Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

आजार कानी उपचार नयनी

आजार कानी उपचार नयनी

18 mins
201


      गोपाळराव दिवाणखान्यात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. मध्येच स्वयंपाकघराकडे बघत होते, पण तिकडून त्यांना अपेक्षित आवाज न येता वेगळी खुडबुड ऐकू येत होती. जीव कासावीस झालेल्या अवस्थेत गोपाळरावांनी स्वतःचे बुड काही क्षण दिवाणवर टेकवले, परंतु त्यांना चैन पडत नव्हते. ते उठले. तरातरा स्वयंपाकघरात पोहोचले. पहातात तर यांची पत्नी कसला तरी शोध घेत होती.

"बायको, अहो, बायकोजी..."गोपाळरावांनी आवाज दिला.

"समजले मला. तुम्ही आल्याची चाहूल लागली. मी काही भजी तळून खात नव्हती तर तुमच्यासाठी चहा करण्यासाठी 'शुगर फ्री' गोळ्यांची बाटली शोधत होती. बहुतेक स्टॉक संपलाय."

"अगं, चांगलेच झाले की. साखर टाक ना. चहाची वाट पाहून पाहून रक्तातील साखर कमी झाली असणार. शिवाय किती महिने झाले गं साखरेचा चहा घेतलाच नाही." गोपाळराव विनवणीच्या स्वरात म्हणाले.

"काऽय? महाराज, दिवस म्हणा दिवस. महिने कशाचे आले?" बायको म्हणालीः

"तेच ते. दिवस-दिवस म्हणता महिना होतो की. तू म्हणतेस तर दिवस. कित्ती..."

"अहो, परवा म्हणजे गुरुवारीच तर तुम्ही साखरेचा चहा घेतलात हो. त्यादिवशीही असाच वाद घातलात. काय तर म्हणे उपासामुळे साखरेचे प्रमाण कमी झालेय."

"होते गं, होते. बरे, मला सांग आज सोमवार ना? शुक्रवारी चहा घेतला बिनसाखरेचा. शनिवारी साखर न टाकता चहा दिलास. बरोबर? काल रविवारी अगदी सपकसार..."गोपाळराव बोलत असताना बायको पटकन म्हणाली,

"सपकसार कशाचा आलाय, गोपाळराव ? चांगल्या दोन गोळ्या घातल्या होत्या."

"दोन टाक किंवा चार टाक. त्याला साखरेची चव येणार नाही. साखर ती साखरच! मला सांग, गोळ्या शोधण्यासाठी घाम गाळण्यापेक्षा दोन चमचे साखर टाकली असती तर बिघडले असते का? सव्वा चार वाजताहेत अजून लाईटरने गॅसचे चुंबन घेतले नाही." गोपाळराव बायकोकडे बघत म्हणाले.

"अहो, चुंबन सम्राट, सव्वा चार नाही हो. आत्ता चार वाजून सात मिनिटे झाली आहेत." बायको मंद मंद हसत म्हणाली.

"चहा होईपर्यंत चार वाजून पंधरा मिनिटे होतील. बरे, असे कर ना गं, ऐवीतेवी चहाला उशीर झालाच आहे आणि तू भज्याचे नाव काढले आहेसच. म्हणजे भजे खाण्याची तुझी इच्छा दिसते आणि भजे म्हणता क्षणी तोंडामध्ये लाळेचे तळे साचलेय, जीभ सुसाटपणे विहार करतांना सर्व दातांना भजे खाण्याचे आमंत्रण देत सुटलेय. बिच्चारे दात कांद्याचे खमंग, चमचमीत भजे खायला मिळणार म्हणून स्वत:च स्वतःला घासून घेतात..."

"अहो, करून-करून माझाच भज्जा व्हायची वेळ आलीय."

"छट्! तुझा भज्जा झाला तरी त्यास असली भज्याची चव येणार नाही गं....ए.. प.. प्ली.... प्लीज..."

"काय सांगावं बाई या माणसाला. वयाची एकसष्टी झाली. लग्नाची चाळीशी उलटली तरी तुमचा हट्टीपणा जात नाही."

"कसा जाईल ग? अशी सुगरण, स्वयंपाककृत्यदक्ष, पन्नाशीतही एखाद्या षोडशेला लाजवेल अशी सौंदर्यवती बायको असतांना..."

"पुरे. पुरे. एखादी गोष्ट मनात आली की ती समोरच्या माणसाकडून कशी करून घ्यायची याबाबतीत तुमचा हात कुणी धरणार नाही. भज्जी तर भज्जी। माझे काय, पण उद्या कोलेस्ट्रॉल वाढले,बी.पी. वाढले तर मला सांगू नका. आता बाहेर जाऊन बसा."

"ये हुई ना बात! त्या वटसावित्रीमुळे एक मात्र छान झाले..."

"आता हा लाडीगोडी लावण्याचा कोणता नवीन प्रकार सुरू केला आहे?"

"दरवर्षी हाच पती जन्मोजन्मी मिळावा अशी तू वडाला प्रार्थना करतेस त्याची ही दुसरी बाजू..."

"दुसरी बाजू? कोणती?"

"अगं, अर्धांगिणीबाई, तुम्ही बायका व्रत करून, प्रार्थना करून हाच पती सात जन्म मिळवता पण आम्हा पुरूषांना मात्र कोणतीही पूजा न करता, अगदी हात न जोडता ती पत्नी जन्मोजन्मी मिळते त्याचे काय? माझ्या दृष्टीने अजून एक फायदा म्हणजे तू दर जन्मात पत्नी असणार म्हणजे माझ्या जीभेचे चोचले प्रत्येक अवतारात पुरवले जाणार..."

"आणि हे भयंकर आजार दर जन्मी वसतीला असणार...'' नवरा-बायकोचा संवाद रंगात आलेला असतांना बाहेरून आवाज आला,

"गोपाळराव आहेत का?"

"अरे, हा तर सुदामरावांचा आवाज. हे कधी आले मुंबईहून?" असे बडबडत गोपाळराव दिवाणखान्यात येईपर्यंत सुदामराव आत येऊन डोक्यावरची टोपी काढून घाम पुसत बसले होते.

"सुदामराव, व्हाट अ प्लेझंट सरप्राइझ! केंव्हा आलात? एक मात्र झाले, तुम्ही अगदी वेळेवर आलात. अहो, गरमागरम कांद्याचे भजे होत आहेत." गोपाळराव म्हणाले.

"व्वा! भजी म्हणजे जीव की प्राण हो. पण आज भजे कसे?" सुदामरावांनी विचारले.

"काही विशेष नाही. दोनच जीव राहतात इथे. आली लहर केला कहर...भज्यावर ताव मारण्याचा हो." गोपाळराव हसत म्हणाले.

"गोपाळराव, तुमच्या आग्रहाखातर एखादाच भजा घेईन हं. अहो, उच्च रक्तदाब आहे. धोक्याची पातळी ओलांडून वाहणाऱ्या नदीप्रमाणे कोलेस्ट्रॉल कायम भरतीवर असते. तुमची कशी आहे तब्येत?"

"छट् काय ताकद आहे आजाराची, माझ्या घराच्या परिसरातही येण्याची? तुम्हाला आठवतच असेल फार वर्षांपूर्वी शुटींग चालू असतांना अमिताभ बच्चनला भयंकर मोठा अपघात झाला होता. त्याच्या जीवाला धोका असतांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटून बच्चन असलेल्या दवाखान्याच्या परिसरात न येण्याबाबत प्रत्यक्ष यमालाही दम भरला होता. तशीच धमकी मी आजारांना देऊन ठेवलीय."

"असे आहे तर, मला वाटते आजाराना प्रतिबंध करणारी एखादी लक्ष्मणरेषा आखली की काय?"

"कशाला यमाला धमकी नि कशाची आलीय लक्ष्मणरेषा. सुदामराव, एक आजार आहे म्हणून सांगू?"

"मला मुंबईला जाऊन तीन वर्षे झाली. त्यावेळी तुम्हाला हातपाय दुखण्याचा प्रचंड त्रास होता. आता कसे आहे?"

"जाग्यावर आहेत. काही त्रास नाही. पण मधली ती चारपाच वर्षे कशी काढली ते माझे मलाच माहिती."

"फरक पडला ते उत्तम झाले. कुणाची औषधी घेतलीत?"

"ते मात्र, छातीठोकपणे नाही सांगता येणार. आरोग्य विभागात जेवढ्या शाखा असतील त्या शाखेतील ... म्हणजे ऑलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी यासह ते नुरानी..."गोपाळराव सांगत असताना सुदामराव हसत म्हणाले,

"गोपाळराव, युनानी दवाखाना म्हणा, नुरानी चेहरा असतो."

"व्वा! सुदामजी व्वा! साठी ओलांडली तरी अजून तो चाळीस वर्षांपूर्वीचा नुरानी चेहरा आठवतोच का ?"

"वो कोई भचलने वाली बात है, गोपालजी ? उसे देख देखकर तो जी रहें है... शान से!"

"व्वा! आप के शायराना अंदाज को हमारा सलाम! तर अॅलोपथीचे किती डॉक्टर झाले लक्षात नाही. सात आठ आयुर्वेद दवाखान्याच्या पायऱ्या चढून झाल्या. होमिओपॅथीचे पाच-सहा डॉक्टर झाले. एका पाहुण्याने सांगितले म्हणून सोलापूर गेलो. तिथे होमिओपॅथीचे एक डॉक्टर होते. पाहुण्यांकडे दोन-तीन जणांना त्यांचा चांगला गुण आल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्या डॉक्टरांनी पंधरा दिवसांसाठी सात-आठ प्रकारची पाच हजार रुपयाची औषधी दिली. वारीला जावे त्याप्रमाणे सोलापूरला दर पंधरा दिवसांनी सहा महिने गेलो पण आजार कमी झाला नाही. शेवटी जाणेच सोडून दिले. तुम्ही म्हणता त्यामाणे नुरानी चेहरा असलेल्या एका युनानी डॉक्टर कडून औषधी घेतली. झाडपाला देणाऱ्या दोन डॉक्टरांनी दिलेला पालापाचोळाही घशाखाली ढकलला. वमन झाले. पंचकर्म झाले, रेचकही झाले. ट्रॅक्शन, एक्स रे, एमआरआय, सी.टी.स्कॅन, फिजीओथेरपी... अजून काय-काय झाले ते विचारू नका. हिचे जप-तप-व्रत, पूजापाठ, नवसे-सायास, उपास-तापास सारे-सारे झाले. एका वैद्याने तर चक्क एका वेळी वीस-वीस फटके मारले हो.पण कशाचाही उपयोग झाला नाही. नवीन काही उपचार सुरू केला की एक-दोन दिवस चांगला फरक वाटे, परंतु पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न! तीळमात्र आराम तो नाही. एकदा तीर्थयात्रा करत-करत दिल्ली मुक्कामी असतांना असह्य दुखणे सुरू झाले. मुक्कामाशेजारी असलेल्या एका डॉक्टरने हाय पॉवर, किंमतीने भारी अशी गोळी दिली. कुणी कॅल्शियमच्या गोळ्या, कुणी डी व्हिटॅमिनच्या गोळ्या, कुणी मल्टी व्हिटामिन, कुणी बी-१२ च्या गोळ्या दिल्या, पण उपयोग शून्य! पथ्यपाण्याचेही तसेच. जो जे सांगेल ते जेवणातून आणि जीवनातून दूर केले. मध्यंतरी पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अकोला... 'जिथे जाऊ तिथली औषधी खाऊ' म्हणजे हमखास गुण येतो असे तिथल्या पाहुण्यांनी छातीठोकपणे सांगितल्यावरून गावोगावीच्या डॉक्टरांना दाखवून झाले पण काडीचाही फरक नाही. मल्लमं झाली, पन्नास-एक प्रकारच्या तेलाच्या बाटल्या झाल्या ..."

"गोपाळराव, खूप सहन केले हो तुम्ही. शेवटी कोणते औषध लागू पडले?"

"खरे सांगू का, सुदामराव? एकूण एक सारी औषधी बंद केली. कोणत्याच डॉक्टरकडे जायचे नाही असा निश्चय केला. शेवटचा उपाय म्हणून एके दिवशी सकाळीच उठलो. नऊ-साडेनऊला एका होमिओपॅथीच्या दुकानात गेलो. त्याला फाईल दाखवली आणि काकुळतीने म्हणालो,

"बाबा रे, ही जी सारी औषधी घेतलीय त्याव्यतिरिक्त कोणती औषधी घ्यायची शिल्लक असेल तर दे. त्याने मला बसायला सांगून सारी पुस्तके चाळली, आलमाऱ्या धुंडाळल्या. शेवटी एका प्रकारची गोळी आणि एक पातळ औषध दिले. तिथून निघालो. रस्त्यात एक मोठे आयुर्वेदिक औषधालय दिसले. तिथे गेलो. त्यालाही सारे ऐकवले. त्यानेही तोपर्यंत कुणीच न दिलेल्या गोळ्या, औषधी आणि काढे दिले. ते घेऊन घरी निघालो. काही अॅलोपंथीचे मेडिकल दिसले. वेगळ्याच तिरमिरीत तिथे शिरलो. त्यालाही सारे ऐकवले. तो म्हणाला,

"अहो, काका सोपा आजार आहे. डॉक्टरांनी बाऊ केलाय. तुम्ही तर पार दिल्लीवर स्वारी करून आला आहात. तेव्ह म्या पामराने काय द्यावे? पण आहे, एकदम स्वस्त परंतु जबरदस्त परिणाम करणारी गोळी आहे. शेवटी त्याने दिलेली गोळी घेऊन घर आलो. दुसरे दिवशी..." गोपाळराव सारे सविस्तर सांगत असतांना त्यांची पत्नी हातात गरमागरम भज्यांच्या बश्या घेऊन येत म्हणाली,

"अहो, भावोजी प्रवासातून थकून भागून आले असतील आणि तुम्ही त्यांना रडकथा काय ऐकवता? कसे आहात, भाऊजी? घ्या गरमागरम भजी."

"सकाळीच आलो. गोपाळराव ची भेट घ्यावी म्हणून आलो आणि कांद्याच्या भजीचा पाहुणचार मिळाला. मी थकलो वगैरे नाही. ते त्यांचे अनुभव सांगत आहेत. तुम्ही कशा आहात ?"

"एकदम मजेत. आरामात घ्या. अजून आणते." म्हणत त्या आत गेल्याचे पाहून गोपाळराव म्हणाले, "दुसरे दिवशी सकाळपासूनच औषधी सुरू केली. सकाळी उपाशीपोटी, नाश्ता झाल्यावर, दुपारच्या जेवणानंतर, सायंकाळी जेवणापूर्वी, जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी घ्यावयाच्या गोळ्या-औषध

अशी विभागणी करुन जवळपास सहा महिने ती औषधी घेतली बघा. फरक सांगायचा तर सुईच्या टोकावर जेवढे मातीचे कण बसतील असा फरक जाणवत होता. शेवटी वैतागून एकूण एक औषधी बंद केली. मेडीकललेस झालो! तुम्हाला सांगतो, एवढा कंटाळलो होतो ना, अनेक वेळा मनात विचार आला, संसारामध्ये असलेली सारी कर्तव्यं निभावून झाली आहेत. मुलं आपल्या संसारामध्ये सुखी, आनंदी आहेत तेंव्हा सारे पाश तोडून टाकावेत..." तितक्यात त्यांच्या पती गरमागरम भज्यांच्या प्लेटस् घेऊन तिथे आल्याचे पाहून गोपाळराव पुढे म्हणाले,

"हा ओंडका गळ्यात होता म्हणून तो विचार सोडून दिला."

"बाप रे! गोपाळराव तुम्ही तर एकदम टोकाचाच निर्णय घेत होतात."

"त्यांनी लाख विचार करू देत, पण मी बरे जाऊ देईन? ते जाऊद्या. तुम्ही घ्या ना भजे, चांगली झालीत ना?"

"अति उत्तम झाली आहेत. पण कसे आहे वहिनी, वयोमानाने सहन होत नाही हो. खरे सांगतो, दोन-तीन वर्षानंतर हा असा ताव मारतोय. गोपाळराव, तुमचे हात-पाय दुखायचे शेवटी थांबले कशाने?"

"मेडीकल लेस झालो. कोणतेही औषध घ्यायचे नाही अशी प्रतिज्ञा केली. वेदना असहनीय होत असताना एकदा सहज म्हणून जेवणानंतर इथेच असलेला लाकडी सराटा घेतला आणि रागारागाने पायावर मारू लागलो..."

"काय ? सराट्याने वार करवून घेतले."

"होय हो भाऊजी! हे कधी काय करतील याचा नेमच नाही. त्यादिवशीपासून ह्यांनी त्या सराट्याने हात नि पाय बडवून घ्यायचा सपाटाच लावला. वेळ नाही, वार नाही. घे सराटा दे रट्टा असे सुरू केले."

"बाप रे! गोपाळराव, भलताच प्रयोग केलात की."

"खरे सांगतो तोच उपाय शेवटी रामबाण इलाज ठरला. तिसऱ्याच दिवसापासून आश्चर्यकारकरित्या फरक वाटू लागला. पंधरा दिवसात तर एकदम शंभर टक्के फरक पडला. जो काम दवा या दुआ न कर सकी वो काम फटको ने कर दिखाया!"

"वाह! मान गए। तुमच्या हिमतीला दाद द्यावी लागेल." सुदाम म्हणाले.

"अहो, खरी हिंमत तर पुढेच आहे. काय झाले, सर्वांनी हाता-पायाला दुखणे कमी व्हावे म्हणून कॅल्शियमच्या गोळ्यांचा भडीमार केला. त्याचा काय परिणाम झाला माहिती आहे. बावीस एमएमचा किडनी स्टोन होऊन बसला."

"बाप रे बाप! ते तर भलतेच झाले. मग काय शस्त्रकिया?"

"छे! एक आजार कमी व्हावा म्हणून औषध घेतांना दुसऱ्या आजाराचे बीजारोपण कसे होते हा अनुभव गाठीशी होताच म्हणून मग डॉक्टरकडे जायचेच नाही असे ठरवले. पण एवढा त्रास व्हायचा ना, अक्षरशः गडबडा लोळत असे. या आजारातून बाहेर पडलेल्या एका पाहुण्याने सांगितले की काही करू नका. फारच त्रास वाढला तर एखादी पेनकिलर घ्या. पाणी मात्र भरपूर प्या. मग काय?

सतत सलाईन चालू ठेवावे तसे पाणी सुरूच ठेवले. वॉटर प्युरी फायरची बारीक नळी असते ना ती एका भांड्यात टाकून नळीचे टोक तोंडामध्ये धरून बसायचो. जिथे दिवसात डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे सात-आठ लिटर पाणी प्यायचे तिथे माझ्या या प्रयोगामुळे सतरा-अठरा लिटर पाणी पोटात जावू लागले. शिवाय कडू कारले! आयुष्यात कधी कारल्याचा अणू ताटात पडू दिला नाही तिथे हिला कुणीतरी सांगितले की. मुतखडयावर गुणकारी कडू कारली... कडू कारली! कधी साखरेत घोळून, कधी चांगल्या तुपात तळून कारले नाष्ट्याला, जेवणात घेऊ लागलो. शिवाय कारल्याची कोशिंबीर, कारला चटणी, कारल्याचा मुरब्बा, कारल्याचे लोणचे, कारल्याचे कडू-कडू सरबत असे एक ना अनेक प्रकार अक्षरशः गिळावे लागले. कुणाला सांगू नका, परंतु मुलाने सांगितले आणि जन्मात कधी नव्हे ती बियरही चाखू लागलो. रात्री घड्याळात गजर ठेवून दोन-तीन वेळा लघवीला जाऊन पाणी आणि दोन-चार घोट बियरही घेवू लागलो. मग काय महिनाभरात हा एवढा खडा बाहेर पडला. एक मिनिट हं..." म्हणत गोपाळरावांनी खिशातून भ्रमणध्वनी काढला आणि त्यात जतन करून ठेवलेले मुतखड्याचे चित्र सुदामरावांना दाखवले.

"माय गॉड! गोपाळराव, एवढा मोठा खडा? तुम्हाला झालेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. पण तुमच्या सकारात्मक वृत्तीला दाद द्यायला हवी. पराकोटीचा त्रास दिलेल्या या दुश्मनाचे छायाचित्र काढून ठेवलेत. विषय निघालाच म्हणून माझ्या मुंबईच्या एका परिचिताला झालेला त्रास सांगतो. त्यालाही असाच किडनी स्टोन होता. मुंबईच ती. त्याला सेकंड, थर्ड आणि फोर्थ ओपिनियन देणाऱ्या प्रत्येक डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्याने शस्त्रक्रिया केली. सर्व व्यवस्थित पार पडले. कामानिमित्त काही दिवसांनी तो मला भेटायला आला. तुम्हाला आठवत असेल, मला रत्नांची आणि खड्यांची थोडी-फार माहिती आहे. माझे लक्ष त्याच्या हाताच्या बोटांकडे गेले. त्याच्या पाचही बोटांमध्ये दोन-दोन अंगठ्या घातलेल्या मला दिसल्या. प्रत्येक अंगठीत खडे होतेच. परंतु एका अंगठीतला खडा मला थोडा वेगळा वाटत होता. त्याच्या परवानगीने मी त्या खड्याचे निरीक्षण करून त्याला विचारले की तो खडा कुठून घेतला आणि कुणी दिला. तो हसत म्हणाला, 'खडा तसा विशेष आहे. पूर्ण पस्तीस हजाराला पडला.' मी त्याला म्हणालो, 'तुम्हाला कुणी तरी फसवलंय.' तसा तो हसत-हसत म्हणाला की तो खडा म्हणजे त्याला झालेला आणि शस्त्रक्रियेद्वारा बाहेर काढलेला मुतखडा होता तो. आता बोला. असे अवलिये असतात, पण तुम्ही मात्र भरपूर सहन केले हो."

"काय करणार? अरे, हो! एक सांगायचेच राहिले बघा. जी गोष्ट बियरची तीच गोष्ट मटनाची! होय! सुदामराव, मी मटनही खाले. काय झाले. आमच्या शेजारी एक परप्रांतीय कुटुंब रहात होते. त्या गृहस्थाने सांगितले की त्याच्या भावाला किडनी स्टोन झाला असतांना डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्याने मटनावर ताव मारला, त्यामुळे त्याचा खडा बाहेर पडला. खरे खोटे काय ते तोच जाणो. परंतु त्याच्या सततच्या मागे लागण्याने मी चार-पाच वेळा मटन खाले."

"हे डॉक्टर पण ना, काय खायला लावतील आणि काय प्यायला लावतील ते सांगता येत नाही. इथून गेल्यावर मुंबईचे पाणी मला सहन झाले नाही. मला आवरक्ताची संडास लागली. एका आयुर्वेद डॉक्टरांची औषधी सुरू केली, त्यांनी मला चक्क मटन किंवा मटनाचा रस्सा घ्यायचा सल्ला दिला."

"म्हणजे सुदामराव, तुम्ही सुद्धा?" गोपाळरावांनी हसत विचारले.

"नाही, नाही. मी नकार दिला. म्हटलं, कसाही संसाराचा भार हलका झालाच पाहिजे. त्यामुळे मरण पत्करेन पण मटन खाणार नाही. दोन्हीमध्ये फरक काय तो 'र' आणि 'ट' चा! पण त्या डॉक्टरांनी एक उपाय सांगितला. म्हणाले की तुम्हाला जीभ बाटवायची नाही ना, मग आपण मटनाच्या रश्श्याचा एनिमा देऊ. त्यांनी शेवटी त्यांना पाहिजे तसा एनिमा देऊन पोट तर रिकामे केले आणि बाटवले हो. मला तर वाटते स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे रझाकार होते. ते गुंडगिरी करून जनतेला लुटत. आजचे डॉक्टर म्हणजे त्यांचे सुधारलेले रूप म्हणजे 'आजारकार!' असेच!"

"जाऊ द्या! अहो, एवढं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही मुद्दाम तर घेतले नाही ना. आजकालच्या औषधीमध्ये अल्कोहोल असतेच की.." गोपाळराव समजावून सांगत असतांना बाहेरून आवाज आला,

"आहेत का गोपाळराव? यावे का आम्ही ?"

"अरे, दिनानाथजी, या." गोपाळराव म्हणाले. दिनानाथ आत येऊन बसताच गोपाळरावांनी त्या दोघांची ओळख करून देताच दिनानाथ म्हणाले,

"अरे वा, सुदामराव, गोपाळराव नेहमीच तुमची आठवण काढतात. आज भेटीचा योग आला. छान झाले."

"दिनानाथजी, कशी आहे तब्येत? तोंडातले फोड कसे आहेत?" गोपाळरावांनी विचारले.


"कमी आहेत. 'औषध नको पण सल्ला आवर.' असे म्हणायचे वेळ आली. जो भेटायचा तो सल्ला देत असे. कधी नव्हे तो तोंडात फोड आला त्याचा असा त्रास होई म्हणता. एक म्हणाला, भरपुर पाणी प्या. तिखट, तूरदाळ कायम बंद करा. आधीच तूरदाळाचे भाव गगनाला भेदून पुढे गेलेले. सणावारावी खावी म्हटलं तरी अंगावर काटा येतो आणिळतोंडात फोड येईपर्यंत तुरदाळ कोण खाणार? चहा-कॉफीवर संक्रांत! साश्रू नयनाने घोट-घोट पाणी कसे तरी घशाखाली ढकलत होतो. बरे, त्या फोडानेही डाव साधला. जिभेच्या अगदी मध्यावर ठाण मांडले. तोंडात एका बाजूला फोड आला तर वन वे... वळण रस्ता वापरता येतो, पण हा बसला मध्यभागी. गल्लीतल्या डॉक्टरांना

दाखवावे म्हटले तर चिरंजीव म्हणाले, 'असा निम हकिम, खतरे जान' नको. शेवटी त्याने बळेच एका मोठया दवाखान्यात नेले. सरकारच्या एक खिडकी योजनेप्रमाणे 'सारे एकाच छताखाली' असा तो दवाखाना! डॉक्टरांचे दर्शन व्हायलाच तीन तास लागले. त्यांनी दोन-तीन तपासण्या सांगितल्या. सोनोग्राफी, रक्त, लघवी, साखर अशा एकूण एक तपासण्या करून शेवटी एमआरआय करायलाही सांगितले..."

"काऽय? एवढ्या टेस्ट? उष्णतेमुळे येणाऱ्या फोडासाठी एमआरआय ?"

"हो ना. पण सारे अहवाल निरंक आल्यावर म्हणाले, एक काम करूया. उगीच रिस्क नको. आपण या फोडाचा छोटासा तुकडा मुंबईला तपासणीसाठी पाठवूया."

"अरे, बाप रे! पाठविला की काय?'

"मरता क्या न करता, डॉक्टरांचा सल्ला आणि पोराचा दट्टा म्हणून दिला पाठवून. तीन दिवसानंतर रिपोर्ट आला. डॉक्टरांना आणि मुलाला एकच शंका. तोंडातला कॅन्सर असणार, पण त्यांची शंका खोटी ठरली.''

"दिनानाथ, तुम्हाला सुपारीच्या खांडाचे, बडीसोपच्या दाण्याचे व्यसन नाही आणि कॅन्सर होईलच कसा?"

“गोपाळराव, हे तुम्हाला-आम्हाला कळून काय फायदा?"

"पण मग फोड बरा झाला कसा? कशाने?" सुदामरावांनी विचारले.

"सुदामजी, मुंबईचा अहवाल येईपर्यंत गल्लीतल्याच डॉक्टरकडे कुणालाही न सांगता गेलो. त्यांनी सांगितले दोन-तीन प्रयोग केले. पहिला म्हणजे दिवसांतून तीन-चार वेळा हळद पाण्यामध्ये मिसळून गुळण्या केल्या. नंतर त्या फोडावर लसणाची पाकळी दाबून ठेवली. तिसरे म्हणजे बर्फाचा खडा घेऊन त्यावर अलगद फिरवला आणि शेवटी कापसाचा बोळा थंड दुधामध्ये बुडवून फोडावर धरला."

"एक ना अनेक प्रयोग! फरक पडला का मग?" गोपाळरावांनी विचारले.

"शंभर टक्के! मुंबईचा अहवाल आल्यावर या असे त्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पुन्हा डॉक्टरांपुढे पेशीला त्यायालयात उभे रहावे तसे उभे राहिलो. अहवाल निरंक आलेले पाहून आनंद होण्याऐवजी चिंताक्रांत चेहऱ्याने डॉक्टर म्हणाले, हा अहवालही निरंक आहे, आता शेवटचा उपाय एकदा सिटीस्कॅन करून घ्या. ते ऐकतांना माझी तळपायाची आग अशी मस्तकाला शिरली म्हणता, परंतु अत्यंत शांततेने, संयमाने म्हणालो, 'कशाचे सिटीस्कॅन? अहो, फोड तर साध्या उपायांनी नाहीसा झालाय. चल रे, म्हणत मी ताडताड बाहेर पडलो."

"वा! भई वा! कुणावर विश्वास ठेवावा नि कुणावर नाही." गोपाळराव बोलत असताना तिथे त्यांच्या पत्नीचे आगमन झाले. दिनानाथांना पहाताच त्यांनी विचारले,

"दिनानाथभाऊजी, तुम्ही केव्हा आलात? मला माहितीच नाही. आम्ही आत्ताच गरमागरम भजी खाल्ली. थांबा. तुमच्यासाठीही गरम तळून आणते."

"वहिनी, थांबा. मी नाष्टा करूनच आलोय..." दिनानाथ सांगत असतांना दिवाणखान्यात आलेल्या व्यक्तीला पाहून गोपाळराव म्हणाले,

"अरे, आबा या. या...."

"चुकीच्या वेळी आलो. पाहुणे का?'' आबांनी विचारले.

"नाही हो. मित्र आहेत. बरोबर आलात. आम्ही सारे आजारी माणसं एकत्र जमलोत. असे म्हणा ना. आजारी व्यक्तींचे संमेलन! आता तुम्हीही या संमेलनात सहभागी आहात. काय चाललयं तुमचं ?

डोकेदुखी कमी झाली का?" गोपाळरावांनी विचारले.

"झाली. बाप्पा झाली. फार परेशान केले हो. बरे, वेदना होत्या पण तीव्र नव्हत्या. सर्दीही नव्हती. दोन दिवस माहिती असलेली गोळी घेतली. विशेष फरक वाटला नाही म्हणून गेलो एका सर्जनकडे.

त्यांनी रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल एक म्हणता सारे तपासले. सीटीस्कॅनही केला, परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. सारे अगदी नॉर्मल! दोन दिवस वाट पाहून त्यांनी 'मायग्रेन असेल' या स्वतः च्या निदानाने दिली गोळी. तो मेडिकल दुकानदार म्हणाला, 'तुमची लक्षण मायग्रेनची वाटत नाहीत हो. त्याच इॉक्टरानीच संगितल्याप्रमाणे 'आरोग्यमय' या कंपनीची चप्पल घेतली."

"दहा बारा कंपन्या आहेत अशा आरोग्यमयी चप्पलच्या. बरे, पण डोकेदुखीचे काय?" सुदामरावांनी विचारले.

"झाली कमी. तो दुकानदार तसा म्हणाला आणि मी डॉक्टरने दिलेली गोळी न घेता दुकानदाराने दिलेली सुंठीचे पावडर घेऊन घरी आलो. रात्री सुंठ शिजवून कपाळावर मळवट भरल्याप्रमाणे फासली. बराच वेळ अशी आग झाली म्हणता विचारू नका. सोबत त्याच दुकानदाराने दिलेली एक साधी गोळी घेतली. मस्त झोप लागली. सकाळी उठलो. एकदम फ्रेश! सहा महिने झाले. डोक्याला हात लावला तरच आपल्याला डोके-कपाळ आहे याची जाणीव होते. नो डोकेदुखी!" आबासाहेब सांगत असताना गोपाळरावांच्या धर्मपत्नी सर्वांसाठी चहाचा कप घेऊन आल्या. चहाचा कप घेत

दिनानाथांनी विचारले,

"गोपाळराव, आपण आपल्याच आजारावर बोलत बसलो. वहिनींनी गरमागरम भजी, वाफाळलेला चहा दिलाय. त्यांच्या तब्येतीचे काय? मागे एकदा तुम्ही वहिनींचे कोलेस्ट्रॉल वाढलेय असे म्हणाला होताल, आता कसे आहे?

"भाऊजी, ते विचारू नका. कोलेस्ट्रॉल निघाले किती तर १९५! परंतु डॉक्टरांनी टीएमटी करा, इको करा असा सल्ला दिला. माझ्या भावालाही हाच आजार होता, त्याच्याशी चर्चा केली. तो म्हणाला, १९५ म्हणजे तसे नॉर्मलच आहे. त्याचे तर नेहमीच २५० पेक्षा जास्त असते. इतर काही कोलेस्ट्रॉल लोकही तसेच म्हणाले. आमचा एक पाहुणा नागपूरला डॉक्टर आहे. त्याला बोलले. तो म्हणाला, काहीच करू नका. फक्त पथ्य करा. मग काय तेल, तूप, साखर कमी केले. दोन महिन्यांनी तपासले.

एकदम नॉर्मल! पण पथ्य मात्र कायम जीवनी आले."

"वहिनी, पथ्यावर निभावले हेच छान झाले. अहो, त्या दलदलीत फसला नाहीत. चक्रव्यूहात सापडले ना मग काही खरे नाही. काय झाले, माझा मेहुणा दाढ दुखते म्हणून एका चांगल्या नामांकित दंतवैद्याकडे गेला. त्यांनी नेहमीप्रमाणे फोटो काढला. दाढ किडली होती. दाढ वाचवता येते. रुट कॅनॉल करावे लागेल. पाच-सहा वेळा यावे लागेल. त्यासाठी..."

"दहा हजार फीस लागेल..."आबासाहेब मध्येच म्हणाले.

"अगदी बरोबर! परंतु माझ्या मेहुण्याने स्पष्ट आणि ठामपणे सांगितले की रुट-बीट नको. दाढ काढून टाका. शेवटी डॉक्टरांनी दोन दिवस गोळ्या घ्या आणि मग या असे सांगितले. त्याप्रमाणे दोन दिवस गोळ्या घेऊन पुन्हा गेला. डॉक्टरांनी सुन्न करण्याचे इंजेक्शन देऊन दहा मिनिटांनी दाढेच्या मुळाशी त्यांचे दाढ काढण्याचे अवजार घातले आणि दाढ काढणार तितक्यात त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. शेजारी उभ्या असलेल्या नर्सने तो उचलला आणि डॉक्टरांच्या कानाला लावला. दुस-याच क्षणी आनंदविभोर झालेले डॉक्टर म्हणाले, अरे व्वा! अभिनंदन! आलोच हं. फोन नर्सच्या हातामध्ये देत डॉक्टर त्यांच्या स्टाफला म्हणाले, 'अरे असे पहाताय काय? अरे आपल्या मैडम... माझी बायको, महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलीय. चला. मेहुण्याकडे पाहन म्हणाले, सॉरी! दोन मिनिटात बायकोचे अभिनंदन करून आलो... "

"अहो, मतमोजणी आहे माहिती असतांना दवाखाना बंद ठेवायचा ना?"

"उत्पन्न! केवळ कमाईवर डोळा. पुढे काय झाले?"

"पुढे काय? मेहुण्याला त्याच अवस्थेत ठेवून सारे पळाले. पाच-दहा मिनिटे झाली. पण कुणाचाच पत्ता नाही. माझा मेहुणा तसा सनकीच. त्याने इकडे-तिकडे पाहिले. शेजारी डॉक्टरांनी ठेवलेले अवजार उचलले. त्या चिमटीत दाढ पक्की धरली आणि जोर लावून उपटली की हो..."

"व्वा रे, मेरे शेर ! पुढे काय झाले?"

"दाढ काढल्यावर डॉक्टर जो कापसाचा बोळा लावतात तो तिथेच ठेवलेल होता. तोच गच्च दाबून तिथेच पंधरा-वीस मिनिटे बसला. शेजारच्या औषधी दुकानातून गोळ्या घेतल्या आणि घरी आला."

"बाप रे। सलाम त्यांच्या धाडसाला! दातांचा विषय निघाला म्हणून सांगतो काय झाले, गोपाळराव, तीन वर्षांपूर्वी मुंबईला गेलो आणि अचानक माझी दाढदुखी सुरू झाली. यांच्या मेहुण्याप्रमाणे दाढ काढूनच टाका या माझ्या निग्रहावर डॉक्टरांनी तीन दिवसांच्या गोळ्या दिल्या आणि चौथ्या दिवशी काढून टाकू असा सल्ला दिला. दोन दिवस गोळ्या घेतल्या. दाढदुखी बरीच कमी झाली. परंतु पाहुणे वारले म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्याला जावे लागले. तिथे चांगला पंधरा दिवस मुकाम पडला. दाढदुखी पूर्णपणे थांबली. मुंबईला परतलो. दाढ मुळीच दुखत नव्हती म्हणून डॉक्टरकडे गेलोच नाही. पण सहा महिन्यांनी तीच दाढ डोके वर काढत असताना डॉक्टरांकडे न जाता त्याच गोळ्या तीन दिवस घेतल्या. त्या गोष्टीला अडीच वर्षे होतात. दात एकदम निरोगी।"

"व्वा! आजच्या आपल्या आजारांचे संमेलन एक..."

"एक मिनट हं! फेसबुकवर आलेला एक ताजातवाना विनोद सांगतो आणि आपल्या संमेलनाचा समारोप करूया. एका मित्राने अशी पोस्ट टाकलीय, की दाढ दुखते म्हणून तो डॉक्टरकडे गेला. चर्चेअंती दाढ काढण्याच्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो डॉक्टरकडे गेला. सारे सोपस्कार झाले. दाढ काढल्यानंतर मित्राच्या लक्षात आले की वरच्या बाजूची दाढ काढतांना खालच्या बाजूचीही दाढ काढली की काय? त्याने डॉक्टरांना विचारले. डॉक्टर म्हणाले की बरोबर आहे. कसे होते, दातातला किडा खालच्या दाढेवर उभा राहून वरची दाढ पोखरत होता. म्हणून दोन्ही दाढा काढून टाकल्या..."

आबासाहेब सांगत असतांना सर्वांनी खो-खो हसत एकमेकांचा निरोप घेतला.

                        ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy