Pratibha Tarabadkar

Others

3  

Pratibha Tarabadkar

Others

भाषा

भाषा

2 mins
177


मध्यंतरी नागराज मंजुळेंचं एक विधान वाचण्यात आलं,'भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसतंय'.

खरंच, भाषा ही संवाद घडविण्याचे माध्यम आहे त्यामुळे विविध भागांमधील स्थानिक भाषा वैविध्यपूर्ण असणारच!

 माझ्या वडिलांची बदली मिरजेला झाली.अस्सल मुंबईकर असलेले आम्ही अचानक एका अनोळखी प्रांतात येऊन पडलो.अर्थात 'पानी तेरा रंग कैसा,जिसमें मिलाये वैसा ', अशी वृत्ती असल्याने त्या परिसरात मिसळून गेलो तरी कधी कधी मजेशीर प्रसंग येत.

एकदा माझ्या मैत्रिणीच्या ओळखीच्या टेलर कडे कपडे शिवायला टाकायला गेले होते.एका वाड्यातील अंधाऱ्या खोलीत तो रहात होता.आम्ही गेलो तेव्हा तो घरी नव्हता.त्याची बायको म्हणाली, 'लावून देतो '.मला काही कळेचना काय लावून देणार?

माझा गोंधळलेला चेहरा पाहून मैत्रिणीने खुलासा केला,'अगं ती म्हणतेय, तिच्या नवऱ्याला पाठवून देईल.'

अच्छा म्हणजे लावून देणार याचा अर्थ पाठवून देणार असा आहे तर!

आमच्या कामवालीला आई काहीतरी काम सांगत होती तर ती म्हणाली,'ताई, लोटून झाल्यावर करते.'आई बुचकळ्यात! तशी तिने झाडण्याची एक्शन केली.

लोटणे म्हणजे झाडणे होते तर! अशा अनेक गमतीजमती घडत असत.

लग्न होऊन डोंबिवलीला आले.अस्सल म-हाटमोळं गाव असूनही आमचं शेजार मात्र गुजराती होतं.गुजराती म्हणजे अतिशय अघळपघळ लोक! कधीही कुणाच्याही घरी शिरत, मोकळेपणाने गप्पा मारत.अर्थात तो काळ होता चाळीस वर्षांपूर्वीचा!तर एक जण दुसरीला आग्रह करीत होती,'आवो चाय पीवा ', तशी दुसरी फणकाऱ्याने म्हणाली,'हूं तमारी जेवी नवरी नथी ',हे शब्द माझ्या कानावर पडले आणि माझ्या काळजात लक् कन हलले.'बाई गं,मंजूबेन दुसरं लग्न करतेय की काय?दिवसभर मला चैन पडेना.तिच्या गोजिरवाण्या मुलांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोरुन हलेनात.'काय अवदसा आठवली मंजूबेनला दुसरं लग्न करायची?

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर ताबडतोब ही बातमी त्याच्या कानावर घातली.तर गुजराती भाषेत नवरी म्हणजे रिकामा वेळ असलेली.म्हणजे ती दुसरी म्हणत होती मी तुझ्या सारखी रिकामी नाहीय म्हणून!

हुश्श,केव्हढं ओझं उतरलं माझ्या काळजावरचं म्हणता!

बघा, मराठी नवरी आणि गुजराती नवरीच्या अर्था मध्ये किती फरक आहे ते!

मध्यंतरी आम्ही मैत्रिणी मैत्रिणी दक्षिण कर्नाटकाच्या ट्रीपला गेलो होतो.उडपी श्रीकृष्ण मंदिराच्या गेटसमोर काही तरुण तरुणींचा आवडता कार्यक्रम... अर्थात सेल्फी घेणे चालले होते.त्यातील एक भरपूर मेकअप चोपडलेली,सोनेरी काठाची पांढरी... टिपिकल दाक्षिणात्य साडी नेसून, कपाळावर टिकलीच्या वरच्या बाजूला भस्म वगैरे लावलेली... तरुणीचे सेल्फी घेणे चालले होते.माझी एक मैत्रीण तिच्या जवळून जाताना मला म्हणाली,'बघितलीस का हिरॉईन, काय मेकअप थापलाय'

मी पण तिला दुजोरा देत मोठमोठ्याने बोलत आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला हाक ऐकू आली,'काकू ', आम्ही मागे वळून पाहिले तर तीच 'हिरॉईन ' आम्हाला बोलवत होती.'काकू तुमचा रुमाल पडलाय' आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले.'म्हणजे हिला मराठी येतंय?हिने आमची शेरेबाजी ऐकली असेल!

आम्ही ढांगा टाकत तिच्या 

जवळ गेलो, रुमाल घेतला आणि धूम ठोकली.

अशा भाषेच्या गमतीजमती!


     


Rate this content
Log in