डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4.3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

अनोखी श्रद्धांजली!

अनोखी श्रद्धांजली!

4 mins
214


     आज पुन्हा त्याच्या आठवणींनी तिच्या मनाचा कोपरा न कोपरा व्यापून गेलेला. खूप प्रयत्न केला तिने अश्रूंना थोपवण्याचा पण बुद्धीवर विजय मिळवत भावना अनावर झाल्या अन् डोळे अगदी मेघांप्रमाणे बरसू लागले. थोडा आवेग ओसरला अन् प्रयत्न पूर्वक डोळे पुसले तिने.


मन अगदी भूतकाळात गेलं काही वर्ष, कदाचित त्याच्याही काही काळ मागे.


तो अन् ती अगदी शाळेपासूनच एकत्र शिकलेले. घरगुती संबंधांमुळे त्याची आणि तिची आधीचीच मैत्री.


अगदी घनिष्ठ असलेली ही मैत्री नकळत्या वयात प्रेमात कधी परावर्तित झाली कळलेच नाही दोघांनाही.


तो मुळातच अत्यंत धाडसी स्वभावाचा,निधड्या छातीचा!

कुणावर होत असलेला थोडासा अन्याय सुद्धा त्याला कधी सहन व्हायचा नाही.


शिवरायांचा इतिहास शिकतांना अगदी देहभान हरपून जायचं त्याचं. शिवरायांच्या वीरश्री चा पोवाडा जेव्हा तो गायचा तेव्हा ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहायचे.

शिवरायांचे जाज्वल्य देशप्रेम त्याच्याही मनात तसेच पेरले गेले होते त्याच्या इष्ट दैवत शिवराया प्रमाणे....


अन् मग त्याच्या मनात एकच ध्यास मातृभूमीच्या प्रेमाचा!


ती सुद्धा त्याच्या याच गुणावर भाळली होती अन् अगदी जीव ओवाळून टाकला होता तिनेही त्याच्यावर...!


त्याच्या या वेड्या देशप्रेमाने त्याने अगदी लहान पणापासूनच सैन्यात जाऊन देशसेवा करायचं ठरवलं.


भरपूर व्यायाम करून कमावलेलं पीळदार शरीर अन् उंचपुरी देहयष्टी होतीच की त्याच्या साथीला!


आई वडिलांनी ही कधीच आडकाठी नव्हती आणली त्याच्या या स्वप्नांना.बाबांनी फक्त एवढेच सांगितले होते की चागला शिकून सवरून मग एक ऑफिसर म्हणून मिलिटरी मधे जा. त्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेचा सुद्धा उपयोग त्याला त्याच्या देशासाठी करता येईल.


बाबांचं म्हणणे त्यालाही पटले होते. चांगला उच्चशिक्षित होऊन मगच तो सैन्यात गेला होता.अन् एक ऑफिसर म्हणून पदभार स्वीकारला होता त्याने सैन्यात.


तशीही त्या दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमाची कुणकुण घरी लागलीच होती. दोघेही अतिशय गुणी असल्याने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.


शिक्षण आटोपले ,नोकरी लागली अन् एक छानसा मुहूर्त पाहून त्या दोघांचे लग्न ही थाटा माटात पार पडले.


दिल्ली ला त्याची पोस्टिंग असल्याने तो तिलाही सोबत घेऊन गेला.


नव्याच्या नवलाईचे ते बहारदार दिवस दोघांनी अगदी मनसोक्त जगून घेतले.


मिलिटरी चे शिस्तबध्द जीवन, त्याच्या मनातला देशप्रेमाचा झरा अन् वरून त्या दोघांची एकमेकांवरील प्रेमाची लयलूट जीवन अगदी उत्साह आणि आनंदानी ओसंडून चालले होते दोघांचेही.


सगळं अगदी सुरळीत सुरू असताना सीमेवर शत्रूच्या हालचाली वाढल्या च्या बातम्या यायला लागल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मग एक स्पेशल टास्क फोर्स बनवण्याचा निर्णय झाला. त्याचा आजपर्यंतचा प्रवास बघता एक उमदा,तडफदार अन् हुशार अधिकारी म्हणून त्याला त्या टास्क फोर्स चा चीफ केलं गेलं.


त्याच्या मनातले जाज्वल्य देशप्रेम आता सत्यात उतरणार म्हणून तो खूप खुश होता पण आता ती मात्र सोबत नसणार याचेही मनाला खूप वाईट वाटत होते.


तिला स्वतः तो घरी पोचवून आला होता.एकमेकांचा निरोप घेणं दोघांनाही जड गेलं होतं. ..


याच्या नियंत्रणात असलेल्या टास्क फोर्स ने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती अन् सीमेवरच्या कारवायांना बराच आळा बसला होता. सहा महिन्यांनी पुन्हा तो घरी परतला होता काही दिवसांच्या सुटीवर.


त्याच्या आगमनाचे फुलपाखरी दिवस अगदी पंख लावल्याप्रमाणे भुरकन उडून गेले होते....

पण तिच्या उदरात मात्र एका नव्या जीवाची चाहूल लागली होती.....


त्याला कधी हे सांगेन असं तिला झालेलं. ..,फोनवरच त्याला ही गोड बातमी सांगून मनाचं समाधान करून घेतलं तीने...!


येणाऱ्या बाळाच्या चाहुलीत ती मग्न अन् तो अतिरेक्यांच्या बंदोबस्तात ...


अन् एकदिवस अतिरेक्यांनी त्यांच्या कॅम्प वर केलेल्या भ्याड हल्ल्यात तो शहीद झाल्याचीच बातमी येऊन धडकली...

तशाही परिस्थितीत त्याने मात्र पाच अतिरेक्यांचा खात्मा केलेला.


तिच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला होता..

जन्माला येणारं बाळ आधीच पितृप्रेमाला पारखं झालं होतं. दुःखाचा जणू डोंगरच कोसळला होता तिच्यावर...


पण ती अगदी विरपत्नी ला साजेशी वागली होती. मनातले दुःखाचे कढ बाजूला सारत....


त्याला अखेरचा निरोप दिल्यानंतर मात्र मनातल्या अश्रूंना वाट करून दिली होती तिने.


सासर, माहेर दोन्हीकडचे फुलासारखे जपत होते तिला अन् एका शुभ मुहूर्तावर एका गोंडस बाळाला जन्म दिला होता तिने.

आज मात्र त्याच्या आठवणी असह्य झाल्या होत्या तिला पण नव्या जिवाकडे बघून स्वत:ला सावरले तिने.


अन् आज तर त्याला जाऊन वर्ष झालेले अन् तिच्या मनाचा बांध पुन्हा गळून पडलेला.म्हणून ती आज अशी अश्रूंच्या पुरात न्हाऊन निघाली होती.


तिची अवस्था बघून सासू सासरे सुद्धा विद्ध व्हायचे मनानं.त्यांचाही एकुलता एक आधार देशासाठी शहीद झालेला पण आता सून अन् नातवासाठी त्यांनी मन मोठं केलेलं.


तिची आजची अवस्था पाहून सासूने प्रेमाने तिला मायेचा आधार दिला.


त्यांच्या साथीने,त्यांच्या प्रेमाने खूप आश्वस्त वाटले तिला!


आज मात्र तिने सासू सासऱ्यांजवळ एक विचित्र मागणी केली.

" बाबा ,मला त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे, मला पण सैन्यात भरती व्हायचे आहे."


"पदरी लहान पोर,अन् एक तूच आधार आमचा,असा नको ग हट्ट करू.' कळवळून सासूबाई बोलल्या.


सासरे मात्र तिला पूर्ण ओळखून होते. त्यांच्या लाडक्या दिवंगत लेकाची विरपत्नी होती ती. मागे हटणार नव्हती ती!


त्यांनी स्वत:च्या पत्नीची समजूत घातली. मिलिटरी डिपार्टमेंट शी संपर्क साधून तिच्या तिथे प्रवेशासाठी विचारणा केली.


त्यांच्यासाठी सुद्धा हा अनुभव नवीन होता.

तिची इच्छाशक्ती पडताळण्यासाठी तिला मुलाखतीला बोलवण्यात आले.

तिचा अदम्य आत्मविश्वास अन् पतीचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती बघून तिला संधी देण्याचे ठरवण्यात आले.


वर्षभराच्या लेकराला ठेवून ती मिलिटरी ट्रेनिंग ला गेली.

भरपूर मेहनत अन् स्वत:च्या बुद्धिमत्तेने तिने ती ट्रेनिंग यशस्वी रित्या पार पाडली.


आज तिने एक मिलिटरी ऑफिसर म्हणून पदभार ग्रहण करत शहीद पतीला



 अनोखी श्रद्धांजली  दिली होती.


तिच्या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे घरचे सगळे अन् मिलिटरी डिपार्टमेंट सुद्धा नतमस्तक झाले होते.


धन्य तो वीर जवान अन् धन्य ती विरपत्नी!


या लेखनाचे सर्वाधिकार लेखिके कडे सुरक्षित आहेत.

लेख शेअर करायचा झाल्यास कोणताही बदल न करता, कृपया नावा सहच शेअर करा.

साहित्य चोरी हा कायदेशीर अपराध आहे.

धन्यवाद!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational