Pratibha Tarabadkar

Horror

4.0  

Pratibha Tarabadkar

Horror

अष्टपाद -भाग २

अष्टपाद -भाग २

7 mins
245


 अजिंक्य जागा झाला तो घामाने निथळतच! आज पुन्हा साधूमहाराजांनी त्याला दर्शन दिले होते.पण यावेळी अष्टपाद या शब्दाबरोबर त्यांनी यश ही उच्चारले होते.अजिंक्यने आपल्या स्मृतीला ताण दिला.हो, साधू महाराजांनी नक्कीच यशचा सुद्धा उल्लेख केला होता.पण त्यांना कसं माहित मी यशच्या शोधात आहे म्हणून? ते गढी कडे बोट दाखवून अष्टपाद का म्हणत होते? त्या गढीचं नाव अष्टपाद आहे का?आपण पाहिले ते सत्य होते की स्वप्न? अजिंक्य प्रश्नांच्या आवर्तात गुंतला होता.त्याला अज्ञाताचे भय वाटू लागले.कितीतरी वेळ तो बसून राहिला.

    'अजिंक्य भाऊ,उठताय ना?'बारकूने चोरट्या आवाजात हाक मारली तशी अजिंक्य ताड्कन उठून बसला.आवाज न करता दोघे फ्रेश होऊन पटकन् निघाले.बारकूचे माय आणि बापूस उठायच्या आत बारकूला परत यायचे होते ना!बारकूच्या चालण्याचा वेग पाहून अजिंक्य विस्मित झाला.पहाटेच्या अंधारात बारकूला जंगलातील वाट कशी काय सापडते यांचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते.बारकूच्या बरोबर चालण्यासाठी अजिंक्य ला जवळ जवळ धावावे लागत होते.पानांची होणारी सळसळ आणि दोघांचे पाय पडून होणाऱ्या वाळलेल्या पाचोळ्याचा आवाज याखेरीज जंगलात पूर्ण शांतता होती.त्या घनदाट जंगलात हळूहळू उजाडायला लागले होते.पक्ष्यांची किलबिल चालू झाली होती.वाटेत एक ओबडधोबड लाकडी मूर्ती एका मातीच्या चौथऱ्यावर उभी होती.बारकूने झाडाची पाने तोडून आणली.अजिंक्यच्या हातात थोडी पाने देऊन तो म्हणाला,'ही राखणी देवी.जंगलाची राखण करते.'बारकूने मनोभावे देवीला नमस्कार केला.'बाय, अजिंक्य भाऊला सुरक्षित ठेव.यशभैय्या मिळू दे.'अजिंक्यने त्या मूर्तीला पाने वाहिली आणि दोघं पुढे निघाले.

     थोडे अंतर चालून गेल्यावर जंगलातील हिरवाई जाऊन अचानक भगभगीत प्रकाश दिसू लागला.अजिंक्यच्या डोळ्यावर विश्वास बसेना.इतक्या घनदाट जंगलात एव्हढी वैराण जागा? आणि त्या ओसाड जागेच्या बरोबर मध्यभागी ती गढी!हो हो तीच गढी,जी अजिंक्यच्या स्वप्नात दिसत असे.अजिंक्य भारल्यासारखा त्या गढीकडे ओढला जाऊ लागला.बारकूने केव्हाच मागच्या मागे पोबारा केला होता.

    अजिंक्य त्या गढीकडे एकटक पहात होता.स्वप्नात दिसत होती तशीच होती ती!भक्कम तटबंदी, मोठमोठे बुरुज....पण माणसांचा कुठेही वावर नाही.पूर्णपणे ओसाड आणि निर्मनुष्य! साधू महाराजांनी याच गढी कडे इशारा करून 'यश'असा शब्द उच्चारला होता.म्हणजे याच गढीत यश असणार.कोणी त्याला किडनॅप करुन या गढीत डांबून तर ठेवले नाही ना? आणि ते साधू महाराज कुठे गेले?

    अजिंक्य सावधपणे गढीच्या पायऱ्या चढू लागला.गढी ऐतिहासिक वाटत होती.भक्कम दगडी बांधकाम,मोठमोठी दालने..... अजिंक्य एकामागोमाग एक दालने पार करीत चालला होता.एका दालनात येऊन तो थबकला.या दालनात काही तरी होते खास!

    अजिंक्यच्या मनात अचानक अनामिक भीतीची संवेदना जाणवू लागली.अदृष्याचे भय.... जणूकाही मृत्यू दारात उभा आहे पण दिसत नाही.

    अजिंक्य मनावर ताबा मिळवत थोडा वेळ स्तब्ध उभा राहिला.या दालनातच काही तरी रहस्य होते खास!त्याने आसपास नजर फिरवली.किंचित अंधारे असे ते दालन, कोनाडे असलेल्या भिंती,पण जमिनीवर मधोमध हे झाकण कसलं आहे? त्याच्या वर अनाकलनीय अशी चिन्हे?काय असेल बरं या झाकणाखाली? थोडावेळ अजिंक्य त्या झाकणाकडे बघत राहिला आणि अचानक एका अनामिक ऊर्मीने तो झाकण उघडायला पुढे झाला.

    'ठहरो', एक घनगंभीर आवाज घुमला...अजिंक्यच्या समोर तेच साधूमहाराज उभे होते.स्वप्नात दिसणारे,भेदक डोळ्यांचे साधू महाराज! अजिंक्य पुतळ्यासारखा निश्चल उभा होता.पाय जणू दगडासारखे जड होऊन जमिनीला खिळले होते.त्याची वाचा बसली होती.विस्फारलेल्या नजरेने भान हरपल्यागत तो साधूमहाराजांकडे एकटक बघतच राहिला.

 साधू महाराजांनी अजिंक्यला त्यांच्या मागून येण्याचा इशारा केला.मंत्रमुग्ध झाल्यागत अजिंक्य त्यांच्या मागून चालू लागला.एका मोठ्या गवाक्षापाशी जाऊन बाहेर इशारा करीत साधू महाराज बोलू लागले,'पाचशे वर्षांपूर्वी येथे समशेर सिंह राजा राज्य करीत होता.'

     'बा अदब,बा मुलाहिजा होशियार!महाराज समशेर सिंह पधार रहे हैं......'चोपदाराने खणखणीत आवाजात घोषणा केली.सर्व सेवक लगबगीने एका रांगेत महाराजांचे स्वागत करण्यास अदबीने उभे राहिले.समशेर सिंह आपल्या घोड्यावरून पायउतार झाले आणि सर्वांचे मुजरे स्विकारत, त्यांची विचारपूस करीत एकलिंगजीच्या मंदिराच्या दिशेने चालू लागले.तोपर्यंत महाराणी रुपकुंवरजींची पालखी तेथे पोहोचली.दोघेजण आपले चढाव उतरुन एकलिंगजींच्या मंदिरात प्रवेश करते झाले.

    महाराणी रुपकुंवरजींनी मंदिराबाहेर आल्यावर सभोवताली दृष्टी टाकली आणि त्यांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या.हिरव्यागार वृक्षांनी बहरलेल्या बागा, सुगंधी पुष्पांनी लगडलेले लताकुंज थुईथुई नाचणाऱ्या जलाने भरलेल्या पुष्करणी,तलावात विहार करणारे हंसपक्षी,बगिच्यात बागडणारे ससे.... महाराणी रुपकुंवरजी भान हरपून ते दृष्य डोळ्यात साठवून ठेवत होत्या.'महाराणी, किती वेळ अशाच उभ्या रहाणार आहात? उद्या आम्ही शिकारीला गेलो की तुम्हाला भरपूर समय आहे या पुष्पवाटिकेत विहार करायला,'महाराज समशेर सिंहांच्या हळूवार आवाजाने महाराणी भानावर आल्या आणि स्मित करत गढी कडे वळल्या.

    गढीमध्ये भल्या पहाटेच गडबड सुरु झाली.हाकारे तयार आहेत का?हत्यारे नीट पारखून घेतली आहेत ना? घोड्यांना व्यवस्थित खाणंपिणं दिलं आहे ना,शेरु कुत्रा तयार आहे ना.....महाराजांचे सेवक लगबगीने इकडून तिकडे धावपळ करीत होते.महाराज समशेर सिंह आज खूप दिवसांनी शिकारीसाठी राजधानीहून गढीवर आले होते.साऱ्या लवाजम्यासह महाराज शिकारीला निघाले.

    

    तिन्हीसांजेला महाराज समशेर सिंह शिकार घेऊन परतले.मोहिम फत्ते झाली म्हणून आनंदात होते.महाराज सेवकाच्या मदतीने कपडे बदलत होते.'महाराज,तुमचा अंगरखा असा कुरतडल्यासारखा का दिसतोय?' महाराणी रुपकुंवरजींनी विचारले.

'वनातील काटेरी झुडपांमुळे फाटला असेल',महाराज उत्तरले.

     रात्री शेरु कुत्रा विव्हळल्यासारखा आवाज करीत होता.खूप दमल्यामुळे असेल असा विचार करून त्याची देखभाल करणाऱ्या सेवकाने अंथरुणावर पाठ टेकली.तोसुद्धा शिकारीच्या मोहिमेमुळे दमला होताच! सकाळी उठल्यावर शेरुकडे लक्ष गेले आणि सारे जण हादरुन गेले.शेरुचा फक्त सांगाडा उरला होता.सारे शेरुच्या त्या अस्थिपंजराकडे डोळे विस्फारून पहात होते तेव्हढ्यात घोड्यांच्या तबेल्याचा मोतद्दार धावत आला.'महाराज,'मोतद्दार धापा टाकीत म्हणाला,'महाराज,आपला हीरु अश्व जमिनीवर पडून लाथा झाडतोय.त्याचे पाय कुरतडल्यासारखे दिसताहेत.इतर अश्व ही अस्वस्थ होऊन दोन पायांवर उभे राहून खिंकाळताहेत.

   समशेर सिंह चक्रावलेच.हे काय आक्रित घडलं आहे? पूर्वी तर कधी असं घडलं नव्हतं.समशेर सिंह महाराज अस्वस्थ होऊन महालात फेऱ्या मारू लागले.

   इतक्यात बागेचा माळी घाबऱ्या घुबऱ्या आला.'महाराज, बागेतील चार ससे मेलेत.कोणीतरी त्यांना कुरतडून लचके तोडले आहेत.बागेतील इतर ससे,मोर,हंस अस्वस्थ होऊन सैरावैरा धावताहेत.'

   समशेर सिंह महाराजांनी त्वरित निर्णय घेतला आणि वीरभद्रला बोलावणे पाठवले.'वीरभद्र, ताबडतोब नीघ आणि स्वामी सर्वानंदांच्या आश्रमात जाऊन त्यांना मी लवकरात लवकर बोलावले‌ आहे‌ असा निरोप दे.'

  'जशी आज्ञा सरकार', वीरभद्राने महाराजांना लवून नमस्कार केला आणि तो स्वामी सर्वानंदांच्या आश्रमा कडे त्वरेने निघाला.समशेर सिंह महाराजांच्या राज्यातील सर्वात वेगवान धावणारा वीरभद्र लवकरच आश्रमात पोहोचला.मी त्या वेळी स्वामींच्या ध्यानसमाधीसाठी मृगाजीन अंथरत होतो.स्वामीजी स्नानाहून नुकतेच परतले होते.वीरभद्रने गढी वरील परिस्थिती बद्दल स्वामींना निवेदन केले तशी त्वरित स्वामींनी मला आज्ञा केली,' शिष्य पूर्णानंद,आपण ताबडतोब समशेर सिंह महाराजांकडे निघायला हवे.'आज्ञा गुरुजी'म्हणून मी स्वामींबरोबर निघालो.

गढीत येता येताच सर्वत्र हाहाकार उडालेला दिसत होता व परिस्थिती फारच गंभीर आहे याची जाणीव झाली .


आपल्या प्रजाहितदक्ष शिष्य समशेर सिंह याच्या राज्यात असं काय बरं घडलं असावं ?

  'स्वामी, आम्ही फार मोठ्या संकटात सापडलोय हो! महाराज समशेर सिंह आणि महाराणी रुपकुंवरजींनी स्वामी सर्वानंदांच्या पायांवर लोळण घेतली.घोड्यांचे अस्वस्थ खिंकाळणे,माणसांचा कोलाहल, पक्ष्यांची फडफड काहीतरी अशुभ सूचना देत होते.स्वामी ताबडतोब एकलिंगजींच्या मंदिरात गेले आणि ध्यानमग्न झाले.

  काही वेळाने त्यांनी डोळे उघडले.त्यांच्याकडे आशेने डोळे लावून,हात जोडून बसलेल्या समशेर सिंहांना त्यांनी आदेश दिला, गढी मध्ये असलेल्या सर्व प्रजाजनांना ताबडतोब मंदिराच्या पटांगणात जमा होण्यास सांगा.'

  'आज्ञा स्वामी,'समशेर सिंहांनी स्वामींना नमस्कार केला आणि भराभर आदेश सोडला.अल्पावधीत सारी माणसे जमा झाली.भेदरलेली, घाबरलेली! सर्व जण हात जोडून,कानात प्राण आणून स्वामींचे बोलणे ऐकू लागली.स्वामी धीरगंभीर आवाजात बोलू लागले.'गढीच्या परिसरात 'अष्टपाद'नावाच्या कीटकाने प्रवेश केला आहे.नावाप्रमाणेच त्याला आठ पाय आहेत.त्यांचा जबडा अतिशय अणकुचीदार असतो.त्यांचं अन्न म्हणजे प्राण्यांचं मांस.अन्न मिळाले की हे अष्टपाद कीटक दुपटीने वाढू लागतात.म्हणजे दोनाचे चार,चाराचे आठ अशा पटीत.यांची भूक भयंकर असते.जर त्यांची भूक प्राण्यांच्या मांसाने भागली नाही तर ते माणसांवर हल्ला करायला मागेपुढे पाहत नाहीत.'

   हे ऐकताच जमलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.शेरु कुत्रा,घोडा,ससे यांच्या अंगावर बोटाच्या पेराएव्हढे काळे ,वळवळणारे कीटक पाहिले होते.लोकांच्या अंगावर शहारा आला.'अष्टपाद',असा कीटक आताच पहिल्यांदा ऐकला,पाहिला होता लोकांनी!

  ' स्वामी,यावर उपाय काय?'महाराजांनी विचारले.'यावर एकच उपाय, सर्वांनी ही गढी नेसत्या वस्त्रांनिशी तात्काळ सोडून जायचे.'स्वामींच्या स्वरातील ठामपणाने सगळ्यांचा एकच गोंधळ उडाला.

  'तुमच्या कपड्यातून हा अष्टपाद कीटक राजधानीत जाऊ शकतो.'स्वामी बोलू लागले.महाराज समशेर सिंहांना आपल्या कुरतडलेल्या अंगरख्याची आठवण झाली.'म्हणून मी एक उपाययोजना करतो.'स्वामी बोलत होते,'महाराज, तुमच्या या गढीत एखादे झाकण असलेले विवर अथवा भुयार आहे का?'

'होय स्वामीजी,महाराज म्हणाले,'शत्रूने अचानक हल्ला केला तर निसटून जाण्यासाठी एक भुयार गढी मध्ये बांधलेले आहे.'

'ठीक आहे तर मग!'स्वामींनी समाधानाने मान डोलावली.

  'स्वामीजी,हे कीटक इतके भयंकर,संहारक आहेत तर तुम्ही ते मंत्रसामर्थ्याने नष्ट करुन टाकाल का?' या कीटकांपासून प्राणीमात्रांना किती धोका आहे!'

  'नाही वत्स, आम्ही त्या प्रजातीवर नियंत्रण ठेवू शकतो पण नष्ट करण्याचा अधिकार आम्हाला नाही.'

  समशेर सिंह निरुत्तर झाले.

   स्वामींनी सर्वांना डोळे मिटून ओम् नमः शिवाय चा मंत्र मनात म्हणण्याचा आदेश दिला.सर्वांनी ताबडतोब स्वामींच्या आज्ञेचे पालन केले.

थोड्याच वेळात सोसाट्याचा वारा सुटला.त्या वाऱ्याचे घोंघावणाऱ्या वादळात रुपांतर झाले.सर्वांचा थरकाप उडाला पण स्वामींच्या आज्ञेचे उल्लंघन न करता डोळे मिटून सारेजण ओम् नमः शिवाय चा जप करीत राहिले.

 'आता सर्वांनी डोळे उघडा,'स्वामींचा धीरगंभीर आवाज घुमला.सर्वांनी भीतभीतच डोळे उघडले आणि आजूबाजूला नजर टाकली अन् सर्वांच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या.अष्टपाद कीटकामुळे त्यांची सारी सृष्टीच उजाड झाली होती.सारी कुंजवने,लतामंडप, हिरवेगार वृक्ष सारे सारे नष्ट झाले होते.अष्टपाद कीटकांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वामींना त्या नयनमनोहर वनाची आहुती द्यावी लागली होती.

महाराज समशेर सिंह आणि महाराणी रुपकुंवरजींनी आपल्या प्रजाजनांसह जड अंतःकरणाने गढीचा निरोप घेतला.

  'शिष्य पूर्णानंद,स्वामींनी मला जवळ बोलावले,'या परिसरातील सारे अष्टपाद कीटक मी मंत्र सामर्थ्याने या भुयारात कोंडून ठेवले आहेत.हे सृष्टीच्या नियमाला धरून नाही त्यामुळे त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी मी आता तप करण्यासाठी हिमालयात जात आहे.तू या गढीत कोणी शिरत नाही ना यासाठी पहारा दे.कारण हे अष्टपाद कीटक सृष्टी नियमांच्या विरुद्ध कोंडलेले असल्याने शतकानुशतके ‌जिवंत रहातील.'असे म्हणून स्वामी हिमालयात निघून गेले.

   'येथील पक्षी,प्राणी एव्हढेच काय तर आदिवासी सुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने तेथील स्पंदने त्यांना त्वरित जाणवतात.जेथे धोका वाटतो तेथे ते फिरकतही नाहीत.म्हणूनच गढीच्या परिसरात ते कधीच प्रवेश करीत नाहीत.'

  तुझ्या भावाला, यशला ही अशुभ, धोकादायक स्पंदने जाणवली नाहीत.त्याने आदिवासींच्या विरोधाला अंधश्रद्धा म्हणून पाहिले आणि या परिसरात प्रवेश केला.मी नेमका त्याच वेळी माझ्या गुरुंना भेटायला हिमालयात गेलो होतो.'

   'हे अष्टपाद कीटक मंत्राच्या प्रभावाखाली असल्याने भुयाराबाहेर येऊ शकत नाहीत पण शतकानुशतके अन्न न मिळाले तरी जिवंत आहेत.'

   'तुझा भाऊ यश येथे आला,कुतुहलापोटी त्याने या भुयाराचे झाकण उघडून पहिल्या पायरीवर पाय ठेवला त्याबरोबर अनेक शतके उपाशी असलेल्या अष्टपाद कीटकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचे लचके......

     अजिंक्य बेशुद्ध होऊन खाली पडला.

   'अजिंक्य भाऊ,उठा', दूरवरून हाक ऐकू आली आणि अजिंक्यने हळूहळू डोळे उघडले.बारकूच्या घरातील खाटेवर तो पडला होता.बारकू आणि त्याचे आई-वडील त्याच्याकडं काळजीने पहात होते.

  'मी बारकूकडे कसा आलो?

'मी जे गढीत पाहिले ते सत्य होते की स्वप्न?'

अजिंक्य कोड्यात पडला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror