Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

चष्मा नि सुषमा

चष्मा नि सुषमा

11 mins
184


सकाळचे दहा वाजत होते. अप्पा नाष्टापाणी आटोपून वर्तमानपत्रावर नजर टाकत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावरील नाव पाहून अप्पा म्हणाले,

"भाऊसाहेब, नमस्कार. काय म्हणता?"

"काही नाही. आपल्या चाळीतील ज्येष्ठ नागरिक संघाने असे ठरवले आहे की, आपण सर्व सदस्यांनी एकत्र जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची आहे..."

"पण त्या लसीचे काही दुष्परिणाम वगैरे..."

"अप्पा, काही दुष्परिणाम नाहीत. आणि आता या वयात असे कोणते दुष्परिणाम होणार आहेत? कोरोनाने नाही तर कोरोनाच्या लसीने मृत्यू येईल. तो तर टळणार नाही ना?"

"तेही आहेच की. बरे, कधी जायचे आहे?"

"अहो, आज.. आत्ता... ताबडतोब! वीस मिनिटात सारे आपल्या नागरिक संघाच्या कार्यालयात येणार आहेत. तुम्ही या."

"येतो. पण काही खर्च वगैरे?"

"नाही, बिलकुल नाही. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत घ्या."

"बरे. कोणत्या दवाखान्यात जायचे आहे?"

"सुटका हॉस्पिटल!..."

"भाऊसाहेब, तो तर फार महागडा दवाखाना आहे."

"बरोबरआहे. पण सरकारमधील एका मंत्र्याचा आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आपल्याला विनाखर्च देणार आहेत."

"हेही नसे थोडके. सुटका! चला. एक तर कोरोनातून सुटका होईल किंवा या जगातून!"

"अप्पासाहेब, अशी निराशाजनक भाषा का?"

"काय करणार? भाऊसाहेब, तुमची वहिनी सोडून गेल्यापासून जगायची इच्छाच होत नाही. सारे कसे निरस, उदासीन वाटते आहे."

"अप्पा, असा निराशावाद तुमच्याकडून अपेक्षित नाही हो. इतरांना स्फूर्ती देणारे, अनेकांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारे अप्पा अशी तुमची ख्याती असताना..."

"जाऊ देत. मी वेळेवर पोहोचतो..." असे म्हणत अप्पांनी फोन बंद केला. स्वयंपाक घराकडे बघत त्यांनी आवाज दिला, "माधवी..."

"काय अप्पा? काही हवे आहे का?" बाहेर येत माधवुने त्यांच्या सूनबाईने विचारले.

"काही नाही. आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य लस घ्यायला जात आहेत. मीही लस घेऊन येतो..."

"अप्पा, कोविडची लस घेणार का?"

"हो. तुला काय वाटले पोलिओची लस?"

"अप्पा, तुम्ही की नाही बस! पण कालच तुमची आणि अरविंदची चर्चा झाली ना? त्याने सांगितले आहे ना की, दोन महिन्यांनंतर घ्या म्हणून."

"सांगितले होते पण आता सारे जात आहेत, फुकटात लस देत आहेत तर... मुख्य म्हणजे लस घेतल्यानंतर काहीही त्रास होत नाही. शिवाय सुटका हॉस्पिटलमध्ये आहे."

"अरविंदला एकदा फोन करू का?"

"नको. त्याला कार्यालयात खूप काम असते..."असे म्हणून अप्पांनी मुलाला विचारायला नकार दिला. माधवी म्हणाली,

"अप्पा, सोबत काही खायला देऊ का? पाणी बॉटल भरुन घ्या. गर्दी असू शकते. वेळ लागला तर तुम्हाला भूक नाही सहन होणार."

"बिस्कीट पुडा दे. पाण्याची बाटली भरून घेतो."

      काही क्षणात अप्पा नागरिक संघाच्या कार्यालयात पोहोचले. तिथे बरीच ज्येष्ठ स्त्री- पुरुष मंडळी जमली होती. अप्पांना पाहताच भाऊसाहेब म्हणाले,

"या. अप्पा, या. पाच मिनिटात निघूया. पायी जायचे ठरले आहे. मंत्रीमहोदय बँड पथक पाठवत आहेत. घोषणा देण्यासाठी मुलं पाठवत आहेत."

"चांगले नियोजन आहे. जन्मात कधी वाजतगाजत मिरवायची संधी मिळाली नाही. लग्नातही बँडबाजा लावला नव्हता. तेवढी एक हौस राहिली होती तीही या कोरोनामुळे पूर्ण होतेय."अप्पा बोलत असताना बाहेर बँड आल्याची चाहूल लागली. त्यांनी पोहोचल्याबरोबर तशी सलामी दिली आणि सारे जेष्ठ नागरिक जमा झाले. बँडच्यासमोर एक मोठा फलक घेऊन चार पाच माणसे उभी होती. फलकावर मंत्रीमहोदयांचा हात जोडून सस्मित छायाचित्र होते तर फलकावर 'ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लसीकरण उपक्रम... सौजन्य ... सुटका हॉस्पिटल!'

बँडपथकाच्या मागे पंधरावीस मुले एकामागे एक उभे होते. कुणीतरी 'चला' असा आदेश दिला आणि बँडपथकाच्या निनादात सारे निघाले. तितक्यात मुलांनी मंत्रीमहोदयांच्या नावाने घोषणा देत त्यांचा जयजयकार सुरू केला. एका मुलाच्या हातात माईक होता. दुसऱ्या मुलगा 'भोंगा' सांभाळत होता. मंत्रीमहोदयांचा जयजयकार करताना मुलगा मध्येच ललकारी देत होता...

'बघतोस काय द्वेषाने

लस घेतोय आनंदाने!'

       अप्पांच्या गल्लीतून बाहेर पडत असताना मार्गावर असणाऱ्या घरातील स्त्रियांनी ज्येष्ठ नागरिकांना ओवाळले. पंधरावीस मिनिटात तो जत्था सुटका हॉस्पिटलमध्ये पोहोचला. दवाखान्यात अप्पा आणि त्यांच्या सोबतच्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रत्येकाची रक्तदाबाची तपासणी करण्यात येत होती. अप्पांचाही रक्तदाब तपासत असताना त्यांच्या लक्षात आले की, तपासणी करणाऱ्या नर्सला कुठेतरी पाहिले आहे. ते विचारात असताना नर्सने पट्टी हाताभोवती गुंडाळत विचारले,

"तुम्हाला रक्तदाबाची शिकायत आहे का?"

"नाही..."

"आत्ता तर वाढलेला दिसतोय. तुम्ही आत्ता पायी आलात का? ठीक आहे. दुसऱ्या दोघांची तपासणी करुन पुन्हा पाहूया..."

"एक.. एक... मिनिट... त... त... तू... तुम्ही सुषमा ना?"

"ह..ह...होय..." त्या डॉक्टरने चमकून अप्पांकडे पाहिले. ती काही बोलण्यापूर्वीच अप्पांनी अगतिकतेने विचारले, "तू शिक्षा निकेतन शाळेत आठवी ते दहावीपर्यंत होतीस ना?"

"ह... ह... होय! अच्छा! तू अप्प्या ना?" डॉ. सुषमाही स्वतःचा आनंद लपवू शकली नाही."

"हे शाळेतील नाव तुझ्या अजूनही लक्षात आहे?"

"होय. काही खास माणसांची... म्हणजे खास नावे लक्षात राहतात..."

"अग, तू भेटलीस म्हणून माझा बी. पी. वाढलाय की काय? गंमत हं. पण यापूर्वी कधी रक्तदाबाचा त्रास जाणवला नाही..."

"दिल से मिले दिल... एक मिनिट हं. आपण आत बसूया..." असे म्हणत डॉ. सुषमाने अप्पाला बाजूच्या खोलीत सोडले आणि इतर नागरिकांची तपासणी करायला दुसऱ्या नर्सला सांगायला ती बाहेर गेली. अप्पांनी खिशातला चष्मा काढून शेजारच्या टेबलवर ठेवला. त्यांना फक्त वाचताना, टीव्ही पाहताना चष्मा लावावा लागे. तत्काळ अप्पांच्या डोळ्यासमोर तो दहावीपर्यंतचा काळ आला. सुषमा त्यांच्या वर्गात होती. दोघेही हुशार होते. अभ्यासाबाबत नेहमीच एकमेकांशी चर्चा करीत. दोघांमध्ये धड मैत्री नाही आणि धड प्रेमही फुलले नाही. दहावीचा तो काळ आणि त्या काळातील विद्यार्थी असे फार कमी वेळा स्वतःचे प्रेम प्रकट करीत असत किंबहुना तशी भावनाही जन्माला येत नसे. परंतु कुणाबद्दल कुणाच्या तरी ह्रदयाच्या एका कोपऱ्यात काही तरी असे. म्हणूनच इतक्या वर्षांनी सुषमा दिसताच, तिला ओळखण्यापूर्वीच अप्पांच्या ह्रदयाचे ठोके वाढले ते त्या मशीनने दाखवून दिले. काही वेळातच डॉ. सुषमा परतली. शब्दांची देवाणघेवाण होत असताना अप्पांची पत्नी आणि सुषमाचा पती हे जग सोडून गेले असल्याचे दोघांनाही समजले. दोघे बराच वेळ गप्पांमध्ये रंगले असताना एका सिस्टरने येऊन सूचना दिली की, अप्पांसोबत आलेल्या सर्वांना लस देऊन झाली आहे. अप्पा दोमनाने उठले. उठताना त्यांनी टेबलवरचा चष्मा उचलला. खिशात टाकला. डॉ. सुषमाने स्वतः अप्पांना लस टोचली...

         अप्पा घरी पोहोचले. जेवण झाल्यानंतर त्यांनी शतपावली करून वामकुक्षीसाठी अंग टाकले आणि क्षणार्धात त्यांना गाढ झोप लागली. ते बराचवेळ झोपून होते. त्यांच्या सूनेनेही त्यांना उठवले नाही. अप्पा जागे झाले. त्यांनी घड्याळात पाहिले. सायंकाळचे सहा वाजले होते.

'बाप रे! मी आज किती वेळ झोपलो. आता फिरायलाही जाणे होणार नाही...' असे पुटपुटत अप्पा बाहेर आले. माधवी सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होती.अप्पांना पाहताच तिने विचारले,

"अप्पा, काय झाले? लस घेतलीत त्याचा काही त्रास होत नाही ना? नाही म्हटलं इतका वेळ तुम्ही कधी झोपत नाहीत. बसा. चहा टाकते..."

"राहू देत. इतक्यात अरविंद येईल तो आला की घेऊ सारेच. तूही उठवले नाहीस. आज फिरायला जायचेही राहिले."

"म्हटलं खूप दिवसांनी झोपलेत. झोपू द्यावे. पुन्हा वाटले, लस घेतलीय त्यामुळे झोप लागली असेल. उठवावे तर अर्धवट झोप झाल्यामुळे त्रास होईल." माधवी बोलत असताना अरविंदचे आगमन झाले. तो अप्पांकडे बघत सुहास्य चेहऱ्याने आत गेला. पाठोपाठ माधवीही...

      "अप्पा, मी तुम्हाला म्हणालो होतो लस सध्याच घेऊ नका म्हणून पण नेहमीप्रमाणे तुम्ही माझे ऐकले नाहीत. बरे, आता काही त्रास तर होत नाही ना? लस घेताना काही त्रास झाला का?" काही वेळाने बाहेर आलेल्या अरविंदने विचारले.

"अरे, नाही. पण सुरवातीला थोडे बी.पी. वाढले होते..." अप्पा सांगत असताना माधवीने किंचाळल्याप्रमाणे विचारले,

"अप्पा, काय सांगता? अहो, तुम्हाला बी.पी.चा त्रास नव्हता ना? मग आजच कसा झाला? बरे, कुणी सांगितले बी.पी. वाढलाय म्हणून? पण वाढला का?"

"अग, सुषमाने सांगितले... म्हणजे तिथे लस देण्यापूर्वी सर्वांचीच तपासणी होत होती. सुषमा नावाची डॉक्टर होती. तिने तपासणी केली. नंतर सर्वांची तपासणी होईपर्यंत मी तिच्याशी गप्पा मारत बसलो..."

"अप्पा आणि गप्पा... आई असती तर असेच म्हणाली असती..." असे म्हणत अरविंदने टीव्ही लावला. नेमकी त्याचवेळी अप्पांना आणि इतरांना दिलेल्या लसीचे बातमीपत्र एका वाहिनीवर सुरू होते. ते पाहून अरविंद म्हणाला, "अप्पा, बघा. तुमचीच बातमी येत आहे. तुम्ही दिसाल बहुतेक..." तो म्हणत असताना अप्पांनी खिसा पाहिला. चष्मा नव्हता. झोपताना चष्मा खोलीत विसरला असेल पण चष्मा आणायला जावे तर बातमी संपेल म्हणून ते तसेच बातमी पाहत बसले. बातमी संपली पण अप्पा दिसले नाही म्हणून अरविंदने विचारले,

"अप्पा, तुमच्या सोबत आलेले सारे दिसले पण तुम्ही नाही दिसलात. कुठे होतात?"

"अरे, मी त्या सुषमासोबत..."

"अप्पा, कोण ही सुषमा? गप्पा मारण्याइतकी तुमची ओळख कशी?" माधवीने विचारले.

"माधवी, सुषमा म्हणजे माझी... म्हणजे आत्ताच सांगितले ना, ती डॉक्टर आहे म्हणून... माझा बी.पी. तिला बरोबर वाटला नाही म्हणून थोडा वेळ बाजूच्या खोलीत आम्ही बसलो म्हणजे तिने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि त्याचवेळी हे टीव्हीवाले आले असतील म्हणून मी दिसत नाही. मी चष्मा घेऊन येतो..." असे म्हणत अप्पा आत गेले. तसे माधवीने अरविंदकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. अरविंदने दोन्ही खांदे 'काय माहिती' अशा अर्थाने उडवले.

      काही क्षणातच अप्पा चष्मा घेऊन आले. बातम्या पाहाव्यात म्हणून त्यांनी चष्मा डोळ्यावर लावला आणि टीव्हीकडे पाहिले पण काही तरी चुकले नि नंतर आठवले म्हणून त्यांनी चष्मा काढला. खिशातला रुमाल काढला. चष्मा पुसला. डोळ्यावर चढवला. टीव्ही पाहिला पण छे!पुन्हा चष्मा काढला. तीच प्रक्रिया पुन्हा केली पण तरीही परिणाम शून्य! असे दोन तीन वेळा झाले आणि वैतागलेल्या अप्पांनी चष्म्यावर तोंडाने फुंकर मारली त्यामुळे चष्म्यावर धुके आल्यागत झाले. अप्पांनी ते धुके स्वच्छ केले. चष्मा डोळ्यावर ठेवला. टीव्हीकडे बघितले. इकडेतिकडे बघितले. आजूबाजूला बघितले. अप्पांची ती कसरत पाहणाऱ्या अरविंदने विचारले,

"अप्पा, काय झाले? चष्म्याशी का खेळत आहात?"

"खेळत नाही रे पण या चष्म्यातून दिसतच नाही रे. हे बघ ना, सकाळी वर्तमानपत्र वाचले, बातम्या पाहिल्या तेव्हा व्यवस्थित दिसत होते..."

"अप्पा, लस घेऊन घरी आल्यावर चष्मा लावला होता का?"

"माधवी, नाही ग. आल्याबरोबर जेवलो. घरातच शतपावली केली आणि नंतर तर भरपूर झोप लागली..."

"अप्पा, नीट बघा... नंबर तर बदलला नाही ना? " अरविंद सांगत असताना प्रचंड धक्का बसल्याप्रमाणे माधवी ओरडली,

"अर.. अर.. अरविंद, लस..."

"आता तुला काय झाले? अशी लसलस काय करतीस?"

"अरविंद, तुझ्या लक्षात कसे येत नाही? सकाळी अप्पांना याच चष्म्यातून दिसत होते. दिवसभरात असे काय घडले की... शिवाय दवाखान्यातून आल्यापासून चष्मा लावलाच नाही..."

"तुला असे तर म्हणायचे नाही की, लस घेतल्यामुळे अप्पांच्या डोळ्यावर परिणाम..."

"एक्झक्टली! मला तेच म्हणायचे आहे..."

"थांब. आत्ताच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचू नको. अप्पा, तुमच्यासोबत कोण कोण आले होते? भाऊसाहेब आलेच असतील. तुमचा मोबाईल द्या..." असे म्हणत अरविंदने अप्पांकडून भ्रमणध्वनी घेतला. भाऊसाहेबांचा क्रमांक जुळवून म्हणाला,

"भाऊसाहेब, मी अरविंद! लस घेतल्यानंतर कुणाला काही त्रास झाला का?"

"नाही रे. पण तू का विचारतोस?"

"भाऊ, प्लीज, इतरांची चौकशी करून घरी या ना. अप्पांना अचानक डोळ्याचा त्रास सुरू झाला आहे..." असे म्हणत अरविंदने भ्रमणध्वनी बंद केला...

        काही क्षणातच भाऊसाहेब आणि इतर बरेच लोक अप्पांकडे आले. भाऊसाहेबांनी विचारले,

"काय झाले अरविंद? तू फोन का केलास? अप्पा, तुम्ही ठीक आहात ना?"

"होय. पण मला दिसतच नाही. म्हणजे सकाळी आपण लस घ्यायला गेलो त्यापूर्वी मी वर्तमानपत्र वाचले, टीव्हीवरील बातम्या पाहिल्या. तुम्हाला तर माहितीच आहे मला फक्त वाचताना आणि टीव्ही बघताना चष्मा लागतो म्हणून आत्ता आपली लसीकरणाची बातमी पहावी म्हणून चष्मा लावला तर टीव्हीवर काहीच दिसत नाही."

"अरे, बाप रे! एक सांगा, चष्मा न लावता तुम्हाला कसे दिसतेय?"

"नेहमीप्रमाणे दिसतेय. आता चष्मा लावला तर... एक मिनिट हं..." असे म्हणत अप्पांनी शेजारी पडलेले वर्तमानपत्र उचलले आणि ते वाचायचा प्रयत्न करीत म्हणाले,

"बघा आता. वर्तमानपत्रातील बातम्याही बरोबर दिसत नाहीत. बरे, नंबर बदलला म्हणावे तर दोन महिन्यांपूर्वीच नंबर बदलला होता..." अप्पा बोलत असताना भाऊसाहेब म्हणाले,

"बरोबर आहे पण नंबर बदलला तरीही एकदम काही दिसणारच नाही असे होणार नाही ना?"

"नक्कीच... नक्कीच त्या लशीमुळेच झाले..."

"अरे, पण सुटका हा दवाखाना तसा नामांकित आहे. मंत्र्याचा आहे..."

"मंत्र्याचा आहे म्हणून तर असे घोटाळे करतात. इकडे तर मोफत लस दिल्या असे दाखवायचे, दुसरीकडे सरकारकडून प्रचंड पैसा उकळयचा आणि त्याचवेळी जनतेच्या जीवाशी असा खेळ करायचा..."

"मला वाटते आपण पोलीस केस करावी... सुटका हॉस्पिटलवर... म्हणजे पुढील व्यक्तिंची अशा घोटाळ्यातून सुटका होईल.."

"पोलीस केस करण्यापूर्वी आपण मीडिया बोलवूया. पोलीस खात्यावर मंत्र्यांचा वचक असतो. प्रकरण दाबून टाकतात. मीडियावर आले म्हणजे घटना तिखटमीठ लावून रंगवल्या जाते."

"थांबा. हे सारे नंतरही करता येईल. आधी दवाखान्यात तर फोन करुया..." भाऊसाहेब म्हणत असताना चाळीत राहणार पंत नावाचे गृहस्थ तिथे आले. त्यांचा चेहरा... डोळे सुजलेले दिसत होते. कुणीतरी विचारले,

"पंत, चेहऱ्याला हे काय झाले?"

"अहो, काही नाही. सकाळी लस घेण्याचा हा प्रताप...."

"बघा. बघा. लस घेतल्यानंतर पंतांची अवस्था झाली आहे. आता अजून कुणाची अशी काही दुर्दशा होण्यापूर्वी हे प्रकरण जनतेसमोर आलेच पाहिजेत." त्यावर कुणी काही बोलण्यापूर्वीच भाऊसाहेबांनी स्वतःच सुटका हॉस्पिटलमध्ये फोन लावून म्हणाले,

"मी भाऊसाहेब बोलतोय. आम्ही सकाळी अनेक जणांनी हॉस्पिटलमध्ये येऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. परंतु या लशीचे काही जणांवर विपरित परिणाम जाणवत आहेत..."

"थांबा हं. मी एक मिनिटात लसीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा यांना फोन देते..." तिकडून एक महिला म्हणाली. तसे भाऊसाहेब सर्वांना म्हणाले,

"कुणीतरी डॉ. सुषमा आहेत..."

"सुषमा... हां बरोबर आहे..."अप्पा काही तरी बोलण्याचा प्रयत्न करीत असताना भाऊसाहेबांच्या फोनवर आवाज आला,

"नमस्कार. मी डॉ. सुषमा बोलतीय. काय झाले?" भाऊसाहेबांनी लस घेतल्यानंतर अप्पा आणि पंत यांना झालेला त्रास सांगताच सुषमा म्हणाली,

"भाऊसाहेब, मी दहा मिनिटात आपल्या चाळीत पोहचते. काळजी करु नका." असे म्हणत डॉ. सुषमाने फोन बंद केला...

       काही मिनिटात दवाखान्याची गाडी अप्पांच्या घरासमोर उभी राहिली आणि तोपर्यंत अप्पांच्या घरात चाललेल्या गप्पांना, तर्कवितर्कांना विराम मिळाला. डॉ. सुषमाला पाहताच काही जण तावातावाने बोलण्याचा प्रयत्न करणारांना हाताने शांत बसण्याचा इशारा करुन सुषमाने विचारले,

"कुठे आहेत ते अप्पा?" तितक्यात अप्पा दिसताच सुषमा म्हणाली

"काय हे अप्पा? दहावीला असताना जसा वेंधळा होतास तसा आजही आहे..." डॉ.सुषमा बोलत असताना नकळत झालेली चूक तिच्या लक्षात आली. स्वतःला सावरत ती म्हणाली,

"भाऊसाहेब, माफ करा.पण मी आणि अप्पा दहावीपर्यंत एकत्र शिकलो त्यामुळे 'अरे... तुरे' असे झाले..."

"ते ठीक आहे पण हा काय गोंधळ आहे?" भाऊंनी विचारले

"गोंधळ नाही तर हा या अप्पाचा वेंधळेपणा आहे."

"सुषे, काय झाले ते सांग?" अप्पा म्हणत असताना ते 'सुषे' म्हणाले आणि हास्यस्फोट झाला. तशी लाजणारी डॉ. सुषमा म्हणाली,

"अप्पांचा बी.पी. बरोबर नव्हता म्हणून मी त्यांना बाजूच्या खोलीत बसवले. तिथे त्यांनी चष्मा काढून ठेवला. नंतर आमची ओळख निघाली. गप्पा मारताना अप्पांना लस द्यायला बोलावले आणि हा अप्पा तिथेच ठेवलेला माझाच चष्मा घेऊन आले..."

"तुझा चष्मा? कसे शक्य आहे? हा माझाच चष्मा आहे..." अप्पांना थांबवून सुषमाने पर्समधून एक चष्मा काढला आणि म्हणाली,

"तर मग अप्पा, हा कुणाचा चष्मा आहे?" सुषमा दाखवत असलेल्या त्या चष्म्याकडे बघत अप्पा ओरडले,

"आँ.. सेम टू सेम... आपले चष्मे किंचित बदल सोडला तर सारखेच आहेत की..."

इतरही सारे आश्चर्यात पडलेले असताना अप्पांनी सुषमाच्या हातातील चष्मा घेतला. डोळ्यावर ठेवून आधी टीव्ही बघितला. नंतर वर्तमानपत्र बघितले आणि आनंदातिशयाने ओरडले,

"दिसयेत की. सारे पहिल्याप्रमाणेच दिसतेय..."

"अप्पा, नीट बघा. डॉ. सुषमा तुम्हाला दिसतात का?" भाऊसाहेबांनी हसत विचारले.

"हो दिसतेय की..." अप्पा पटकन बोलून गेले आणि फुललेल्या हास्याच्या कारंजीत सुषमाने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. तितक्यात तिथे आलेल्या सौ. पंतांनी पंतांना विचारले,

"का हो हीच का ती जिच्या सौंदर्याचे तुम्ही गुणगान करीत होता..."

"अच्छा! म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर लसीकरणाचा प्रादुर्भाव नाही तर लस देणाऱ्या नर्सची स्तुती केल्याचा प्रसाद आहे तर..." भाऊसाहेब म्हणाले आणि पुन्हा तिथे हास्यस्फोट झाला...

        नंतर एक महिन्याने शालेय जीवनात न उमलेल्या प्रेमाचा अंकुर अप्पा आणि सुषमा यांच्या साठोत्तरी जीवनात रसरसून बहरून आला. दोघेही सर्वांच्या संमतीने विवाह बंधनात अडकले...

    


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy