उनाड पाऊस कधी रडवितो
उनाड पाऊस कधी रडवितो
कुधी रडवितो, कधी हसवितो।
कधी झुलवितो, कधी झुरवितो।।
कधी झोडतो, कधी मोडतो। आनंदाने कधी गर्जतो।।
इंद्रधनूला आडवे करुनी। कधी भुईला, चिंब भिजवतो।।१।।
उनाड पाऊस, असाच पडतो।
घरदार अन झाडे वेली।
वाऱ्या संगे, उंच उडवतो।।
गोठ्यामधली, गुरे वासरे। रानमधली, रान पाखरे।।
झाडांवरल्या, घरट्यामधुनी। अंडी पिले शोधीत फिरतो।।२।।
उनाड पाऊस, असाच पडतो।
कधी माळावर, कधी शेतावर।
कधी नदीच्या, पैलतीरावर।।
डोंगरमाथी उंच घरावर। धुंद होऊनी असा बरसतो।।
मिलनासाठी आसुसलेल्या। वसुंधरेला मिठीत घेतो।।३।।
उनाड पाऊस, असाच पडतो।
मग अवचित येतो, त्या पारावर।
प्रेम वीरांना शोधीत फिरतो।।
दाट धुक्यातल्या जलधारांनी । खडकालाही पाझर फुटतो।।
साय धुक्याची, ढगात घेऊनी। धार दुधाची, ओतीत फिरतो।।४।।
उनाड पाऊस, असाच पडतो।