येतो फेरा पावसाचा
येतो फेरा पावसाचा
ना ऋतू पावसाळी, ना मेघ पावसाचा।
ऊन-वादळात येतो, फेरा पावसाचा।।
कधी हिवाळी उन्हाळी, मजा माणसाची घेतो।
ऊन-वादळी वाऱ्यात, लोका गारांनी झोडतो।।
पीक पिकल्या शेतात, पाणी सोडोनिया देतो।
जसे वाढल्या ताटात, कोणी माती कालवीतो।।
धावपळ करी सारी, कांदा, बटाटा झाकाया।
किती पुरवावी आता, ताडपत्रीची हो छाया।।
गहू हरभरा ज्वारी, कशी डोलते शेतात।
मोहर आंब्याचा गळला, वाऱ्या-पावसात।।
कधी करावी पेरणी, कशी पिकवावी शेती।
अवकाळी पावसानं केली, वांगी टोमॅटोची माती।।
विहिरी तलाव तळी, सारी गाळ मातीनं भरली।
गाई-गुरं माणसाची घरदार, उभी पाडून टाकली ।।
कधी येतो गार वारा, कधी धुळीचा पसारा।
टपोऱ्या थेंबापाठी, कधी पडतात गारा।।
बालका समान केली आम्ही, शेतावर माया।
काय नियतीचा कोप, कोणा देईना हो खाया।।