Nagesh S Shewalkar

Tragedy

3  

Nagesh S Shewalkar

Tragedy

बाप : हसू आणि आसू

बाप : हसू आणि आसू

8 mins
176


         मोहन तयार होऊन त्याच्या वडिलांच्या खोलीत शिरला. नेहमी पलंगावर बसून असणारे त्याचे बाबा तिथे नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले, अगदी न्हाणीघरातही डोकावले परंतु बाबा तिथे नव्हते. रात्री भरलेली कपड्यांची बॅग मात्र मोहनने रात्री जिथे ठेवली तिथेच होती. 'बाबा कुठे गेले?' असा प्रश्न स्वतःलाच विचारत तो बाबांच्या पलंगावर टेकला. पलंगावर बसत असताना त्याचा हात उशीवर पडला आणि तो दचकला. त्याने झटकन मान वळवून उशीकडे पाहिले. तो पुन्हा पुन्हा उशीवर हात फिरवत असताना एक आवाज आला,

"काय शोधतोय? का दचकलास?" कुणाचा आवाज आहे ह्याकडे दुर्लक्ष करून तो म्हणाला,

"कुणाला म्हणजे? बाबांना? प.. प.. पण त.. ह.. ह.. हा आवाज कुणाचा आहे?"

"त्याच्याशी तुला काय देणे घेणे आहे?"

"म... म... तू..."

"होय! मी उशी बोलतेय! तुझ्या बाबांच्या मानेला वर्षानुवर्षे आधार देणारी. त्यांच्या सुख- दुःखात त्यांना आधार देणारी मीच ती उशी!"

"प... पण... कसे शक्य आहे?"

"खोटे वाटतेय? माझे शरीर कशामुळे चिंब झाले आहे?"

"क... क... कशामुळे?" गोंधळलेल्या अवस्थेत मोहनने विचारले.

"हे काही पाणी नाही तर तुझ्या बाबांच्या अश्रूंच्या सरी आहेत. रात्रभर त्या सरी मला चिंब भिजवत होत्या..."

"पण का?"

"हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा स्वतःला विचारला असता तर बरे झाले असते..."

"मला खरे वाटत नाही. बाबासारखा सिंहाची छाती असलेला माणूस कधीच रडणार नाही. आणि रडले असते तर माझ्या लक्षात आले असते..."

"कसे लक्षात येणार? ते काही दिवसाढवळ्या, कुणाला सांगून रडत होते का? तुला सांगून आसू गाळणार होते का? अरे, तुझे सोड पण तुझी आई असताना... ती जवळ झोपलेली असतानाही बाबांनी ती झोपल्यावर दाबून ठेवलेले सारे दुःख मला जवळ करुन मोकळे करताना, स्वतःच्या चेहऱ्याने मला गच्च आवळून धरीत अश्रूंचा अभिषेक केला आहे. तुझ्या आईलाही हा प्रकार कधी समजला नाही... कधी कधी तर मला भीती वाटायची की, ते मला एवढे गच्च आवळून धरीत असताना त्यांचा श्वास कोंडला तर..."

"शक्यच नाही..."

"अरे, मग मी काय चालत जाऊन पाणी अंगावर शिंपडून घेतले काय?"

"पण बाबा रडत..."

"अरे, बाबांच्या डोळ्यातून प्रसवलेला एक- एक थेंब माझ्या हृदयात मी जपून ठेवला आहे कारण मोठ्या विश्वासाने तो ठेवा, ती शिदोरी माझ्या साक्षीने गाळून माझ्या हवाली केली आहे. ते हळवे झालेला प्रत्येक क्षण मला जशाच्या तसा आजही आठवतो."

"अच्छा! मग सांग बरे, बाबांनी कधी आसवं गाळली ते."

"अरे, एकदा गाळली असतील तर लक्षात राहिल ना? अरे, कितीतरी प्रसंग आहेत. ते सांगत बसले तर अख्खा दिवस पुरणार नाही. तू चौथ्या वर्गात असतानाच प्रसंग... तू खूप हुशार होतास. चौथी बोर्ड परीक्षेत तू जिल्ह्यात प्रथम येणार हे जवळपास नक्की होते परंतु..."

"मी चक्क नापास झालो. आठवतेय मला... परंतु ती लिपिकाची चूक होती आणि नंतर मी पास झालो असल्याचे पत्र शाळेला मिळाले."

"आणि मला हे आठवतेय की, ते पत्र यायला दोन दिवस लागले कारण निकाल लागला तो दिवस शुक्रवार! शनिवार, रविवार दोन दिवस कार्यालयाला सुट्टी होती. तू नापास होणे शक्य नाही हे माहिती असूनही तुझे बाबा प्रचंड नाराज झाले, त्या रात्री ते जेवलेही नाहीत. तू पास आहेस ही काळ्या दगडावरची रेषा आहे हे सोमवारी स्पष्ट होणार होते पण त्यांना दुसरीच भीती वाटत होती..."

"दुसरी भीती ती कोणती?"

"सोमवारपर्यंत सर्वत्र ही बातमी पसरणार की, तू नापास झाला आहेस आणि नंतर नापासाचे पास होणार याचा अर्थ अनेकांनी वेगळा काढला असता. तुझ्या बाबांनी दबावतंत्र वापरुन, लाच देऊन तुझा निकाल बदलून आणला ही चर्चा होईल या भीतीने त्यांचा त्या रात्री डोळ्याला डोळा तर लागलाच नाही परंतु ते सारखे आसवं पाझरत होते..."

"परंतु बाबा म्हणजे एक कणखर माणूस असे आम्हाला माहिती होते..."

"ते तर होतेच रे... म्हणजे आहेत परंतु शेवटी तेही एक माणूस आहेत. त्यांनाही भावभावना आहेत, सुख-दुःख आहेत. निगरगट्ट म्हणवणारी माणसे रात्रीच्या अंधरात अश्रू गाळतात ह्याची आम्ही साक्ष देतो. दिवसाढवळ्या आसवं गाळली तर सारे कुटुंब दुःखाच्या महासागरात बुडेल, जर आधार देणारा कोलमडताना दिसला तर मग त्या माणसावर अवलंबून असणारी माणसे हातपाय गाळून बसतात. समुद्राच्या मध्यात जर जहाज संकटात सापडले तर जोपर्यंत मुख्य नावाडी जहाजात आहे, तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तोवर इतर प्रवासी निश्चिंत असतात आणि ज्यावेळी तो चालक समुद्रात उडी घेतो किंवा हातपाय ढिले सोडून, सर्व प्रयत्न सोडून बसतो ना तेव्हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो... त्यामुळे कुटुंब प्रमुखांना आपल्या भावनांना आवर घालावा लागतो... किमान रात्रीचा घनघोर अंधार पसरेपर्यंत तरी आसवांना आतच दाबून ठेवण्याची कसरत करावी लागते तेव्हा..."

"मला नाही हे खरे वाटत..."

"बारावी पास झाल्यानंतर तुझी दुरवरच्या कॉलेजमध्ये निवड झाली होती परंतु तिथे पाठवायचा, राहण्याचा खर्च परवडणार नाही म्हणून आणि महत्त्वाचे म्हणजे तुझ्या आईचा तुला तितक्या लहान वयात दूर ठेवायला असलेला विरोध..."

"होय! आईचा खूप विरोध असला तरीही बाबांनी पैशाचे कारण पुढे करुन मला पाठवले नाही..."

"खरे आहे! कारण आईचा हळवा स्वभाव होता. आई नको म्हणतीय म्हणून पाठवत नाही असे तुला सांगितले असते तर तू आईला जन्मभर बोलला नसतास, आईबद्दल तुझी नकारात्मक भूमिका होऊ नये म्हणून त्यांनी पैशाचे कारण पुढे केले. या... या... याच इथे रात्री आई बाबांच्या छातीवर डोके ठेवून तासनतास रडत असे. तू दूर जाणार ही जाणीवच आईला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी अनेकदा बाबांनाही अश्रू आवरणे कठीण जायचे परंतु आईला ते समजायचे नाही. त्याच अवस्थेत आईला झोप लागली की, कैकदा बाबांनी अश्रूंचा अभिषेक मला केला आहे. त्याकाळात एक-दोन वेळा त्यांनी मनातल्या मनात स्वतःशीच संवाद साधला. तुझी संधी जातेय हे दुःख तर होतेच होते परंतु ते स्वतःच स्वतःला आईची बाजू समजावून सांगायचे. तिची चूक नाही, ते मातृहृदय आहे, तिला मुलाविषयी वाटणारी काळजी योग्य आहे हे ते अनेकदा बडबडत असत, सोबत आसवंही असत..."

"म्हणजे बाबा वाटतात तितके कठोर, पाषाण हृदयी नाहीत तर..."

"अरे, बहुतांश बाप हे दिसतात तसे नसतात. कोणत्याही पित्याला आपला मुलगा चांगला शिकावा, मोठ्या लठ्ठ पगाराच्या नोकरीला असावा असेच वाटते. तो सुसंस्कृत व्हावा म्हणून बाप तू म्हणतोस तसा कठोर असतो. तो मुलाला शिव्या देतो, प्रसंगी मारहाणही करतो परंतु त्याचा हेतू शुद्ध असतो. दुसरी गोष्ट... तुझे बाबा आनंदाच्या भरातही अश्रूंची टीपं गाळत असत. तू दहाव्या वर्गात काय म्हणतात ते बोर्डात दहाव्या क्रमांकावर आला होतास तेव्हा रात्री कितीतरी वेळ बाबा आनंदाश्रू गाळत होते..."

"होय. तेव्हा मला थोडे जाणवले ते..."

"तुला आठवते त्यानंतर तुझे शिक्षणावरील लक्ष..."

"होय! एक मोठी संधी मिळाली नाही म्हणून मी प्रचंड निराश झालो होतो. अकरावीला जेमतेम पास झालो परंतु त्याचवेळी बाबांनी मला खूप समजावले होते. आईची बाजू कशी योग्य होती हेही मलाच बाबांनी पटवून दिले. त्यातून मला एक नवा हुरुप आला होता, एक नवी प्रेरणा, स्फूर्ती मिळाली होती. हां...हां... एक गोष्ट मला त्यावेळी जाणवली होती पण मी तिकडे दुर्लक्ष केले होते. मला समजावून सांगताना एक- दोन वेळा बाबांचे डोळे भरुन आले होते परंतु महत्प्रयासाने त्यांनी..."

"त्यावेळी बाहेर न येऊ दिलेल्या आसवांना त्यांनी त्या रात्री वाट मोकळी करुन दिली होती... माझ्या कुशीत..."

"कदाचित मी माझ्या विवंचनेत असल्यामुळे मला बाबांचे अश्रू तेव्हा दिसले नसतील परंतु बाबांच्या समजावून सांगण्यामुळे मी मनावर घेतले, बारावीला खूप अभ्यास केला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो.नंतर मागे वळून पाहिले नाही..."

"अजून एक प्रसंग सांगते, तुझ्या बाबा रडवेले झालेला... तुला चांगली नोकरी मिळाली. पगारही भरभक्कम होता तरीही तुला मुली सांगून येत नव्हत्या. आलेल्या..."

"अनेक मुलींनी मला नकार दिला होता..."

"त्यावेळी अनेक रात्री बाबांचे डोळे अश्रू पाझरत होते..."

"माय गॉड! आता मला बरेच काही आठवत आहे. तू म्हणतेस तसे मला मुली नकार देत असताना सकाळी सकाळी बाबा उठल्यावर त्यांचे डोळे लालेलाल झालेले दिसत असत. अनेकदा मी कारण विचारताच ते हसण्यावारी नेत आणि झोप लागली नाही असे सांगत..."

"पण तू कधी झोप न येण्याची चौकशी खोलात जाऊन केलीस का?"

"नाही. कारण बाबांच्या स्वभावाचा हळवेपणा कधी आम्हाला समजलाच नाही..."

"कसा समजणार? ते कधीच कुणासमोर तसे व्यक्त झाले नाहीत, रडले नाहीत. अरे, इतरांचे सोड, तुझी जन्मदात्रीला, त्यांच्या साता जन्माच्या सहचारिणीला त्यांच्या स्वभावातील या हळवेपणाचा कणही समजला नाही आणि तू आज त्यांना..."

"म्हणजे हे त्यांना समजले होते.."

"तर मग... तुमचा एक डायलॉग आहे... 'बाप आखीर बाप होता है।' याप्रमाणे त्यांना सारे समजले होते. तुझी आई गेल्यापासून ते आत्यंतिक हळवे झाले होते. अनेकदा भर दिवसाही या खोलीचे दार लावून अनावर झालेल्या, तुमच्यासमोर दाबून ठेवलेल्या भावनांना ते माझ्यासमक्ष वाट मोकळी करुन देत. काल तू त्यांना..."

"पण मी स्पष्टपणे काही सांगितले नव्हते, आपण दोघे दोन- तीन दिवस देवदर्शन करून येऊ..."

"बाळा, तू अजूनही तुझ्या बाबांना ओळखले नाही. ते तुम्हीच म्हणतात ना, 'हम उडती चिडिया के पर गिनते है।' यापलीकडे तुझे बाबा आहेत. 'ताकास तूर न लागू देणे' या बाबतीत तुझे बाबा तुझ्या पेक्षा हजारपटीने पुढे आहेत. काल रात्री भावनाविवश झाल्यावर ते एकच गोष्ट राहून राहून म्हणत होते, देवदर्शनाला न्यायचं म्हणतोय आणि नेणार आहे... वृद्धाश्रमात! त्याच्या नजरेत, त्याच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास नव्हता, तो ठामपणा नव्हता उलट एक अपराधीपणाची भावना दिसत होती. नजर वळवून, चेहरा खाली घालून बोलणारा देवदर्शनाला नेत नाही तर..."

"अरे, बाप रे! ओळखलेच नाही की बाबांना..."

"आता खरे बोललास. पण आता वेळ निघून गेली आहे..."

"म..म.. म्हणजे? बाबा कुठे गेले की काय?"

"हे मला का विचारतोस? तू म्हणालास म्हणून तुझ्या समक्ष ही बॅग भरुन ठेवलीय. त्यावेळी त्यांना तुझ्या आईची खूप आठवण येत होती. रात्री रडताना ते जणू पत्नीशी संवाद साधताना म्हणत होते, 'बघा. आपला मुलगा. त्याची इच्छा मी या घरात राहू नये अशीच आहे तर मग कशाला राहू? वृद्धाश्रमात त्याने नेऊन सोडावे इतका मी अशक्त, परावलंबी नाही. तिथपर्यंत येण्याचा त्रास तरी त्याला कशाला देऊ? शिवाय तिथे जी रक्कम भरावी लागणार आहे, तो भूरदंड तरी त्याला होऊ द्यायचा? आहे तेवढी रक्कम आहे... माझ्यापाशी'..."

"म... म... म्हणजे?..."

"पुढे असेही पुटपुटत होते की, जी काही शिल्लक मजजवळ आहे ती तरी कुठे मी माझ्यासाठी वापरणार होतो? तो फ्लॅट घेताना त्यालाच देणार होतो. माझ्या पैशाने त्याची वास्तू व्हावी हे त्या विधात्याला मान्य नसेल तर..."

"माय गॉड! केवढी मोठी चूक..." असे बडबडत मोहन खोलीच्या बाहेर आला. त्याला तत्काळ पत्नीची मोहिनीची आठवण झाली.

"अग... अग... मोहिनी... कुठे आहेस..." तो असे ओरडत असताना नेहमीप्रमाणे फिरायला गेलेली मोहिनी आत येत म्हणाली,

"काय झाले? काय ओरडत आहात..."

"अग, आपण बाबांना वृद्धाश्रमात सोडणार होतो परंतु बाबा बहुतेक..."

"वृद्धाश्रमात जात होते..."

"म्हणजे?"

"माझा बाबांना कालही वृद्धाश्रमात पाठविण्यासाठी विरोध होता, आजही आहे, उद्याही असणार आहे..."

"तुझा विरोध असतानाही मी बाबांना... ते जाऊ देत पण बाबा खरेच घर सोडून..."

"जाऊ द्यात ना मग. तुमच्यासाठी 'बिना औषधांचे खांडूक फुटले' असेच झाले ना."

"अग पण... याचा अर्थ तूही..."

"ते अर्थ बिर्थ तुम्ही लावत बसा. बाबा आत्ता वृद्धाश्रमात जात होते. मी फिरुन येत असताना ते मला दिसले... आणि.. मी..मी... बाबा... बाबा... या आत या... मोहन, एक सांगते, यानंतर तू बाबांना घराबाहेर काढले तर माझा या घरातील तो शेवटचा क्षण असेल..." असे म्हणत मोहिनी दारापर्यंत गेली. दाराच्या आड उभे असलेल्या बाबांना... तिच्या सासऱ्याच्या हाताला धरून ती आत त्यांच्या खोलीत निघून गेली. बाबा आत जात असताना मोहनला त्यांचे पाणावलेले डोळे दिसले...

                     ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy