बसथांबा
बसथांबा
बस म्हणजे शासनाचा लाड डब्बा.लालपरी.या लाल डब्यातनं अनेकांनी प्रवास केलेला आहे आजही करत आहेत. बस थांबा म्हणजेच आजचा या तरुण पिढीचा बस स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबणे. जिथे बस थांबते तो बस थांबा, तो बस स्टॉप.
सहज रात्री फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. शांत,शांत वातावरणामध्ये पावसाची रिमझिम चालूच होती. निसर्ग खूप छान दिसत होता. हिरवी झाडी,रस्ते पाण्याने भिजलेले. त्या रस्त्यामध्ये मृगजळासारखे छान भास,आभास होत होते.
निसर्गाच्या या देखण्या रूपामध्येच मी पार हरवून गेले होते. गाडीतूनच हात बाहेर काढून पावसाचा अनुभव घेत होते. मस्त वाटत होतं.
मध्येच कात्रज चा बस स्टॉप दिसला. साधारण रात्रीचे सव्वा बारा वाजून गेले असतील. सर्व गाड्या बस स्टॉप वरती छान रांगेत उभे होत्या. दिवसभर काम करून दमल्या होत्या. थकल्या होत्या. दिवसभर थकल्याने शांतचित्ताने जणू काही विसावल्या होत्या. मनात अनेक प्रश्न उमटून गेले. आणि मग विषय ठरला आज आपण बस स्टॉप या विषयावरती लिहायचे.
पहाटे चार वाजल्यापासून या बस थांब्यावर ती माणसांची वर्दळ चालू होते. कोण ऑफिसला जाण्यासाठी निघत, कोण शाळा लांब आहे म्हणून निघतो, कोणाच्या नातेवाईकांची भेट घ्यायची असते, असे अनेकविध लोक चार वाजल्यापासून बस थांब्यावर थांबलेले असतात.हेच दृश्य दिवसभर पहायला मिळते.
त्यांच्या प्रत्येक मनाचा कोपरा जो आहे ना तो आपल्याला चेहऱ्यावरच्या निरीक्षणाने न्याहाळता येतो.चिंता, काळजी, आनंद, सुख, दुःख असं अनेक विध चेहरे दिसतात.
मनातल्या विचारांची गर्दी समजून घेता येते. या बस स्टॉप वरती थांबलेल्या अनेक लोकांचे दररोजचे भेटणे झाल्याने त्यांचे ओळखीत रूपांतर होते. घट्ट मैत्री होते. ही मैत्री कोठे झाली बस स्टॉप वरती झाली.
एक बस येते माणसांना भरून वाहून घेऊन जाते.दुसरी बस थांबते दुसरी माणसं भरते आणि निघून जाते.दिवसभर हे चालूच असते.
कधी कधी बसची वाट बघत बसावे लागते. कधी कधी काही बस मिस होतात आपल्याकडून.
कधी कधी बस टायर पंक्चर झाले म्हणून थांबावं लागतं. अशा वेळेला आपल्याला जिथे पोहोचायचं असतं तिथे वेळेवर पोहोचू शकणार नाहीत याबद्दलची खंत मनामध्ये असते ती आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. आपलाच आपल्याला राग येतो. पण बऱ्याचदा पैशांच्या अभावी आपण रिक्षा दुसरी वाहने करू शकत नाही.
बस हे परवडणारे साधन आहे. कमी पैशांमध्ये लांबचा पल्ला गाठता जातो. म्हणून काही माणसं अजूनही अशी आहेत की बस शिवाय प्रवासच करत नाहीत.
सकाळपासून रात्री अकरा पर्यंत या बस थांब्यावरती प्रवाशांची वर्दळ आपल्याला दिसून येते.
आता तर काय शासनाने खूप सुविधा उपलब्ध करून दिले आहेत या प्रवासाबद्दल. महिलांना 50 टक्के तिकिटामध्ये सूट दिलेली आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास दिलेला असतो. नागरिकांसाठी दिवसभर तुम्ही कुठेही फिरा बसने असाही पास असतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा बसच्या विविध सेवा उपलब्ध आहेत.
बस स्टॉप वर तुम्ही बघायला गेला तर... बस स्टॉप वर मजा असते बघण्यासारखी. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एखादे पुस्तक असते परीक्षा चालू आहेत. आपली बस येईपर्यंत अभ्यास होईल हा विचार असा त्यांच्या मनात. कडेवर मूल आहे बाईच्या कधी येणार ही बस या विचारांमध्ये ती गुंतलेली असते. चार-पाच मैत्रिणी गोळा होऊन बसची वाट बघत बसतात,आनंदात गप्पा मारत असतात.हातामध्ये एखादे चॉकलेट किंवा एखादा खाऊ असतो. दोन मैत्रिणी छान कुठेतरी फिरायला चाललेल्या असतात.बघा त्यांच्या कशा गप्पा रंगलेल्या असतात. काही जण आपल्याच विचारात असतात बस कधी येणार कसं होणार माझं मी वेळेवर पोहोचेल की नाही इत्यादी त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, विवंचना असतात. अशा अनेक व्यक्तींच्या चेहऱ्यांची निरीक्षण करताना आपली बस कधी येते हे कळत नाही. मग त्या बस मध्ये चढण्याची घाई. कोण पहिलं जातं. दे धक्का बुक्की सुद्धा पाहण्यासारखी असते.
पण आपणच आपली एक ओळ केली छान आणि ओळीमध्ये आपण गेलं तर! कोणालाच कुठला त्रास होणार नाही. कंडक्टर कडून सर्व प्रवासी आरामात गाडीमध्ये घेतले जातील. कोणाला लागणार नाही धक्काबुक्की होणार नाही.
काही वृद्धांचा घरामध्ये वेळ जात नाही. अशा वृद्धाने खरोखरच बस थांब्यावर जावे आरामात टाईमपास करावा दोन तासाने घरी यावं. मस्त मजेत टाईमपास होईल या लोकांचा. सहज सुचलेल्या या कल्पना आहेत.
आता प्रत्येकाकडे टू व्हीलर,फोर व्हीलर आहेत. प्रत्येक जण आरामात प्रवास करत असतो.
पण हा बस प्रवास खरच सुखदायी असतो. आपले पैसे वाचवणारा असतो. पण आपल्याला तेवढा वेळ नसतो. बस येण्याची वाट आपण पाहू शकत नाही. पण बरीचशी गर्दी आपल्याला अजूनही या बसथांब्यावर दिसते म्हणजेच बस अजूनही खूप चालत आहेत. शासनाने दिलेल्या या सोयीचा उपयोग खर तर आपण करायला हवा. जसा ज्याला जमेल तसा त्याने उपभोग घ्यायला हवा.
लाल परीराणी आहे सर्वांसाठी
उपभोग घ्या तिचा आपल्यासाठी
आरामात बसून सारे प्रवास करूया
शासनाच्या सोयींचा उपभोग घेऊया....