असेही प्रेम!
असेही प्रेम!


असेही प्रेम !
'सावधान... कुर्यात सदा मंगलम् सावधान!...' भटजींनी शेवटचे मंगलाष्टक म्हटले आणि त्या भव्य दालनात उपस्थित असणारांनी वधूवराच्या दिशेने हातातील सर्व अक्षता फेकल्या. होय! फेकल्याच! सर्वसाधारणपणे लग्नात उपस्थित असलेले लोक अक्षता फेकतातच. अक्षता फेकून होत नाहीत तोच टाळ्यांचा कडकडाट आणि वाद्यांचा गजर झाला. बरीचशी मंडळी वधूवराला भेटून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठाकडे जात असताना तर बरेचसे लोक जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी भोजन कक्षाकडे निघाले असताना एक सुमधुर आवाज सर्वांच्या कानावर पडला...
"आमचे सर्व नातेवाईक, परिचित, मित्र-मैत्रिणी आणि उपस्थित आपण सारे. नमस्कार! मी मृणाली! अर्थात आजच्या वराची मुलगी..."
"आणि मी चिन्मय! आजच्या वधूचा मुलगा! मृणाली माझी पत्नी आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडलेल्या आमच्या आईबाबांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहात. तेव्हा आपला अधिक वेळ न घेता आम्ही सुरु करतो..." असे म्हणत चिन्मयने मृणालीकडे पाहिले. दोघांनी एका आवाजात पुढील वाक्य पूर्ण केले...
"आईबाबांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट..."
"त्याचे असे झाले. सहा महिन्यांपूर्वी मी आणि मृणाली एका वधूवर परिचय मेळाव्यात भेटलो. सोबत माझी आई होती..."
"माझ्या बाबांसोबत मीही वरसंशोधनासाठी त्या मेळाव्याला उपस्थित होते..."
"मृणाली, मला वाटते, प्रस्तावना भरपूर झाली. आपण आता आईबाबांनाच त्यांच्या 'प्रेमविवाह' संदर्भात बोलू द्यावे. या आईबाबा, या." चिन्मय म्हणाला.
"सर्वांना आम्हा उभयतांचा नमस्कार. काय बोलावे? कसे बोलावे? कुठून सुरुवात करावी? एक अगोदर स्पष्ट करतो, चिन्मय म्हणाला तसा आमचा प्रेमविवाह वगैरे नाही. हो ना सुनंदा?"
"अगदी बरोबर आहे. हां एकमात्र निश्चित आम्ही सातवी ते दहावी एकाच वर्गात होतो. एकमेकांशी परिचय होता परंतु ओळख, परिचय वेगळा आणि प्रेम वेगळे खरे ना सुशील..."
"अगदी खरे! महत्त्वाचे म्हणजे तो काळ पन्नास वर्षांपूर्वीचा! आजची सहाव्या-सातव्या वर्गात शिकणारी मुले बाकी काही कळो ना कळो पण एकमेकांना 'आय लव्ह यू' म्हणून मोकळे होतात. त्यावेळी आम्हाला याचा गंधही नव्हता. दोघेही तसे हुशार..."
"म्हणजे अठ्ठावण्ण- एकोणसाठ गुणांवर रेंगाळणारे! साठ टक्क्याच्या रेषेला कधी स्पर्श केला नसला तरीही आम्ही मिळवित असलेल्या गुणांना कमी महत्त्व नसे..."
"हायर सेकंड क्लास असेच म्हणायचे. आता अठ्ठ्याण्णव टक्क्यांनाही कमीच समजल्या जाते. त्यावेळी वर्गात प्रथम येणारा विद्यार्थी पंच्याहत्तर टक्क्यांच्या जवळपास असायचा. आम्ही एका वर्गात होतो. शाळेत, वर्गात, शाळेच्या पटांगणात एकमेकांशी बोलत होतो. अभ्यासाबाबत चर्चाही करीत असू. अधूनमधून एकमेकांच्या वह्या घरी नेऊन गृहपाठ पूर्ण करीत असू. हो ना सुशील?"
"अगदी बरोबर! मला वाटते आम्ही दहावीच्या वर्गात शिकत असताना सुनंदाच्या जवळच्या नात्यातील बहीण पळून गेली."
"होय. पण त्यावेळी ती फक्त पळून गेली, तिने लग्न केले एवढेच काय ते माहिती झाले..." सुनंदा बोलत असताना चिन्मयने मध्येच विचारले,
"पण तुमच्या प्रेमसंबंधाचे..."चिन्मयला थांबवत सुशील म्हणाला,
"चिन्मय, खरे सांगू का, प्रेम, विवाह ह्या गोष्टीपासून आम्ही दूर असलो तरीही ह्रदयात कुठेतरी ती भावना जन्म घेत होती कारण मी तरी कुणाचे लक्ष नाही हे पाहून सुनंदाकडे नेहमी बघत असे. नजरानजर होत असताना तिने टाकलेला कटाक्ष, हिच्या ओठांवर येणारे मधाळ हसू, गालावर पडणारी खळी कळत नकळत आवडत असे, सारखे सुनंदाजवळ रहावे, तिच्याशी भलेही अभ्यासाच्या का होईना पण गप्पा माराव्यात असे सातत्याने वाटायचे..." असे म्हणत सुशीलने सुनंदाकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी तो म्हणाला,
"बघा. ह्याच कटाक्षाने त्या काळात घायाळ केले होते आणि हा लाजरा मुखडा कितीही वेळ पहावासा वाटे. आजची तरुणाई ह्या गोष्टींना प्रेम म्हणत असतील तर होय, मी त्यावेळी सुनंदावर प्रेम करीत होतो." सुशील बोलताना थांबलेला पाहून मृणालीने विचारले,
"आई, बाबा म्हणतात त्या त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या? तुमच्या मनात त्यावेळी काय विचार येत होते..."
"अं... विचार वगैरे करायचे ते वय नव्हते शिवाय जवळच्या नात्यातील बहिणीला कुणावर तरी प्रेम केल्यामुळे घरदार, जवळची माणसे, नातेवाईक यांना सोडावे लागले, तिच्या पश्चात तिला नाही नाही ते बोलत होते ही एक गोष्ट कुठेतरी मनात घर करून होती. प्रेमाबद्दल नकळत नकारात्मकता निर्माण झाली. पण सुशील आवडत होता की नाही हे आता सांगणे कठीण आहे. एक मात्र नक्की जसे आता सुशीलने सांगितले त्याप्रमाणे सुशीलचे माझ्याकडे लपून बघणे मला आवडायचे. माझेही डोळे त्याच्याभोवती अधूनमधून घिरट्या घालायचे. काही कारणाने त्याने बघितले नाही तर एक वेगळीच अस्वस्थता पसरत असे. सुशील कबड्डी खूप छान खेळत असे..."
"आणि सुनंदा खो- खो सुरेख खेळायची. खेळतानाची तिची चपळता मला खूप आवडत असे..."
"सुशील जेव्हा चढाई करायला जायचा त्यावेळी त्याची आक्रमकता, समोरच्या खेळाडूला पार मागे थांबायला लावण्याचे त्याचे चातुर्य आणि विद्युतगतीने मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाताना विरोधी खेळाडूंची होणारी त्रेधातिरपीट, असे करताना मध्येच पाय कुणाच्या छातीच्या दिशेने उचलताना किंवा नकळत खाली पाय मारुन गड्यांना बाद करण्याची त्याची कामगिरी डोळ्याचे पारणे फेडायला..."
"म्हणजे आई, तूही बाबांवर प्रेम करीत..."
"आता तुम्ही या भावनांना प्रेम समजत असाल तर होय, माझे त्याकाळात सुशीलवर प्रेम होते. एकदा तर सुशीलने फार मोठी कामगिरी पार पाडली. सुशील, तूच सांग ना, ते तू केलेले धाडस..."
"झाले काय तर आमच्या दहावीच्या परीक्षा जवळ येत होत्या. परीक्षेची धास्ती नव्हती तर आता आपल्या मित्रांना सोडून जावे..." सुशीलला पुढे बोलू न देता चिन्मयने विचारले,
"धास्तीपेक्षा दुःख याचे होते की, आता सुनंदाला सोडून जावे लागेल..."
"अगदी बरोबर! त्यावेळी बारावी वगैरे नव्हती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या करियरची दिशा ठरवायला मिळत असे. माझे बाबा डॉक्टर असल्यामुळे मीही डॉक्टर व्हावे अशी त्यांची नि माझी इच्छा होती."
"माझ्या घरी मात्र वेगळे होते. आईबाबा दोघेही बँकेत असल्याने मीही बँकेत नोकरी करावी असेच ठरले होते. त्यातच बाबांची बढती होणार असल्यामुळे त्यांची आणि आईचीही बदली होणार होती."
"त्यामुळे आम्ही एकमेकांपासून दुरावणार ही गोष्ट मनाला दुःखी करीत होती. त्यामुळे मग मी एक धाडस केले. मी चक्क सुनंदाला पत्र लिहिले..."
"प्रेमपत्र लिहिले? बाबा, त्याकाळात ते भलतेच धाडस होते की..."
"प्रेमपत्र नाही म्हणता येणार. होय, सुनंदाला परीक्षेची तयारी करण्यासाठी माझी वही हवी होती. शाळा सुटताना मी ती वही तिला दिली आणि घरी जाऊन बघ असे सांगितले..."
"असे कधी न सांगणाऱ्या सुशीलने असे का बजावले असावे या विचारात मी घरी पोहोचले. योगायोगाने आईबाबा बँकेतून आले नव्हते. मी पटकन आत जाऊन ती वही काढली आणि पाहते तर काय..."
"प्रेमपत्र ना? बाबांनी दिलेले?" मृणालीने विचारले
"नाही. ते पत्र नव्हते तर त्यात प्रेम होते. म्हणजे सुशीलने फक्त 'आय लव्ह यू!' एवढेच लिहिले होते."
"बाप रे! आई, मग तुम्ही काय केले? तुमच्या आईबाबांना सांगितले? तसे लिहिणाऱ्या बाबांना खडसावले?..."
"की आई तूही तसेच उत्तर दिले..."
"नाही. सुनंदाने यापैकी काही केले नाही. दोन दिवसांनी वही परत करताना तिच्या त्या कटाक्षातील भाव बरेच काही सांगत होते..."
"आईच्या तुम्हाला आवडणाऱ्या कटाक्षात 'माझीही हीच अवस्था आहे रे...' असे भाव होते का?" चिन्मयने विचारले.
"नाही. ती भाषा होती, असा मुर्खपणा करायचे हे दिवस नाहीत. अभ्यास कर. चांगले करिअर कर... आणि नंतर दहावीची परीक्षा झाली. हिच्या आईबाबांची बदली दूर झाली. नंतर आम्ही दोघेही आधी शिक्षणात आणि नंतर संसारात..."
"म्हणजे तुमची लग्नं झाली त्यावेळीही तुम्ही तुमचे प्रेम..."
"कुठे आणि कसे व्यक्त करणार? त्याकाळात हे मोबाईल तर सोडा पण साधे लँडलाईन फोनही घरोघरी नव्हते. शिवाय सुनंदाच्या आईबाबांच्या सातत्याने बदल्या होत त्यामुळे शोधणार कसे?"
"शिवाय महत्त्वाचे म्हणजे प्रेमांकुर फुटलेच नव्हते ना. शिवाय तशी इच्छा व्यक्त करण्याचे धाडस त्यावेळी आम्हा मुलींजवळ नव्हते."
"आणि खरे सांगू का, नंतर अभ्यासात एवढे गढून गेलो ना की, जे प्रेम पुरते उमलेले नव्हते किंवा ती भावना मोठ्या प्रमाणात दृढ न होताच आम्ही एकमेकांपासून दूर गेलो..."
"आणि कालौघात त्या पुसट आठवणी कायमच्या पुसल्या गेल्या..."
"नाही म्हणायला वर्गातील कुणी भेटले की इतरांची जशी विचारपूस होई तशी मी सुनंदाची चौकशी करीत असे पण कुणालाही काहीही माहिती नव्हते. दहावीच्या परीक्षेनंतर आमची पहिली भेट झाली ती तुमच्या वधूवर परिचय मेळाव्यात. तुम्ही दोघे बाजूला बोलत बसला होता. आम्ही दोघे एका बाजूला अनोळखी असल्याप्रमाणे बसलो असताना कुठेतरी मनात एक भावना जागृत होत होती. एक क्षण असा आला की, दोघांनी एकदम 'त.. सु...सु..."
"सुनंदा... सुशील असे एकमेकांना विचारले."
"ते ठीक आहे, पण तुम्ही दोघांनी लग्न केले. आपापल्या साथीदारांसह यशस्वी संसार केले तेव्हा तुमच्या या न झालेल्या प्रेमाची..."
"नाही सांगितले कारण आम्ही दोघे एकमेकांना पूर्ण विसरलो होतो आणि मुळात तसे क्षण कधी आम्ही सोबत व्यतीत केलेच नव्हते तर 'नसलेल्या प्रेमाची गोष्ट' काय म्हणून सांगणार ना?"
"पण तरीही कधी मित्र-मैत्रिणी भेटताच एकमेकांची चौकशी केल्यानंतर अस्वस्थता तर येतच असेल ना? त्यावेळी ती अस्वस्थता का आली हे जन्मोजन्मीच्या साथीदारांना नाही ऐकवले?"
"नाही रे नाही! तशी कधी इच्छा झाली नाही आणि तसे सुचलेही नाही. बरे, आता पुढे वळूया. त्यादिवशी तुमच्यासाठी वधूवर परिचय मेळाव्यात अनेक वर्षांनंतर भेट झाली. गत स्मृतींना उजाळा मिळाला. आम्ही आमचे साथीदार म्हणजे तुमचे आईवडील तर गमावले होते. एकमेकांना बघून, बोलून आनंद झाला आणि नकळत त्याचवेळी मनात तुम्ही म्हणता तो प्रेमांकुर डोके वर काढू लागला..."
"होय! आम्ही तुमच्या हालचालीतून, बोलण्यातून तुमची ती अवस्था ओळखली. मी चिन्मयला म्हणाले देखील की, आपले आईबाबा कसे पूर्वीपासून ओळख असल्याप्रमाणे बोलत आहेत. पण तुम्ही दोघांनी ताकास तूर लागू दिली नाही..."
"चिन्मय, मी त्या दिवशी घरी परतताना, घरी आल्यावर बाबाला विचारले परंतु बाबांचे एकच तुझे काय ठरले ते सांग. पण माझ्या प्रश्नाला उत्तर न देता विषय बदलण्याच्या त्यांच्या गडबडीने मी ओळखले..."
"मलाही आईच्या नजरेतून खूप काही म्हणजे पाणी कुठे तरी मुरतेय हे जाणवले..."
"अरे, हा निर्णय घेणे सोपे नव्हते. एकतर तुमची लग्नं व्हायची होती शिवाय अगोदरच्या जोडीदाराच्या आठवणी का इतक्या सहजासहजी पुसता येणार होत्या. परंतु तुमचा दोघांचा निर्णय लांबत असताना आम्ही सुरवातीला फोनवर बोलत होतो..."
"नंतर हलकेच एक दोन वेळा सुनंदाची इच्छा नसताना कॉफी शॉपमध्येही गेलो..."
"माझी इच्छा का होत नव्हती हे त्यादिवशी सुशीलच्या लक्षात आले..."
"ज्यादिवशी आम्ही दोघे त्याच कॉफी शॉपमध्ये आलो नि तुम्हाला..."
"एकाच 'थम्पस्अपमध्ये' पुंगळ्या टाकून नजरेत नजर..."
"आणि तिथूनच तुम्ही दोघांनी आमच्या दुसऱ्या लग्नाची बोलणी सुरु केली. बरे का, मंडळी आम्ही दोघे सोळाव्या वर्षी जे प्रेमाचे म्हणता येणार नाही..."
"या दोघांना या लग्नासाठी तयार करताना काय काय पापड बेलावे लागले ते आम्हा दोघांनाचा माहिती! बाबा तसे लवकर तयार झाले पण माझी आई काही केल्या तयार होतच नव्हती. मग तिचा होकार मिळविण्याची जबाबदारी तिच्या सुनेने अर्थात मृणालीने घेतली. ती आईला काय म्हणाली ते त्या दोघींनाच माहिती..." चिन्मय तन्मयतेने सांगत असताना सुशीलने अचानक विचारले,
"मृणाली, तू अशी काय जादूची कांडी फिरवलीस की, सुनंदाने आमची मैत्री तर स्वीकारली पण लग्नाला तयार होत नव्हती. तिचे एकच पालुपद होते, मला थोडा वेळ हवाय..."
"अगदी हेच! आम्हालाही आई हेच सांगत होत्या. दरम्यान माझे आणि चिन्मयचे लग्न करण्याचे ठरले होते परंतु मी आईला म्हणाले..."
"म्हणाले कसली? हिने चक्क मुलगीप्रमाणे हट्टच धरला की, तुमच्या निर्णयावर माझा आणि चिन्मयचा निर्णय अवलंबून असणार आहे. तुम्ही बाबांना नकार दिला तर आम्हीही एकमेकांना नकार तर देऊच पण आजन्म अविवाहित राहताना केवळ मैत्र जपू..."
"म्हणजे तू चक्क हिला धमकी दिली?"
"बाबा, हवं तर तसे समजा पण शेवटी हो ना करता आई एकदाच्या तयार झाल्या..."
"परंतु मीही एक अट टाकली..."
"आईंची अट मान्य करण्यापूर्वी मीही एक वचन आईकडून घेतले..."
"अरे बाप! तुम्ही सासू-सुनेने हा अट- वचनाचा काय खेळ खेळलात ते एकदा सांग तरी... माझी मुलगी असून तू मला कशाचाही पत्ता लागू दिला नाही."
"आई म्हणाल्या की, तुमचे लग्न झाल्यावर आमच्या लग्नाचा विचार करु... माझी तशी अटच आहे."
"मी असे म्हणताच हे दोघे तयार झाले पण मी तुझ्याशी लग्न करीन असे माझ्याकडून वचन घेतले."
"आणि हा सोहळा घडून आला तर... याचा अर्थ आमचे लग्न जुळविण्याचे 'क्रेडिट गोज् टू बोथ ऑफ यू..." सुशील तसे म्हणत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला...