Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

चंद्रावरी मधुचंद्र

चंद्रावरी मधुचंद्र

14 mins
215



    विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. राज्यातले सारे आमदार लवकरच विधान भवनात प्रवेश करते झाले. भवनात प्रवेश करण्यापूर्वी सर्वांची विशेष यंत्राद्वारे तपासणी झाली. पहिलाच दिवस असल्यामुळे सारेच आमदार उत्साहात होते. त्या विधानसभेचे एक आश्चर्य असे की, सर्व आमदारांपैकी चार आमदार वगळता इतर सर्व आमदार नव्याने निवडून आलेले आणि वयाने अगदी तरूण होते. विधानसभेच सरासरी वय होतं बत्तीस वर्षाचं! विरोधी पक्षाचे एक आमदार श्री.झोटे पाटील सर्वात वयस्कर म्हणजे पासष्ट वर्षाचे असून विधानसभा स्थापन झाल्यापासून ते विनाखंड त्या सभागृहाचे सदस्य राहिले होते. प्रत्येकवेळी मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळवून ते विजयी झाले होते... स्वतःचाच विक्रम मोडून! विधानसभा वयानं कमी असल्यामुळे साहजिकच चर्चेच्या वेळी अनेक गंमती व्हायच्या.

         पहिल्याच दिवशी सभापती महोदय आणि मुख्यमंत्री दोघेही सभागृहात आले. सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. दोघेही स्थानापन्न होताच सारे आमदार आपापल्या जागेवर बसले विद्यार्थ्याप्रमाणं! रीतसर सभागृहाचं कामकाज सुरू होताच सर्वात ज्येष्ठ सदस्य झोटे पाटील उभं राहून म्हणाले,

"सभापती महोदय, आज मी एक प्रकरण सभागृहापुढे ठेवणार आहे. तरी आजचे इतर विषय रद्द करून या प्रकरणावर चर्चा करावी अशी मी विनंती करतो." झोटे पाटलांच्या तशा विनंतीमुळे अनेकांनी धसका घेतला. कारण सभागृहातील अनेक सदस्य या ना त्या प्रकरणात गुंतलेले होते. कुणी भुखंड प्रकरणात, कुणी कॉपी प्रकरणात, कुणी पंचतारांकितमधील प्रेम प्रकरणात, कुणी बेकारांना नोकरी देण्यात तर कुणी महाविद्यालय काढल्याच्या प्रकरणात! अनेक स्फोटक प्रकरणे उजेडात आणल्याबद्दल झोटे पाटलांचा लौकिक होता.

"सांगा. आमदार महाशय, आपलं म्हणणं."

"राज्यातला एक इसम चंद्रावर हॉटेल काढतोय. हनिमून ऑन मून."

"व्हॉट ए फँटॅस्टिक नेम. चंद्रावर मधुचंद्र! व्वा!" एक आमदार म्हणाले.

"फंटास्टिक नेम नाही मान्यवर. हे हॉटेल खरोखरच चंद्रावर निघतंय. या ठिकाणी नवविवाहितांसोबत शौकिनांना सारं काही पुरवल्या जाईल."

"वा! छान आहे की, अधिवेशन संपलं की काढा एक ट्रीप. जाऊ सगळेच सरकारी खर्चानं." विरोधी पक्षाच्या एका आमदारानं शेजारी बसलेल्या महिला आमदाराकडे बघत म्हटलं.

"आपल्यासाठी एक खोली बुक करा. चांगली पंधरा दिवस." मंत्र्याशेजारी बसलेल्या महिला राज्यमंत्र्यांनी हळूच सांगितलं. पण समोरचा माईक बंद नसल्यामुळे ते साऱ्या सभागृहानं ऐकलं आणि सभागृह हास्य समुद्रात बुडालं.

"तुमचं वय नाही, पण आम्हांला तरी मजा करू द्या की." कुणीतरी झोटे पाटलांकडे बघत म्हणाले आणि परत एकदा हास्यकल्लोळ झाला.

"यांच्या पोटात दुखणारच ना."

"थांबा, अशी आपसात चर्चा करू नका. प्रकरण मोठं गमतीचं. तितकंच गंभीर आणि चर्चा करण्यासारखं आहे. तेव्हा आपण चर्चा करू."

"परंतु असं हॉटेल चंद्रावर निघतेय यासंबंधी सरकारकडे काही माहीत नाही." मुख्यमंत्र्यांना पुढे न बोलू देता झोटे पाटील म्हणाले,

"हा घ्या सज्जड पुरावा. आजच्या वर्तमानपत्रात चौकटीत आलेली बातमी."

एका उत्साही तरूण मंत्र्यानं ते वर्तमानपत्र घेतलं आणि सभापतींच्या परवानगीची वाट न पाहता वाचण्यास सुरू केली...

    'चला चंद्रावर! चला चंद्रावर! सर्व शौकीन जनतेस कळविण्यास अत्यानंद होतो, की सर्व शौकीन आणि रंगेल मित्र-मैत्रिणीसाठी आम्ही लवकरच चंद्रावर, हो प्रियकर प्रियेला आणून देईन म्हणतात ना त्या चंद्रावर हॉटेल काढतोय ...हॉटेल हनिमून ऑन मून! सर्व प्रकारची देशी विदेशी दारू, त्याचप्रमाणे विदेशी तरूणी आपल्या निवडीप्रमाणे, आवडीप्रमाणे आम्ही पुरवू. लवकरच चंद्रावर बांधकाम सुरू होतंय. आजपर्यंत अनेक पंचतारांकित हॉटेल्स, धाब्यांमधून आम्ही आपली सेवा केली. आता खास सर्वांसाठी 'हनिमून ऑन मून' चला तर लागा तयारीला." जाहिरात वाचून मंत्री खाली बसले.

"असे धाबे, जे जंगलात, महामार्गावर सुरू आहेत ते बंद करावेत. काही दिवसांपूर्वी रात्री मी बघितलं अशा धाब्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या उभ्या असतात. गाड्यांचा डिझेल खर्च अर्थातच सरकारचा.." एक तरूण महिला आमदाराला तावातावानं बोलताना पाहून मागून कुणीतरी म्हणालं,

"आपण रात्री त्या भागात कशाला गेला होता?"

"एकट्याच गेल्या होत्या की कुणी.." कुणीतरी विचारत असताना कोसळत हास्याच्या प्रचंड सरीत सभापती म्हणाले,

"कृपया मध्ये बोलू नका, हे हॉटेल कुणाच्या खात्यात येतं?" सभापतींनी मुख्यमंत्र्याकडे बघत विचारले,

"हे प्रकरण जंगल खात्याकडे येत नाही. कारण चंद्रावर झाडी नाही." जंगल खात्याच्या मंत्र्यांनी फाईल बंद केली.

"ही हद्द आपल्या राज्याच्या कक्षेत येत नाही. तेव्हा ह्या प्रकरणात आपल्या राज्यानं हस्तक्षेप न केलेला बरा."

"परंतु हॉटेल मालक आपल्या राज्यातला आहे, त्यामुळे आपल्याला जबाबदारी टाळता येणार नाही." विरोधी पक्षनेते म्हणाले.

"या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून, केंद्र सरकार, गुप्तचर खाते यांच्याशी विनिमय करून नंतरच या प्रकरणी निर्णय घ्यावा." असा आदेश सभापतींनी दिला. परंतु त्यादिवशी विधानभवनाच्या भव्य प्रांगणात गटागटाने आमदार उभे राहून चर्चा करत होते. विषय अर्थातच 'हनिमून ऑन मून.'

"अरे यार, परवानगी द्यायलाच पाहिजे."

"हा यार, राजकारणाच्या तापातून विरंगुळा मिळेल."

"काय पण मजा येईल यार नाही का?"

"अरे, मी तर माझ्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा विचार करतो. लग्न झाले की... मधुचंद्र सरळ चंद्रावर!"

"अरे, तसा मुर्खपणा करू नको. अरे, अशा ठिकाणी पत्नीला घेवून जायचे म्हणजे इतर देशी-विदेशी तरूणी सोबतची मजा घालवायची नाही का?"

"ते कसे?"

"अरे ह्या बायका महासंशयी. तिथे इतका खर्चकरून आपण जाणार, दुसरं तिसरं सोडा. परंतु कुणाला बोलताना बघितलं तरी त्या सूतावरून पृथ्वी गाठणार..."

    एकंदरीत तो दिवसच नाही तर संपूर्ण अधिवेशनाचा काळ ह्या प्रश्नावर गाजणार असं वातावरण निर्माण झालं होतं....

          'बाग' या धाब्याचे मालक श्री. चंचल धाब्याच्या प्रवेश द्वारावर उभे होते. त्या भागातलेच नाही तर बाजूच्या जिल्ह्यातले अनेक अधिकारी, पदाधिकारी, श्रीमंत लोक दररोज सायंकाळी त्या धाब्यावर येऊन आपली सायंकाळ 'नशिली' बनवत. गावठीपासून विदेशीपर्यंत सर्व प्रकारची दारू, सर्व प्रकारच्या डिशेस आणि गावठी, देशी, तरुणींची व्यवस्था श्री.चंचल करत त्यामुळे 'बाग' धाब्यातून बाहेर पडणाऱ्या पार्टीचे बील हजारोंच्या घरात असे. त्या दिवशी त्यांच्या 'बाग' धाब्यावर जिल्ह्यातले मोठमोठे पुढारी जमणार होते. जि.प.च्या अध्यक्षांची निवड होती. जिल्ह्यातल्या एका 'वजनदार' पुढाऱ्याने अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता आणि जि.प.सदस्यांची मते आपल्याला मिळावीत म्हणून बागमध्ये मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. सकाळीच त्यांचा माणूस येऊन पूर्ण बाग धाब्यासह जेवण, मदिरा आणि तरूणी बुक करून गेला होता. सायंकाळी सात पासूनच इतर सर्व अधिकारी, पुढारी परत जात होते. 'बागच्या' प्रवेशद्वारापाशी विद्युत बल्बनी झळकणाऱ्या फलकावर आजच्या मेनूखाली हाऊसफुलचे बल्ब प्रकाशमान होते. रात्री नऊ वाजता एका मागोमाग एक पन्नास कार बागसमोर थांबल्या. त्यातून जवळपास तीन-साडेतीनशे पुढारी उतरून बागच्या सुशोभित खुर्च्यांवर बसले. त्या पुढाऱ्याने चंचलला बोलावून सांगितले,

"या सर्वांना हवी ती रम, हवं ते जेवण आणि तरूणी द्या बिलाची काळजी करू नका. हा घ्या अॅडव्हॉन्स." असं म्हणून त्यांनी नोटांची भरलेली सुटकेस चंचलला दिली व म्हणाले,

"तुमचं हॉटेल हनिमून ऑन मून केव्हा सुरू होतंय?

"लवकरच साहेब."

"ठीक आहे. तोवर आम्ही अध्यक्ष होऊ. पहिली जंगी पार्टी देऊ तुमच्या नवीन हॉटेलवर! कसं?"

"आपली कृपा, आपल्या सारख्यांच्या कृपेने आणि आपणासाठीच हे हॉटेल मी सुरू करतोय."

   हळूहळू बाग मधलं वातावरण बदलू लागलं. बाटल्यावर बाटल्या फुटू लागल्या. शेजारी बसलेल्या तरूणीसोबत चाळे वाढले. हळूच कुणाला नकळत कुणी तरूणीसोबत शेजारच्या कॉटेजमध्ये जाऊ लागले, आपल्या खुर्चीवर बसलेल्या चंचलला हे वातावरण नवीन नव्हतं. फक्त माणसं बदलली होती. वातावरण, हेतू, देवाण-घेवाण रोजचीच होती. गुन्हा खात्याला माहित असणार नाही अशी सारी माहिती चंचलता होती. कारण या बागेमध्ये अनेक प्रकारचे सौदे त्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पाच धाबे, चार पंचतारांकित हॉटेल्स होते. गिऱ्हाईकास प्रत्येक ठिकाणी हवी ती बाब मिळत असे. साहजिकच त्याची रोजची कमाई लाखोची होती. तो करोडपती म्हणून ओळखला जाई. त्याचे एक पंचतारांकित हॉटेल वाळवंटात होते. वाळवंटातील श्रीमंतांना तो वाटेल ते पुरवीत असे आणि आता त्याची योजना चंद्रावर हॉटेल काढण्याची होती. अब्जावधी रूपये खर्च त्याला या योजनेसाठी येणार होता. परंतु त्याचा हा सारा खर्च एका आठवड्यात भरून निघणार होता. प्रश्न होता, बांधकाम साहित्य आणि नंतर गिऱ्हाईकाला चंद्रावर न्यायचं कसं? त्यासाठी एका खाजगी विमान कंपनीशी करार झाला होता. त्या कराराप्रमाणे कंपनीचे एक विमान खास चंचलसाठी तयार राहणार होतं. सुरूवातीला बांधकाम साहित्य आणि नंतर प्रवाशांची चंद्रावर ने आण करणार होतं. चंचलचं लक्ष बाहेर थांबलेल्या कारकडे गेलं. त्यातून एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या थाटात उतरलेली व्यक्ती दिमाखदार पावलं टाकत जवळ येवून म्हणाली,

“मी सचिवालयात सचिव असून..."

"हे बघा साहेब, आज हाऊस फूल आहे. कोणताही, कितीही मोठा अधिकारी आला तरी आज जागा नाही."

"अहो, पण माझं ऐका तर खरं."

"हे बघा प्लीज, तंग करू नका. पूर्ण 'बाग' एकाच व्यक्तीनं बुक केलंय त्यामुळे आज काहीही करता येणार नाही. तेव्हा आपण दुसरीकडे..."

"माझे ऐका तर खरं मी तुमच्याच कामासाठी आलोय. हॉटेल हनिमून ऑन मून च्या संदर्भात बोलण्यासाठी मी मुद्दाम आलोय."

"हनिमून ऑन मून च्या संदर्भात? या इकडे या. स्पेशल केबीन रिकामं आहे माझं." दोघेही 'त्या' केबिनमध्ये बसताच ते अधिकारी म्हणाले,

"चंद्रावर काढण्यासाठी आपण आजपर्यंत सरकारची परवानगी..."

"काय? हॉटेल काढण्यासाठी सरकारची परवानगी? पण कोणत्या सरकारची? भारत, पाकिस्तान, अमेरिका, चीन, जपान, अफ्रिका सांगा कोणत्या देशाचा हक्क आहे चंद्रावर? अवकाशात यान पाठवताना कुणी कुणाची परवानगी घेतली होती? ती जागाच अशी आहे ज्याची ताकद असेल त्यानं तिथं वास्तव्य करावं.फार विचार करून मी ही योजना आखलीय साहेब. यापासून मला कुणीही परावृत्त तर काय फसवून पैसा ही उकळू शकणार नाही.."

"काय? पैसा उकळू..."

"होय पैसा! मला काय मुर्ख समजलात? साधं हॉटेल काढण्यासाठी किती खेटे घालावे लागतात? किती पैसा खर्च करावा लागतो? जागेला कमी आणि लायसन्सला जास्त पैसा द्यावा लागतो. तुम्हांला वाटलं असणार मी तुमच्या धमकीला बळी पडून लाख दोन लाखांनी तुम्हांला खुश..."

"काय बोलताय मि. एका सरकारी अधिकाऱ्याला?"

"खरं बोलणं वर्मी लागतं साहेब. पैशासाठी तुम्ही आला नसतात तर पोलिसांकरवी नोटीस पाठवून, आणखी कुणा करवी तुम्ही मला ऑफिसात बोलावू शकला असता. पण नाही. तुम्हांला एकट्याला सारं दाबायचं. माझ्यावर कार्यवाही करण्यापूर्वी तुम्ही दहा वेळा विचार करा. मी लेच्यापेच्या गुरूचा चेला नाही. कोणत्या नियमाच्या कोणत्या कलमाखाली तुम्ही माझ्यावर खटला भरणार? माझ्यावर खटला भरण्यासाठी तुम्हांला न्यायालयही चंद्रावरच काढावं लागणार. कारण पृथ्वीवरच्या कोणत्याही न्यायालयाच्या कक्षेत चंद्राचा भाग येत नाही. तेव्हा मि.अधिकारी आलात तर आजची रात्र जो पाहिजे तो पाहूणचार घ्या आणि परत जा." चंचल कठोरपणे म्हणाला...

    खाजगी वैमानिक संस्था आणि चंचल यामध्ये करार झाल्यानंतर काही दिवसांनी चंद्रावरच्या हॉटेलच बांधकाम सुरू झालं. त्याचा नकाशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या परदेशी कंपनीकडून तयार झाला. त्याप्रमाणं बांधकाम सुरू झालं. देशाच्याच काय पण परदेशातल्या सरकारनेही कायद्याच्या पुस्तकात हे बांधकाम अडविण्याचे कोणते कलम आहे का याचा शोध विधिज्ञांकडून घेतला. परंतु असं कलम शोधू शोधूनही सापडलं नाही. परिणामी ह्या बांधकामावर बंदी (स्टे) आणण्याचे देशोदेशीच्या सरकारचे मनसुबे उधळले गेले. शेवटी सर्वांनी मिळून देशाच्या पंतप्रधानांना विनंती केली की, हॉटेलमालक चंचल हा आपल्या देशातील रहिवासी असल्यामुळे हॉटेल हनिमून ऑन मून सर्व देशांच्या प्रतिनिधींसाठी खुलं असावं, तुमच्या देशातील हॉटेल जशी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुली असतात त्याप्रमाणे! अनेक विदेशी कंपन्यांनी हॉटेलचे शेअर्स विकण्यासंबंधी चंचलशी, सरकारशी पत्र व्यवहार केला तर अनेक खाजगी संस्थांनी या हॉटेलमध्ये भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर अनेक विदेशी बँकांनी कर्ज देण्याची तयारी दाखवली. एका देशाच्या राजपुत्राने आपला हनिमून कोणत्याही किंमतीवर उद्घाटनाच्या दिवशी करण्याची योजना आखली. चंद्रावर हॉटेलचे काम जोरात सुरू झाले. त्याच्या रोजच्या प्रगतीसंबंधी रोजच्या वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून येऊ लागले. हजारो वातानुकुलीत खोल्या असलेलं, शेकडो स्विमिंग पूल, शेकडो बार, शेकडो नृत्यागृह इत्यादी सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशा एकमेव अद्वितीय हॉटेलच काम प्रगतीवर होतं. ज्याप्रमाणे सूर्य एक, चंद्र एक, पृथ्वी एक त्याचप्रमाणे होणारे हॉटेलही एकमेव अशी नवी संकल्पना विज्ञानात रूढ होण्याची शक्यता वाढली. कारण इतिहासकारांच्या अंदाजाप्रमाणे ताजमहालच्या कामगारांचे हात ज्याप्रमाणे तोडून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे हॉटेल हनिमून ऑन मूनच्या कारागिरांचेही हात तोडले जातील. या गुन्ह्याबद्दल चंचलवर कोणत्याच देशाला गुन्हाही दाखल करता येणार नव्हता. कारण चंद्राचा भाग कोणत्याही देशाच्या प्रभागाखाली नव्हता. एकंदरीत हॉटेल हनिमून ऑन ह्या आंतरराष्ट्रीय औत्सुक्याच्या प्रश्नापुढे इतर सारे आंतरराष्ट्रीय प्रश्नच बाजुला पडले. काश्मीर प्रश्नाबाबत सचिव पातळीवरच्या बोलण्यात काश्मीर ऐवजी हॉटेल द्या असा मुद्दा चर्चेला येवू लागला.

"सांग सखे सांग तुजशी आणू काय?"

"आण प्रिया आण नभीचा चांद आण."

"सखे, चांद आणण्यापरी जाऊन चंद्रावर करूया हनिमून."

अशा विविध जाहिराती दूरदर्शनवर दाखवून चंचलने आपल्या हॉटेलची जोरदार जाहिरात सुरू केली. खाजगी विमानाद्वारे अनेक नावाजलेले, मोठमोठ्या इमारती बांधलेले कामगार चंद्रावर पोहचले. तिथल्याच मातीवर प्रक्रिया करून त्यापासून विटा आणि सिमेंट बनविण्यात आले. लोखंड, लाकूड असे इतर बांधकामाचे साहित्य विमानाद्वारे चंद्रावर पोहचले. नामांकित संतांच्या हस्ते पायाभरणी समारंभ होवून बांधकाम जोरात सुरू झाले. चंचलचा एक पाय चंद्रावर तर एक पाय पृथ्वीवर पडू लागला. आठवड्यातील अनेक दिवस तो चंद्रावर घालवू लागला. मोठमोठे इंजिनअर्स स्वतः उभे राहून बांधकाम करवून घेऊ लागले. देशोदेशीला बांधकामाची प्रगती वर्तमानपत्र, दूरदर्शनवर छायाचित्रांसह दाखविण्यात येवू लागली...

       ज्याच्या प्रतिक्षेत सारे जग होते, ती बातमी जगातल्या सर्व प्रसार माध्यमांनी दिली...

'ज्या हॉटेलच्या प्रतिक्षेत आपण आहात. ज्या हॉटेलमध्ये आपली पहिली रात्र साजरी व्हावी म्हणून अनेकांनी आपली लग्न लांबविली, अनेकांनी लग्न होवूनही संयम ठेवून आजतागायत आपला मधुचंद्र केला नाही, त्यासर्वांसाठी खुशखबर, सूर्य, चंद्र, पृथ्वी याप्रमाणे एकमेव असलेला स्वर्ग, स्वर्गातही मिळणार नाही अशी मदिरा, रंभा उर्वशीपेक्षा सौंदर्यवान मदिराक्षी असलेले एकमेव हॉटेल हनिमून ऑन मूनचे उद्घाटन अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर राज्याचे आमदार मा.श्री.झोटे पाटील यांच्या शुभहस्ते होईल. कारण हनिमून ऑन मूनला खरं प्रकाशित त्यांनीच केलं विधानसभेत हे प्रकरण काढून! विधानसभेत चर्चा झाल्यामुळे या हॉटेलला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. उद्घाटनाचा दिवस हा फक्त आमदार व खासदारांसाठी राखीव असला तरी फक्त झोटे पाटील उद्घाटक सोडले तर इतर सर्वांना उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करून खर्च स्वतः करावा लागेल. उद्घाटनाच्या दिवशी पुढाऱ्यांसोबत एक सीट राखीव असेल..."

निवेदन प्रसारीत झाल्यानंतर ताबडतोब राज्यातील, इतर राज्यातील खासदार, आमदार, महिला पुढाऱ्यांनीसुद्धा नोंदणी करावयास सुरूवात केली. दोन दिवसात एका वेळी दहा हजार लोक समाविष्ट होऊ शकतील असे ते चंद्रावरचं हॉटेल पूर्णपणे बुक झालं. उद्घाटनाचाच नाही तर त्यानंतरचा महिनाही बुक झाला. योगायोगाने संसदेचं अधिवेशन सुरू होतं. विरोधी पक्षाच्या एका खासदाराने ठराव मांडला,

"भारताच नाव जगातच नव्हे तर चंद्रावर कदाचित स्वर्गातही अमर करणाऱ्या त्या चंचलरावांना संसदेत बोलावून त्यांचा जाहीर सत्कार करावा. कारण म.गांधी, पं.नेहरू इ.थोर नेत्यांनी राजकारणात तर सुनील गावसकर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर यांनी क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव अटकेपार कोरलं. परंतु चंद्रावर हॉटेल काढण्याची करामत करून चंचलने भारताचं नाव त्रिभुवनात अजरामर केलं."

पंरतु हा सत्कार विरोधी पक्षाने सुचविला असल्यामुळे त्याचं सारं श्रेय विरोधी पक्षाला जाईल या स्वार्थी हेतूने इतिहासात अजरामर ठरू पाहणारा सोहळा सरकारी पक्षानं होऊ दिला नाही आणि या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्षानं प्रचंड घोषणाबाजी करून सभात्याग केला.

   साऱ्या जगाचं लक्ष हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी लागलं. अनेक वर्षापासून चालू असलेल्या युद्धालाही त्या दोन देशांनी तात्पुरती स्थगिती दिली. पुढारी, अधिकारी, श्रीमंत हेच नाही तर दोन देशातले प्रतिनिधीही भेटले तरी अगोदर हनिमून ऑन मून संबंधी चर्चा होऊ लागली. दोन अधिकारी भेटताच चर्चा होऊ लागली,

"काय अशात फार मोठा प्रकल्प नाही का निघणार?"

"का बरं?"

"नाही. मोठा प्रकल्प निघाला म्हणजे चंद्रावरच्या हॉटेलचा आस्वाद घेता आला असता."

"जाता येईल. आज ना उद्या."

"नाही यार. जो मजा शुरू में है वो बाद मे नहीं। अनेक जाऊन आल्यानंतर ते हॉटेल शिळे होऊन जाईल आणि..."

"बासी खाना अच्छा नही लगेगा क्यूँ?"

      "काय? चलायचं ना चंद्रावर?"

"चलायचं म्हणजे? हा काय प्रश्न झाला सभापती?"

"तिथं सोबत..."

"छे, छे सभापती सोबत नेवू नका. चंद्रावर देशोदेशीच्या येणार आहेत. करू निवड तिथंच. पृथ्वीवरची नेवून तिथं मजा करण्यापेक्षा मग इथंच काय वाईट आहे?"

"तेही खरंच म्हणा. पण काय हो, हे हॉटेल खरंच असेल?"

"का तुम्हांला शंका येते?"

"नाही. शंका नाही. पण असं बघा, आपल्याला बसवतील विमानात, खूप खूप फिरवतील आणि अशा ठिकाणी उतरवतील की, तो मोठा जंगलाचा भाग असून त्याठिकाणी एक हॉटेल बांधलेलं आहे. तो भाग चंद्राचा असेल कशावरून? नाही मला उगीचच शंका येते."

"पॉईंट है बॉस. जाऊ द्या. आपल्याला येऊन फुशारकी तर मारता येईल ना, आम्ही चंद्रावर आमुक देशाच्या तरूणीसोबत मजा केली म्हणून."

"तसं झालं तर ठीक. पण समजा खूप फिरवलं आणि ती चंद्राची जागाच सापडत नाही असं म्हणून वापस आणलं किंवा अॅडव्हान्स बुकींग करुन अब्जावधी रूपये घेवून पसार झाला तर? हाक ना बोंब अशी परिस्थिती होईल."

"चला जे होईल ते होऊ दे. जातील एखादे लाखच जातील. आपल्याला थोडाच घरातला पैसा द्यायचा?"

       दोन देशाच्या सचिव पातळीवरच्या बैठकीत, "प्रथम अभिनंदन! चंद्रावरच्या हॉटेलबद्दल! एक करू पुढची आपली सचिव पातळीवरची बोलणी हॉटेल हनिमून ऑन मूनवरच ठेवू कसं?"

"हो तसंच करू. बोलणीही होतील आणि आपल्याला हनिमूनची मजाही चाखता येईल."

       अखेर तो दिवस उजाडला. हॉटेल हनिमून ऑन मूनचे उद्घाटन देशातील आमदार, खासदार, पुढारी मिळून दहा हजार लोक खास विमानांनी तिथं पोहचले. सर्वधर्माच्या प्रसिद्ध धर्मगुरूंना बोलावून त्या त्या धर्माच्या विधीनुसार हॉटेलचा उद्घाटन विधी सुरू झाला. उद्घाटक श्री.झोटे पाटील ही वेळेवर पोहचले. देशोदेशीच्या दूरदर्शन कॅमेऱ्यांनी तिथं गर्दी करून चाललेल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपापल्या देशात दाखविण्यास सुरूवात केली. ज्यांच्या घरचे लोक चंद्रावर पोहचले त्यांच्या घरीही दूरदर्शनवर त्यांचे दर्शन होताच अभिमानानं माना उंचावरून डोळ्यात कौतुकाचे भाव दिसू लागले कारण आपला माणूस चंद्रावर गेला म्हणजे काय कमी झालं? गावातही चर्चेचा विषय झाला.

"धनी, पयलेपासून खटपटी, राजकारणात पडायच्या अगोदरपासून मुंबई दिल्लीच्या वाऱ्या केल्या. परदेशात मी गेलंत धनी. आता तर बघा चंद्रावरच! चंद्रावरून मला झकास पैठणी आणतो म्हणाले चांदणं असलेली..." असं म्हणता म्हणता धन्याच्या शेजारी लक्ष जाताच डोळ्यात अंगार फुलायचा.

"हे धंदे करायचे व्हते म्हणून मला नेलं नाय चंद्रावर! एका पैठणीत मला खुश करता नव्ह? कोण असल वो ती सटवी? बघा धन्याशी म्या जलमात केली नाय अशी लगट करून काय तरी पाजते. थांबा, या तुमी या तर या! लाटन हानीन फेकून! नको वाऱ्यानं उडून जाईल. थांबा, मुसळ काढते शोधून अन् फेकते चंद्रावर, पण तिथं डॉक्टर नसल नाय कां? बर या. मजा किती करायची ती करून घ्या. मग खाली बघा तुमची सोय." धन्याशेजारी अर्धनग्न परदेशी युवतीला पाहताच कौतुक कुठे तरी पळायचे.

    तिकडे हॉटेल हनिमून ऑन मून वर चाललेली मजा काही न्यारीच. तिथं पोहोचलेल्या लोकांना स्वर्ग दोन बोटे काय प्रत्यक्षात स्वर्गात अवतरल्यासारखं वाटलं. उच्चप्रतीच्या देशोदेशीहून बोलावलेल्या मदिरा, देशोदेशीच्या, तऱ्हेतऱ्हेच्या रंभा उर्वशी त्या वातावरणात सारे आपले देश, आपली जात, धर्म, नातेवाईक सारे काही विसरले. काही स्त्री अधिकारी, स्त्री पदाधिकारीही पोहोचल्या होत्या. त्यांच्यासमोर नेहमी गोंडा घोळणारे लोक त्यांच्याकडे साधा कटाक्ष टाकण्याची तसदी घेत नव्हते, परिणामी त्यांना तिथं करमेना झालं.

"बघ, नेहमी माझ्याकडे टक लावून बघणारा हा बहाद्दर कसा नजर वळवतो."

"अगं असंच असतं. तिथं आपण त्यांना किंमत देत नाहीत म्हणून ते पुढे पुढे करतात. इथं आपल्यापेक्षा स्वरूपवान, उघड सौंदर्य त्यांना मिळतंय तेव्हा.."

"ह्या किती दिवस पुरणार आहेत. या म्हणावं पृथ्वीवर. मग बघू. तिथं आपल्याशिवाय त्यांना विचारतं कोण?"

     शेवटी एक दिवस मजा करून ही मंडळी पृथ्वीवर परतली. कारण दुसऱ्या दिवशी त्यांना तिथं जागा नव्हती. दुसऱ्या दिवशीचे बुकींग फुल होते. इच्छा नसतानाही हे लोक विमानात बसले. परततानाही तीच चर्चा!

     "एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का हो, पृथ्वीवर आपण रात्रीतून अनेकदा प्रेम करतो आणि काल रात्री फक्त एकच वेळा? काहीही म्हणा, पण समाधान झालंच नाही."

"हो, मलाही जाणवलं. पृथ्वीवरची मजा काही वेगळीच इथं दडपण म्हणा...?"

"कसलं दडपण?"

"आपण थेट चंद्रावर मजा मारतोय हे दडपण..."

"हां यार! त्या परदेशी युवतीच्या अनेक प्रयत्नानंतर मी सामील झालो."

"जाऊ दे, एक ऐतिहासिक प्रसंग आपण पार पाडला ना?"

"पण तो खरोखरच चंद्र होता ना?"

"म्हणजे ?"

"नाही तसा कुठं बोर्ड बिर्ड दिसला नाही किंवा चंद्रावर दिसते ते हरिणही दिसले नाही."असं बोलता बोलता विमानतळावर विमान उतरलं. चंद्रावर मजा करणारे म्हणून विमानतळावर त्यांचे स्वागत ठेवण्यात आलं. पत्रकारांनी विचारलं,

"कसा दिसला आपला देश चंद्रावरून?"

"सारे जहाँ से अच्छा!"

"चंद्रावर मजा करताना काय वाटलं?"

"आपण काहीतरी अद्भुत, अद्वितीय कामगिरी करतोय असंच वाटलं."

"एकंदरीत आपल्या देशाची अन् चंद्राची तुलना?"

शेजारी उभ्या असणाऱ्या, त्यांच्यासोबत चंद्रावरून परतणाऱ्या महिलांकडे बघत तो पुढारी म्हणाला, "जो बात, जो मजा हमारे देश में है वो चांद पर कहाँ?"

"मेरी जुती!"असं हळूच ती महिला पदाधिकारी म्हणाली.

      नंतरचा आठवडा हॉटेल हनिमून ऑन मून च्या रसरशीत चर्चेत गेला आणि त्या सायंकाळी दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये ती ठळक बातमी आली,

"हॉटेल हनिमून ऑन मून चंद्रावर अस्तित्त्वात नाही. ह्या हॉटेलची जाहिरात सुरू झाल्यापासून अमेरिकन शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले, त्यानंतर काल चंद्रावर यान उतरवण्यात ते यशस्वी झाले. यानाकडून संपूर्ण चंद्रावरचे फोटो मिळाले असून त्यावरून अशी वस्ती चंद्रावर नाही. परंतु शक्तीशाली दुर्बिण आणि कॅमेरातून पृथ्वीचे बारीक निरीक्षण केले असता असे हॉटेल एका मोठ्या देशातल्या भागात सुरू असून आत्तापर्यंत जाहिराती देताना, प्रत्यक्षात जे फोटो वर्तमानपत्रांनी, दूरदर्शनने दिले, याशिवाय आतापर्यंत त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश दिला त्यांना तो भाग चंद्रावर आहे हे भासविण्यात आले. हा भाग कोणत्या देशाचा आहे, ह्याचा शोध अमेरिकन शास्त्रज्ञ घेत आहेत." भारतीय दूरदर्शनने बातमीच्या शेवटी बातम्यांचा वेळ वाढवून बातमी दिली,

"आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार हॉटेल हनिमून ऑन मून हे हॉटेल चंद्रावर नसून भारतातच आहे. देशातील एका मोठ्या जंगलातील झाडे साफ करून प्रथम दर्शनी चंद्रासारखा पृष्ठभाग दर्शविण्यात आला. वर्तमानपत्र, दूरदर्शनचे पत्रकार आणि उद्घाटनसोहळा झाला त्यावेळी सर्व देशांच्या दूरदर्शन टीमलाही ह्याचा सुगावा लागू दिला नाही. अशा प्रचंड नियोजनातून हे हॉटेल बांधण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री, सी.बी.आय.चे अधिकारी, पोलीस प्रमुख, काही राज्याचे मुख्यमंत्री, अनेक उच्चाधिकारी यांची तातडीची बैठक सुरू असून हा हनिमूनचा प्रभाग कोणत्या राज्याच्या अधिपत्याखाली येतो. अशा फसवणुकीबद्दल खटला भरता येईल का किंवा श्री.चंचल ह्यांचेवर कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी इत्यादी अनेक बाबींचा कायदेशीर अभ्यास सुरू असून बैठकीचा अहवाल हाती येताच विशेष हनिमून वार्तापत्र देण्यात येईल. तोपर्यंत ऐका वाद्यसंगीत...



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy