Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

4.5  

Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

अशी पाखरे येती

अशी पाखरे येती

5 mins
299


 विमानतळावरील उघडझाप करणाऱ्या काचेच्या दारातून वेदांत दिसेनासा झाला आणि माधुरीच्या काळजात लक्कन हलले. जणू शरिराच्या अविभाज्य भागाची ताटातूट होत होती. घरी आल्यावर इतस्ततः विखुरलेले वेदांत चे कपडे,बूट आवरतांना माधुरीचे डोळे भरून येऊ लागले तिची कातर अवस्था पाहून राहुल समजुतीच्या स्वरात म्हणाला,'अगं, वेदांत मोठा झाला. आता पंख फुटले आहेत त्याला.आकाशात झेप घेणारच तो!'माधुरीने अबोलपणे नुसतीच मान हलविली. माधुरीची मैत्रीण दीपा घरात आली आणि माधुरी कडे डोळे विस्फारून पहातच राहिली.खांद्याशी उसवलेला जुनाट गाउन,न विंचरलेले केस,भकास मुद्रा...'अगं काय झालंय तुला माधुरी?


'सारखी आठवण येते ग वेदांतची.जिथे तिथे भास होतो त्याचा.जीव लागतच नाही कशात'माधुरी पडेल आवाजात म्हणाली.'कमाल आहे तुझी'दीपा कपाळाला हात लावत म्हणाली.'रोज बोलतेस न तू त्याच्याशी?त्याचं चांगलं बस्तान बसलंय तिकडे ना,मग आता तुझं काय बिनसलंय?'दीपाने आश्चर्याने विचारले.'काही करावसंच वाटत नाही.एक प्रकारचं रितेपण आलंय बघ!'माधुरी उदासपणे म्हणाली.'अगं मोठा झाला आहे वेदांत आता,पंख फुटलेत त्याला मग भरारी घेणारच ना तो!'दीपा माधुरीची समजूत घालू लागली तेव्हढ्यात भांडी गडगडण्याचा आवाज आला.'कबुतर'माधुरी स्वयंपाकघरात पळाली. इतस्ततः विखुरलेल्या भांड्यांजवळ एका पालथ्या पडलेल्या ताटावर उभे राहून एक कबुतर रोखून पहात होते तर दुसरे पलायनाच्या तयारीत खिडकीवर बसले होते.'हाट हाट' करीत माधुरी कबुतरांच्या अंगावर धावून गेली.'काय उच्छाद मांडलाय मेल्यांनी,रोजचा त्रास आहे या कबुतरांचा' पुटपुटत माधुरी पसारा आवरु लागली.'वेळीच हाकल बरं त्यांना,'दीपा स्वयंपाकघरात येत म्हणाली.'नाहीतर घरभर त्यांची पिसं,विष्ठा...ईsss'दीपा शहारत म्हणाली.'तू ही खिडकी बंदच का करुन ठेवत नाहीस?'

 

'खिडकी बंद करायची?'माधुरीला ती कल्पनाच कशीशी वाटली.ती खिडकी तर तिच्या ‌स्वयंपाकघराची शान होती.प्रशस्त, लांबरुंद अशी ती खिडकी ओट्यालगत असल्याने स्वयंपाक करताना तिला कधीही कोंदटपणा,गरम वाटत नसे.मस्त बॉक्स टाइप ग्रील होती त्या खिडकीला.'माधुरी, किती छान जागा आहे ही झाडं लावायला'दीपा खिडकीच्या ग्रीलमध्ये डोकावत म्हणाली.'तयारी कर माधुरी,आपण आज बाहेर जाऊन मस्तपैकी भेळपुरी, पाणीपुरी हादडू आणि मग नर्सरीमध्ये जाऊन कुंड्या,माती, झाडांची खरेदी करू.'माधुरीला दीपाची आयडिया आवडली आणि ती कपडे बदलायला पळाली. वेगवेगळ्या फुलझाडांच्या कुंड्यांनी माधुरीची बॉक्स टाइप ग्रील सजली.फक्त एकच कुंडी माती घालून तयार होती ज्यात पिवळ्या गुलाबाचे रोप माधुरी लावणार होती पण नर्सरीमध्ये ते उपलब्ध नव्हते.लवकरच मिळणार होते.

 

पहाटे नेहमीप्रमाणे माधुरी स्वयंपाकघरात आली आणि तिचे ल‌क्ष खिडकीकडे गेले तर एक कबुतर त्या रिकाम्या कुंडीत बसले होते.'अरे देवा, आता ही कबुतरं पहाटेपासूनच घरात घुसायला लागली की काय!'माधुरीने त्याला 'हाट हाट'करायला लागली पण ते ढिम्म हलायला तयार नव्हतं.,उलट तिच्या कडेच टवकारून बघू लागलं आणि थोडं हललं.बघते तो काय,त्याच्या पोटाखाली एक चिमणुसं अंडं होतं.'बाई गं,या घुसखोरानं तर अगदी कमालच केली.आमच्या हद्दीत अतिक्रमण तर केलंच, वरुन माझ्या नाकावर टिच्चून अंडं सुद्धा घातलं!'जाऊ दे, माधुरीला वाटलं, नवीन जीव जन्माला येतोय,त्याचा नाश करण्याइतके दुष्ट तर आपण नक्कीच नाही.

 

दिवसभर माधुरी कबुतराकडे लक्ष ठेवून होती.कबुतर अगदी निश्चलपणे कुंडीत बसून होते. दुसऱ्या दिवशी पहाटे माधुरीने स्वयंपाकघरात दिवा लावला आणि समोर लक्ष गेले तर समोरच्या कुंडीत बसलेले कबुतर मोठ्या कष्टाने डोळे उघडत होते.'अयाई ग,बिच्चारी', माधुरी कळवळली.'काल पहाटेपासून ही कुंडीत निस्तब्ध बसून आहे.खाणं नाही, पिणं नाही.आणि अंड घालणं म्हणजे एक प्रकारचे बाळंतपणच की!'माधुरीने कबुतराजवळ ज्वारीचे दाणे टाकले तरी कबुतर आपलं ढिम्मच!बाई ग,आता तुला डिंकाचे आणि अळिवाचे लाडू हवेत की काय!

 

सलग दोन दिवस 'ती'कबुतर अंड्यावरुन हलली नाही पण गंमत म्हणजे 'तो'कबुतर मात्र जवळपासही फिरकला नव्हता.दोन दिवसांनी 'तो'कबुतर प्रकट झाला.थोडा वेळ गुटुर्रगुम आवाज काढून झाले.बहुदा उशीरा आल्याबद्दल माफी मागत असावा.'ती'कबुतर अंड्यावरुन उठली आणि ताबडतोब 'तो' कबुतर अंड्यावर जाऊन बसला.त्या अवधीत माधुरीला दोन अंडी दिसली.'अगं बाई,जुळं होणार की काय?'  'बसून बसून अंग आंबलंय अगदी.जरा पंख मोकळे करून येते,'आकाशात झेप घेणाऱ्या कबुतराच्या गुटुर्रगुमचे माधुरीने भाषांतर केले. मात्र या कबुतराने माधुरीची पंचाईत करुन ठेवली होती

 त्याच्या आजूबाजूच्या झाडांना पाणी घालणे मुश्कील करून ठेवले होते. कबुतराचे लक्ष इकडेतिकडे गेले की माधुरी पटकन कुंड्यांमध्ये पाणी घालत असे.तेसुद्धा कबुतराकडे एक डोळा ठेवूनच.तिला थोडा जरी संशय आला तरी चोच उगारुन धमकावित असे.


'आई ना,ती तिच्या कबुतरामध्ये गुंतली आहे.फोटो काय काढते, स्टेटस् वर टाकते पण खूष दिसते सध्या,'दबक्या आवाजात राहुल वेदांतला सांगतांना तिने ऐकले आणि माधुरीच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. थोडे दिवस गेले आणि एका सकाळी कबुतराच्या पोटाखालून एक पिल्लू बाहेर आले. 'अगं बाई, अंड्यातून पिल्लं बाहेर पण आली?'माधुरीने उत्सुकतेने पिल्लाला निरखले.पण तिची काहीशी निराशा झाली.पिवळी लव असणारे छोटे मांसाचे गोळे. बटबटीत डोळ्यांचे अन् मोठ्या मोठ्या चोचीचे.कुठं पारव्या रंगाची गिर्रेबाज कबुतरं आणि कुठं ही त्यांचीच पिल्लं!पण कुठल्याही नवजात शिशूचं आगमन आपल्याला आनंददायी वाटतंच ना!ती कबुतराची बाळं बघायला माधुरीने राहुलला हाक मारली, पटापट मोबाईल वर जमेल तसे फोटो काढले आणि स्टेटस् वर टाकले आणि काय गंमत, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.वेदांतने सुद्धा कबुतरांच्या नवजात शिशूंचे स्वागत करणारा संदेश टाकला.एका मैत्रिणीने तर' पिलांना तीट लाव नाही तर त्यांना दृष्ट लागेल'अशी कॉमेंटही केली.


माधुरी अगदी मोहरुन गेली.वेदांतच्या दूरदेशी जाण्याचे दुःख आता बोथट होऊ लागले.त्यांच्या विडिओ कॉल मध्ये कबुतर आणि पिल्लं यांचा उल्लेख हमखास असे. माधुरी रोज त्या पिल्लांची प्रगती निरखत होती.आईच्या पोटाखालून बाहेर येण्याची पिल्लांची धडपड आणि त्यांना परत पोटाखाली सारायची कबुतराची गडबड.पोटाखालून बाहेर आली की मात्र पिल्लं एकच गोष्ट करीत...चोचींनी मारामारी करणं! दिसामाजी पिल्लं मोठी होऊ लागली.माधुरी त्यांची वाढ कौतुकाने निरखत असेच पण राहुलसुद्धा रोज 'काय म्हणताहेत पिल्लं'म्हणून कुंडीत डोकावे.आजकाल माधुरी कडे येणारे पाहुणेही पिल्लांच्या कुंडीत डोकावत असत.आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली होती ती पिल्लं म्हणजे!

 

हल्ली कबुतराला माधुरी बद्दल थोडा विश्वास वाटू लागला असावा.ती पिल्लांना एकटं सोडून थोडा वेळ बाहेर जाऊ लागली होती.पिल्लं मजेत चोचींनी मारामारी करत टाइमपास करीत असत. आता पिल्लं थोडी मोठी झाली होती.इवले इवले पंखही फुटले होते त्यांना.छोटी छोटी पिसं आणि पंख फुटल्याने ती कबुतराची पिल्लं आहेत हे ओळखू येऊ लागले होते. आज तर कबुतराने कमालच केली.स्वतः खिडकीच्या ग्रील वर उभी राहून पिलांना पण ग्रील वर चढण्यास प्रोत्साहन देत होती.'तोल जाऊन खाली पडली तर'माधुरी धसकली.पण पिल्लं मात्र सावकाशपणे आईच्या देखरेखीखाली ग्रील वर तोल सावरत उभी राहिली. आठवडाभराने त्या पिल्लांनी आईबरोबर भरारी घेतली आणि खिडकीसमोरील वृक्षाच्या फांदीवर बसली.माधुरीच्या पोटात लक् कन हलले.इतके दिवस लळा लावणारी पिल्लं दूर निघून गेली.वेदांतसारखीच! माधुरी डोळे भरून पिल्लांकडे आणि कबुतराकडे पाहू लागली.तिच्या डोळ्यातून घळाघळा आसवं वाहू लागली.


अचानक कबुतराने आकाशात झेप घेतली.दोन्ही पिल्लांना एकटं सोडून.माधुरी डोळे विस्फारून पहातच राहिली.पिल्लांच्या काळजीने तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले.पण...पण...हे काय? पिल्लंसुद्धा वेगवेगळ्या दिशेने उडाली.आता त्यांच्या पंखात पुरेसे बळ आले होते.त्यांना स्वतः चा मार्ग स्वतः च शोधायचा होता.स्वतंत्रपणे. मुलांना वाढविण्यासाठी वेळ द्यावा, कष्ट करावेत पण भरारी घेण्याची त्यांच्यात क्षमता आली की त्यांच्यात न गुंतता अलगदपणे दूर व्हावे या निसर्गचक्राचे किती सुंदर उदाहरण या कबुतराने सहजपणे दाखवून दिले होते! दूरवर उडून जाणाऱ्या पिल्लांना माधुरीने टाटा केला आणि नवा दृष्टिकोन देणाऱ्या कबुतरास धन्यवाद देण्यासाठी हात जोडले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama