ब.सा.ठोकळ (गुरुजी)
ब.सा.ठोकळ (गुरुजी)
बबन सावळेराम तथा ब.सा.ठोकळ हे लोकप्रिय व उत्तुंग असे व्यक्तिमत्व होते. सुशिक्षित लोकांत ते ब.सा.ठोकळ होते. तर सर्व सामान्य लोक त्यांना "बहिणू मास्तर" म्हणत असत.
काळा सावळा वर्ण, उंच व धीप्पाड शरीरयष्टी, हसतमुख असा चेहरा निळ दिलेले परीट घडीचे पांढरे शुभ्र धोतर व पैरण, डोक्यात थोडीशी तिरकी घातलेली गांधी टोपी पायात कोल्हापुरी वाहणा असा त्यांचा भारदस्त वेश होता.ब. सा. हे अतिशय प्रेमळ असे व्यक्तिमत्व होते.
ब. सा. यांचा जन्म साधारणपणे 1936 सालचा चा होता. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात नायफड सरेवाडी या आदिवासी दुर्गम गावात त्यांचा जन्म झाला.अतिशय गरीब व हालाखीची परिस्थिती असूनही त्यावेळी शिक्षणाचा गंध नसतानाही ते सातवी पर्यंत शिकले. या सातवीला (आताची S. S.C.) त्यावेळी व्ह.फा. म्हणत. (Varnaculur final)
व्ह. फा. झाल्यावर पुढे शिक्षक होता येत असे. झालेही तसेच. ब. सा. शिक्षक झाले. खामुंडी ता.जुन्नर येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली.1965 च्या आसपास ते खामुंडी गावी शाळा मास्तर म्हणून रुजू झाले.तेथे ते 13 वर्ष होते. तेथे ते विदयार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य करत असताना ज्युनियर पी. टी.सी. झाले. नंतर पुढे ते सीनियर पी.टी.सी. देखील झाले.(आताचे डी. एड.) त्या काळात अपवादानेच लोक ज्युनियर पिटीसी किंवा सीनियर पिटीसी व्हायचे. त्यामुळे त्यांना मुख्याध्यापक पदाची संधी मिळत नसे. परंतु ब.सा. यांना मात्र मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली. आणि तीही त्यांच्या नायफड या गावात.
त्या काळात नायफड येथे सातवीपर्यंत शाळा होती. शंभर दोनशे मुले. दहा ते अकरा शिक्षकांचा स्टाफ आणि त्यांचे मुख्याध्यापक ब.सा.ठोकळ हे होते.
सडेतोड व परखड बोलणे, गुणग्राहकता, रुबाबदार व्यक्तिमत्व, समोरच्याकडून काम करून घेण्याची हातोटी,आदरयुक्त दरारा, प्रेमळ वाणी, मुद्द्याला धरून बोलणे ही ब.सां.च्या अंगी असलेले उपजत गुण होते.
वाडीत त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्याचप्रमाणे आदरयुक्त दरारा देखील.वाडीत कोणाचेही कोणतेही काम असो.पहिला सल्ला घ्यायला लोक ब.सां.कडे येत असत.
सरेवाडी नायफड हे त्यांचे जन्मगाव. सन 1994 ला ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वस्तीची मिटिंग घेतली. आपल्या वस्तीत मंदिर नाही. रस्ता नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. यासाठी काहीतरी करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना त्यांचे विचार पटले. सरेवाडी हे एका उंच डोंगरावर वसलेली वाडी. कोणत्याही प्रकारचे रस्ते नाहीत.पायवाटेने डोंगर चढून वर जायचे. त्या काळात सरेवाडीला साधी सायकल सुद्धा जात नव्हती. मुख्य रस्त्यापासून सरेवाडी हे साधारण तीन ते चार किलोमीटर आंतर असेल. शिवाय डोंगर वाटेने एखादा किल्ला चढून जावा तसेच जायचे. आणि अशा परिस्थितीत
सरेवाडीच्या ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.आणि तोही ब.सा.यांच्या नेतृत्वाखाली. त्या काळात सरेवाडी ची लोक आठवड्यातून दोन वेळा जंगलात शिकारीला जात असत.नेहमीच त्यांचा मांसाहार ठरलेला.आणि अशातच विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर बांधायचा निर्णय म्हणजे साधीसुधे काम नव्हते.तेथील लोकांच्या मनात परमार्थ बिंबविण्याचे काम खऱ्या अर्थाने ब.सा. यांनी केले.
मंदिरासाठी लोक वर्गणी काढून पैशाची जमवाजमव केली. दगडविटा सिमेंट वाळू लोखंड व पत्रा इत्यादी साहित्य लोकांनी अक्षरशा डोक्यावर वाहून चार किलोमीटर डोंगरावर असलेल्या सरेवाडी येथे आणले. तन-मन-धन अर्पण लोक काम करीत होते.अल्पावधीतच मंदिराचे काम पूर्ण झाले. विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. होम हवन, जेवणाच्या पंगती,भजन व किर्तन यांनी सरेवाडी दुमदुमून गेली. कधीही सरेवाडीला न फिरकनाऱ्या लोकांचे तसेच परमार्थिक लोकांचे आणि नातेवाईकांचे पाय सरेवाडी ला लागू लागले.याची संपूर्ण श्रेय ब.सा.आणि सरेवाडीच्या ग्रामस्थांना द्यावे लागेल.प्रचंड एकजूट, एक विचार, कामावर असलेली निष्ठा, सरेवाडीच्या ग्रामस्थांनी जगाला दाखवून दिली.
सरेवाडीला महिन्याच्या दोन्ही एकादशींना हरिपाठ, हरी किर्तन,अन्नप्रसाद व हरिजागर होऊ लागला. त्यानिमित्ताने नातेवाईक व परमार्थिक लोकांचे जाणे येणे वाढू लागले. यासाठी त्यांना हरिभक्त परायण कै.श्री.डवणे महाराज यांनी खूप साथ दिली. सरेवाडी चे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात घेतले जाऊ लागले.
ब.सा. हे माझे सख्खे चुलत आजोबा होते.माझ्या बहिणीचे लग्न होते.त्यावेळी गावामध्ये दोन गट होते. एका गटातील लोक बोलायचे दुसऱ्या गटाला लग्नाला बोलावू नका. नाहीतर आम्ही येणार नाही. माझे सर्वांबरोबर संबंध चांगले होते. त्यामुळे सर्वांना लग्नकार्याला बोलवने मला क्रमप्राप्त होते. लग्नाच्या वऱ्हाडाचे संपूर्ण जेवण व आलेल्या पाहुण्यांचे आदर सत्कार मानपान गावातले लोक करत असत.त्या काळात लग्नाचे संपूर्ण नियोजन गाव पातळीवर होत असे. अशातच आमचे घरी पहिलेच लग्नकार्य. त्यातच वडील निर्वातलेले.अशावेळी काय भूमिका घ्यावी.याचे प्रचंड दडपण माझ्या मनावर पडले होते.आणि अशातच मला आठवण झाली माझे आजोबा ब.सा.यांची. मी तात्काळ असा मित्र काशिनाथ जढर यांना घेऊन सरेवाडीला गेलो. ब.सा. आजोबा यांना माझी समस्या सांगितली. त्यांनी अजिबात काळजी करू नको.लग्नाच्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून ते लग्न लागेपर्यंत संपूर्ण सरेवाडी येथील बायका मुलांसह सर्वाना तुमच्या गावी हजर करतो. सर्व लग्नकार्य आम्ही वहिवाटून नेऊ.अजिबात काळजी करू नको.परंतु लग्नकार्याला संपूर्ण गावाला बोलवणे कर. कुणालाही चुकवू नको.लग्नकार्य हे वारंवार होत नसते.मतभेद हे काही दिवसांनी मिटतीलही. परंतु लग्नाला न बोलावल्याची रुख रुख कायम राहील असे मला सांगितले. त्यामुळे माझ्यावर असलेल्या दबाव एका क्षणात निघून गेला.
लग्नाच्या दिवशी खरोखरच सकाळी सरेवाडीतील संपूर्ण ग्रामस्थ हजर होते.जेवण बनवण्यासाठी तांदूळ व इतर साहित्य आम्ही जमा करत असतानाच गावातले दोन्ही गटाचे लोक तेथे दाखल झाले.आणि म्हणू लागले. लग्नाचे सर्व नियोजन आम्ही करू.पाहुण्यांना कशाला सांगता.असे म्हणून गावकऱ्यांनी लग्नाच्या नियोजनाची सर्व संपूर्ण सूत्रे हाती घेतली. त्यानिमित्ताने गावातील दोन्ही गट एकत्र आले ही किमया केवळ ब.सा. ठोकळ यांची होती.
त्यांच्या मुलीचे म्हणजेच माझ्या मावशीचे लग्न ठरले होते.धामणखेल ता.जुन्नर येथील नवरदेव. तेव्हा मला त्यांनी बोलावून घेतले. तुझी मावशी धामणखेल येथे दिली आहे. तेव्हा तेथील त्यांचे घरदार, शेतीवाडी बघून ये. असं मला आदेश दिला. मी बोललो, बाबा हे काम मोठया मोठ्या माणसाचे.तुम्हीच चार दोन मोठी माणसे पाठवा व त्यांना बघून यायला सांगा. यावर ते म्हणाले ते काही नाही! यासाठी तूच जाऊन ये.जोडीला काशिनाथ जडर याला घेऊन जा. यावर मग मी काय बोलणार?
त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी व काशिनाथ धामणखेल येथे जाऊन आलो.तेथील लोकांनी आमचे चांगले स्वागत केले. ठरल्याप्रमाणे सर्व घरदार, शेतजमीन इत्यादींची इंत्यभूत माहिती काढून आलो.मावशीच्या लग्नाच्या वेळी लग्नाच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवलेली होती.
ते आजारी असताना दर पंधरा दिवसांनी ते मला भेटायला बोलवत. मी ही शक्य तेव्हा त्यांना भेटायला जात असे. अनेक गप्पागोष्टी होत. मी गेल्यावर त्यांना बरे वाटे. परंतु पुढे त्यांचा आजार बळावला. आणि एके दिवशी ब.सा. आजोबा गेल्याची बातमी येऊन थडकली. ते ऐकून मी सुन्न झालो. मी ऐकतो आहे हे स्वप्न तर नाही ना. असे विचार मनात येऊन गेले. क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे वाटले.
त्यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांची परमार्थिक सेवा, समाजाच्या कामासाठी कायम धावून जाणे,सतत हसतमुख चेहरा, अडचणीत असलेल्या माणसाला कायम धीर देण्याची क्षमता, काम करून घेण्याची पद्धत हे सर्व आठवणीने मन उचंबळून आले. अशी माणसे पुन्हा होणे नाही. हे ही तितकेच खरे.