वैशाख वणवा
वैशाख वणवा
उन्हाचा कडाका
जीवाची काहिली
घामाच्या धारांनी
कायाही भिजली ...
वैशाख वणवा
तप्त सूर्य झाला
जिवाचा विसावा
वार्यात निमाला ...
झाडाला बांधला
तोच एक झुला
उंच उंच झोके
आनंद सानुला ...
नभातले मेघ
शामल जाहले
पर्जन चाहूल
मन शांत केले ...
रानी करवंद
आंबा बागेतला
आनंद नाचला
माझ्या मनातला ...
जांभळे पिकली
खाण्याचा आनंद
रान मेव्याचा हो
लागे मज छंद ...
तप्त सूर्य जरी
तापलेला तवा
त्यातही घेतला
आनंद मी नवा ...