The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Suresh Kulkarni

Others

1.8  

Suresh Kulkarni

Others

बारक्या !

बारक्या !

14 mins
2.1K


सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे ,असा 'अल्प ' नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते .

"आक्का ,मी आलोय ग SSS ! "अंगणातून कोणी तरी टाहो फोडला . मंचकरावची धुंदी खाड्कन उतरली . पण स्वभावा प्रमाणे मुळीच घाई न करता त्यांनी सावकाश डोळे किल किले करून अंगणात नजर फेकली. सुकलेल्या चिपाडा सारखा ततंगडा माणूस हाळी देत होता . त्याने कपड्याचे एक बोचके बायकी थाटात बगलेत धरले होते .

"हे पहा अजून गिरिजाबाईंचा स्वयंपाक झालेला नाही . दुपारी दोन नंतर या ,तेव्हा भीक वाढू ! " मंचकराव म्हणाले .

"अहो पण मी भीक ----"

"आम्हास माहित आहे ,तुम्हास शिळे-पाके चालते !पण कालच्या पोळ्या आणि भाकरी गिरिजाबाई आम्हांसच खाऊ घालतात ! तेव्हा नो शिळे -पाके बिझिनेस ! आपण दुपारीच या !"

"कोण ? बारक्या !" तेव्हड्यात गिरिजाबाई पदराला हात पुसत अंगणात आल्या . बगलेतलं बोचक भिरकावून देत त्या काटकुळ्या माणसाने गिरीजाबाईंचे पाय धरले .

"ये ,ये बारक्या घरात ये !अन आज आठवण झाली व्हय आक्कांची ? इतके दिवस कुठं होतास ?"

"आग ,तिकडं चम्पाआक्काकड साल भर होतो . तिच्याकडनचं तुझा पत्ता आणि गाडीभाडं घेतलं अन तडक आलो बग !पर ह्यो मिशाळ बाबा कोण म्हणावा ?" त्याने मंचकरावकडे निर्देश करत , हनुवटीला तर्जनी लावत बेरक्याने नाजूक मुरका घेत विचाले .

" अरे , हे तुझे ----"

" आम्ही मंचकराव !गिरिजाबाईंचे पती ! या वाड्याचे मालक ! "आपल्या झुपकेदार मिश्यावरून पालथी मूठ फिरवीत मंचकराव खर्जात म्हणाले .

" या बया ,म्हणजे दाजी का ? नमस्कार करतो हा दाजी " बारक्या नमस्कारासाठी झुकला .

"ठीक आहे !" असे काहीसे पुटपुटत त्यांनी पाय मागे घेतले . साधारण हे सोंग गिरिजाबाईंच्या माहेरचे असावे इतकी त्यांना कल्पना अली होती . तरी त्यांनी गिरिजाबाईना विचारले .

"हे कोण ?"

"ह्यो बारक्या , गावाकडन आलाय . " त्यांनी तुटक उत्तर दिले . म्हणजे त्या बारक्या बद्दल फारसे बोलू इच्छित नव्हत्या . त्या बारक्याला घेऊन तडक घरात गेल्या . दुपारच्या जेवणात गिरिजाबाईनी रव्याचा गोडं सांजा केला . 'बारक्या ' हे काहीतरी 'खास ' प्रकरण असल्याची मंचकरावच्या मनाने नोंद घेतली .

                                                                              ०००

बारक्या येऊन जेम तेम चारच दिवस झाले होते . पण अख्ख्या आळीत तो ' मंचकरावचा मेव्हणा ' म्हणून व्हायरल झाला होता . इतकेच काय शेजारच्या भुजंगाने सुद्धा 'हे तुमचे मेहुणे का मेहुणी ?'अशी कुचकडे पूछा केली होती !भुजंग्या डाम्बिसच आहे . बारक्या आता घरात चांगलाच रुळला होतो . 'दाजी ,बाजारात जातोय . काही आणायचे आहे का ? 'असे आवर्जून विचारात असे . आणि सांगितलेली वस्तू हमखास 'विसरत ' असे ! बाहेरून येताना तो स्वतः साठी बिड्याची बंडल मात्र आठवणीने आणत असे ! मागल्या दारात बसून बिड्या ओढणे हि त्याची अनंत जन्माची अतृप्त इच्छा तो आवडीने तृप्त करून घेत असावा  ! पण गिरिजाबाईस बारक्याचे कोण कौतुक ! कारण बारक्या त्यांना हर कामात मदत करायचा . अंगण झाडून सडा टाकणे , घर साफ करून ओल्या फडक्याने पुसून घेणे , भांडी घासणे , कपडे धुणे , बाजारातून भाजी आणणे , भाजी निवडून देणे , कणिक मळून देणे . सबकुछ !


गिरिजाबाई आणि बारक्या गावर निवडत बसले होते . समोर चांदीच्या पानदानातून टपोरी सुपारी मंचकरावनी उचालली . तिचे बारीक काप करून वेलदोड्या सोबत तोंडात टाकता टाकता त्यांनी बारीक नजरेने बारक्या कडे पहिले . त्यांच्या नेमके लक्षात आले नाही पण काहीतरी ओळखीचे मात्र जाणवले .

"काय, बारकेराव काय करता तुम्ही ?"मंचाकरावनी बारक्यास विचारले

"काय म्हणजे ?सगळंच करतो कि ! अन दाजी तुम्ही बगताच कि ?"

"तसे नव्हे . पोट-पाण्यासाठी ?"

"त्याची काय गरज पडली नाही आजवर! पडलं तवा बघू !"

"म्हणजे ?"

"आता बघा ,गेल्या साली सालभर चम्पाआक्का कड होतो .आता तुमच्याकडं आहे . असाच फिरणार ,जिंदगीभर !"

"अहो,आश्रितासारखे असे किती दिवस जगणार ?" मंचकरावनी नको ते विचारले .

"बारक्याला दोनवेळच्या जेवणाची कधीच भ्रांत पडणार नाही ! तो आम्हास जड नाही ! " इतकावेळ गप्प असलेल्या गिरिजाबाई ताड्कन उत्तरल्या. गिरिजाबाईंचा नूर बघून मंचाकरावनी बोलणे आवरते घेतले .

"अरेच्या , बारकेराव मघापासून आमच्या लक्षात येत नव्हते ते आत्ता आले . आज आपण आमचा गंजीफ्रॉक चुकून घातलेला दिसतोय !"

"चुकून नाही मुद्दाम घातलाय ! फडताळात अकरा बनियानी पडल्यात !घेतल्या दोन ., आता थोडं ढगळ्या हैत ,पण चालतंय कि !अन फक्त बनियनच नाही तर अंडरवेट पण तुमचीच आहे ! दाखवू का ?" बारक्याने आपले किडके दात दाखवत विचारले . 'बारक्या ' प्रकरण हाता बाहेर जातंय हे मंचकरावना जाणवू लागले .'सालभर चंपाआक्का कडे होतो . ' हे वाक्य मंचकरावना आठवले . म्हणजे वर्षभर हा 'आदिभार ' उचलावा लागणार कि काय ?

                                                                                                                                                          ००        

गिरिजाबाईना नदुखावता बारक्याचा कसा बंदोबस्त करावा हा भुंगा डोक्यात घेऊन मंचकराव साईबाबाची पोज घेवून पिंपळाच्या पारावर बसले होते . तोच समोरून खंडोबा झुकांड्या तोल सावरत आला .

"काय मंचक -राव कसल्या इचारात हैती ?"आंबूस स्वरात त्याने विचारले .

"त्याचे काय कि एक 'बारक्या 'आमच्या घरात आले आहेत . ते गिरिजाबाईच्या माहेरचे आहेत आणि त्याने लाडके पण आहेत . आम्हास ते त्रासदायक ठरणार असा आमचा होरा आहे . तेव्हा गिरिजाबाईस न दुखावता या बारक्यास कसे परत पाठवावे या विचारात आम्ही आहोत . आपण काही सुचवू शकाल का ?" मोठ्या आशेने मंचाकरावनी झुकांड्यास विचाले . कारण मागेच्या वेळेस ' दारुडे व्हा ! गिरिजाबाई तुमच्यावर प्रेम करतील .!" हा सल्ला याच झुकांड्याने दिला होता . एकाच 'बैठकीत ' काम झाले होते ! (सन्दर्भ -मंचकमाहात्म्य -शेजार -प्रेम -अध्याय दुसरा ).

"बारक्या ! हा, ठाव हाय ,तुमचं मेव्हन ! सिम्पल हाय , तेल दारू पाजा ! तुमचं सोडून दुसऱ्याच्या घरात घुसलं ! अहो माजच बाग ,दोरु पोटात गेलीकी डोक्यात शिट्टी वाजती ! शिट्टी वाजाया लागली कि समूर दिसलतंय त्या घरात घुसतो ! मग लोक भायेरुन कडी घालत्यात ! पक्का बंडुबस्त होतो ! बर ते जाऊदे . एक शंबर रुपडे द्या ,रातची सोय करायचीय . मजी बाटलीचं पैस हैत ,चकण्याला कमी पडत्यात , कमी कसलं न्हाईच हैत !"

"आता बुडखा हलवा झुकांडे ,नसता -----" पायताना कडे पहात मंचकराव खर्जात म्हणाले . तसा झुकांडे सरळ चालण्याचा प्रयत्न करत ,तिरपा तिरपा चालत दूर गेला . या झुकांड्याला काही विचार ,याचा आपला एकच सल्ला 'दारू प्या /पाजा '. ----पण हा उपाय करून पहाण्यास काय हरकत आहे . दारूच्या नशेत 'बस्तान हालावण्यचा सल्ला बारक्याच्या गळी उतरवता येईल . आणि मुख्य म्हणजे आपणही ' तीर्थ ' घेऊन बरेच दिवस झालेत . तृप्ती होईल! . बारक्यास 'पार्टी ' देण्या साठी गिरिजाबाई खुशीने राजी होतील ! मंचकरावांनी अपेयपान आणि अभक्षभक्षणचा बेत पक्का केला .

                                                                               ००

मध्य रात्रीचा समय असावा . दोन्ही हात वरकरून ,तांगडे फाकवुन तोंडावर गोधडी पांघरून मंचकराव झोपले होते . एक विचित्र स्वप्न त्यांना पडत होते आणि त्यामुळे त्यांचे  अंग घुसळत होते . काय होते ते स्वप्न ? आपण डुक्कर झालो आहोत आणि कुजकट वासाच्या गटारात लोळत आहोत ! हे ते स्वप्न होते . तो वास इतका असहाय्य होता कि ते जागे झाले . स्वप्न भंगले  ,डोळे उघडले तरी तो वास येतच होता . हे भलतेच ! बारक्या फडतूस कुठलीशी सडकी दारू पिऊन आला होता आणि तो मंचकरावाच्या गोधडीत घुसला होता . बेन झुकांड्या सोबत ढोसून आलं असावं . झुकांड्याचा असाच वास येतो . आता मात्र या बारक्याचा बंदोबस्त करणे गरजेचं आहे . असा काहीसा विचार करत, दुसरे अंथरून पांघरून घेऊन मंचकराव मारुतीच्या गारढोण काळ्या पथरच्या चौथऱ्यावर झोपायला निघून गेले .

                                                                               ००

संध्याकाळी वेताळ टेकडीला डाव्या बाजूने फेरी मारून मंचकराव घरी परतले . आणि अंगणातच थबकले . त्यांच्या पोटात खड्डा पडला ! का काय ? कसला जीवघेणा खमंग मसाल्याच्या फोंणीचा वास घरात न माता अंगणात उतू जात होता . घरात सामिष पदार्थ शिजत होता . आणि हे काय ? कधींनोव्हे तो संध्याकाळी अंगणात सडा . त्यावर ठळक रांगोळी ! (चार ठिपके ,चार ओळीची -काय कि गिरिजाबाईना एव्हडीच एक रांगोळी येते !)आज गिरिजाबाईना काय झालाय ? एकदम 'चिकना 'बेत ! वा !वा !

" काय गिरिजाबाई , आज काय विशेष प्रयॊजन ? कसली तयारी चाल्लीयय ?"घरात येत मंचाकरावनी विचारणा केली .

" बेत तुमच्यासाठीच आहे ! बारक्या तुम्हास 'पार्टी 'करतो म्हणून हटून बसला . त्यानेच सर्व घाट घातलाय . सगळी तयारी त्यानेच केलीय . "

परमेश्वर दयाळू आहे ! जे आपण करणार होतो ते अपसुख होतंय !


साधारण आठच्या सुमारास मंचकराव बैठकीत स्थानापन्न झाले..

"आक्का बाहेर ये ग "बेरक्याने गिरिजाबाईना हाक मारली . त्या माजघरातून बाहेर आल्या .

"हा , आता दाजी शेजारी बस . "

" पण ,का ?"

"आग बस त खरी " त्या मंचकराव शेजारी बसल्या . बारक्याने घरातून पंचपाळे आणले . सोबतच्या पिशवीतून शाल , श्रीफळ ,धोतर जोड ,फेटा ,भारीची साडी बाहेर काढली .नव्या कापडाला थोडे थोडे कुंकू लावून ,दोघांना आहेर केला .

"अहो बारकेराव हे कशाला ?"मंचकरावानी बुचकुळ्यात पडून विचारले

"कशाला काय ? मी आक्कांच्या लग्नात नव्हतो ,माझा आहेर राहिला होता . तो समजा . "

गिरिजाबाईंचे डोळे पाणावले होते . कोण कुठला , समज आल्यापासुन खंबीर भावासारखा पाठीशी उभा आहे !

बारक्याने दोघांना वाकून नमस्कार केला . काय बोलावे ,काय करावे हे मंचकरावांना कळेना . त्यांनी आपल्या तर्जनीतील पाच ग्राम सोन्याचे येडे काढले आणि बारक्याच्या ओंजळीत टाकले ! बारक्या वेड्यासारखा त्यांच्या कडे पहातच राहिला .

"दाजी ,हे आणि कशाला ?मी तुमच्याकडून खुप घेतलय ."

"असुद्या बारकेराव ,हा आमच्याकडून कानपिळणीचा आहेर समजा !"

मग सगळं आवरून बारक्याने दारूचा खंबा काढला . तश्या गिरिजाबाई उठून आत निघून गेल्या . त्याने हे घरात पिणे अजिबात खपत नसे . आज केवळ आणि केवळ बारक्यासाठी त्या कबूल झाल्या होत्या .

मंचकरावानी उठून फडताळातून दोन चांदीचे पेले ,जे केवळ मदिरेसाठीच वापरत , काढले . पहिला पेला रिता केला दुसरा भरला ,काजूचा बकाणा तोंडात भरला .

"हे कशा साठी ,बारकेराव ?" त्यांनी विचारले

"काल मी झुकांड्या सोबत तुम्हाला सोडून दारू पिलो . खूप वाईट वाटलं !"

"म्हणून आज हा अट्टाहास केलात ?"

" नाही ! आज हि माझ्याकडुन शेवटची 'पार्टी ' "

"शेवटची म्हणजे ?"

"म्हणजे आता उद्या सकाळी मी येथून जाणार !"

इतक्यात चढली कि काय ? का खरच हा 'जातो 'म्हणतोय ?

"काय ? जाणार ?"

"होय ! असे किती दिस आश्रितासारखे तुकड मोडायचे ?"

त्याचा वाक्यातला 'आश्रितासारखे ' शब्द त्यांना खटकला !

" अहो रहा कि ! आमचे बोलणे नका इतके मनाला लावून घेऊ !"

"नको !लोक नवे ठेवतात . काल झुकांड्या पण ' किती दिस रहाता , आता जवा कि' म्हणत होता . "

म्हणजे झुकांड्या नशेत बरळला कि काय ? त्याचा नेम नाही .

"तुम्ही रहाता , आम्ही ठेऊन घेतो . या झुकांड्याचा कोठे सम्बन्ध येतो . "

"जाऊ द्या दाजी . आता मन उठल . नका अडवू आता . पण एक मागणं हाय !"

"बोला "

"आमच्या गिरिजाआक्काला सांभाळून घ्या ! कधीच अंतर देऊ नका ! लहानपणापासून लई सोसलाय तीन ! तवा माझा काळ चलता होता . गिरीजा सारख्या चार सहा पोरी होत्या . आमचा तमाशाचा फड पंचक्रोशीत प्रसिद्ध होता . पोरींवर वाईट नजर ठिवणारी गिधाड कमी नव्हती . पण मी मध्ये पहाडासारखा उभा असायचो . तमाशाची मूळ उपसली . सगळी वाताहत झाली . गिरीजा भाग्याची . तिला चांगल घर मिळाल ! बाकी आता नको ते करत्यात अन पोटाची खळगी भारत्यात ! अन माझ काय ? ढोलकी शिवाय काय येत नाही ! ढोलकी गेली खंद्या पासून हात गेल्यात आस वाटतय ! पार मोकळा -रिकामा झालोय ! 'आत्महत्या पाप ' हि शिकवण नसती तर बर झाल असत ! सुटका करून घेतली असती ---मागच "

बारक्या बोलत होता . मंचकराव ऐकत होते . त्यांच्या झुपकेदार मिश्या त्यांच्याच डोळ्यातल्या पाण्याने भिजून चिंब झाल्या होत्या .

किती वेळ कोणास ठावूक बारक्या आपली कर्म कहाणी सांगत होता . मंचकराव बसल्या जागीच झोपले होते .

                                                                           ०००

सूर्यनारायण हातभार वर आला होता . मंचकरावनी तोंड खंगाळले . अजून चुचुरत होते . धोतराच्या सोग्याने तोंड पुसत गिरिजाबाईनी आणलेला चहाचा कप घेतला .

"बारकेराव ,गेले का ?" त्यांनी गिरिजाबाईना विचाले .

" सकाळीच गेला . " मंचाकरावनी चहा घेतला . रिकामा कप घेऊन गिरिजाबाई घरात गेल्या . सुपारीचा कातरा तोंडात टाकावा म्हणून ते पानाचा डब्बा पाहूलागले तो मिळेना .

"गिरिजाबाई ,आमचे पानदान पाहिलेत का ? "

"नाही . काल तर तुमच्या जवळच होता ! पहा तुम्ही चुकून फडताळात ठेवला असेल . "

त्यांनी फडताळात धुंडाळा घेतला ,तेथे पानदान तर नव्हतेच पण ते दोन चांदीचे पेले आणि इतर वस्तू पण नव्हत्या ! म्हणजे बेरक्याने ---

बरोबर झुकांड्या सोबत दारू पिताना आता बस्तान हलवण्याची वेळ अली आहे याची जाणीव बारक्याला झाली असणार . ती 'पार्टी ' आपल्या झोपे साठीच असणार !

तेव्हड्यात गिरिजाबाई घाबऱ्या होऊन आल्या .

"माझ्या पाटल्या ,बोरमाळ अन बांगड्या ----"

"नाहीत ! असेच ना ?"

"हो --"

"जाऊ द्या गिरिजाबाई !"

"मेल्या बारक्याने तर हे केले नसेल ?"

"जाऊ द्या ,तुम्ही नका त्रास करून घेऊ !या पिकावर तुम्हास नवे दागिने करून देऊ !"

" तळपट येओ या बारक्याला ! मेल्यान घर धून नेल ! अहो असा नव्हता आमचा बारक्या ! चोऱ्या -माऱ्या ची नव्हती हो सवय ! आमची लाज वाचवताना चारदा डोकं फोडून घेतलं होत यान ! मला त्याची हि सवय माहित असती तर नसता हो घेतला घरात ! तुम्ही ताबडतोब पोलिसात जा ! बारक्याची तक्रार करा ! मेल्याला पडूदेत बेड्या !" गिरिजाबाई रडत रडत बोलत होत्या .

"हो हो गिरिजाबाई आधी तुम्ही शांत व्हा . नको . पोलिसात तक्रार नको ! आम्ही ती कदापि करणार नाही ! अहो त्यांनी तुमचे जीवाची पर्वा न करता कितीदा तरी रक्षण केले आहे , तुम्हास त्यांचे कवच लाभले होते . हे तुम्ही विसरत आहेत . त्यांनी जे तुमच्यासाठी आणि म्हणजेच आमच्या गिरिजाबाईंसाठी केले ते पैशात ,सोन्या चांदीत नाही हो तोलता येणार . त्यांनी जे दिले त्यामानाने काहीच नेले नाही ! तुमच्या पाटल्या साडी रूपाने आणि आमचे चांदीचे पान -दान धोतर ,फेट्याच्या रूपाने आपल्यापाशीच आहे ! अभागी जीव ,जे ढोलक त्यांना वाजवता येत त्याच आज मोल नाही . असुरक्षततेची भावना त्यांना चोरी करावयास भाग पडते . उद्याचे म्हातारपण कदाचित त्यांना भीती दाखवत असेल ! जाऊ द्या करा त्यांना क्षमा ! आमच्यासाठी तरी त्यांना माफ करा ! "

विशाल मनाच्या या रांगड्या माणसाला गिरिजाबाई बिलगल्या . मंचकरावच हे रूप त्यांना नवेच होते .


बारक्याने त्यांच्या नावाने गावात किती उधाऱ्या केल्या असतील याचा विचार करत मंचकराव बिलगलेल्या गिरिजाबाईच्या पाठीवरून सांत्वनाचा हात फिरवत राहिले .



इति त्रितिय अध्याय Endam .


सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियानची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच . Bye



Rate this content
Log in