Pratibha Tarabadkar

Drama

4.3  

Pratibha Tarabadkar

Drama

डंख - भाग १

डंख - भाग १

4 mins
305


 आकाशच्या बाइकच्या हॉर्नचा आवाज थांबेना.कंटिन्युअस चालणाऱ्या हॉर्नचा आवाज ऐकून शलाका धाडधाड पायऱ्या उतरु लागली.वर येणारे पोंक्षेकाका हसून जिन्याच्या कडेला झाले.'जा जा लवकर, तुला बघितल्याशिवाय आकाश काही हॉर्न वाजवायचा थांबणार नाही.'लाजून गालातल्या गालात हसत शलाका आकाशपाशी पोहोचली.'किती हा आवाज आकाश, सगळ्या आनंदनगरला कळेल आपण फिरायला चाललोय ते'शलाका डोळे मोठे करत आकाशला खोटं खोटं रागवत म्हणाली.'कळू दे कळलं तर, सगळ्यांना माहित आहे आपलं लग्न होणार आहे ते',आकाश बेफिकिरीने म्हणाला.शलाका त्याच्या मागे बसली आणि आकाशने बाइक स्टार्ट केली.जाता जाता शलाकाची नजर आकाशच्या घराकडे गेली.दंडगेकाकू, आकाशच्या आई बाल्कनीत उभ्या होत्या.शलाकाने त्यांच्याकडे बघून हात हलविला.प्रत्युत्तरादाखल त्यांनीही शलाकाला टाटा केला.


 अवघ्या सहा बिल्डिंगची सोसायटी.आनंदनगर.अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखणारे.त्यांची मुलं एकत्र खेळत,भांडत मोठी झालेली.आकाश आणि शलाका त्या मुलांमधीलच.अनेक वर्षं एकमेकांशी मैत्री असलेले.पण जसजसे मोठे झाले तसतसं एकमेकांबद्दल आकर्षण,ओढ वाटू लागली आणि कधी प्रेमात पडले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.सुरुवातीला नुसतेच चोरटे कटाक्ष,मग एकमेकांच्या येण्याजाण्याच्या वेळी रस्त्यावर रेंगाळणं आणि योगायोगाने समोर आलोय असं भासवणं...मग मोबाईल वरून हाय,गुड मॉर्निंग,गुड नाईट चे मेसेजेस टाकणं आणि मग पुढची पायरी म्हणजे आनंदनगरच्या इतर मित्र मैत्रिणींना टाळून एकमेकांना भेटणं.पण या चोरट्या भेटीगाठी इतरांच्या नजरेपासून थोड्याच लपून रहाणार होत्या? दोघांच्या प्रेमाची वार्ता कर्णोपकर्णी झाली आणि यथावकाश उभयतांच्या आईवडीलांपर्यंत पोहोचली.


 शलाकाच्या आई वडिलांना हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता.लहानपणापासूनच आकाश एक हुशार मुलगा होता.असा निर्व्यसनी, कर्तबगार मुलगा जावई म्हणून निश्चितच आवडला असता.तिकडे आकाशच्या आई वडिलांना पण हरकत घेण्याचे काहीच कारण नव्हते.नजरेसमोरच मोठी झालेली शांत, समंजस शलाका सून म्हणून त्यांना निश्चितच आवडली होती.आजकालच्या मुलामुलींच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकून धसकणाऱ्या दोघांच्या आई-बाबांना आपल्या ओळखीच्या,समोरच रहाणाऱ्या मुलांनीच आपसात जमवले म्हटल्यावर जीव भांड्यात पडावा तसे झाले.आणि आकाश व शलाका उघडपणे एकमेकांकडे येऊ जाऊ लागले.प्रत्येक सणावाराला शलाका आकाशच्या घरी जाऊन तेथील रीतीरिवाज आत्मसात करीत होती.दसरा, दिवाळी पहाट, गुढीपाडवा इ.सणांना जरीची साडी नेसलेली शलाका आणि झब्बा पायजमा घातलेला आकाश यांची जोडी देवळात जाताना हमखास दिसे.

 आकाश कॉंप्युटर इंजिनिअर होऊन एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करु लागला तर शलाका B.Ed.होऊन एका इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करु लागली.नोकरीत सेटल झाल्याने साखरपुडा करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करून तीन महिन्यांनी लग्न करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने ठरविले.


 आकाश आणि शलाकाने त्यांच्या नेहमीच्या 'इंद्रधनू उद्यानात' प्रवेश केला.उत्तम निगा राखलेले हे उद्यान दोघांच्या अत्यंत आवडीचे.घसरगुंडी, झोपाळ्यावर खेळणारी मुले, प्राणायाम करणारे वृद्ध,भरभर चालण्याचा व्यायाम करणारे प्रौढ यांची वर्दळ असल्याने हे उद्यान कायम चैतन्याने भारलेले असे.आकाश आणि शलाका एका बाकावर स्थानापन्न झाले.'अरे आकाश,या वर्षी अॅन्युअल फंक्शन साठी प्रत्येक राज्यातील लोकगीतावर गाणं शोधून त्यावर डान्स बसवायचा आहे.'शलाका सांगू लागली पण आकाशचे तिच्याकडे लक्षच नव्हते.


 'शलाका, दोन तीन वर्षांत आपल्या आलोकला आपण इथेच खेळायला आणत जाऊ.'आकाश खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत म्हणाला.'आलोक? कोण आलोक?'शलाकाने चकीत होऊन विचारले.'आपला मुलगा आलोक,'आकाश उत्तरला.'ए हॅलो, आपलं लग्नसुद्धा झालं नाहीये अजून! कुठल्या स्वप्नात आहेस तू?'त्याच्यासमोर चुटक्या वाजवत शलाका ने विचारले.'फक्त पंधरा दिवसांनी तर साखरपुडा आहे आणि तीन महिन्यांत लग्न!'तिचा हात पकडत आकाश म्हणाला.'मग मुलगा व्हायला काय अवकाश?'आकाशने तिच्या कडे बघून डोळे मिचकावले.त्याच्या बोलण्याचा गर्भित अर्थ लक्षात येऊन शलाका लाजून लाल झाली.'आलोक नाव कुठून काढलं ते नाही विचारलंस? अगं आकाशमधला अ आणि शलाका मधली ल आणि क ही अक्षरं घेऊन आलोक नाव काढलंय मी.'आणि मुलगी झाली तर?'सोपं आहे , मुलगी झाली तर तिचं नाव ठेवू आलोका'आकाश सहजपणे म्हणाला.'तुझ्या माझ्या प्रेमाची निशाणी असणार आहे ना ती!'आकाशने डोळे मिचकावले


 'तू म्हणजे अस्सा आहेस ना आकाश',शलाका त्याला चापट मारत म्हणाली. 'मी अगदी अधीर झालोय राणीसरकार, कधी एकदा लग्न होतंय आणि मी माझ्या शलाकाराणीला घरी आणतोय.'आकाशने शलाकाचा हात हातात घेऊन दाबला.'आलोक आकाश दंडगे'आकाश मोठ्याने उद्गारला.

 'आकाश,चल निघूया आता.उशीर झाला की आईचे फोन येणं सुरु होईल.'शलाका बाकावरुन उठत म्हणाली.मात्र  तेव्हापासून आकाश आसपास कोणी नाही असं पाहून शलाकाला 'अहो आलोकच्या आई' अशी हाक मारत असे आणि त्याच्याकडे कृतक् कोपाने कटाक्ष टाकताना शलाकाच्या गालावर गुलाब फुलत आणि अंगावर रोमांच!


 आकाश आणि शलाकाचा साखरपुडा अत्यंत थाटात पार पडला.संपूर्ण आनंदनगर लोटलं होतं.साहजिकच आहे, इतक्या वर्षांच्या काळात सारेच जण एकमेकांना ओळखत होते.शिवाय नातेवाईक, आकाशच्या ऑफिसचे कलिग्ज,शलाकाच्या शाळेतील शिक्षिका,अबब... साखरपुडा कसला, जवळजवळ लग्नच म्हणा ना!शलाकाच्या आईबाबांनी खर्चाच्या बाबतीत कुठलीही कसर ठेवलीच नव्हती मुळी! आकर्षक रित्या सजवलेले स्टेज, फोटोग्राफरच्या फ्लॅशचा लखलखाट,मंद संगीत याने वातावरण कसं चैतन्याने भारलेले होते.दोघांना भेटून अभिनंदन करण्यासाठी माणसांची रीघ लागली होती.पुष्पगुच्छांनी स्टेज भरुन गेले होते.शलाका मेकअप आणि आकर्षक केशरचनेमुळे अतिशय मोहक दिसत होती.'सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही'अशी आग्रहाची विनंती शलाकाच्या बाबांनी माइक वरुन केली आणि पाहुणे मंडळींनी आपला मोर्चा जेवणाकडे वळविला. साखरपुड्याच्या दगदगीमुळे सगळ्यांनाच शीण आला होता त्यातून शलाकाच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या तयारीने जोर धरला होता तर आकाश पण त्याच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये बुडून गेला होता.रोज सकाळी good morning आणि रात्री good night एव्हढ्या संदेशांपलिकडे मोबाईल वर बोलायलाही फुरसत नव्हती.


 शलाकाचे आई-बाबा लग्नाच्या निमंत्रितांची यादी पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालत होते.कोणी राहून तर गेले नाही ना याची परत परत पडताळणी करीत होते.'शलाका, साड्यांचे ब्लाऊज लवकर शिवायला टाक.टेलर वेळेवर पंचाईत करुन ठेवेल', म्हणून भुणभुण करीत होती, पाहुणे मंडळी आली की स्वयंपाकाला बाई लागेल म्हणून चौकशी करीत होती. लगीनघाई सुरू झाली होती.तिकडे दंडग्यांकडेही अशीच गडबड चालू होती.पाच सवाष्णींना बोलावून मुहूर्त केला आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.आकाश एकुलता एक लाडका लेक मग सर्व हौसमौज पूर्ण केली पाहिजे ना!

 'आता पाच मिनिटांत दंडगे येताहेत'.फोन बंद करीत शलाकाचे बाबा आईला म्हणाले.'लग्नाची इतर खरेदी करायला जायचंय ना त्याबद्दल ठरवायला येत असतील',शलाकाची आई बैठकीची खोली आवरत म्हणाली.'शलाका, जरा नीट आवरुन घे तर ,आकाशचे आई-बाबा येताहेत.'अॅन्युअल फंक्शन कालच संपल्याने शलाका मस्त रिलॅक्स होऊन लोळत पडली होती ती उठून बसली.लगेचच बेल वाजली.'या या 'शलाकाचे बाबा त्यांचे स्वागत करीत म्हणाले. मनोहरराव आणि मीनाताई स्थानापन्न झाले.दोघांचे चेहरे गंभीर होते.थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही.

 'साखरपुडा मोडला असे समजा.आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचे नाही.' 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama