अहो, प्लीज...
अहो, प्लीज...


अहो, प्लीज...
शनिवारी रात्री मी या विचाराने झोपलो की, उद्या रविवार आहे. मस्तपैकी उशिरा उठावे परंतु मध्यमवर्गियांसाठी 'मनातले मांडे नि वास्तवातील भांडे' यात जमीन- अस्मानचा फरक असतो हे माझ्या रविवारी सकाळी रोजच्या पेक्षाही लवकर जाग आली तेव्हा समजले. एकदा जाग आली आणि नंतर जंग जंग पछाडले तरीही झोप लागत नाही हा इतिहास! त्यामुळे झोप लागणे शक्यच नव्हते. छतावर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत बसलो. फिरणाऱ्या पात्यांप्रमाणे गरगरत येणाऱ्या भूतकाळाला मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवले कारण अनुभवाने हे माहिती होते की, भूतकाळाच्या चक्रव्यूहात एकदा का अडकले की एकतर हाती काही लागत नाही आणि मनावर आक्रमण करणाऱ्या घटना ह्या बहुतांशी दुःखद असतात त्यामुळे मी पटकन अंथरूण सोडले. बाहेर येऊन दात घासले. माझी चाहूल लागताच माझ्या कर्तव्यदक्ष पत्नीने चहाचे आधण ठेवले. मी टॉवेलने तोंड पुसून हातात वर्तमानपत्र घेऊन सोफ्यावर बसतो न बसतो तोच पाण्याचा प्याला आणि चहाचा कप घेऊन बायकोचे आगमन झाले. मी तिच्याकडे पाहिले. मला जाणवले की, तिच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्तच मधाळ हसू पसरले होते, चाल काही तरी वेगळेच दर्शवत होती. त्या हास्यामागे काही तरी हेतू नक्कीच आहे हे मी अनुभवातून ओळखले. परंतु मी काहीही प्रतिक्रिया न देता पाणी पिऊन चहाचा कप ओठाला लावला. दोन तीन घोट चहाचे घेऊन होत नाहीत तोच बायकोचे शब्द जणू मधाच्या पोळातून घोळून आल्याप्रमाणे कानावर पडले,
"अहो, मी प्लीज ऐका ना. तो पेपर थोड्यावेळाने वाचला तर चालणार नाही का?" खरेतर हेच वाक्य दररोज सकाळी वेगळ्या शब्दात कानावर आदळत असे परंतु त्यादिवशी त्यातील लाघव, विनय, गोडवा, आर्जव, रसाळता ऐकून मी पुन्हा सावध झालो. मनातल्या मनात स्वतःलाच बजावले,
'पतीमहाशय, जागे व्हा. ही सारी साखरपेरणी आहे. एक प्रकारचे जाळे टाकल्या जातेय. आवळा देऊन कोहळा काढण्याचा विचार आहे.' परंतु 'आलीया भोगाशी असावे सादर' याप्रमाणे मी सावध होत विचारले,
"बोला. काय म्हणता?"
"इश्श! काहीतरीच तुमचे. अहोजाहो कशासाठी? अहो, एक काम करा ना प्लीज!"
"काम? ते कोणते?"
"आम्ही नाही सांगणार! ओळखा ना तुम्ही..."
"ओळखू? अं... अं... आज रविवार सुट्टी आहे. नाष्टा तयार करायचा कंटाळा येतोय का? हॉटेलमधून काही बोलवायचे असेल तर स्पष्ट सांग ना. असे आडवळणाने का सांगतेस?"
"फराळाचे तर मी घरीच बनवणार आहे. मोसम कुछ अलग है, तेव्हा तुमच्या आवडीचे खमंग कांदाभजी बनवणार आहे. कशी वाटली आयडिया?"
"व्वाह! खरेच. वातावरण पावसाळी आहेच. भजी तो बननाही चाहिए... पण त्याबदल्यात मला कोणते काम करावे लागणार आहे? हां...हां.. आले लक्षात. कांद्याची भजी करण्यासाठी कांदे चिरुन द्यायचे आहेत का? मला माहिती आहे, कांदा चिरताना तुझ्या डोळ्यात आसवांचा पूर येतो..."
"ते तर आहेच पण काही झाले तरी मी कधीच कांदा चिरायचे काम तुम्हाला सांगत नाही. आज थोडे वेगळेच काम आहे. ओळखा ना हो... असे काय करता?"
"तुला तुझ्या आईबाबांकडे जायचे आहे का?..."
"नाही ना! अहो, परवाच तर आले की जाऊन. इतक्या लवकर जाणे बरे दिसणार नाही हो..."
"अरेच्चा! हेही नाही. मग काय असेल बुवा? सिनेमाला जायचे आहे का? खरेच की, आपण किती महिन्यांपासून सिनेमाला गेलो नाहीत. चल जायचे का आज?"
"काय पडलंय आजच्या सिनेमात? तेच ते अन् तेच ते. वेगळे काही नसतेच."
"मग काय असेल बुवा? अगं, सांग ना गं. कशाला उगाच सस्पेन्स वाढवतेस?"
"नाही हं. माझ्या लहानपणी म्हणजे दहावीच्या वर्गात जाईपर्यंत आम्ही मैत्रिणी मिळून 'भुलाबाईचा खेळ' खेळत होतो..."
"भुलाबाई? हां. समजले. माझी ताईही तिच्या मैत्रिणीसोबत भुलाबाई खेळायची..."
"मजा येत असे त्या खेळात. एका बरणीत किंवा भांड्यात केलेला खाऊ टाकून तो डब्बा वाजवून दाखवताच केवळ आवाजावरून आत काय पदार्थ असे ते ओळखावे लागायचे. असा ओळखा ओळखीचा खेळ खेळून मग डब्यातला पदार्थ खाताना खूप मजा येत असे..."
"आज तसा तू कोणता खेळ खेळत नाहीस ना?"
"तुमचे आपले काही तरीच! तुमच्या सोबत खेळ तो कोणता आणि कसा खेळणार? पण ओळखा ना आज तुम्हाला कोणते एक काम करायचे आहे ते?"
"साडी? पण परवाच तर आपण दहा-बारा दुकानं हिंडून तुझ्या पसंतीची संक्रांतीची साडी घेतली ना? दिवाळी तर खूप दूर आहे..."
"काय पण तुमची स्मरणशक्ती आहे हो. दहा- बारा दुकाने हिंडलो हे पक्के लक्षात आहे हो. मग त्याच स्मरणशक्तीच्या आधारे आज माझे कोणते काम आहे ते सांगा ना..."
"छे! बुवा, डोके चालत नाही..."
"काय बाई, तुम्ही इतके हुशार आणि साधी गोष्ट ओळखता येत नाही..."
"काही क्लू देशील तर..."
"क्लू? असे म्हणता? ती एक भाजी आहे..."
"भाजी? ओळखले? नाही. नाही. तुझ्या आवडीची नि मला आयुष्यभर पसंत नसलेल्या आणि 'तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडुच' अशी ख्याती असणाऱ्या कारल्याची भाजी खाऊन मी आज रविवारचा दिवस खराब करणार नाही... तुला आठवते का, तुला किडनी स्टोन झाला तेव्हा आपल्याकडे कारल्याच्या पदार्थांची रेलचेल होती. आवडत नसतानाही मी ते सारे कडूकडू पदार्थ खाल्ले ना, आता कारल्याचे नाव काढले तरी मला ओकारी आल्याप्रमाणे वाटते. "
"ते आठवते. पण तसेनाही हो. कारल्याची भाजी नाही हो..."
"मग दिवसभर करपट वास येणारी शेपुची भाजी करायची असेल किंवा न पचणारी, पित्त वाढवणारी शिमला मिरची असेल..."
"जा बाब्बा, तुम्हाला साधी गोष्ट समजत नाही. कसे सांगू आता... हां. ती भाजी कधी कडू असते..."
"कडू? कारल्याशिवाय दुसरी कोणती भाजी कडू असते बुवा? बिलकुल डोके चालत नाही. तू क्लू ही असे देत आहेस ना की माझे डोके बधीर झाले आहे."
"म्हणजे तुम्हाला डोके आहे तर पण ते आज का चालत नाही..."
"असेच होते गं. प्रत्येक हुशार नवऱ्याचे डोके इतरत्र सर्वत्र चालते परंतु बायकोपुढे चालतच नाही. हवालदिल होतात नवरे ..."
"ते जाऊ द्या हो पण तुम्ही नक्कीच ओळखू शकाल फक्त थोडे डोके चालवा ना... अहो, तुम्हाला ती लावणी आठवते का हो...
'खाजवा की... जरा खाजवा की
बुगडी शोधाया डोकं..."
"तू आता रिमेक लावणी म्हण..."
"इश्श! तुम्ही असे आहात ना... तुमची इच्छा असेल तर म्हणते... ऐका,
'खाजवा की... अहो, जरा खाजवा की
भाजी शोधाया डोकं..."
"व्वाह! व्वाह!! किती सुरेख!!! पण डोके कितीही खाजवले तरी तुला हव्या असलेल्या भाजीचे नाव काही आठवत नाही. हरलो बुवा! आता तर सांगशील. भाजीसंदर्भात काय आहे ते..."
"असे काय करता हो? तुमच्या तोंडातून 'हरलो' असे ऐकावेसे वाटत नाही. बरे, शेवटचा क्लू देते हं. आपल्या लग्नात तुम्ही पहिला उखाणा घेतला होता तो तरी आठवतो का?"
"तो कसा विसरेन बरे? आयुष्यात पहिल्यांदाच बायकोचे नाव घेतले होते."
"मग एकदा घ्या ना तो उखाणा पुन्हा..."
"अगं पण, बरे ठीक आहे. घेतो तो पहिला वहिला उखाणा. आयुष्यात पुन्हा कधी उखाणा घेतला नाही. ऐक...
'भाजीत भाजी मेथीची
अलका माझी आवडीची...' त्यावेळी सारे जण खूप खूप हसले होते. कारण त्याकाळात प्रत्येक नवरदेवाचा हाच उखाणा ठरलेला... फेव्हरिट होता."
"ते झाले हो पण आता तरी माझ्या कामाचे काही आठवले का?"
"उखाण्यात भाजी? अच्छा! म्हणजे आज मेथीची भाजी, मेथीचे पराठे, मेथीची दाळ भाजी, मेथीची भरडा भाजी असा कोणता प्रकार करण्याचा विचार आहे का? अगं, मला काय विचारायचे आणि हे कोणते असे मोठे काम आहे की, तुला एवढी लांबलचक प्रस्तावना करावी लागली. पटकन सांगायचे ना, आज मेथीचा हा प्रकार करायचा आहे. मेथीचा कोणताही प्रकार मला खूप आवडतो हे तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तू पण ना..."
"आहे, अशी आहे. तुम्ही काल आणलेली मेथीची जुडी खूप कोवळी, लुसलुशीत आहे..."
"चला. तू दिलेली शाबासकी म्हणजे फार मोठा पुरस्काराच असतो. त्यातही मी आणलेली भाजी तुझ्या कधीच पसंतीला उतरत नाही. अशावेळी मेथी तुला आवडली ही फार मोठी गोष्ट आहे..."
"ते जाऊ द्याहो पण मेथीची जुडी की नाही खूप मोठी आहे. तेवढी मेथी निसायला बराच वेळ लागेल. मग स्वयंपाक केव्हा करावा आणि जेवण कधी करावे. त्यातही मला कोथिंबीर, मेथी निसण्याचा भयंकर कंटाळा येतो हो. पालक मात्र मी आवडीने निसते. म्हणून म्हणते, प्लीज,एक करा ना... ऐकून तर घ्या ना. तेवढी मेथीची भाजी निसून द्या ना,प्लीज! तोवर मी कांदीभजी करते. वाटल्यास भज्यासोबत गरमागरम चहापण करते. प्लीज!..." असे म्हणत माझ्या होकार- नकाराची वाट न पाहता बायकोने ती भलीमोठी मेथीची जुडी आणि सोबतच तेवढीच मोठी कोथिंबीरीचीही जुडी आणून माझ्यासमोर ठेवली आणि मी 'आलीया भोगाशी असावे सादर' याप्रमाणे मेथी निसायला सुरुवात केली, मात्र मनोमन एक निश्चय केला की, यापुढे साता जन्मात कधीच मेथीची जुडी आणणार नाही आणि तो उखाणाही कधीच घेणार नाही.
००००