांतीसाठी गिफ्ट पण तिथूनच आणा तुमच्या आवडीचं. लक्षात आहे ना पुढच्या महिन्यात तिच्याकडे वास्तूशांत आहे ते!'

तिच्या बोलण्यासरशी तिघांचीही तोंडं वाकडी झाली याची तिनं नोंद घेतली. लग्न झाल्यावर मुलीनं सासरच्या मंडळींमध्ये दुधातील साखरेसारखं विरघळून जावं अशी अपेक्षा करताना पुरुषानं मात्र मुलीच्या माहेरच्यांशी कायम दूजाभाव ठेवावा हा कुठला न्याय? वसंतरावांच्या कपाळावरील आठी बघून सुलूच्या मनात आले.

   'मी ब्यूटी पार्लरला जातेय ',सुलू पायात चपला सरकावत म्हणाली.

'माझा चहा?' वसंतरावांच्या या प्रश्नावर सुलूने त्यांच्याकडे रोखून पाहिले.

'तुमचा चहा कराल तेव्हा माझाही करुन ठेवा 'ती म्हणाली आणि दार उघडून बाहेर पडली.

  ब्यूटी पार्लरच्या आरशात स्वतःकडे निरखून बघताना सुलूचा स्वतः च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काळ्याभोर केसांचा शोल्डरकट, कोरलेल्या भुवया, फेशियल मुळे टवटवीत दिसणारा चेहरा...सुलूला आनंदाने स्वतः भोवती गिरकी घ्यावीशी वाटली.

 नाटकाला भेटल्यावर सगळ्या मैत्रिणींनी दिलेल्या कॉंप्लिमेंटस्, त्यांच्या सोबत पाहिलेले अप्रतिम नाटक आणि नंतर हॉटेल मध्ये केलेलं डिनर.... सुलू कित्येक वर्षांनी हे आयुष्य नव्याने जगत होती. तिचे ओठ अलवारपणे गुणगुणू लागले,'आज फिर जीने की तमन्ना है '

सुलू घरी आली तेव्हा वसंतराव अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. डायनिंग टेबलवर मांचुरियन, पिझ्झा,नूडल्सची पार्सलं पडली होती. मंदार ,मनाली, अर्णव अजून आले नव्हते. सुलू कपडे बदलून बेडरुममध्ये गुडूप झोपून गेली.

अनुताईच्या वास्तूशांतीसाठी गिफ्ट म्हणून मंदार मनालीने सुंदरशी गणपतीची मूर्ती आणली होती. घरात दाखवून मनालीने छानपैकी गिफ्ट पॅक करुन आणले.

'आई, मला ऑफिसमध्ये महत्वाची मिटींग आहे म्हणून मी मावशीकडे येऊ शकणार नाही ', मंदारने जाहीर केले.

'माझ्या मैत्रिणीचा हळदीसमारंभ नेमका त्याच दिवशी आहे त्यामुळे मी सुद्धा येऊ शकत नाही,पण माझ्या तर्फे त्यांना शुभेच्छा द्या हं,'मनालीच्या सबबीचे आणि नाटकी बोलण्याचे सुलूला मनातल्या मनात हसू आले.

'माझ्या पेन्शनर्स असोशिएशनची मिटींग त्याच दिवशी आहे.'वसंतरावांनी जाहीर केले. सुलूला तिघांच्या वागण्याचे आता अजिबात वैषम्य वाटेनासे झाले होते.

'काही हरकत नाही,'सुलू थंडपणे म्हणाली,'अर्णवची काय व्यवस्था लावायची? त्याची त्या दिवशी शाळा आहे ना?'

त्याबरोबर तिघेही चमकून एकमेकांकडे बघू लागले. वास्तूशांत टाळण्यासाठी सबबी सांगताना हा मुद्दा त्यांच्या लक्षातच आला नव्हता.

'अगं आई,'मंदार घाईघाईने म्हणाला,'तो काय केजीत तर आहे, एक दिवस शाळा बुडली तर काय फरक पडणार आहे? तू त्याला तुझ्या बरोबर घेऊन जा ना मावशी कडे!'

'छे रे बाबा, मावशीने मला मदतीला बोलावलंय.अर्णवला घेऊन गेले तर शक्य होईल का?'

'मग आता काय करायचं?' तिघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.त्यांना तसंच कोड्यात ठेवून सुलू मनातल्या मनात खुदुखुदू हसत होती.

मैत्रिणीच्या हळदी समारंभात नटूनथटून नाचायच्या बेतावर पाणी पडल्याने मनाली धुमसतच अर्णवला बरोबर घेऊन गेली. मंदार मिटींगच्या नावाखाली ऑफिसला गेला आणि वसंतराव 'अगं अगं म्हशी मला कुठं नेशी 'असा आव आणत सुलूबरोबर अनुताईच्या वास्तूशांतीसाठी आले.

अनुताईच्या नव्या घरासमोर काढलेली सुंदर रांगोळी,दाराचे तोरण, सनई चा मंद सूर...सारे वातावरण कसं प्रसन्न वाटत होतं.अनुताईने दोघांचं स्वागत केलं आणि 'वाटलंच होतं मंदार मनाली येणार नाहीत 'अशी पुस्तीही जोडली.

एकीकडे होम हवन,मंत्रघोष सुरु झाले आणि एक एक पाहुणे हजर होऊ लागले.आतेभावंडं,मामेभावंडं,मावसभावंडं, अनुताईच्या सासरची मंडळी....सर्वजण एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करीत होती, जुन्या आठवणींना उजाळा देत होती, हल्ली समारंभाशिवाय एकमेकांना भेटता येत नाही म्हणून खंत व्यक्त करीत होती.अनुताईचा मुलगा आणि सून सोडले तर जणू ज्येष्ठ नागरिक संघाचा मेळावाच भरलाय असं वाटत होतं.आपल्यानंतरची पिढी हे संबंध टिकवणार नाही याबद्दल सगळयाजणांना खेद वाटत होता पण काय करणार?

एकमेकांचे निरोप घेऊन सारे आप्त निघाले, चेहऱ्यावर हसू घेऊन...

 सुलूचा पूर्वीचा आत्मविश्वास पुन्हा एकदा नव्याने जागृत होऊ लागला. केवळ वेळीच नकार न देता आल्यानं आपल्याला घरच्यांनीच गृहित धरलं आणि त्याची किंमत आपण मोजतोय याचे भान तिला आले. स्वत:घ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर आपले छंद,आवडी जोपासल्या पाहिजेत याची जाणीव तिला झाली आणि यावर्षी तिच्या मैत्रिणी जेव्हा गुजरातची ट्रीप आखू लागल्या तेव्हा तिने त्यात सामील होण्याचा मनसुबा जाहीर केला तेव्हा सर्व मैत्रिणींना आश्चर्याचा धक्काच बसला.

'वेलकम संसारी बाई, अगं हेच तर आपले दिवस आहेत हिंडण्या फिरण्याचे! पुढे हातपाय थकल्यावर मनात इच्छा असली तरी शक्य होईल का?'

'खरंय,'सुलूने मान डोलावली.'सगळं कबूल आहे गं पण मी ट्रीपला गेले की अर्णवचे हाल होतील म्हणून जीव घाबरतो,' सुलूचा स्वर कातर झाला.

'खरंय तू म्हणतेस ते पण कधी ना कधी अशी वेळ येणारच. मग प्राप्त परिस्थितीत मार्ग कसा काढायचा यासाठी घरातील मंडळी प्रयत्न करतीलच.आणि याची सुरुवात या ट्रीपच्या निमित्ताने होईल तेव्हा फार काळजी करू नकोस.'

'अगं आता कुठे रेल्वेचं, हॉटेलचं बुकिंग करणार.मधे अजून चार महिने आहेत आपल्याला गुजरातला जायला. तोपर्यंत घरच्या मंडळींना पर्यायी व्यवस्था शोधता येईल की!'

   सुलूने ट्रीपसाठी मैत्रिणींना हो म्हटले होते खरे पण ती जरा साशंकच होती.

 'मी चार महिन्यांनी गुजरातला मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाणार आहे ', सुलूने बातमी सांगितली आणि वसंतरावांना पाणी पिता पिता ठसका लागला.

 'किती दिवसांसाठी?', मंदारने स्वरात शक्य तितके मार्दव आणत विचारले..

'आठ दिवसांची ट्रीप आहे आमची!'

'मग अर्णवचं काय करायचं?',मनालीने चिंतातूर स्वरात विचारले.

'अजून चार महिने आहेत जायला. तुम्हाला खूप अवधी आहे त्याच्यासाठी व्यवस्था करायला.'सुलूने ' तुम्हाला'या शब्दावर जोर दिला.

 सुलू चार महिन्यांनी का होईना पण तब्बल आठ दिवस घराबाहेर रहाणार ही वार्ताच घरातील सर्वांना चिंतातूर करणारी होती.सुलू कायम घरातच रहाणार हे जणू त्यांनी गृहितच धरले होते.

अर्णवसाठी पाळणाघर शोधण्याची जोरदार मोहीम सुरू झाली.लवकरच आपल्या घरापासून केवळ दहा मिनिटांवर सुसज्ज असे पाळणाघर आहे असा शोध लागला.पाळणाघराची सवय लागावी यासाठी संध्याकाळी चार ते सहा अर्णवला पाळणाघरात सोडायची जबाबदारी त्याचे आजोबा म्हणजेच वसंतरावांनी स्वीकारली. ते त्याला स्कूटर वरून ने आण करू लागले.कामवाल्या बाईंना थोडे पैसे जास्त देऊन त्यांच्याकडून भाज्या निवडणे ,चिरणे या जबाबदाऱ्या सोपविल्या तर पोळ्यांच्या बाईंवर नाश्ता करणे, भाजी करणे याचे जादा काम दिले गेले. मंदार,मनाली डी मार्ट मधून सामान आणू लागले.... अशा त-हेने घराची व्यवस्था नीट लागली आणि सुलू निःशंक पणे ट्रीप ला जाण्यासाठी बॅग भरु लागली.बॅग भरता भरता ती गुणगुणू लागली,

'पंछी बनू उडती फिरू मस्त गगनमें....


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama