ट्रेन चे लॉक डाऊन मनोगत
ट्रेन चे लॉक डाऊन मनोगत
खूप महिने धावले नाही पाय झालेत सुस्त
कठीण झाले थांबून आता करा काही बंदोबस्त
काय ते सारखे शेड खाली उभे राहायचे तोंड मिटून
पायी चालणाऱ्यांचे हाल खूप झाले सुरू करा आता मला झटून
माझ्या समोर होत आहेत मोठे मोठे उद्योगपती हतबल
असे कसे चालेल थांबून मला मी च तर आहे त्यांचे मनोबल
सवय मला इतकी माणसांची सतत असायची लगडलेली
पण सगळे वेळेवर कामावर पोहचले की कामे व्हायची रखडलेली
सकाळी च उरकून सगळे च तयार व्हायचे कामावर जायला मस्त
मी ही कधी ओरडा खायची थोडी वागले की गैरशीस्त
त्यांचे तर बरोबर च होते वेळेवर आॅफिस गाठायचे असे
मी तरी काय करणार पण कधी रूळ,कधी वायर रुसून बसे
वेळ जायचा मग त्यांना समजवायला आश्वासनांची नेहमीच भरती
पुढच्या वेळी नक्कीच करेन खर्च मी तुमच्या मशागती वरती
मग कुठे ते तयार व्हायचे जोडून द्यायचे रूळ आणि तारा
मला मात्र खूप दिवस खायला लागायचा शब्दांचा मारा
कधी खूप धुके,कधी खूप पाऊस संकटे झेलली पार
पण मार्ग काढला नेहमीच आणि आणले सोडले सगळ्यांना वारंवार
पाऊस तर नेहिमच माझा बघतो अगदी अंत
वाटच माझी अडवून ठेवतात सारखी हीच असते खंत
समजते मला तुमची व्यथा माणसे झाली मुंबईत फार
पण असं म्हणून कसे चालेल काही करा की नीट माझा विचार
मी तर नेहमी तुमचीच आहे नाही थकणार कधीच
पण थोडा ताण कमी केलात तर अपघात थांबतील आधीच
प्रत्येक वर्षी नवीन घोषणा यावेळी नाहीच भरणार पाणी
पाऊस मग परीक्षाच घेतो म्हणतो होईन जाऊदे आणीबाणी
प्रयत्न माझा नेहमीच राहतो नको कोणाची टळू दे वेळ
आणि व्यवसाय सगळे सुफळ व्हावेत येऊ दे अशीच वेळ
जाळे माझे पसरून राहावे देशाच्या गावोगावी
मग मिळेल बघा लागलीच सगळ्यांना यशाचीच चावी