Savita Tupe

Inspirational

4  

Savita Tupe

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

4 mins
401


   " आई आता छान जमते आहे गाडी चालवायला , आज आपण गाडी घेवून बाहेर रस्त्यावर जाऊ ," मेघा म्हणाली .

 "अग लगेच असं नको रस्त्यावर जायला . समोरून गाडी आली की मला घाबरायला होतं ." 

सुरेखा ताई सुनेला म्हणाली.

नाही हो करत शेवटी या सासू सुनेची जोडगोळी निघाली .

   मेघाने सासूला टू व्हीलर शिकवण्याचा जणू काही विडा उचलला होता .आठ दिवसात सुरेखा ताई बऱ्यापैकी गाडी चालवायला शिकल्या होत्या . सोसायटीच्या आवारात त्या दुपारी आणि रात्री वर्दळ नसताना गाडी शिकत होत्या .सुरवातीला मेघाने मागे बसून त्यांना त्यांचा तोल सांभाळता येईपर्यंत शिकवले मग आता त्या हळूहळू एकट्याच गाडी चालवत होत्या. पण आज रस्त्यावर गाडी न्यायची म्हणल्यावर त्या थोड्या घाबरल्या होत्या .

  मेघा मागे बसली आणि सुरेखा ताई गाडी घेवून बाहेर आल्या . गाडीचे स्पीड कमीच ठेवले , रस्त्यावर आल्यावर त्यांची भीती बरीच कमी झाली .त्या अगदी व्यवस्थित गाडी चालवत होत्या . मेघा पण मनातून खुश झाली की आता आईंना एकटीला सुध्दा गाडी चालवायला जमेल .गप्पा मारत त्या सरळ चालल्याच होत्या तेवढ्यात समोर एक रिक्षावाला अचानक थांबला तसा सुरेखा ताईंनी गाडीला ब्रेक लावला .त्या जागेवर थांबल्या पण मागून येणारी एक गाडी त्यांच्या गाडीवर येवून आदळली .

 मेघाने दोन्ही पाय मागे टेकवून गाडी पडता पडता सांभाळली. मागून आलेली गाडी एक मुलगी चालवत होती .ती मात्र जाम भडकली .म्हणाली , 

 " कशी चालवता गाडी ? असा मध्येच कोण ब्रेक लावते का गाडीला ? "

 मेघा तिला सॉरी म्हणाली आणि सासू नवीन आहे गाडी अजून पूर्ण शिकली नाही , आज पहिल्यांदाच बाहेर आणली वगैरे सांगत होती पण ती मुलगी काही ऐकेना , म्हणाली या वयात काय करायचं आहे गाडी शिकून , देवळात जावून भजन करत बसायचे ना , एखाद्या वेळी चुकून पडलात तर हाडे सुध्दा नीट राहायची नाही ."

 मेघा पण जाम चिडली तिच्यावर , दोघींची चांगलीच जुंपली रस्त्यावर .तरुण रक्त , माघार कोण घेणार ? 

सुरेखा ताईंनी दोघींना कसा बसा आवर घातला , त्या मुलीला जा म्हणाल्या आणि त्यांनी मेघाला पण शांत केले . जाता जाता ती मुलगी परत ," हे काय वय आहे का गाडी शिकायचं ? " हा सल्ला देवून तिथून निघून गेली .

  मेघा गाडी घेवून घरी आली .सुरेखा ताई शांत झाल्या , मेघाच्या लक्षात आले पण तिने नंतर बोलू असे म्हणून सासूला जरा वेळ द्यायचे ठरवले .

  सुरेखा ताईंचा उत्साह मावळला , त्यांनाही वाटायला लागलं की खरंच काय गरज आहे गाडी शिकायची . कुठे जायचं झालं तर रिक्षा आहे , बस आहे .आरामात जाता येईल .आणि खरंच कुठ जाणार आहे मी तरी ? कधीतरी बाहेर पडणार , चालणं व्हावं म्हणून चालतच जाणार मग गाडीची गरज काय ? खरंच उद्या हातपाय तुटले तर कोण सांभाळणार ? नकोच त्यापेक्षा . बस झाल आता हे गाडीचं नाटक . मेघाला पण सांगते आता उद्या नको म्हणून .

   मेघाच्या लक्षात आले की आता आई असाच विचार करत असणार . दोन दिवस गेले पण सुरेखा ताई काही बोलल्या नाही .

   मेघा त्यांच्या कडे गेली . त्या निवांत पुस्तक वाचत पडल्या होत्या . मेघाला बघून उठल्या .

मेघा म्हणाली , " काय झालं आई , एवढ्यातच तुमचा आत्मविश्वास डगमगला ? माणसाचा पहिला स्वतःवर विश्वास असायला हवा मग दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतो ना याला महत्व राहत नाही . गाडी शिकणं खुप क्षुल्लक आहे पण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल . काही गोष्टी दिसायला खुप साध्याच असतात पण त्या आपण आत्मसात करतो तेव्हा त्याचे महत्त्व आपल्याला कळते . तुम्ही शिकलेल्या आहात पण लग्न झाल्या नंतर त्या शिक्षणाचा तुम्हाला काहीच फायदा झाला नाही . आत्ता पर्यंत कधीच बाहेरची कामे केली नाही . आज पर्यंत कधी ती वेळ नाही आली पण आई आम्ही दोन वर्ष इथे नसणार मग इथे ही कामे करायला तुम्ही दरवेळी कोणाला सांगणार ? म्हणून मला असे वाटते की तुम्हाला काही अडचण नको यायला . किती तरी कामे असतात अशी जी आपली आपणच करायला लागतात .म्हणजे बँकेत जाणे , लाईट बिल भरणे , भाजी आणणे , किराणा सामान आणणे, तुमचे दर महिन्याचे रूटीन चेकअप, आणि कधी वाटलच तर गाडीवर फक्त एक चक्कर मारून येणं . मग आपल्या सोबत कोणी नसले तरी काही फरक पडत नाही , गाडी काढली की निघालो ."

 मेघा बोलता बोलता शांत झाली आणि सुरेखा ताईंचे निरीक्षण करू लागली . त्या त्यांच्या विचारत हरवल्या होत्या . डोळ्यात पाणी जमा झाले होते .मेघाने हळूच त्यांच्या हातावर हात थोपटला .

सुरेखा ताई म्हणाल्या , " मेघा , आज तर तू मला माझीच ओळख नव्याने करून दिली आहेस . लग्न झाल्यानंतर तुझ्या सासऱ्यांनी कधी कोणती जबाबदारी माझ्यावर टाकलीच नाही . लग्नाआधी पण एकटीने कधी काही केलं नाही त्यामुळे इथे वेगळं काही वाटलच नाही .पण आता तुम्ही दोघे जाणार आहात तर मला खरंच खूप टेन्शन आलं होतं . खरं तर मी माझ्यातला आत्मविश्वास विसरले होते .मी स्वतः कोणी आहे हेच विसरले होते . मला माझे अस्तित्व ही आहे याची जाणीव सुध्दा विसरले होते . नवरा , घर आणि मुलगा बस माझे अस्तित्व त्यांच्यातच गुरफटले होते . पण तू मला जगण्याची वेगळी वाट दाखवून दिली आहेस . तू माझी मुलगी आहेस म्हणण्यापेक्षा मला जगण्याची वाट दाखवणारी माझी मार्गदर्शक , माझी गुरू आहेस . तू आणि रोहन निश्चिंत मनाने लंडनला जा मी इथे सगळं सांभाळून घेईन , तू हे नव्या पिढीचे नवे तंत्रज्ञान शिकवून मला अगदी २१ व्या शतकातली कर्तबगार महिला बनवले आहेस . माझ्यातला निद्रिस्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागवला आहे . आता या नव्या युगात वावरताना मी जराही अडखळणार नाही . खरंच तुला खुप मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा ! "

 मेघा मात्र कौतुकाने सासूचे आत्मविश्वासाने भरलेले हे अनोखे रूप अगदी भारावल्या सारखी होवून बघत होती .तिला आता सासूला एकटं सोडून जाताना जराही काळजी वाटणार नव्हती . प्रश्न फक्त दोन वर्षाचा जरी होता तरी आपली सासू आता एकटी सारं काही सांभाळू शकेन असं तिलाही विश्वासाने वाटत होतं .



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational