Pratibha Tarabadkar

Crime Thriller

4.0  

Pratibha Tarabadkar

Crime Thriller

अडगळ - भाग ३

अडगळ - भाग ३

5 mins
282


गणेश, सगुणा आणि पुंडलिक पोलिस स्टेशनला पोहोचले तेव्हा इ.कदम आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना देत होते.'सर,ही सगुणाक्का आणि हे माझे दाजी पुंडलिक.' हे दोघेही जण प्रामाणिक आहेत हे एका दृष्टिक्षेपात इ कदमांच्या अनुभवी नजरेने जाणले.प्रामाणिकपणा हा पैशांवर नाही तर वृत्तीवर अवलंबून असतो.

 'काय ग सगुणा,तू या बिल्डिंग मध्ये कामाला जातेस का?'मोबाईलमधील 'वृंदावन हाउसिंग सोसायटीचा'फोटो दाखवत इ.कदमांनी विचारले.'व्हय सायेब,इथं माजी तीन कामं हायेत.तीन,आठ आनि आकरा नंबरमधी.'सगुणाच्या बोलण्याची इ.कदमांना गंमत वाटली.'या बिल्डिंग मधील कोणाकडचं सामान तू अलिकडे भंगारात विकलंस का?'सगुणा जरा विचारात पडली.'हां सायेब,आकरा नंबरच्या रुपाताईचा माळा साफ केला हुता तवा विकलं हुतं.अवो सायेब,काय सांगू तुम्हास्नी, अशी घान हुती ना त्या माळ्यावर,निस्ती अडगळच अडगळ!समदं साफ केलं त्या दिवशी.मंग भंगारात दिलं नको आसलेलं.'


 'हा डबा पण होता का माळ्यावरच्या अडगळीत?'इ.कदमांनी पत्र्याचा 'तो डबा'सगुणापुढे ठेवत विचारले.सगुणा विचारात पडली.'आसंल कदाचित. अवो लय उशीर झाला होता म्हनून लगालगा भंगार इकलं आनि दुसऱ्या घरी कामाला गेलू.अवं काय सांगू तुम्हास्नी,ती अडगळ कुठून आवरली आसं झालं आमच्या रुपाताईला.''का बरं?'तिला बोलतं करुन आणखी काही माहिती मिळतेय का ते पाहण्यासाठी इ.कदमांनी विचारले.

 

'अवो सायेब, दुसऱ्या दिवशी मी कामाला गेलू तवा रुपाताई डोकं धरून बसली हुती.ती अडगळ साफ का केलीस म्हणून मोठ्ठं भांडण केलं रुपाताईसोबत कुणालनं!'इ.कदमांनी सहेतुक राणेंकडे पाहिलं.'कोण कुणाल?''रुपाताई आन राजेशदादाचा मुलगा.यंदा बारावी करतोय.लयीच अत्रंगी हाय त्यो.अवं त्याच्या कालिजच्या दप्तराला हात बी लाऊ देत न्हाई.रुपाताईबी म्हंते काय सोनं लागलंय का तुझ्या दप्तराला म्हनून.'इ.कदमांनी विचारले,'सगुणा,तू मोबाईल नंबर देऊ शकशील त्या तिघांचा?'


'सायेब, माझ्या कडे फक्त रुपाताईचा नंबर हाये.राजेशदादा आनि कुणालचा न्हाई.'मग त्यांचे नंबर पण आणून देशील?'इ.कदमांच्या प्रश्नावर सगुणा विचारात पडली.'का वो सायेब,काय झालं?'अगं काही नाही,सहजच.थोडं काम आहे त्यांच्या कडे म्हणून.'इ.कदमांनी घाईघाईने खुलासा केला.'चालेल.मिळाले नंबर की मी गणेशकडे देते.'

 'बरं सगुणा कोणाला काही सांगू नकोस बरं यातलं'.'न्हाई सांगणार'म्हणत सगुणा उठली.

 

इ.कदमांनी बाबू खबरीला राजेश,रुपा आणि कुणाल यांची इत्यंभूत माहिती काढायला सांगितली.

'सर,तो राजेश आणि रुपा एकदम साधी सरळ माणसं आहेत.राजेश एका प्रायव्हेट कंपनीत क्लार्क आहे आणि रुपा हाऊसवाईफ आहे.पण त्यांचा मुलगा कुणाल सरळ वाटत नाही.खर्चिक षौक आहेत त्याला.मध्यंतरी स्वतः च्या वाढदिवसाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली त्याने. रात्रभर दारू पित होता मित्रांसोबत.पन्नास हजार बिल आलं होतं.'

 

'अरे पण आई-वडिलांना कसं कळलं नाही?'इ.कदमांनी आश्चर्याने विचारले.'काय सर,अहो आई-वडिलांना सांगितलं असेल मित्राकडे अभ्यासाला जातोय म्हणून.मग हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांना फोन केला असेल मित्राकडे पोहोचलोय आणि आता अभ्यासात डिस्टर्ब होऊ नये म्हणून मोबाईल स्वीच ऑफ करतोय असं सांगितलं असेल..मुलगा अभ्यास करतोय म्हणून आई-वडील खूष आणि आई-वडील आपल्यावर वॉच ठेवणार नाहीत म्हणून मुलगा खूष!'


 इ.कदमांनी कपाळाला हात लावला. गणेशने राजेश,रुपा आणि कुणाल चे मोबाईल नंबर्स आणून दिले.अपेक्षेप्रमाणे राजेश आणि रुपा यांच्या कॉल रेकॉर्ड मध्ये आक्षेपार्ह असे काही आढळले नाही पण कुणालच्या फोनमधील एक नंबर बघून इ.कदम चमकले.त्यांच्या विभागातील कुख्यात ड्रग पेडलरचा नंबर होता तो!वसीम पठाण त्याचं नाव.कुणाल आणि वसीमचा फोनवरून वारंवार संपर्क होत होता हे त्या कॉल रेकॉर्ड वरुन दिसत होते.


इ.कदमांनी बाबू खबरीला कुणालचा पाठलाग करुन तो दिवसभरात काय काय करतो, कोणाला भेटतो याची बित्तंबातमी काढण्याचा आदेश दिला.त्याप्रमाणे बाबू खबरीने कुणालची माहिती काढली आणि इ.कदम कुणाल आणि वसीम पठाणला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचू लागले. तरुण, चपळ पोलिसांची टीम या मोहिमेसाठी सज्ज झाली.बाबूच्या माहितीनुसार कुणाल आणि वसीम पठाण डायमंड हॉटेलमध्ये भेटणार होते.

 

या मोहिमेसाठी पोलिसांनी वेशांतर केले होते.दोन पोलिस पार्सल काऊंटर वर ,दोघेजण सफाई कामगार म्हणून तर दोघेजण वेटर म्हणून तैनात करण्यात आले.हॉटेल मॅनेजरला याची कल्पना देण्यात आली होती.हॉटेलचे कर्मचारी सतत नोकरीत धरसोड करीत असल्याने इतर कर्मचारी वर्गाला वेगळी माणसं बघून काही संशय आला नाही. दुपारचे चार वाजले.टी शर्ट, जीन्स आणि पाठीला सॅक लावलेला कुणाल कोचिंग क्लास मधून बाहेर पडला आणि जवळच असलेल्या डायमंड हॉटेल कडे चालू लागला.त्याच्या मागावर असलेल्या बाबूने इ.कदमांना फोन केला आणि ताबडतोब इ.कदमांनी मोहिमेवर असलेल्या पोलिसांना अॅलर्ट केले.सर्वजण सावध झाले.

 

कुणाल डायमंड हॉटेलमध्ये शिरला आणि कोपऱ्यातील एका टेबलवर बसला.ती त्याची नेहमीची जागा असावी कदाचित. खिशातून मोबाईल काढून त्यात बघण्यात तो गुंग झाला.दुपारची वेळ असल्याने हॉटेलमध्ये तुरळकच माणसं होती.वेटरचा युनिफॉर्म घातलेले शिंदे कुणालच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवू लागले तशी कुणालने डोळे वर करुन विचारले,'आज शंकर नाही आला का?'तशी शिंदे प्रसंगावधान राखून म्हणाले,'त्याला अचानक गावी जावे लागले'त्यावर 'ओके'म्हणत कुणालने परत मोबाईल मध्ये डोके घातले.


हॉटेलमध्ये इ.कदम अशा प्रकारे बसले होते की कुणालचे टेबल त्यांना व्यवस्थित पणे दिसेल.सावकाशपणे चहाचे घोट घेत पण सावधचित्ताने ते बसले होते.फ्रेंच दाढी आणि काळसर काचांचा चष्मा यामुळे निरखून पाहिल्याशिवाय ते इ.कदम आहेत हे कोणाला कळले पण नसते. थोड्याच वेळात वसीम पठाण हॉटेलमध्ये शिरला.त्याचा तो भीमकाय देह आणि डुलत डुलत चालणे यावरून त्याला इ.कदमांनी ताबडतोब ओळखले व इतरांना इशारा केला.त्याबरोबर सर्वजण सावध झाले.वसीम पठाण कुणाल समोरील खुर्चीवर येऊन बसला.पाच मिनिटांत शिंदे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी पाण्याचा ग्लास वसीम समोर ठेवला.'देखो वेटर, ऑर्डर लेनेको थोडी देर के बाद आना,अब हमें जरा बातें करनी हैं', वसीमने सांगितले तशी 'जी साब 'म्हणत शिंदे झुकले आणि बाजूला झाले.


सुर्वे एका खांबाआड दडून कुणाल आणि वसीम चे मोबाईल मध्ये विडिओ शूटींग करत होते.वसीमने एक ब्राऊन पेपरचे पार्सल कुणालला दिले.कुणालने पटकन ते आपल्या सॅक मध्ये घातले.मग वसीमने आपल्या पठाणी ड्रेसच्या खिशात हात घालून दोन हजारांच्या नोटा काढून मोजून कुणालला दिल्या.कुणालने त्या नोटा सॅक मध्ये टाकल्या तोच इ.कदम उठले आणि त्यांनी पुकारले,'वसीम पठाण'त्याबरोबर वसीम चमकला आणि त्याने खिशात हात घातला.त्याचा उद्देश लक्षात येऊन तयारीत असलेल्या पोलिसांनी त्याला ताबडतोब घेरले . ताकदवान असलेल्या वसीमने सुटण्यासाठी खूप धडपड केली पण पूर्ण तयारीनिशी आलेल्या पोलिसांनी त्याला जेरबंद केले.वसीमची झडती घेतली असता त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर मिळाले. या अनपेक्षित धाडीने सुन्न झालेला कुणाल बधीर होऊन बघतच बसला.हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना काही कळायच्या आत पोलिसांनी वसीम पठाण आणि कुणालला गाडीत घातले आणि गाडी पोलिस स्टेशनच्या दिशेने धावू लागली.


वसीम पठाण आणि कुणालला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवले होते.हे इतके अचानक घडले होते की कुणाल अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता.इ.कदम त्याच्यासमोर खुर्चीवर बसले आणि कुणालकडे रोखून पाहिले त्याबरोबर गर्भगळीत झालेला कुणाल पोपटासारखा बोलू लागला. 'सर,अकरावीत माझी ओळख कॉलेज मधल्या मनदीपशी झाली.त्याच्याकडे कायम भरपूर पैसे असत.मित्रांवर तो हवा तसा पैसा उधळत असे.साहजिकच मुलांमध्ये तो फारच पॉप्युलर होता.मी पण त्याच्याकडे ओढला गेलो.त्याच्याकडे इतका पैसा कोठून येतो याबद्दल मला उत्सुकता होती.मग मी त्याला त्याबाबत विचारले असता त्याने माझी ओळख वसीम शी करुन दिली.माझे काम होते वसीम कडून माल घेऊन रामप्रसाद पानवाल्याकडे पोहोचवणे.यात भरपूर पैसे मिळतात म्हणून मी हे काम करावयास तयार झालो.'

 'तू एकटाच हे काम करत होतास की आणखी मुलंही यात आहेत?'

 'सर, माझ्या माहितीतील जिग्नेश,पीटर,हरिश पण हे काम करतात.बाकी आणखी कोणी असेल तर माहित नाही.'

 इ.कदम खोलीबाहेर आले.इतक्या लहान वयात मुलं केवळ पैशाच्या मोहाने असं गुन्हेगारी कृत्य करण्यास धजावतात या विचाराने ते अस्वस्थ झाले होते.

 

'एक मोठं ड्रग्स रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश,'पेपरांमध्ये पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी आली होती.तर'ब्रेकींग न्यूज,ड्रग रॅकेट मध्ये सामील असलेल्या अल्पवयीन मुलांना अटक'अशी बातमी टी.व्ही.वर दिवसभर दाखविण्यात येत होती.

 अशा प्रकारे एका माळ्यावरील अडगळीपासून सुरू झालेले प्रकरण अनेक वळणे घेत समाप्त झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime