Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Crime Inspirational

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Crime Inspirational

अवंती

अवंती

9 mins
202


अवंती

ती बोलत होती मंत्रमुग्ध होऊन. तिच्या चेहऱ्यावरचं तेज ओसांडून वाहत होतं. मंचावर बसलेले मान्यवर आणि इतर भान हरपून तिचं बोलणं ऐकत होते.


आसूड दैव ओढे, वर्मीच वार सारे

जाणीव त्या व्यथांची, खपली धरेल का रे?


घेवू नको कसोटी, बाजूत जोम बाकी 

शंकाच शेष नाही, होईन पास का रे?


या ओळींवर तिने आपलं भाषण संपवलं. भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. शाल, नारळ आणि स्मृतिचिन्ह हातात पकडून स्टेजवरून खाली उतरत असताना प्रत्येक पावलागणिज तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.


आज तिला सन्मानित करण्यात आलं होतं. तिने केलेल्या अद्वितीय कार्याची सरकारने दखल घेतली होती. ही तिने केलेल्या कार्याची पोचपावतीच होती. समाजातील प्रत्येक स्तरातून तिचं कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत होता.


कार्यक्रम संपल्यानंतर ती घरी जायला निघाली. इतक्यात पाठीमागून आवाज आला 


"अवंती...!". 


आवाज ऐकताच तिची पावले जागीच थबकली. आवाज ओळखीचा होता. तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. कितीतरी वर्षांनी ती हा आवाज ऐकत होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने मागे वळून पाहिलं. 


"वेद", हो तो वेदच होता. जवळजवळ बारा वर्षांनंतर ती त्याला पाहत होती. एकदम कृश, काळवंडलेला चेहरा,

डोळे बोट बोट खोल गेलेले, चेहऱ्यावरचं तेज नाहीस झालेलं पण आवाजात खणक मात्र आजही तीच होती. त्याला पाहताच तिच्या मनात जुन्या आठवणींचे उमाळे दाटून आले आणि भुतकाळाचा एक एक पदर उलगडत गेला.


"अवंती मला नाही आवडत हं, तू असं लोकांच्या घरी काम केलेलं. एकदा आपलं लग्न होऊ दे, मग बघ तुला मी कसं राजाच्या राणीसारखं ठेवतो की नाही,"


वेद तिचा हात हातात घेऊन प्रेमाने कुरवाळत बोलत होता आणि ती कौतुकाने त्याच्याकडे एकटक पाहत होती. इतक्यात...


"अवंती, अगं कुठं आहेस तू. भाजी करपली वाटतं. कधीची त्या वेदला चहा द्यायला गेली आहे ही पोरगी."


साठे आजींचा आवाज ऐकताच अवंती लगबगीने बाहेर आली आणि किचनकडे वळाली.


अवंती साठे आजींकडे घरकाम करायची. त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीनिमित्ताने परदेशी होता. त्या इथे एकट्याच रहायच्या. कोणीतरी सोबत असावं म्हणून त्यांनी पेइंग गेस्ट ठेवण्याचा निर्णय घेतला होता. वेद मागील सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. 


दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षाच्या अवंतीने नुकताच तारुण्याचा अल्लड उंबरठा ओलांडला होता. आतापर्यंत उनाडपणे पडणारी तिची पावले हल्लीे जरा सावकाश पडत होती. 


घरी अठराविश्व दारिद्र्य होतं. आई लोकांची धुणीभांडी आणि वडील बांधकामावर गवंडयाच काम करायचे.

अवंतीसुद्धा कधी कधी आईला मदत करण्यासाठी तिच्यासोबत जायची. साठे आजींच्या घरी दिवसभराचं काम असल्यामुळे अवंतीच त्यांच्या घरी थांबायची तोवर तिची आई इतर घरची कामं आटोपायची.


इथेच अवंती आणि वेद सहा महिन्यांपूर्वी एकमेकांना पहील्यांदा भेटले होते. हळूहळू भेटी वाढत गेल्या. अवंतीच्या कोमल मनाच्या गाभाऱ्यात वेदसाठी प्रेमाकुंर फुटू लागले. वेदही तिच्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करत होता.


दिवस सरत होते. दोघांच्या प्रेमाला जवळपास दोन वर्षे उलटत आली होती. प्रेमाच्या आणाभाका घेत, सोनेरी भविष्याची स्वप्ने रंगवत दोघांचं प्रेम दिवसेंदिवस अधिकच बहरत गेलं होतं, गहिरं होत गेलं होतं. 


एक दिवस...


"ऐक ना अवंती, अगं मला मुंबईला चांगल्या नोकरीची ऑफर आली आहे." वेद खूप खुशीत दिसत होता.


"मुंबईला... तू मुंबईला जाणार मला सोडून. मी तुझ्याशिवाय कशी राहणार वेद. एक क्षण देखील तुला सोडून राहणं शक्य नाही मला. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय." अवंती काकुळतीला येऊन बोलत होती.


"अगं, तुला एकटीला रहायलाच कोण सांगतंय. तू ही माझ्यासोबत मुंबईला येणार. मी थोड्या वेळात आईशी बोलून घेतो आणि आज संध्याकाळीच तुझ्या घरी येतो तुझ्या आई बाबांना भेटायला. तुझा हात मागायला." 


वेदच्या तोंडून हे ऐकल्यानंतर अवंती गोड लाजली. संध्याकाळी वेद अवंतीच्या घरी गेला आणि तिच्या आईबाबांकडे अवंतीचा हात मागितला. बाबा लहानपणीच देवाघरी गेले. आई वयस्कर आहे, तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती काही इकडे येऊ शकणार नाही त्यामुळे सगळी जवाबदारी माझ्यावरच आहे. असं बोलून त्याने अवंतीच्या आई बाबांचं आपल्या आईशी फोनवर बोलणं करवलं. 


आधीच फटका संसार, त्यात घरबसल्या आपल्या लेकीला इतकं चांगलं स्थळ आल्यामुळे त्यांनी डोळे झाकून या स्थळाला होकार दिला. मागील दोन वर्षांपासून वेदला सगळे ओळखत होते. सगळे त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. त्याने आपल्या वागण्या,बोलण्याने सगळ्यांच्या मनात एक जागा निर्माण केली होती. त्यामुळे नकाराचा प्रश्नच नव्हता.


आठवड्यानंतरच मुंबईला नवीन नोकरीच्या ठिकाणी जॉइनिंग असल्यामुळे चार पाच दिवसातच गावातील देवळात दोघांनी लग्न उरकून टाकलं आणि दुसऱ्याच दिवशी वेद आणि अवंती मुंबईला रवाना झाले. मुंबईमध्ये वेदच्या मित्राने त्यांच्या राहण्याची सोय केली होती.


"अगं थांब अवंती, अशीच कशी आत येतेस. व्यवस्थित गृहप्रवेश व्हायला हवा नं. तू इथेच थांब, मी आलोच."


वेदने उंबऱ्यावर माप भरून ठेवलं. आरतीचं ताट सजवलं. तिचं औक्षण करत तिला उंबऱ्यावरच माप ओलांडायला लावलं आणि तिचा हात पकडून तिला घरात घेऊन आला. अवंतीला भारी कौतुक वाटत होतं. इतका चांगला जीवनसाथी लाभला म्हणुन ती मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती.


रात्री त्याने स्वतःच्या हाताने जेवण बनवून तिला भरवलं होतं.


सकाळी जाग आली तेंव्हा अवंती वेगळ्याच कोणत्यातरी ठिकाणी होती. एका वेगळ्याच बंद खोलीत. तिने बाजूला पाहिलं, वेद तिथे नव्हता. 


"वेद...वेद...!" 


ती हाका मारत होती. तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. एक भयानक, गजबजलेली वस्ती. तिथं काही मुली तोंडावर भडक मेकअप करून रस्त्यावरून फिरत होत्या. आपण कुठे आहोत तिला काहीच कळत नव्हतं. तिने उठून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा बाहेरून बंद होता. तिने जोरजोरात दरवाजा ठोठावायला सुरवात केली. थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला. एक पन्नाशीच्या आसपासची बाई आत आली सोबत एक गुंडासारखा दिसणारा माणूस होता.


"वेद कुठं आहे आणि तुम्ही कोण आहात, मी इथे कशी आले? वेदला बोलवा ना. मला वेदकडे जायचं आहे." अवंतीने एका दमात प्रश्नांचा भडिमार केला.


"भीमा हे बघ, हे नवीन पाखरू. हिच्यावर लक्ष ठेवायचं." ती बाई तिच्याकडे दुर्लक्ष करत सोबत आलेल्या माणसाला बोलत होती.


"अहो, वेद कुठं आहे? मी काहीतरी विचायतेय." अवंतीने चिडून तिला विचारलं.


"आता वेदला विसरायचं, हेच तुझं घर. तू इथून कुठेही जाऊ शकत नाहीस आणि ज्या वेदच्या नावाने तू बोंबा मारतेयस ना, तो गेला. तो आता परत नाही येणार. त्याचं कामचं आहे नवीन पाखरं जाळ्यात ओढायची आणि इथं आणून विकायची. गेला असलं दुसरं एखाद सावज हेरायला आणि हो! तू आता कुंठणखाण्यात आहेस म्हणजेच वेश्यावस्तीत... इथं सगळे मला मावशी म्हणतात. इथून पळून जायचा विचार देखील करू नकोस. इथे आमच्या परवानगी शिवाय कोणी श्वास देखील घेऊ शकत नाही,समजलं." 


इतकं बोलून ती बाई दार जोरात ओढून निघून गेली. हे सगळं ऐकून अवंतीच्या पायाखालची जमीन सरकली, डोकं गरगरायला लागलं. कानात लाव्हा उसळतोय असं तिला वाटू लागलं. रागानं तिचं अंग थरथर कापू लागलं होतं. ज्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला होता. काय करावं तिला काही कळत नव्हतं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. 


ज्या वयात तिला वेश्या या शब्दाचा अर्थही कळत नव्हता, त्या वयात तिला वेश्या बनवलं गेलं होतं. तिने बऱ्याचदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत होता. तिने कित्येकदा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला पण आत्महत्येसाठी लागणारं बळ ती एकवटू शकली नव्हती. लोकांचे रोज गलिच्छ स्पर्श अनुभवत बलात्कार सोसत होती. तिला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. 


रात्रीचा भयाण एकटेपणा तिला आतून पोखरत होता. अश्रूंचा बांध फुटायचा आणि मग डोळ्यातून वेदना ओसंडून वाहू लागायच्या.


शरीरासोबत मनाच्याही रोज चिंधड्या होत होत्या. मनाच्या साऱ्या संवेदनाच भान हरपत चालल्या होत्या तिथे शरीरावर होणाऱ्या अत्याचाराच्या जाणिवांची काय गत...! मनाने तिचा मृत्यू कधीच झाला होता. होता तो फक्त भावनाशून्य हाडामांसाचा सांगाडा. 


तिला तिथे येऊन जवळपास वर्ष उलटलं होतं. एक दिवस अचानक सगळीकडे गोंधळ सुरू झाला. तिथे असणाऱ्या बायका पोरी पळत होत्या, सैरावैरा धावत होत्या. लपण्याचा प्रयत्न करत होत्या. 


"काय झालं, सगळे असे धावत का आहेत." अवंतीने एकीला विचारलं.


"अगं, पोलिसांची धाड पडली आहे. तू पण लपून बसं कुठेतरी नाहीतर पोलीस पकडून नेतील." तिने सांगितलं.


हे ऐकल्यानंतर ती तिथेच बसून राहिली. ती ना जागची हलली, ना तिने कुठे पळून जाण्याचा प्रयत्न केला, ना लपण्याचा प्रयत्न केला.


पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्याने कुंठणखण्यातुन सोडवून आणलेल्या बायकांना कोणाला आपल्या घरी जायची इच्छा आहे का? विचारलं असता एक क्षण तिचे डोळे चमकले पण दुसऱ्याच क्षणी तिने नकारार्थी मान हलवली.


पोलिसांनी ज्यांना घरी जायची इच्छा आहे त्यांना त्यांच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला तर बाकीच्यांना 'आशा' मध्ये नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला.


'आशा' एक सामाजिक संस्था होती. जी समाजाने ठोकरलेल्या, नवऱ्यानीं सोडलेल्या, फसवल्या गेलेल्या स्त्रियांसाठी काम करायची. त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावलं उचलुन रोजगारच्या संधी उपलब्ध करवून देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्यावर जोर द्यायची.


'आशा' मध्ये आठवड्यातून दोन दिवस काऊन्सलिंगचे सेशन असायचे. तिथं त्यांचं योग्य प्रकारे समुपदेशन केलं जायचं.


प्रत्येक दुःखावर काळ हेच औषध असतं. प्रत्येक सरणारा क्षण तिचं दुःख हळूहळू गिळंकृत करत होतं. ती स्वतःला सावरू लागली होती. तिच्या शरीराच्या आणि मनाच्या झालेल्या लक्तरांना ती ठिगळ लावू पाहत होती. तिच्या आजूबाजूला असणाऱ्या बायकांची दुःखे आता तीच लक्ष वेधून घेत होती. हळूहळू तिला जाणीव व्हायला लागली होती की तिच्यासारख्याच समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे. 


गुन्हा करणारा गुन्हा करून अलगत निघून जातो आणि त्याची शिक्षा स्त्रियांना जन्मभर भोगावी लागते. का बरं स्त्रियांनी आपलं संपूर्ण आयुष्य रडत, कुढत काढायचं?


एकतर्फी सोयीने बनवलेल्या समाजव्यवस्थेच्या हिंसक बेडीत त्यांनी का अडकून रहायचं? स्त्रियांची ही स्वप्नं असतात, त्यांनाही सन्मानाचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. असे अनेक विचार आता तिच्या मनात थैमान घालू लागले होते.


तिचा अंतरात्मा तिला साद घालत होता. तिच्या मनाने दिलेल्या या हाकेनं तिला एक नवीन ऊर्जा मिळाली होती. याचाच परिणाम म्हणजे तिच्या मनानं आता वेश्यांच्या, समाजाने ठोकरलेल्या स्त्रियांच्या पुनर्वसनाचा ध्यास घेतला.


तिला ठाऊक होतं तिला जे वाटतयं,जे करायचं आहे ते तितकं सोपं नाही. भावनेच्या भरात घेतलेला कुठलाही निर्णय सत्यात उतरवणं तितकं सोपं नाही. त्यासाठी आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर बनणं खूप गरजेचं आहे आणि त्या दिशेने तिने तिची वाटचाल सुरू केली होती. हरण्यासारखं आता तिच्या कडे काहीच शिल्लक नव्हतं.


सोपं नव्हतं तिच्यासाठी हे सगळं. शून्यातून जग निर्माण करणं. तिच्यातली जिद्द, ऊर्जा तिच्यात नव्याने पेटलेली ठिणगी तिला प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ देत होती. प्रबळ इच्छाशक्तीपुढे मार्गही प्रशस्त होऊ लागले होते.


ती तिच्यासारख्याच अनेक आभाळ हरवलेल्या, बेवारस, समाजाने टाकलेल्या स्त्रियांना भेटू लागली. त्यांच्या असंख्य व्यथानीं, प्रश्नांनी तिचे काळीज पिळवटून निघायचे. ती त्यांच्या व्यथा, वेदना समजू शकत होती. 


तिने त्या सगळ्यांना एकत्र गोळा केलं. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी घरगुती डबा सर्व्हिस, लोणची, पापड बनवणे असे लघुउद्योग सुरू केले. त्यांच्या मदतीने व सहकार्याने एक छोटीशी संस्था स्थापन केली. स्वतः निराधार असूनही ती अनेक निराधार जीवांची आधार बनत चालली होती. त्या जशा स्वावलंबी बनू लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या तसा त्यांच्यातला आत्मविश्वास दुणावू लागला. अंधारलेल्या मनाच्या गाभाऱ्यात आशेची प्रकाशबीजं रुजू लागली होती.


हळूहळू तिच्या संस्थेचा पसारा वाढू लागला. तिचं कार्य लोकांच्या नजरेत येऊ लागलं. वेगवेगळी प्रसारमाध्यमं तिच्या या कार्याची दखल घेऊ लागली. सरकारनेही तिच्या या अद्वितीय कार्याची दखल घेतली. 


सामाजिक कार्यात उतुंग भरारी घेणाऱ्या लोकांना प्रदान करण्यात येणारा 'समाजरत्न' पुरस्कार तिला जाहीर झाला होता.


"अगं अवंती! कसला विचार करतेयस, कुठे हरवलीस? मी वेद...तुझा वेद. ओळखलं नाहीस का मला?" वेदच्या आवाजाने भूतकाळाची जळमटे गळून पडली आणि ती भानावर आली.


"वेद! तू का आला आहेस परत?" तिने रागाने विचारले.


"अगं,असं काय म्हणतेस. मी तुझा नवरा आहे. मी तुला परत न्यायला आलोय. मला माहिती आहे तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस...करतेस ना?" वेद तिच्याकडे पाहत तिला विचारत होता.


"कुठून येतो रे हा पोकळ आत्मविश्वास. ज्या वेळी तू मला सोडून गेला होतास, तेंव्हा आपलं नवरा बायकोचं नातं माहीत नव्हतं का तुला. तू जे माझ्या सोबत केलं ते कमी होतं का, अजून काही करणं बाकी आहे का?" तिने द्वेषाने विचारले.


"मला माहिती आहे अवंती, मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो. अगं, पैश्याच्या फसव्या मृगजळामागे मागे धावत होतो मी. माझ्या कर्माची फळं मी भोगतोय. अगं, तुला सोडून गेल्यानंतर मी दुसऱ्या एका मुलीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. पण ती खूप हुशार निघाली. तुझ्यासारखी निरागस नव्हती. तिच्या कुशाग्र बुद्धिपुढे माझं काहीच चाललं नाही. तिला माझी शंका आली आणि तिने माझ्याविरोधात पोलिसात तक्रार केली. मला अटक झाली. आमच्या सगळ्या अड्डयांवर छापेमारी झाली. सगळे पुरावे आमच्या विरोधात होते. मला दहा वर्षांची शिक्षा झाली. मागील सहा महिन्यांपूर्वीच मी जेल मधून सुटलो आहे. तेंव्हा पासून मी तुला वेड्यासारखा शोधतोय गं." वेदच्या डोळयात पाणी होतं. तो हात जोडून तिच्या समोर उभा होता.


"अगं, जेलमध्ये असताना मला पदोपदी जाणीव होत होती की मी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करता करता खरोखरचं तुझ्या प्रेमात पडलो होतो. सारखे तुझेच विचार माझ्या मनात घोळायचे. ह्या भावना आजवर कधीच कोणाबद्दल माझ्या मनात आल्या नव्हत्या. प्लिज..ssss माझ्यासोबत चल अवंती. मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत गं. मला माफ कर." तो काकुळतीला येऊन बोलत होता.


"नाही वेद, आता माफी मागून काही उपयोग नाही. मी माझा भूतकाळ खूप मागे सोडून आले आहे. जुनी अवंती केंव्हाच मेली. आता तुझ्यासमोर उभी आहे ती फक्त या माझ्या मैत्रिणींची ताई आहे." 

           

"अरे, ह्या बायका पाहतोयस यांच्या अंधारलेल्या आयुष्यात नवीन आशेची प्रकाशबीजं रुजल्यामुळे यांची आयुष्य कशी लख्ख उजळून निघाली आहेत. त्यांना आभाळ गवसलंय, त्यांच्या हक्काचं. या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना माझी गरज आहे." 


"आणि हो! एक गोष्ट तुला सांगायची राहूनच गेली. अरे, मलाच तुझे आभार मानायचे होते." 


अवंती बोलत होती आणि तो फक्त ऐकत होता.


"माझे आभार!" त्याने खाली मान घालत विचारलं.


"हो तुझे आभार, तू जे माझ्यासोबत वागलास ते एका अर्थी बरचं झालं वेद. मला त्रास सहन करावा लागला, मी उध्वस्त झाले, पूर्ण बरबाद झाले. पण शेवटी तुझ्या अशा वागण्यामुळेच तर मला माझ्यातल्या क्षमता समजल्या. मी खंबीर बनले. नाहीतरी मी अजूनही कोणाच्यातरी घरी धुणीभांडीच करत राहिले असते. तुझ्यामुळेच माझ्या हातून हे महान कार्य घडू शकले. मला जगण्याची एक नवीन दिशा मिळाली. कित्येक स्त्रियांच्या दुःखांवर फुंकर घालता आली. तुझे खूप खूप आभार." इतकं बोलून अवंती चालू लागली.


वेद अश्रूभरल्या नयनांनी फक्त तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत उभा होता.     



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy