Nagesh S Shewalkar

Comedy

2  

Nagesh S Shewalkar

Comedy

आली रे आली...

आली रे आली...

9 mins
69


     आली रे आली...

"आली का? आली का रे?""

आली रे... आली! आली रे ...आली!"

"कोण आली रे?"

"चला रे चला. तिला भेटायला जाऊया..."

"येऊन... येऊन येणार कोण? कोरोनाच्या लसीशिवाय दुसरे कोण?"

"आली रे आली.... कोरोनाची लस आली..." अशा घोषणांनी त्या नगरातील तो प्रभाग दणाणत होता. कोण करीत होते या अशा आगळ्यावेगळ्या मोर्चाचे नेतृत्व? कुणाच्या सांगण्यावरुन तो जमाव मोठ्या उत्साहाने, जोरजोरात घोषणा देत निघाला होता. आवेशू पोटसुटे या नगरसेवकाच्या संकल्पनेतून तो जमाव कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला निघाला होता. रस्त्याने जाताना घोषणांच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष घराघरात जाऊन सर्वांना लस घ्यायचे आमंत्रणही देण्यात येत होते...

       आवेशू पोटसुटे हे त्या वॉर्डाचे नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी म्हणजे अगदी कोरोनाच्या काळातही महानगरपालिकेच्या निवडणुकीत आवेशू प्रचंड मतांनी विजयी झाले होते. त्यापूर्वी दोन वेळा त्यांचा प्रभाग त्यांच्या जातीसाठी आरक्षित नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता कारण वॉर्ड, नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची पद्धत अस्तित्वात येईपर्यंत अगोदर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांच्या घराण्यातील कुणी ना कुणी व्यक्ती सदस्य म्हणून सातत्याने निवडून येत होता. स्वतः आवेशू पोटसुटे हे दोनवेळा त्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे मागची दहा वर्षे आरक्षणाच्या माध्यमातून इतर कुणीतरी नगरसेवक पदावर निवडून आल्यामुळे नाइलाजाने आवेशूंना घरी बसावे लागले होते.

     शेवटच्या वेळी महानगरपालिकेची मुदत संपली परंतु कोरोनामुळे निवडणुका वेळेवर होतात की नाही ही चिंता सतावत असताना निवडणुका जाहीर झाल्या आणि आवेशूंसाठी अत्यानंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा प्रभाग त्यांच्या जातीसाठी सुटला. आवेशू यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग एकादृष्टीने सुकर झाला. अपेक्षेप्रमाणे आवेशू पोटसुटे यांचा दणदणीत विजय झाला. नगरसेवक होताच पोटसुटे यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला तो म्हणजे प्रभागातील प्रत्येक नागरिकाला त्यांनी मास्क स्वखर्चाने पुरवले. विशेष म्हणजे त्यांची निवडणूक निशाणी 'मास्क' होती. होय!पोटसुटे यांनी त्यांचे सारे पूर्वज आणि ते स्वतः ज्या पक्षाचे सदस्य होते त्या पक्षाने तिकीट नाकारले म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. वास्तविक पाहता प्रचाराच्या काळातच ते मतदारांना मास्क देण्याच्या विचारात होते परंतु त्यांचा एक वकील मित्र म्हणाला,

"तसे काही करु नको. तुझे अनेक राजकीय विरोधक आहेत. कुणी निवडूक आयोगाकडे तक्रार केली तर निष्कारण निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती."

मात्र निकाल जाहीर होताच आवेशू यांनी घरोघरी मिठाई न पाठविता मास्कच पाठविले होते.

         कोरोनाचा काळ संपत नव्हता आणि कोरोनामुळे प्रभागातील कामांना गती येत नव्हती. असे चाललेले असताना कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा शोध लागला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. आवेशू पोटसुटे यांनाही खूप आनंद झाला. त्या नूतन लसीचा शुभारंभ त्या शहरात सर्वप्रथम आपल्या प्रभागातून व्हावा यासाठी आवेशू यांनी जंग जंग पछाडले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु त्यांना त्यात यश आले नाही कारण ते अपक्ष नगरसेवक होते. परंतु आवेशू पोटसुटे हार मानणारांपैकी नव्हते. त्यांनीही प्रतिज्ञा केली की, लसीचा पहिला डोस माझ्याच प्रभागात दिला जाईल. त्यासाठी त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य खात्याशी अनेकदा संपर्क साधला. अर्ज दिले, विनंत्या केल्या पण छे! त्यांना यश येत नव्हते.

     त्यादिवशी नेहमीप्रमाणे त्यांच्या भल्यामोठ्या अंगणातील बागेमध्ये आवेशू यांचा प्रभागातील काही ठराविक कार्यकर्ते, जाणते नागरिक, मित्रमंडळी यांच्यासोबत सकाळी सकाळी गप्पांचा फड रंगला होता. विषय आणि मुद्दा एकच होता... कोरोना लस! प्रभागातील जणू सारे प्रश्न बाजूला पडले होते आणि कोरोना लस हा एकमेव प्रश्न समोर उभा टाकला होता.

"आवेशू, काय झाले त्या लसीचे? अरे, आपण इथे गप्पा ठोकत बसू आणि तिकडे कुणीतरी लसीचा पहिला डोस पिऊन मोकळा होईल."

"नाही. असे होणार नाही कारण काहीही झाले तरी लसीचा शुभारंभ आपल्याच वॉर्डात होईल. अपक्ष नगरसेवक नसतो ना तर आतापर्यंत आपल्या वॉर्डाचे शंभर टक्के लसीकरण करून मोकळा झालो असतो..."

"अहो, मग नगराध्यक्षांना पाठिंबा जाहीर करा की.."

"तेही झाले. कालच त्यांच्याशी बोललो पण त्यांच्या पक्षाला महानगरपालिकेत प्रचंड बहुमत आहे त्यामुळे त्यांना आपल्या मताची काही किंमत नाही. राज्याचे आरोग्य मंत्री, देशाचे आरोग्य मंत्री यांच्याशीही बोलणे झाले पण कुणीही दाद देत नाही. लस घेऊन येणारा ट्रक आपल्या शहरात दाखलही झाला आहे. केव्हाही लसीकरण सुरू होईल. काय करावे ते समजत नाही."

"अहो, मग त्या 'हू' शी संपर्क साधा की. तिथूनच आरोग्याचा सारा कारभार चालतो ना, त्या संस्थेने आदेश दिल्यावर नाही म्हणायची कुणाची ताकद आहे?"

"अहो, आपल्या देशाने लस तयार करून आणि इतर अनेक देशांना ती लस मोफत पाठविल्यामुळे ती जागतिक आरोग्य संघटना आपल्या देशाला तसे काही करायला सांगेन असे वाटत नाही."

"पोटसुटे, एक काम करा. आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते पहिली लस पाजण्याचा कार्यक्रम ठेवा. पंतप्रधान आनंदाने येतील."

"झाला. तोही प्रयत्न झाला. पण सध्या कोरोना काळ असल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट नकार आला आहे..." आवेशू पोटसुटे बोलत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावरील नाव पाहून खुर्चीवरून उठून पोटसुटे थोडे बाजूला गेले. काही क्षणातच ते बोलत बोलत पुन्हा आसनाकडे निघाले. जमलेल्या लोकांना थम्सअप् करीत म्हणाले,

"नाही. काहीच होणार नाही. काळजी करू नका. ओके. धन्यवाद!"

खुर्चीवर बसत म्हणाले,

"अरे, पाहता काय असे? उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या प्रभागात कोरोना लसीचा शुभारंभ करायचा आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयाने, आरोग्य विभागाने मदत केली नाही. शासकीय लस मोफत आहे म्हणतात पण ती आपल्यापर्यंत कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून एका खाजगी रुग्णालयाशी दोन दिवसांपासून संपर्कात होतो. त्यांनी लस तयार करणाऱ्या कारखान्याशी संधान बांधले आणि शासनाकडे जाणाऱ्या लसी आपल्या प्रभागात देण्यासाठी विकत घेतल्या... चक्क दोन हजार रुपयाला एक लस..."

"पण भाऊ, एवढी रक्कम..."

"आले लक्षात. घाबरु नका. कुणालाही एक रुपया खर्च करावा लागणार नाही. मी काय ते पाहून घेईन..."

"तरीही दादा, एवढी रक्कम तुम्ही देणार म्हणजे..."

"काळजी करु नका. 'नगरसेवक पद कायम, चौपट वसूल करु दाम!' महानगरपालिका आहेच ना. ते जाऊ द्या. उद्या सकाळी आपल्या शाळेच्या पटांगणात उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे."

"अभिनंदन, दादा! तुम्ही म्हणजे ना, बस्स! पण दादा, शुभारंभ कुणाच्या हस्ते करायचा? जो कुणी उद्घाटन करेल त्याला लस घ्यावी लागणार ना?"

"आता यावेळी... तो नगराध्यक्ष नक्कीच येणार नाही कारण त्याच्या नाकावर टिच्चून आपण हा कार्यक्रम घेत आहोत..."

"भाऊ, मी काय म्हणतो? कशाला कुणाला मस्का लावायचा? एवढा मोठा विरोध असताना तुम्ही हा विजय ... होय! विजयच की! राज्याच्या, देशाच्या आरोग्य खात्याशी पंगा घेणे ही फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा ह्या लसीकरणाचा शुभारंभ तुमच्याच शुभ हस्ते व्हायला हवा. का हो, मी बरोबर बोलतोय ना?" पोटसुटे यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने इतरांना विचारले.

"एकदम बरोबर! 'करून करून करणार कोण?लसीचे उद्घाटन करणार कोण?"

"आवेशूभाऊंशिवाय आहेच कोण?" त्याला जोरदार साथ मिळाली. आवेशू पोटसुटे यांनी सर्वांच्या आग्रहखातर लसीकरणाचा शुभारंभ करण्याचे मान्य केले. सर्वांना योग्य त्या सूचना देत कार्यक्रमाचे नियोजन करून ते स्वतः कामाला लागले.

      त्याच रात्री दवाखान्याच्या परिसरात अनेक तंबू ठोकण्यात आले. पाण्याची व्यवस्था करण्यात आली. लस घ्यायला रांगा लागू नयेत, प्रत्येकाला काही क्षणात लस मिळावी म्हणून दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करायला लावली. सकाळी लस घ्यायला येणारांसाठी नाष्टा तर दुपारी येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पहिली लस टोचून घेऊन आवेशू पोटसुटे हे स्वतः उद्घाटन करणार होते.

         दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासूनच कार्यकर्ते पोटसुटे यांच्या निवासस्थानी जमत होते. पोटसुटे यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी प्रभागातील लोक जागे होत होते. बरोबर सात वाजता आवेशू पोटसुटे हे अत्यंत आकर्षकरितीने सजवलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये सहकुटुंब सहपरिवार विराजमान झाले आणि तो जत्था विविध घोषणा देत लसीकरणाचे उद्धाटन करण्यासाठी शाळेच्या दिशेने निघाला...

        "आली रे... आली! आली रे ...आली!"

"कोण आली रे?"

"चला रे चला. तिला भेटायला जाऊया..."

"येऊन ... येऊन येणार कोण? कोरोनाच्या लसीशिवाय दुसरे कोण?"

"आली रे आली.... कोरोनाची लस आली..." अशा घोषणांनी तो प्रभाग दणाणत होता. सोबतचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदानासाठी मतदारांना बाहेर काढावे त्याप्रमाणे आबालवृद्धांना लस टोचून घेण्याचे आवाहन, विनंती करीत होते. मिरवणुकीत सहभागी असलेल्या अनेक लोकांनी मास्क घातले नव्हते. ते पाहून त्यांना कुणीतरी विचारत असे,

"का हो, मास्क घातला नाही का?"

"आता मास्कची काय गरज आहे? लस घ्यायची तर आहे. आता कुणाच्या संपर्कात आलो तरी काही मिनिटात लस घेतली की, मग कोरोना होणारच नाही. आता नो मास्क! नो सोशल डिस्टन्स!! आता पूर्वीप्रमाणे हातात हात, गळ्यात गळा घालून मिरवणार हा भोळा!!!..."

     आवेशू पोटसुटे यांच्या घरापासून लसीकरणाचे ठिकाण कितीही रमतगमत गेले तरी पाच मिनिटांच्या अंतरावर होते पण ती मिरवणूक पोहोचायला तब्बल एक तास लागला. ट्रॅक्टरमध्ये उभे राहून लोकांना हात जोडून लस घ्यायला चला अशी विनंती करणाऱ्या आवेशू यांचे घरोघरी सुवासिनी ओवाळून तर लोक पुष्पहार घालून स्वागत करीत होते. प्रभागातील नागरिकांनी घरासमोर सडा टाकून, रांगोळ्या काढून, गुढ्या उभारून स्वागताची जंगी तयारी केली होती. लोक मिरवणुकीत नाचत होते, गात होते, घोषणा देत होते. एका घरापुढे काढलेल्या रांगोळीमध्ये तर कोरोनाच्या विषाणूमागे चार- पाच लसींचे चित्र काढले होते. याचा अर्थ त्या लसी विषाणूला पळवून लावत आहेत...

      साडे आठ वाजत असताना मिरवणूक लसीकरण केंद्रात पोहोचली. तिथेही सर्वांनी पोटसुटे यांचे स्वागत केले. आवेशू पोटसुटे यांनी विधिवत लस ठेवलेल्या पेटीची पूजा केली, नारळ अर्पण केला. लस टोचण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. पहिली लस टोचून घेण्याचा मान अर्थातच आवेशू पोटसुटे यांना मिळाला. त्यांची लस टोचून होताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले. पुन्हा एकदा नाचगाणे, घोषणा झाल्या. हळूहळू लोक येत होते. लस टोचून घेत होते. लस घेऊन दोन-तीन तास झाल्यानंतरही त्या व्यक्तिला काही त्रास होत नाही ना याची खातरजमा करून लोक दुपारी बारानंतर मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रात येत होते. कार्यकर्तेही मतदानासाठी घरातील शेवटचा माणूस बाहेर काढावा त्याप्रमाणे एकूणएक लहानमोठ्या माणसाला लस टोचण्यासाठी आणत होते. दरम्यान प्रसारमाध्यमांचा मोर्चा त्या लसीकरण केंद्राकडे आणि पर्यायाने आवेशू यांच्याकडे वळला. पोटसुटे यांच्यासह कार्यकर्ते, दवाखान्याचे कर्मचारी, लस घेतलेल्या व्यक्ती या सर्वांच्या मुलाखतींचे रवंथ दिवसभर चालू होते. विशेष म्हणजे लसीकरण केंद्रात काही कार्यकर्त्यांनी एक मोठे खोके ठेवले होते. लस घेताच मास्क जवळ न ठेवता त्या खोक्यात टाकण्याची विनंती कार्यकर्ते करीत होते. लसीकरण केंद्राच्या परिसरात काही शीघ्र कवींचीही मैफल जमली.

एक म्हणाला,

"अरे, बघतोस काय द्वेषानं

लस टोचून घेतलीय सिंहानं!"

   लगेच दुसरा वदला,

"बघतोय तुला कौतुकानं

हा वाघही लस घेणार हौशीनं!"

        सायंकाळचे सहा वाजत असताना प्रभागातील एकूणएक नागरिकांना अर्थात शंभर टक्के लसीकरण करून दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांना वाजतगाजत निरोप देण्यात आला. पोटसुटे यांनी प्रत्येकाला बंद पाकिटातून मानधन दिले. सारे खुशीखुशीने परतले.

     आवेशू पोटसुटे यांच्या प्रभागातील लसीकरणाला पंधरा दिवस झाले. कुणालाही लसीचा दुष्परिणाम जाणवला नाही. सारे व्यवस्थित आहेत हे पाहून आवेशू आणि सारे आनंदी होते. परंतु हळूहळू कुणाला खोकला, कुणाला ताप, कुणाला थंडी, कुणाला अंगदुखी अशी नानाविध लक्षणे जाणवत होती. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. औषधोपचार घेऊनही फरक पडत नव्हता. सारे हैराण झाले. काही व्यक्तिंनी कोरोनाची तपासणी केली. महत्त्वाचे म्हणजे या लक्षणातून आवेशू कुटुंबीयही सुटले नाही. आठ दिवस झाले तरी आवेशू यांचा ताप शंभरीहून खाली येत नव्हता. रातोरात आवेशूंनी कुटुंबीयांना घेऊन मुंबई गाठली. काही दिवसांनी सर्वच प्रसार माध्यमांनी एक बातमी प्रसारित केली...

   'धक्कादायक बातमी! कोरोनाची प्रतिबंधक लस दिल्यानंतर अनेक नागरिकांना आजाराने वेढले होते त्यापैकी बहुतेक नागरिकांचे तपासणी अहवाल सकारात्मक आले असून धक्कादायक बातमी म्हणजे ज्यांनी पुढाकार घेऊन हे लसीकरण घडवून आणले होते ते नगरसेवक आवेशू पोटसुटे हे स्वतः कोरोना सकारात्मक असून त्यांचे अख्खे कुटुंबही कोरोनाग्रस्त म्हणून पुढे आले आहे. मुंबई येथील एका महागड्या दवाखान्यात आवेशू कुटुंबीयावर इलाज सुरू असून स्वतः आवेशू यांची प्रकृती चिंताजनक आहे.

    आमच्या बातमीदाराने मिळविलेल्या माहितीनुसार लस घेण्याच्या दिवशी लस घेणारांनी आपल्याजवळ असलेल्या मास्कची सामुदायिक होळी केली होती. विशेष म्हणजे आपल्या प्रभागातील एकूणएक मास्कची होळी नगरसेवक पोटसुटे यांनी पेटवली होती. मास्क न वापरल्यामुळे, एकमेकांना हस्तांदोलन करून आनंदातिशयाने आलिंगन दिल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा अंदाज संबंधितांनी वर्तवली आहे...'

   अशा आशयाची बातमी प्रसारित होत असतानाच एका वाहिनीने 'ब्रेकिंग न्यूज' देताना सांगितले, 'नगरसेवक आवेशू लसीकरण मोहिमेची एक अत्यंत धक्कादायक माहिती आमच्या हातात आली असून लसीकरणाच्या दिवशी दिलेल्या सर्व लसी ह्या कोरोना प्रतिबंधक लस नव्हत्या तर त्यादिवशी टोचलेले एकूणएक इंजेक्शन हे शक्तीवर्धक होते. कोरोना प्रतिबंधाशी त्या लसींचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यानंतर नागरिकांनी कोणतीही काळजी घेतली नाही. लस घेतली आता कोरोना काय करणार अशा समजुतीमध्ये लोक ताळतंत्र सोडून वागले आणि त्यातून कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव झाला...'

   त्याचवेळी दुसऱ्या वाहिनीने बातमी दिली,

'कोरोनाची लागण केवळ आवेशू यांच्या प्रभागात झाली नसून संपूर्ण शहर कोरोनाग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे. लसीकरण करणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे...'

                                           ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy