Pratibha Tarabadkar

Drama

4.3  

Pratibha Tarabadkar

Drama

डंख - भाग ३

डंख - भाग ३

7 mins
320


'शलाकाच्या आई, कळलं का तुम्हाला,दंडग्यांच्या आकाशचा घटस्फोट झाला.'पोंक्षेवहिनी म्हणाल्या.शलाकाच्या आईने आश्चर्याने आ वासला. तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.पोंक्षेवहिनी पुढे काही बोलणार तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्या बोलत बोलत घरी गेल्या.कधी एकदा शलाका आणि तिचे बाबा घरी येतायत आणि त्यांना ही बातमी सांगतेय असं आईला झालं होतं.पण ही बातमी कळल्यावर त्या दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.पण शलाकाची आई गप्प बसणार नव्हती.'काय ग सरु,आकाशचा घटस्फोट झाला म्हणे?'भांडी घासणाऱ्या सरुबाईला तिने विचारले तशी सरुबाईची रसवंती धो धो वाहू लागली.'काल घरला जाताना मला कळलं.कदी एकदा तुम्हाला सांगते असं झालं होतं.अवं ती दंडगे म्हातारा म्हातारी सारखी दाराला टाळं मारुन बंगलुरला जात हुते ते त्यासाठीच!ती आकाशची बायकू पोराला आनि आकाशला सोडून सरळ अमेरिका का काय तिकडं निघून गेली.म्हनून तर हे दोगंबी तिथंच राहिल्यात पन आता आकाशनं हिकडं बदली मागून घेटलीय आनि समदं हितंच रहानार हायेत.'शलाकाची आई मन लावून सगळं ऐकत होती.बरोबरच आहे,या प्रकरणात सगळ्यात जास्त तोंड द्यावे लागले होते ते तिलाच!टोमणे, कुत्सित नजरा,आगाऊपणाने केलेल्या चौकशा... सगळं सगळं सहन करावं लागलं होतं तिला.


हल्ली दंडगे पती पत्नी नातवाला बाबागाडीत बसवून फिरवताना दिसत.मंडळातून येताना शलाकाच्या आईची त्यांच्याशी बहुतेक वेळा गाठ पडत असे. दंडगे तिला सामोरे आले की तिची नजर चुकवित असत.तेव्हा शलाकाच्या आईच्या चेहऱ्यावर खुशीने स्मित उमटत असे. पेरेंटस् मिटींग आटोपून शलाकाला शाळेतून घरी यायला उशीरच झाला होता.आजच्या मिटींगमध्ये काय काय झालं याची मनातल्या मनात उजळणी करत शलाका झपझप पाय उचलत होती.तेव्हढ्यात 'शलाका'अशी हाक ऐकून ती दचकून थांबली.समोर आकाश उभा होता.तब्येतीने हडकलेला, निस्तेज!'कशी आहेस शलाका?'त्याने हळूवारपणे विचारले.'कशी वाटतेय?'स्वत:वर कसाबसा ताबा ठेवत शलाकाने प्रतिप्रश्न केला.'शलाका,आय एम व्हेरी...आकाशचे वाक्य पूर्ण होण्याआधीच शलाका झपाझप पुढे निघून गेली होती.


 शलाकाने तोंडावर पाण्याचे हबकारे मारले आणि ती भिंतीला टेकून उभी राहिली... आपल्या हृदयाची धडधड ऐकत.आज कितीतरी दिवसांनी...नव्हे वर्षांनी आकाश दिसला होता.जुन्या स्मृती पुन्हा उफाळून आल्या होत्या.जो कोणे एकेकाळी शलाकाच्या ध्यानीमनी स्वप्नी होता तो आकाश! त्याच्याबरोबर बाईकवरुन केलेल्या सफरी,शेअर केलेली सुख दुःखं, एकत्र पाहिलेली स्वप्नं...त्याने कानात केलेली 'आलोकची आई'अशी कुजबुज!'आलोक आकाश दंडगे' शलाका नकळत मोठ्याने म्हणाली पण लगेचच भानावर येऊन तिने आजुबाजूला पाहिलं. नशीब,आईबाबा समोर नव्हते.शलाकाने सुटकेचा निःश्वास टाकला.

 

आजकाल दंडगेबाईंचे भजनी मंडळ, महिला मंडळ सगळंच बंद झालं होतं.नातू मोठा झाल्यानं अवखळ झाला होता.'अरे रायन, अरे रायन' असे ओरडत त्याच्या मागे धावताना श्री. व सौ.दंडग्यांची दमछाक होत होती.'कसली ग बाई दंडग्यांची ती सून, करिअर करण्यासाठी मुलाला सोडून सरळ अमेरिकेला निघून गेली!'एकजण म्हणे तर दुसरी म्हणे'मला तर ती लग्नाच्या दिवशीच नटमोगरी वाटत होती.काय तो तिचा गाउन,गळा आणि पाठ उघडी टाकणारा,काय तिचे लाडे लाडे इंग्रजी बोलणं...'हो ना,फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन केलं म्हणून काय झालं, काही रीतभात आहे की नाही?'

 बायकांचं असं बोलणं ऐकून शलाकाची आई थक्क झाली.ज्या बायका तिच्या पुढे आकाशच्या थाटामाटात साजऱ्या झालेल्या लग्नाचे मनसोक्त कौतुक करत होत्या त्याच बायका त्याच्या घटस्फोटाची चर्चाही तितक्याच चवीने करीत होत्या.'अशा लोकांची का बरं मी इतकी पर्वा करत होते?शलाकाच्या आईला वाटलं.


'आज बाजारातून यायला इतका उशीर?'शलाकाने आईच्या हातातून पिशवी घेत विचारले.'हो अगं, तुझ्या ब्रह्मे मॅडम भेटल्या होत्या बाजारात.मग पुष्कळ वेळ गप्पा मारत होतो.'आई रुमालाने घाम टिपत म्हणाली.'तू आणि ब्रह्मे मॅडम?'शलाकाने आश्चर्याने विचारले.तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन आई घटाघटा पाणी प्यायली.'अगं तुझ्यासाठी स्थळ सांगत होत्या.त्यांच्या लांबच्या नात्यातल्या मुलाचं स्थळ.अक्षय देशपांडे म्हणून.भरपूर शिकलेला, निर्व्यसनी, सुस्वभावी आहे म्हणे.'


 'आई जर पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढलास तर मी तुझ्याशी बोलणंच बंद करीन',शलाका वैतागून म्हणाली.'तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं काही सुचतच नाही का?'

 'नाही.'शलाकाची आई ठामपणे म्हणाली.'अगं तुझ्या लग्नाच्या काळजीने रात्र रात्र झोप लागत नाही आम्हाला.तुझ्या मैत्रिणींची लग्न होऊन मुलं झाली त्यांना आणि तू मात्र...शलाका, तुझं वय वाढत चाललंय ग! काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात बाई.उशीर झाला तर कशालाच अर्थ उरत नाही बघ.आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला?तुझा समवयस्क जोडीदार तुझ्या सुखदुःखात भागीदार... पुढचं ऐकायला शलाका थांबलीच नाही.

आज सुटी असल्याने शलाका निवांत लोळत होती.बाबा पुस्तक वाचत होते तर आई मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसली होती आणि बेल वाजली.कोण आलं असेल बरं? बाबांनी दरवाजा उघडला.दरवाज्यात दंडगे पती-पत्नीना पाहून ते स्तंभित झाले.'आम्ही आत येऊ शकतो का?'बळेबळे हसत दंडग्यांनी विचारले.बाबा काहीच न बोलता बाजूला झाले तशी दंडगे पती-पत्नी सोफ्यावर स्थानापन्न झाले.थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही.वातावरणात एक प्रकारचे अवघडलेपण जाणवत होते.


'एक प्रस्ताव तुमच्यापुढे ठेवायला आलो आहे.'श्रीयुत दंडग्यांनी प्रस्तावना केली.तिघांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.'आमच्या आकाशचं लग्न शलाकाशी व्हावं अशी मागणी घालायला आलो आहे.'दंडगे एका दमात बोलले.'काय?'एखादा बॉंबस्फोट व्हावा तसं झालं.सारेजण एकदम स्तब्धच झाले.शलाकाची आई लवकर सावरली.'पण त्याला तर ती शिक्षिका आहे म्हणून नको होती ना?'तिने विचारले.'तेव्हाची गोष्ट वेगळी होती'चिरडीला येत दंडगेबाई म्हणाल्या.'ही आयडिया कोणाची आहे?'आवाजावर संयम ठेवत शलाकाच्या बाबांनी विचारलं.'अहो अर्थातच आकाशची',दंडगेबाई ठसक्यात म्हणाल्या.'तो म्हणाला, नाहीतरी शलाकाचं लग्न होत नाहीये तर मीच करतो तिच्याशी लग्न!'त्या मानभावीपणाने म्हणाल्या आणि शलाकाच्या हृदयातील एका कोपऱ्यात आकाशचे जे अस्तित्व दडले होते त्याच्या क्षणात ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. ती आकाशपासून मनाने पूर्णपणे मुक्त झाली होती. त्वेषाने ती पुढे झाली.'दंडगेबाई, तुमच्या मुलाला विचारा, त्याला बायको हवी आहे का त्याच्या मुलाला सांभाळायला आया?कमावती आया?जी मुलाला सांभाळेल म्हणजे आई-वडिलांना त्रास नाही आणि वरुन कमावती म्हणजे तिला फुकट पोसावी लागणार नाही.अगदी असाच विचार आहे ना तुमच्या मुलाचा?'शलाकाचा आवाज चढला.ती गरजली'दंडगे,उठा आणि चालायला लागा.परत आमच्या घराची पायरी चढू नका.'


शलाकाचा रुद्रावतार पाहून दंडग्यांची भंबेरी उडाली आणि ते दोघे लगबगीने शलाकाच्या घरातून बाहेर पडले.आपलं पितळ उघडं पडलं या जाणीवेने शरमिंदे होत चेहऱ्याचा रंग उडालेले दंडगे बाहेर पडल्यावर शलाकाचे बाबा म्हणाले,'बरं झालं शलाका तू अशा स्वार्थी माणसांच्या घरी लग्न होऊन गेली नाहीस ते!' शलाकाचं मन आता पूर्ण निरभ्र झाले होते.आकाशचे तिच्या काळजातीलअस्तित्व पार पुसून गेले होते.आता ती पूर्ण मोकळी झाली होती.पूर्णपणे मुक्त!

 

'बाबा मला लग्न करायचं आहे.'त्या रात्री शलाका म्हणाली.तिच्या स्वरातील ठामपणा पाहून आईबाबा आश्चर्यचकित झाले.'आमच्या ब्रह्मे मॅडमनी सांगितलेलं स्थळ आहे ना त्याच्याशी करायचंय.'आईने मनातील आनंद लपवित विचारले,'अक्षय देशपांडेशी?'हो.तोच कोणी होता तो!'

 'बघते बाई त्याचं लग्न झालंय की नाही ते!'आईने वेगाने हालचाली सुरू केल्या.अक्षय देशपांडेला शलाका भेटली आणि काय आश्चर्य,दोघांचे सूर पटकन् जुळले.अक्षय नाममात्र घटस्फोटित होता.दोघांनीही भावनांची वादळे सोसल्यामुळे असेल कदाचित पण त्यांचा आपसातील समंजसपणा एकमेकांना पूरक ठरला व पुढील गोष्टी फार वेगाने घडल्या.

 

शलाकाच्या शाळेच्या एच.एम.ब्रह्मे मॅडम यांचा लांबचा नातेवाईक असलेला अक्षय एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत होता.त्याचे आईवडील गावाला रहात होते.सर्वांची पसंती झाली आणि अगदी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडण्याचे ठरले.हे इतक्या वेगाने घडले की एका टप्प्यावर शलाका भांबावून गेली.आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना याबद्दल तिच्या मनात अस्वस्थता दाटून आली.तिची चलबिचल सरुबाईच्या लक्षात आली.शलाका एका जागी निःशब्द बसलेली पाहून सरुबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली,'लग्न म्हणजे जुगार असतो ताई, जोडीदार चांगला मिळाला तर दिवाळी आन् नाही चांगला मिळाला तर शिमगा!पण हा जुगार खेळावा तर लागतोच.तो खेळला नाही तर आयुष्यभराचा एकटेपणाचा वनवास कपाळी येतोच येतो. तवा लग्नाला खुल्या मनाने तयार व्हा.पुष्कळ सोसलंय तुमी .देव तुमच्या पाठीशी उभा आहे हे ध्यानात ठेवा.'


ब्रह्मे मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच देशपांडे मंडळी अतिशय सज्जन व सुसंस्कृत निघाली आणि शलाका त्या घरात पटकन रुळली.अक्षय तिच्या आवडीनिवडी जपत होता तसेच शलाका सुद्धा संसार व शाळा यांचा समतोल राखत होती.त्यातच शलाकाची गोड बातमी कळली आणि आपण आता आजी आजोबा होणार या कल्पनेने शलाकाचे आई-बाबा मोहरुन गेले.इकडे देशपांडे कुटुंबीय सुद्धा या बातमीने आनंदित झाले.अक्षय हर प्रकारे शलाकाची काळजी घेत होता.शलाकाच्या सासूबाई सासरे तिच्यावर शाळा आणि घर यांची जबाबदारी कमी करण्यासाठी येथेच येऊन राहिले होते.सासूबाई शलाकाची आस्थेने विचारपूस करून तिचे डोहाळे पुरवित होत्या.आल्यागेल्याकडे आपली सून किती गुणी आहे याचे कौतुक करत होत्या तर शलाकाची आई बाळंतिणीचा आहार, नवजात बाळाची काळजी इ.विषयांवर यू.ट्यूब,अनुभवी स्त्रियांकडून माहिती घेत होती.


 सातव्या महिन्यात शलाकाचे दोन्ही कडील डोहाळे जेवण पार पडले आणि ती माहेरी रहायला आली.रेग्युलर चेक अप, पौष्टिक आहार यांनी शलाकाच्या अंगोपांगी तेज दिसू लागले होते.सरुबाईंनी मालिशवाल्या बाई आणल्या होत्या त्यांना फिक्स केले. 'ताई,काल त्या दंडगे बाईनं गाठलं होतं मला आणि लय चौकशा करत होती म्हातारी',सरुबाई भांडी घासता घासता म्हणाली.'अगं बाई हो?'शलाकाच्या आईने आश्चर्याने विचारले. 'म्हणाली,शलाकाचा नवरा काय करतो?कसा आहे सोभावानं,तिचे सासू सासरे कसे वागतात तिच्याशी...काय नं काय!म्या म्हणलं लय चांगले आहेत समदे.शलाकाताई एकदम खूश आहे तिच्या सौंसारात तशी चेहराच पडला दंडगेबाईचा!'सरुबाई खुदूखुदू हसत म्हणाली.

 त्या दिवशी शलाकाच्या आईने दृष्ट काढली शलाकाची.हो, उगाच 'कोणाची'दृष्ट नको लागायला माझ्या शलाकाला !


 अक्षयचा रोज फोन येत होताच, शनिवार रविवार भेटायला येत होता तर सासू सासरे शलाकाची चौकशी करीत असत. यथावकाश शलाका बाळंतीण झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.सर्वजण आनंदाने न्हाऊन निघाले.बाळाचं निगुतीने करण्यात दिवस अपुरा पडू‌ लागला. बाळाची दुपटी, झबली यांनी घर सजले.अक्षय आणि त्याचे आईवडील यांच्या बाळाला बघण्यासाठी फेऱ्या वाढल्या.यथावकाश बाळाचे अत्यंत थाटात बारसे झाले आणि शलाका बाळाला घेऊन सासरी रवाना झाली.घर सुनेसुने झाले.मात्र समंजस देशपांडे कुटुंबीय शलाकाच्या आई बाबांना बाळाशी खेळायला बोलवत तर कधी शलाका आणि अक्षय बाळाला घेऊन इकडे येत.

 

शलाका बाळाला घेऊन चार दिवसांसाठी माहेरी रहायला आली होती.बाळाला घेऊन संध्याकाळी ती खाली फिरत होती.आवारात मुलं खेळत होती आणि त्यांचा खेळ बाळ टुकूटुकू बघत रमलं होतं.शलाकाही मुलांचा खेळ बघण्यात गुंगून गेली होती.तेव्हढ्यात तिला 'रायन,रायन'अशा हाका ऐकू आल्या.ओळखीचा आवाज!आकाशचा आवाज!शलाकाने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले.समोरुन आकाश येत होता.निस्तेज,हडकलेला.केसांच्या बटाही अधूनमधून पांढुरक्या झालेल्या.शलाकाला आकाशमुळे भोगावे लागलेले दुःखदायक दिवस आठवले आणि ती पुढे झाली.

 

'आकाश,'तिने हाक मारली.आकाशने दचकून पाहिले.'हे बघ माझं बाळ,'आकाशने बाळाकडे बघितल्यासारखे केले आणि छान आहे असे काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला.'नाव नाही विचारणार बाळाचं?'शलाकाने विचारलं.'काय नाव ठेवलंय?'मलूल स्वरात चाचरत आकाशने विचारलं. 'आशय', माझ्या अन् अक्षयच्या नावाची अक्षरं आमच्या बाळाच्या नावात हवी होती ना म्हणून आशय!अक्षय मला 'आशयची आई'म्हणून हाक मारतो. आकाशचा चेहरा पडला.तो तिकडून निसटायचा प्रयत्न करु लागला.शलाकाच्या ते लक्षात आले.'अरे आकाश तुला कधीपासून मला थॅंक्स म्हणायचं होतं'.


'कशाबद्दल?'आकाशने चाचरत विचारले.'शलाकाने त्याच्यावर नजर रोखली आणि सावकाश एक एक शब्द उच्चारत ती म्हणाली,'तू माझ्याशी लग्न करायचं नाकारल्यामुळेच मला अक्षयसारखा सज्जन आणि सुसंस्कृत पती मिळाला.'शलाकाने आकाशवर शेवटचा वार केला. इतकी वर्षे जपून ठेवलेला जहरी डंख शलाकाने मारला होता. असा डंख ज्याची वेदना आकाश जन्मभर विसरू शकणार नव्हता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama