वसुंधरेची विनवणी
वसुंधरेची विनवणी
सांग निसर्गा असे किती मी
अघोरी अत्याचार साहावे
ऋतूचक्रासी बिघडवूनी
मम जीवन का बदलावे?
हिवाळा उन्हाळा पावसाळा
मम ऋतूचक्र साच्यातले
सर्व काही आलबेल होते
कसे अचानक बदलले?
अशा अवकाळी पावसाने
निसटली पिके हातातूनी
कृषीवल झाला भयभीत
कशी करु हातमिळवणी?
कधी पाऊस कधी हिवाळा
कधी रविराज प्रखरला
कशी तग धरु सांग आता
मम जीवच गुदमरला!!
निसर्गराजा वसुंधरेची
त्वरित ऐक रे विनवणी
संक्रमणाचा काळ आलासे
परिवर्तन करावे झणी!!