Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Pratibha Tarabadkar

Drama


4.4  

Pratibha Tarabadkar

Drama


बेरीज वजाबाकी

बेरीज वजाबाकी

6 mins 304 6 mins 304

दोन जड पिशव्यांचे ओझे सांभाळत सविता बसस्टॉपवर उभी होती.घामाघूम होत.तिच्या हातातील ओझे पाहून रिक्षा तिच्यासमोर वेग कमी करीत असत पण सविता अभावितपणे मान हलवून नकार देत होती.शेअर रिक्षात एव्हढे ओझे घेऊन बसणे कठीण होते आणि स्वतंत्र रिक्षा परवडली नसती. बसेस गर्दीने खचाखच भरुन येत होत्या. पण आता तिला थांबणे शक्यच ‌नव्हते.जिवाच्या कराराने सविता एका बसमध्ये घुसलीच. बस स्टॉपपासून सविताची बिल्डिंग दहा मिनिटांवर होती. पिशव्या खाली ठेवून तिने घाम पुसला व ती पुन्हा ओझे सांभाळत चालू ‌लागली. बिल्डिंगजवळील बाकावर आसपासच्या बायका बसल्या होत्या. काही उभ्या होत्या. नानींनी नेहमीप्रमाणे मैफिल जमवली होती. सविताच्या तक्रारी सांगायला. सविता दिसताच बायकांची आपसात नेत्रपल्लवी झाली. नानी रंगात येऊन सांगत होत्या, 'इतकी कामं करून घेते हो आमच्याकडून, नुसते हाल चालले आहेत आमचे ',इतर बायका चुकचुकल्या तशी नानी धन्य धन्य झाल्या. सविता खिन्नपणे हसली आणि तोल सांभाळत जिने चढू लागली. शेजारच्या ढवळेकाकू दारात उभ्या होत्या. तिला बघून मायेने म्हणाल्या, 'किती धडपडतेस ग घरासाठी,पण तुझ्या सासूला काही किंमत आहे का ‌बघ!सतत माझी सून छळते, कामं? आणि करून घेते म्हणून गावभर सांगत सुटलेली असते. तुझे कष्ट तिला दिसत नाहीत का? आणि तू तरी एवढी ओझी घेऊन का येतेस?'


'काय करणार काकू,कमावणारा एक आणि खाणारी तोंडं सहा,मग मीसुद्धा थोडाफार हातभार लावायला हवा ना!'


'किती समजूतदार सून मिळाली आहे पण नानींच्या तोंडून कधी चांगला शब्द नाही येत तुझ्याबद्दल!'ढवळेकाकूंना फारच राग आला होता नानींचा.'जाऊ द्या हो काकू, बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार? 'कसंनुसं हसत सविताने आपल्या घराची बेल दाबली.टी.व्ही. एव्हढ्या मोठ्याने लावला होता की त्याचा आवाज दाराबाहेर येत होता. अमेयने दार उघडले आणि आईच्या हातातील पिशव्या घेऊन किचनमध्ये ठेवल्या.'आई,आबांना सांग ना टी.व्ही.चा आवाज हळू करायला.उद्या माझी परीक्षा आहे, त्यांना समजत नाही का?'अमेय आईशी भुणभुण करीत म्हणाला.'तुला माहित नाही का अमेय,आबा ऐकणार नाहीत ते! आहे त्या परिस्थितीत तुला अभ्यास करावा लागणार आहे.अमोलसुद्धा बसला आहेच ना एव्हढ्या गदारोळात अभ्यास करीत! उद्या पेपर झाला की कॉलेजच्या लायब्ररीत बस अभ्यास करीत.हवं असेल तर अजून एक डबा देते तुला!'हताश स्वरात सविता म्हणाली.

यांच्या काळजाच्या जागी दगड बसवला आहे का?मुलगा आणि सुनेबद्दल नाही पण नातवंडांचीही माया नाही? त्यांच्या भवितव्याची चिंता नाही? बेल वाजली.'नानी आली वाटतं',अमेय तणतणला.'आता हिच्या मराठी सिरियल्स सुरु होणार.नातवंडांना अभ्याससुद्धा करु देत नाहीत.बेडरुमही बळकावून बसलेत.आता काय रस्त्यावर दिव्याखाली अभ्यास करु का?'अमेयने तणतणतच दार उघडले.'हुश्श दमले बाई',


पदराने वारा घेत नानीने कोचावर बसकण मारली आणि मराठी चॅनेल लावला.'आता रात्रीच्या जेवणापर्यंत बाई काही हलणार नाही टी.व्ही.पासून', सविताने सुस्कारा सोडला आणि ती रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली.जेवणे आटोपली की उद्याच्या डब्यांची तयारी...हे चक्र मागे लागले आहे त्यातून कधी सुटका होणार? सविताच्या मनात आले.कधी त्याला खीळच नाही.असं वाटतं एखाद्या गाडीत बसावं, भोवतालच्या निसर्गाचा आनंद घ्यावा, पुन्हा फ्रेश होऊन घरी यावं.सविता आपल्याच विचारात गुंगून गेली ती मोबाईल च्या आवाजाने भानावर आली.सुधीरचा फोन होता.जेवायला वाट बघू नका, उशीर होईल.'नेहमीचाच निरोप! सुट्टीच्या दिवशी लोळत रहायचे आणि आंबा नानींबद्दल काही सांगायला गेले की मला त्रास देऊ नकोस,तुझं तू निस्तर असं म्हणून अंग काढून घ्यायचे.सविताचे विचार चालू होते.


'ताई,या शुक्रवारी पारायण आहे देवीच्या मंदिरात', मंगलने बातमी दिली भांडी घासता घासता.'अगं बाई मी विसरलेच होते श्रीसूक्ताचे पारायण आहे देवीच्या मंदिरात. 'आमटीला फोडणी घालता घालता सविता प्रसन्न मुद्रेने म्हणाली.'तुम्ही जाता नव्हं दरवर्षी?'मंगलने भांडी विसळतांना विचारले.'हो गं, मला आवडतं तिथलं वातावरण!तो भक्तीभाव,ते धीरगंभीर आवाजात पठण, वातावरण कसं भारलेलं असतं अगदी!'सविता त्या आठवणीत हरवून गेली.'सूनबाई,झाला की नाही स्वयंपाक?आबा भुकेने कळवळले आहेत अगदी!'नानींची आरोळी आली तशी लगबगीने सविता दोघांची पाने वाढू लागली.

देवीच्या मंदिरात साऱ्याजणी भक्तीभावाने एका सुरात श्री सूक्त पठण करीत होत्या.सविता अगदी भारुन गेली होती. तो आनंद मनात साठवत ती बिल्डींगपाशी आली तो तिथे गर्दी दिसली.सविता कावरीबावरी होत पुढे झाली.कुणीतरी आबांना हाताला धरुन आणले होते. 'काय हो, एव्हढ्या म्हाताऱ्या माणसाला पाठवता औषधं आणायला? रस्त्यावरच्या गर्दीत काही झालं असतं म्हणजे?',आबा साळसूद चेहरा करून मान खाली घालून उभे होते.सविताचा आनंद पार पुसून गेला.


आबांना हाताला धरुन घरी येताना सविताच्या संतापाचा स्फोट झाला.'इतके दिवस आमच्या पैकीच कुणीतरी तुमची औषधं आणत होते ना?मग आज मुद्दाम गेलात ना गर्दीत लोकांना दाखवायला की आम्ही तुमची काळजी घ्यायला कसे नालायक आहोत?'सविताचा आवाज संतापाने चिरकला. 'सूनबाई उगाच ओरडू नकोस आबांवर',नाही करवादल्या.'तुम्हाला आम्ही नकोसे झालो आहोत ना,मग वृद्धाश्रमात टाकून द्या आम्हाला',नानींनी नेहमीचे पालुपद म्हटले आणि डोळ्यांना पदर लावला.सविताला एकदम गळून गेल्यासारखे वाटले.किती असहाय्य झालोय आपण!दोन तरुण मुलं, ऑफिसच्या कामाने कावलेला नवरा आणि सासू सासरे यांचा मेळ घालताना आपण मात्र भरडले जातोय.असं वाटतंय पळून जावं या घरापासून.कुठेतरी दूर दूर... काही क्षणातच सविता भानावर आली.डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिने पुसले व ती कामाला लागली.काहीच झाले नाही अशा थाटात बाहेर टी.व्ही.नेहमीप्रमाणे किंचाळू लागला.


घरातील धबडगा उपसता उपसता सविता पार दमून गेली होती. बाहेरचे बटाटेवडे खाऊन आबांचे पोट बिघडल्याने डॉक्टरांकडे खेपा, त्यात मंगल कामावर येईना. ना निरोप, ना फोन! मंगल आतापर्यंत कधीच अशी बेजबाबदारपणे वागली नव्हती. तीन दिवस तिची वाट पाहून सविताने तिच्या घरी जाऊन तपास करावयाचे ठरविले.तिची झोपडपट्टी सविताच्या घरापासून दहाच मिनिटांवर होती. झोपडपट्टीशी सविता गेली तो काय? झोपड्यांचा पूर्ण विध्वंस झालेला. म्हातारी माणसं हताश होऊन डोक्याला हात लावून बसलेली तर तरुण मंडळी आपल्या एकेकाळी असलेल्या घरातून काही किडूकमिडूक सापडतंय का ते पहात खुडबुडत होती. काही स्त्रिया भकास नजरेने मांडीवरील रडणाऱ्या बाळांना जोजवत होत्या.टी.व्ही.वर बातम्यांमध्ये बघतो, त्यापेक्षा किती भयाण वास्तव होते ते!


'मंगल',सविताने हाक मारली.जमिनीवर वाकून काहीतरी शोधत असलेल्या मंगलला सविताने तात्काळ ओळखले.मंगल गर्रकन वळली.दोन तीन दिवस अंघोळ न केलेला,धुळीने माखलेला तिचा म्लान चेहरा बरेच काही सांगून गेला.कडेवरील मुलाला सांभाळत, रडणाऱ्या तिच्या तीन मुलींना हाताशी धरून मंगल सविता समोर आली.

 

'बघितलंत ताई, कशी दैना झालीया आमची? आमचा काटक्या कुटक्यांचा सौंसार मोडला या मुल्सिपाल्टीच्या भाड्यांनी. आता कुटं राहू? काय खायला घालू या पोरास्नी? आनि या पोरांच्या बापाला काय चिंता हाय का बगा? दारु ढोसून पडला आसंल कुटं तरी लोळत! म्या नगो नगो म्हनत हुते तरी ल्योक पायजे म्हनला. म्हने म्हातारपनाची काठी हुईल. परमेसराने ल्योक दिला पन् पांगळ्या पायाचा! आता कोन कोनाची काठी होनार सांगा!' मंगलच्या स्वरातील संताप, अगतिकता, असहायता सविताला अस्वस्थ करीत होती. सविताला पाहिल्यावर मंगलचा बांधच फुटला होता जणू!पण तिच्या फाटलेल्या आभाळावर पांघरूण घालण्यास सविताचे हात तरी कुठे समर्थ होते? सविताने तिला थोपटले आणि पर्समधील होते नव्हते ते सर्व पैसे काढून तिच्या हातात कोंबले आणि परत जावयास वळली.


'ताई,'मंगलची हाक ऐकून सविता थबकली आणि मागे वळली. मंगल हातात पैसे धरुन तशीच उभी होती. स्वप्नाळू डोळ्यांनी सविताकडे पहात!

'ताई,परमेसराकडे नेहमी एकच मागनं मागते बगा, पुढचा जलम माझ्या सविताताईसारका दे.डोईवर हक्काचं छप्पर,मान मोडून काम करनारा दादला आनि खूप बुकं शिकनारी दांडगी पोरं! खूप नसीबवान हायसा बगा तुमी!


सविताच्या डोक्यात वीज चमकावी तसे झाले. मी आणि नशीबवान?: घरी परतताना सविताच्या मनात मंगलचे शब्द घोळत होते.घरी आल्यावर सविताने मनाशी निश्चय केला. 'घरखर्चाचा हिशेब लिहीतेय'असं बजावून कागद पेन घेऊन सविता बसली, तिच्या आयुष्याचा ताळेबंद लिहीण्यास!तिने कागदाचे दोन रकाने केले. एकात लिहिले बेरीज व दुसऱ्यात वजाबाकी. आणि काय आश्चर्य, सविताच्या आयुष्यातील बेरजेचा रकानाच भरु लागला. सुरक्षित बालपण,प्रेमळ आई-वडील, निरोगी,निर्व्यंग शरीर, पदवीपर्यंत विनाअडथळा शिक्षण...ते मंगलच्या शब्दात दोन हुशार दांडगी पोरं इथपर्यंत!

 मात्र वजाबाकीच्या रकान्यात एखाद दोन गोष्टी सोडल्या तर पूर्ण रकाना रिकामाच होता.

 

माणसाच्या मनाची एक गंमत आहे. ज्या गोष्टी परमेश्वराने भरभरून दिल्या आहेत त्या गृहीत धरून मानवी मन ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्याभोवती घिरट्या घालीत बसतं. खरं म्हणजे त्या जगन्नियंत्याने आपल्याला ज्या गोष्टी भरभरून दिल्या आहेत त्याबद्दल त्या दात्याचे, परमेश्वराचे कृतज्ञतेने आभार मानले पाहिजेत! सविता कागद हातात धरून बसून राहिली. खरंतर ही दृष्टी देणाऱ्या मंगलचे आभार मानायला हवेत. सविता एक निश्चय करून उठली. घरातील जादाची अंथरुण, पांघरुणं तिने गोळा केली, जास्तीची भाजीपोळी डब्यात भरून मंगलच्या दिशेने ती चालू लागली.


Rate this content
Log in

More marathi story from Pratibha Tarabadkar

Similar marathi story from Drama