Pratibha Tarabadkar

Inspirational Others

3.9  

Pratibha Tarabadkar

Inspirational Others

आव्हान

आव्हान

7 mins
260


आजीच्या स्तोत्र व घंटेचा आवाज ऐकून केतकीने पांघरुणातून डोके वर काढले.चांगलेच उजाडले होते.आईची कामाची लगबग जाणवत होती.बाबाही काहीतरी गुणगुणत फर्निचरची धूळ झटकत होते.केतकीचे मन अपराधी भावनेने भरून आले. नेटवरुन संपर्कात आलेल्या प्रसादच्या मोहाला आपण बळी पडतो काय, त्याला भेटायला गेल्यावर तो भुलवून आपणास मित्राच्या रिकाम्या खोलीवर नेतो काय अन् त्याचा डाव लक्षात आल्यावर आपण कशीबशी सुटका करून घेऊन पोलिस स्टेशन गाठतो काय!सगळंच कसं एखादं दुष्ट स्वप्न पडल्यागत! आपण रात्रभर घराबाहेर राहिल्याने प्रचंड तणावाखाली असलेल्या आई-बाबांनी सर्व शेजारी पाजारी, नातेवाईकांकडे केलेली चौकशी अन् मग त्या लोकांच्या कुतुहलाला तोंड देता देता त्रस्त झालेले आई-बाबा आणि आजी!


केतकीचे मन दुःखाने भरुन गेले. गोगलगायीसारखे तिने अंग आक्रसले आणि पांघरुणात स्वतःला गुरफटून घेत ती पुन्हा विचारांच्या कोषात अडकली. स्वतःला असंख्य वेळा विचारलेला प्रश्न तिने पुन्हा विचारला,'का मी अशी वागले?'

'केतकीकडे लक्ष ठेव. तिला एकटीला राहू देऊ नकोस!'आजीला सूचना देऊन आई-बाबा ऑफिसला निघाले. ऑफिस जवळ आले तसा सुवर्णाच्या, केतकीच्या आईच्या पोटात गोळा उठला.' आता सर्व सहकाऱ्यांच्या नजरा व चौकशी यांना तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे.' लंच अवर होईपर्यंत ती कॉंप्युटरमध्ये डोके खुपसून बसली. लंच अवर झाला अन् आपला डबा तिने उघडला पण खाण्याची इच्छाच होईना.


'हाय सुवर्णा,' तिची जिवलग मैत्रीण वंदना आपला डबा घेऊन आली. तिला पाहून सुवर्णाचा जीव भांड्यात पडला. आपला डबा सुवर्णासमोर ठेवून वंदनाने तिचा डबा घेतला. सुवर्णाचा चेहरा अचानक का आक्रसला म्हणून वंदनाने मागे वळून पाहिले.ऑफिसमधली महाभोचक बाई मनिषा त्यांच्या दिशेने येत होती.


'मनिषा, आम्हाला डिस्टर्ब करू नकोस प्लीज!' हाताने इशारा करीत वंदना म्हणाली. 'बाय द वे तुझ्या सुयशला दारु पिऊन गाडी चालवल्याच्या केसचं काय झालं?' त्याबरोबर मनिषा चपापली आणि तुरुतुरु आपल्या जागेवर पळाली.

'बघितलंस? आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून!'

वंदनाच्या बोलण्याचं सुवर्णाला हसू आलं.

'बर',केतकी कशी आहे आता?'

'अजून पलंगावर पडून असते. मधूनच हुंदके देऊन रडते पण समजावयाला गेले तर तोंडावरचे पांघरुण ही काढत नाही.आम्ही तिला एकटं अजिबात सोडत नाही.'

'सुवर्णा, मी तिला भेटायला येऊ?'वंदनाने विचारले.

'ये,पण ती तुला भेटायला अजिबात तयार होणार नाही.अगं, रात्रभर ती घरी आली नाही म्हणून आम्ही सगळ्यांकडे चौकशी केली तर त्यांच्या हातात कोलीतच मिळालं.फोन करुन,प्रत्यक्ष भेटून सतत चौकशांच्या माऱ्याने आम्हाला अगदी भंडावून सोडले.तेव्हापासून तर ती जास्तच बिथरली आहे.वंदना, तुझ्यासारखे हितचिंतक कमी आणि ‌अशा प्रसंगाची मजा घेणारेच जास्त असतात बघ!'

'म्हणूनच विचारते,केतकीची भेट घ्यायला येत्या रविवारी आले तर चालेल का?'

'ये.तोवर केतकीच्या मनाची तयारी करते.'

'नको, मी अचानकच आले आहे असेच तिला भासवू या.'

'ओके'

दोघी डबा संपवून हात धुण्यासाठी उठल्या.

'केतकी, कोण आलंय बघ तुला भेटायला!'सुवर्णाने हाक मारली तशी समोरच्या पांघरुणाखाली चुळबुळ झाली.जेमतेम डोळ्यापर्यंत पांघरूण खाली आले आणि समोर वंदना मावशीला बघून केतकी धडपडत उठून बसली.

'वंदनामावशी,'केतकीने कसेबसे शब्द उच्चारला आणि तिच्या डोळ्यात आसवं जमू लागली.वंदनाने सुवर्णाला खूण केली तशी सुवर्णा केतकीचे दार अलगद लोटून गेली.

'मावशी, मी अशी कशी वागते गं! माझ्या आई-बाबांना आणि आजीला किती त्रास दिला गं!अशी चूक मी का केली?'

'केतकी, अगं चुका या माणसांच्या हातूनच होतात ना?त्या जर झाल्या नसत्या तर तो देवच नसता का झाला? आणि ही अपराधाची भावना काढून टाक बरं आधी! अगं वेडाबाई, आई-बाबा आणि आजीचं निरपेक्ष प्रेम आहे तुझ्यावर.... तुमच्या भाषेत unconditional love.आणि म्हणूनच त्यांची एव्हढी धडपड सुरू आहे तुझ्यासाठी! आणि झालेल्या चुका उगाळत बसण्याने त्या सुधारतील का अधिक चिघळतील?'

'पण 'त्या दिवसानंतर'मला काही करावेसेच वाटत नाही'केतकी पुटपुटली.


'जे तुझ्या आयुष्यात घडून गेले ते आता भूतकाळात जमा झाले आहे.ती घटना आपण कितीही प्रयत्न केला तरी बदलू शकणार नाही पण त्या घटनेचा परिणाम आपल्या वर्तमान काळावर किती होऊ द्यायचा हे तर आपल्या हातात आहे ना!'

केतकी लक्षपूर्वक ऐकत होती.वंदनामावशी जे सांगत होती ते विचार तिला सर्वस्वी नवीन होते.

'हा प्रसंग म्हणजे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्यावाईट घटनांपैकी एक आहे.आपले संपूर्ण आयुष्य त्यामुळे झाकोळून टाकायचे की नाही हे ठरवणे तुझ्याच हातात आहे.तुला काय वाटतं,अख्खं आयुष्य या एका घटनेने जगणं अशक्य करेल?'

'काहीच कळत नाहीये' मला'केतकी चाचरत म्हणाली.

'निश्चितच थोड्या दिवसांनी याचा मागमूसही रहाणार नाही.पण हां, तुला त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.'

'आता भूतकाळातील नकोशा वाटणाऱ्या घटनेचे चिंतन करायचे सोडून वर्तमानकाळात कशी सकारात्मक ऊर्जा वापरशील आणि भविष्यात कसे उत्तम जगता येईल यावर आपले ल‌क्ष केंद्रित कर.बघ विचार करून.तुझे तुलाच उत्तर मिळेल.'

'चल निघते मी आता,'विचारात मग्न झालेल्या केतकीच्या खांद्यावर थोपटत वंदना उठली.पर्समधून घडी केलेला पांढराशुभ्र ‌कागद काढून केतकीच्या हातात ठेवत वंदना त्वरेने खोलीबाहेर पडली.केतकीने त्या कागदाची घडी उलगडली.वळणदार अक्षरात लिहिलेल्या दोन ओळी त्यात होत्या.

 ' कोण म्हणतं जीवनात फक्त काटेरी डंख आहेत?

डोळे उघडून बघ, उडण्यासाठी फुलपाखरांचे पंख आहेत'


केतकीच्या आसवांनी तो कागद भिजू लागला. वंदना रोजच्या प्रमाणे डबा खाण्यासाठी सुवर्णाजवळ आली तेंव्हा तिला सुवर्णाचा चेहरा उजळलेला दिसला.

'काय जादू केलीस गं केतकीवर?आज कितीतरी दिवसांनी नीटनेटकी होऊन ती टी.व्ही.बघायला हॉलमध्ये येऊन बसली.'

म्हणजे केतकीच्या विचारांचा प्रवास योग्य चाललाय तर!वंदनाने मनात नोंद केली.

'काय उपदेश केलास तिला?'सुवर्णाने हसत हसत विचारले.

'छे ग, उपदेश द्यायला मी काय संत महात्मा थोडीच आहे?'तिला उडवून लावत वंदना म्हणाली.'तिला फक्त दाखवून दिलं की प्रसंग तोच, परिस्थिती तीच पण गरज असते ती फक्त दृष्टीकोन बदलण्याची.त्या प्रसंगाचे भयंकरीकरण न करता त्यावर कशी मात करता येईल याचा विचार करण्याची!'

'आणि त्या कवितेच्या ओळी?'

'अगं व्हॉट्स अप वर आलेल्या ओळी आहेत त्या!'वंदना हसत हसत उठली आणि जाण्यासाठी वळली अन् थबकली.

'बरं, केतकीच्या कॉलेजचे काय?'

'तिचे बाबा प्रिन्सिपॉलना भेटून आले आहेत', सुवर्णा अस्वस्थपणे चुळबुळत होती.तिच्या व.वासाचा वेगही वाढला होता.

'खूप काळजी वाटते गं केतकीची, तिचं आता पुढे कसं होणार,ती शिक्षण पूर्ण करू शकेल का, भूतकाळ कळला तर तिच्याशी कोणी लग्न करेल का, लोक तिची बदनामी करतील का....एक ना अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे रहातात आणि भितीने नुसता थरकाप उडतो.'सुवर्णाचा चेहरा विदीर्ण झाला होता.त्या विचारांनी ती थरथरत होती.


'अगं हो,हो, किती हे प्रश्न!'वंदना तिच्या हातावर थोपटत म्हणाली.'अगं सुवर्णा, पुढच्या क्षणाला काय होणार हे आपण सांगू शकत नाही तर भविष्य काळात काय घडेल त्याचे काल्पनिक भय कशाला? आणि काय गं, भविष्यात फक्त वाईटच घडेल,चांगले घडणारच नाही असं आहे का?'

'बरं,ते जाऊ दे.आपण प्रथम केतकीने कॉलेज अटेंड करायला प्राधान्यक्रम दिला पाहिजे.मी या रविवारी पण येते केतकीला भेटायला.' 

'अगदी जरुर ये.'

यावेळी केतकीच्या खोलीची अवकळा जाऊन अगदी टापटीप झाली होती.केतकीसुद्धा पुष्कळच टवटवीत दिसत होती हे वंदनाने एका दृष्टिक्षेपात जाणले अन् गाडी हळूहळू रुळावर येतेय हे बघून ती मनातल्या मनात खूष झाली.

........................


'मावशी, मला आता खूप बरं वाटायला लागलंय गं,पण प्रसादचा विचार मनात आला की परत उदास वाटतं गं!'

'एक सांगू केतकी,त्या प्रसादला तू माफ कर.'

'काय? कसं शक्य आहे ते?ज्या मुलाने मला फसवले,मनस्ताप दिला, माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांची ज्याच्यामुळे नाचक्की झाली त्याला मी माफ कसं करु? असं बोलवतंच कसं तुला? माझ्या पेक्षा तो जवळचा वाटतो का तुला?'केतकीच्या डोळ्यात आसवं जमू लागली.

'नाही गं बाळा, असं कसं वाटेल मला?'केतकीला प्रेमाने जवळ घेत वंदना म्हणाली.'मी जे तुला सांगतेय ते तुझ्या भल्यासाठीच.'

'माझ्या भल्यासाठी?ते कसं काय?'केतकी आश्चर्यचकित झाली.

'मला‌ सांग,प्रसादची आठवण झाली की तुझ्या मनात काय विचार येतात?'

'मला नं खूप राग येतो.ते सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे रहातात.मन दुःखाने भरुन जातं अन् असं वाटतं की तो समोर आला तर चांगलं काठीनं, लाथाबुक्क्यांनी तुडवून काढावं.'केतकीच्या डोळ्यातील क्रोध,प्रसादबद्दल वाटणारा तिरस्कार वंदनाला वाचता येत होता.

'या विचारांनी तुला आनंदी,ताजंतवानं वाटत असेल नाही?'

'छे ग मावशी, अगदी गळून गेल्यासारखं वाटतं.काहीच करू नये, नुसतं पडून रहावं,जोराने रडावं,किंचाळावसं वाटतं.'

'म्हणजे या नकारात्मक भावनांचा परिणाम कोणावर होतो?त्रास कोणाला होतो?'

'मलाच', केतकी विचार करत म्हणाली.

'मी तुला म्हटलं त्याला माफ कर ते यासाठीच.जी घटना तुझ्या विचार करण्याने बदलणार नाही उलट त्यांच्या नुसत्या आठवणीने आपल्या मनात त्या दुःखद प्रसंगांची पुन्हा पुन्हा उजळणीच होते,त्याच वेदना आपण परत परत अनुभवतो आणि मिळतं काय तर केवळ दुःख, नैराश्य!जी गोष्ट भूतकाळात घडून गेली ती बदलणे जर शक्य नाही तर तिचा विचार करून आपला वर्तमानकाळ का बिघडला? म्हणजेच प्रसादला माफ करणे हे त्यांच्या नव्हे तर तुझ्या हिताचे आहे.'

'खरंय मावशी तू म्हणतेस ते.पण इतकं सोपं आहे का असं माफ करणं?'केतकीचा प्रश्न रास्त होता.

'सोपं नाही पण प्रयत्न केला तर अशक्यही नाही.त्याचा विचार मनात येऊ लागला की जागरूक राहून मन दुसरीकडे वळवावे.ट्राय करुन बघ.मग या घटनेची तीव्रता तुझी तुलाच कमी झालेली जाणवेल.'

'मावशी, मला खूप बरं वाटायला लागलं आहे.मी हे नक्की करु शकेन असा मला विश्वास वाटतो.पण....

'आता पण काय?'

'मी कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या मित्र-मैत्रिणींना तोंड कसं दाखवू?ते माझ्याबद्दल काय म्हणत असतील?'

'तू काही समाजविघातक कृत्य केले आहेस का?'

'म्हणजे?'

'म्हणजे दरोडा,खून, बॉंबस्फोट वगैरे?'

'छे, काहीतरीच काय मावशी!'

'म्हणजे जी घटना घडली ती तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात घडली.त्यात तुझ्या फ्रेंडसचा काही संबंध नाही.बरोबर?'

'हो'

'मग त्यांच्या प्रतिक्रियेचा संबंध येतोच कुठे?'केतकी ही तुझी नाही तर तुझ्या फ्रेंडसची कसोटी आहे.त्यांच्या वागण्यानेच ते भविष्यात तुझे दोस्त रहाणार की नाही ते ठरणार आहे.जी मुलं मुली तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात घडलेल्या त्या केवळ एका घटनेने वागण्यात फरक करणार असतील तर ते तुझे दोस्त कसे? आणि अशा नुसताच फापटपसारा वाढविणाऱ्या मित्र मैत्रिणींपेक्षा अगदी बोटावर मोजता येतील इतकेच पण जिवाला जीव देणारे मित्रच खरे नाहीत का? आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव,जर कोणी त्या घटनेचा गैरफायदा घेऊन फाजिलपणा करायला लागले तर it is none of your business असं खडसावून सांगायला मागेपुढे बघू नकोस.कारण आक्रमकता हे बचावाचे प्रभावी साधन आहे.Attack is the best defence.'मावशी,तू सांगितलेलं सगळं मी नक्कीच लक्षात ठेवीन.'

'शहाणी माझी बाय ती!'म्हणत वंदनाने केतकीचा गालगुच्चा घेतला आणि पर्समधून पूर्वीसारखाच एक कागद काढून केतकीच्या हातात ठेवत ती खोलीबाहेर पडली.केतकीने कागदाची घडी उलगडली.


हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है

मुश्किलोंसे भाग जाना आसान होता है

डरनेवालोंको कुछ नहीं मिलता जिंदगी में

और लडनेवालोंके कदमोंमें जहाँ होता है


केतकीच्या चेहऱ्यावर आता मंद हसू होते. वंदना रात्रीच्या जेवणानंतर आवराआवर करीत होती तोच फोन वाजला.सुवर्णाचा फोन होता.तिच्या स्वरातला आनंद लपत नव्हता.'अगं केतकी उद्या कॉलेजला जायचं म्हणून बॅग भरतेय.थोड्याच वेळात केतकीचा मेसेज आला.

'आयुष्यात येणारी आव्हानं पेलणार आहे मी

मागे वळून न पाहता पुढे पुढेच जाणार आहे मी!

वंदना ने मेसेज वाचून ‌All the best म्हणून शुभेच्छा पाठविल्या आणि खुषीने गाणे गुणगुणत ती अंथरुणात शिरली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational