दिवाळी
दिवाळी
आज सकाळी मी ऑफिसच्या रोजच्या कामात व्यस्त होते आणि माझ्या एका खूप जुन्या मैत्रिणीचा फोन आला . ती फक्त मैत्रीणच नाही तर बालपणी आम्ही एकाच कॉलनीत आणि तसे शेजारीच रहात होतो . खूप आनंद झाला तिच्याशी बोलून पण वेळ नसल्यामुळे जास्त काही बोलता आलं नाही पण मी तिला घरी ये म्हणून सांगितलं आणि ती लगेच हो म्हणाली , ' येते म्हणे मी रविवारी, खूप गप्पा मारू आपण ' . आणि मी परत माझ्या ऑफिसच्या कामाला लागले .
ठरल्या प्रमाणे आम्ही भेटलो , खूप गप्पा झाल्या , जुन्या आठवणी आणि मुख्यतः दिवाळी नुकतीच होवून गेली होती तर आमच्या आठवणीतली लहानपणाची दिवाळी आणि त्या सगळ्या आठवणी येत गेल्या , खूप - खूप आनंद झाला . आणि त्या आठवणी मला तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायला आवडेल.
खरंच काही चांगल्या आठवणी मागे सुटत जातात आणि जेव्हा आपण वर्तमान स्थितीशी तुलना करतो तेव्हा असं वाटतं की किती सुखाचे आणि आनंदाचे दिवस होते ते ! कीती धमाल , मज्जा , आपलेपणा , एकोपा आणि आपुलकी होती त्या नात्यांमध्ये , जी आता हरवत चालली आहे .
दिवाळी हा आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा वार्षिक सण. लहान - मोठे सर्व जण अगदी दिवाळीची वाट बघत असतात . आणि बालपणी सणासुदीची मजा काही वेगळीच असते . एक उमेद , उत्साह , आवड आणि रिकामा वेळही असतो .
एक महिना आधी पासून गल्लितली मुलं आकाशकंदील बनवायला सुरुवात करत असत . त्याला लागणारे साहित्य म्हणजे बांबूच्या विशिष्ट लाकडी काठ्या त्या ठरलेल्या मोठ्या मार्केट मधून विकत मिळत असत. आणि फक्त स्वतःसाठी नव्हे तर आजूबाजूचे शेजारी राहणारे मुलं ही जबाबदारी घेत असत . शाळा - कॉलेजचा अभ्यास , तर कुणी नोकरी सांभाळून संध्याकाळी फावल्या वेळात आकाशकंदील बनवायचं काम करत असत . कुणाच्या तरी घरी एकत्र सगळं सामान जमवत असत .
त्यात पुन्हा वेगवेगळ्या डिझाईन्स व आकाराचे आकाशकंदील . त्या लाकडी कामट्या हव्या त्या उंची व जाडीच्या कापून घेणं हे एक कलाकुसरीचे काम होते . धारदार सुरीने ते कापताना खूप सावधानी बाळगावी लागते . हाताला लागता कामा नये . त्या नंतर त्यांना जुळवून गोंद लावून , दोऱ्याने पक्क बांधून त्याला वाळू देत असत . कधी काही चुकलं तर परत नव्याने जुळवणी करून मग काम पुढे जात असे .
एकदा कंदील तयार झाला की मग त्यावर रंगीत कागद चिकटवले जात असत . त्यातही कलाकुसर , नवनवीन प्रकार दरवर्षी . आणि काही वेळेला अगदी ऐन दिवाळीच्या दिवसा पर्यंत शेवटी तो कंदील तयार होत असे . आणि मग त्यात बल्ब लावून मग जो घराच्या ओट्याच्या भिंतीपर्यंत त्याचा रंगबेरंगी प्रकाश पडत असे तेव्हा तो स्वर्गीय आनंद कंदील बनवणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे . आणि आम्ही मुली व घरातले सगळेच जे त्या कामात सहभागी नव्हते ते टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन व अभिनंदन देत असू .
ज्यांना आकाशकंदील बनवण्या मध्ये सामील नसेल होता येत ते मुलं एकत्र येवून माती - गारा यापासून ऐतिहासिक किल्ले , राजवाडा असे बनवून त्यात गेरू , चुना , झाडांच्या फांद्या , काटक्या व इतर वस्तू वापरून त्याची सजावट करत आणि काहीवेळा त्यात स्पर्धा म्हणून मार्क पण दिले जात त्यामुळे पुढल्या वर्षी आणखीन चांगलं करायसाठी प्रोत्साहन मिळत असे .
घरातली मोठी मंडळी दिवाळीच्या निमित्ताने लागणाऱ्या जिन्नस , सामानाची यादी करून ठेवत. पुरुष मंडळी त्या यादि प्रमाणे सर्व वस्तू बाजारातून आणून देत असत. नवीन कपड्यांची खरेदी हा पण एक महत्वाचा भाग होता . कधी मोठी बहीण घरच्या शिवण मशीनवर घरीच कापड आणून निरनिराळ्या प्रकारचे फ्रॉक, ड्रेस शिवत असे लहान भावडांसाठी .
आई , काकू , आजी म्हणजे घरातील स्त्रिया व शेजार- पाजारच्या बायका फराळाच्या पदार्थांची तयारी करत असत . अनारस्या साठी आई तांदूळ , भगर भिजवून ठेवत असे , दोन दिवस त्याचं पाणी बदलत राहणे त्यानंतर त्याला खलबत्त्यात कुटून त्याला गूळ अथवा पिठीसाखर एकत्र करून त्याचे लाडू बनवून ते नीट सांभाळून ठेवले जात असत . चकलीची भाजणी बनवून ती दळून आणणे . खूप मेहनतीच काम असे हे सगळं .
आजी कापसाच्या वाती करत असे , सुत काढून ठेवत असे . पणत्या लावण्यासाठी कापसाच्या वाती लागत असत . आणि हो स्त्रिया , मुलींसाठी किंवा घरातील सर्वांसाठीच साफसफाई हे एक महत्वाचं काम असे . माळे साफ करणे . रद्दी - भंगार विकून त्यानंतर ही बरेच अडगळीच्या वस्तू ज्या कधीतरी कामास पडतात म्हणून ठेवून द्याव्या लागतात , त्या पुन्हा नीट झटकून पुसून लावून ठेवणे .
प्रत्येकानी आपापला पुस्तक - वह्यांचा कप्पा आवरणे. कपड्यांचे कपाट नीटनेटके करणे . स्वयंपाकघरातील फळ्या झाडून - पुसून त्यावरील तांब्या - पितळ्याची भांडी चिंच लावून अगदी चमचमीत घासून ठेवणे . इतर डबे भांडी पण घासून पुसून नीट लावून ठेवणे . अगदी दिवाळी येई येई पर्यंत कित्ती काम !
आणि फराळाचे किती निरनिराळे पदार्थ घरात बनवले जात असत . गुळाचे शंकरपाळे, साखरेचे तसेच खारे शंकरपाळे , चकल्या , शेव , चिवडा , अनारसा , बेसनाचे लाडू , करंज्या , सांजोऱ्या आणि असे अनेक पदार्थ .
अत्तर , उटणे, फटाके , पणत्या , रंगीत दिव्यांची सर , घरात नवीन पडदे , टेबल क्लॉथ, दाराला तोरण आणि जर दिवाळी निमित्त घरात रंगरंगोटी करायची झाली तर खूपच काम पुरत असे , पण घर कसं सुंदर आणि स्वच्छ होवून जात असे . अनेक आठवणी आणि त्यात मिळणारा आनंद .
आणि मग दिवाळीची सुरुवात होई वसुबारस म्हणजे गाय वासराची घरातील स्त्रिया पूजा करत असत त्यांना ज्वारी बाजरी ची भाकरी करून खाऊ घालत असत आणि जणू त्यांना माहीत असल्यासारखं त्या मुकाट्यानं पूजा करून घेत असत कधीतरी एखादी गाय जर मारकुटी निघाली तर त्रासदायक होत असे .
दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी . त्या दिवशी स्त्रिया व मुली डोक्यावरून न्हाऊन आणि नीटनेटके रहात असत. जेवणात काहीतरी गोडधोड बनत असे . आणि सकाळी धनाची म्हणजे तांबे , चांदी ह्याच्या नाण्यांची पूजा केली जात असे , लक्ष्मी म्हणून आणि दररोज नवीन गोड पदार्थ नेवेद्य म्हणून ठेवला जात असे . संध्याकाळी फटाके फोडून दिवस साजरा होत असे .
चतुर्दशी म्हणजे नरकचुर्दशीच्या दिवशी घरातील पुरुष व मुलांचं जास्त महत्व . सकाळी अभ्यंगस्नान म्हणजे सूर्योदयाच्या आधी पुरुष मंडळींची स्नान होवून जात असत . अगदी थंडीत कुडकुडत उठून पाट रांगोळी काढून अंगाला सुगंधित तेल लावून देणं , उटणे लावून आंघोळ , औक्षण आणि कणकेचे चार दिवे करून त्यात तेलवात पेटवून स्नानाच्या ठिकाणी चार दिशेला लावून ठेवत , आणि अंघोळीच्या वेळी फटाके फोडून ते अभ्यंगस्नान पूर्ण होत असे .
सर्व पुरुष मंडळी व मुलांचे स्नान झाल्यावर त्यांना फराळ दिला जात असे . कुठेतरी सनईचा सुर कानावर पडत असे रेडिओवर वगैरे आणि सगळं वातावरण कसं प्रसन्न होवून जात असे . पुन्हा दिवाळीचे चार दिवस जेवणात कधी बासुंदी , तर कधी चिरोटे , जिलबी , बुंदीचे लाडू असे क्वचित बनवले जाणारे गोड पदार्थ बनत असत . आणि आमच्याकडे घरातील पुरुष म्हणजे वडील व काकांचाही हे गोड पदार्थ बनवण्यात व काही फराळाचे पदार्थ बनवण्यात तेव्हडाच वाटा असे. वडिलांचा जिलबी तर काकांचा बुंदीचे लाडू बनवण्यात हातखंडा होता . जेवताना ताटा समोर रांगोळी काढून सण साजरा होत असे .
नंतर पाडवा व भाऊबीज तेव्हढ्याच उत्साहाने व परंपरागत रित्या आणि आनंदाने साजरा होत असे . मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेणे , नवीन वस्त्र परिधान करून , घरासमोर रांगोळी काढून संध्याकाळी पणत्या लावून फटाके फोडून पाडवा संपन्न होत असे . भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी पाट - रांगोळी करून भावंडं आळीपाळीने म्हणजे क्रमाने डोक्याला टोपी लावून पाटावर बसून बहिणीं कडून ओवाळून घेत असत आणि बहिणींना ओवाळणी देत असत . दुपारी गोडधोड पदार्थ करून साग्रसंगीत जेवण होत असे , पाटा समोर रांगोळी वगैरे काढून .
फटाक्यांचे सुद्धा कीती प्रकार ? आणि आपापल्या वयोगटा प्रमाणे फटाके मिळत असतं . आधी फुलबाजी, नाग , टिकल्या , रंगीत कड्यापेट्या , भूईचक्कर, मोठे फटाके , लवंगी फटाक्याची लड , रॉकेट वगैरे . आमच्याकडे मोठी मंडळी स्वतः सहभाग घेवून उत्साहाने मोनोरेल म्हणजे दोन लोखंडी खांबांना ती दोरी बांधून मोनोरेल लावत असत आणि त्यामुळे गल्लीतील सर्व लहान मंडळीच छान मनोरंजन होत असे .
दिवाळीचे चार दिवस मुली घरासमोर निरनिराळ्या डिझाईन्सची रांगोळी काढून त्यात वेगवेगळे रंग भरत असत . एकमेकींच्या घरी रांगोळी पाहायला जाणे, कोणाला मदत हवी , किंवा कोणी मदत मागितली तर पटकन तयार होणं मदतीला हा सगळा एक दिवाळी साजरा करण्यातला भाग असे .
आणि अशा प्रकारे दिवाळीचा सण साजरा होत असे. पण तो अजून पूर्ण होत नसे जोपर्यंत एकमेकांच्या घरी फराळाला जाऊन येत नाही तोपर्यंत . लहान मुलं आपापल्या मित्रमैत्रिणींना फराळाला बोलवत , तर पुरुष मंडळी त्यांचे मित्र व शेजारी - पाजारी तर बायका , त्यांचाही फराळ होत असे एकमेकींच्या घरी जाऊन . असा हा उपक्रम दिवाळी संपल्यावर आणि फराळाचे पदार्थ संपेपर्यंत चालत असे .
अशी ही परंपरागत दिवाळी आणि प्रत्येक दिवस साजरा करण्या मागचं महत्व , त्याची मजा काही औरच होती . आता वेळेच्या अभावे म्हणा किंवा काहीही म्हणा पण खूप बदल घडले आहेत ह्या मागच्या बऱ्याच वर्षात . तेव्हा काही अभाव , तुटपुंजी कमाई असूनही लोकं वर्षाचा सण म्हणून काहीही कमतरता न ठेवता आपापल्या परीने आनंदाने , एकोप्याने दिवाळी साजरी करत असत . आता कशाची कमतरता नसूनही तो उत्साह , उमेद , एकोपा , आत्मीयता तितकी पाहायला मिळत नाही .
आपण सर्वांनी मिळून आपली परंपरा , उत्साह , आपुलकी व मित्रता जपली पाहिजे , नाती पुन्हा ताजी ठेवली पाहिजे . पारंपरिक पदार्थ आणि त्यामागचं विज्ञान लक्षात घेतलं पाहिजे . आपले संस्कार जपले पाहिजेत.
दिवाळी म्हणजे फक्त नवीन पदार्थ , नवीन ड्रेस परिधान करून, फटाके फोडून साजरी करणे असं नाही तर प्रत्येकाला आपल्यातील निरनिराळे गुण , विशिष्ट्ता ह्याचा उपयोग करून काहीतरी नवीन करून दाखवणे , नवीन शिकणे , कला गुणांना वाव देणारा हा सण असतो . जसं आकाशकंदील , किल्ले व ऐतिहासिक ठिकाण याचं मॉडेल तयार करणे , स्त्रियांसाठी रांगोळीची कलाकुसर व पाककृती मधली रुची व गुण दाखवण्याची संधी तर पुरुषांसाठी सर्व व्यवस्था बघणे , मदत करणे याला वाव मिळतो , घरातील वडीलधारे सर्वांना आशीर्वाद देऊन आपलं कर्तव्य पूर्ण करतात व जमेल तिथे मदत करून हातभार लावतात .
अशी ही दिवाळी कधीही न विसरता येणारी दिवाळी !! तुम्हा आम्हा सर्वांवरच आनंदाची उधळण करून जाणारी दिवाळी !