स्वप्नं
स्वप्नं
स्वप्नं पहावी, उघड्या डोळ्यांनी
परिस्थितीचे, भान ठेवूनी
क्षमता पहावी, नीट तपासूनी
आवाका किती, घ्यावे ध्यानी
स्वप्नांचे आकाश, रम्य तरल
दीर्घ प्रयत्नांचा, असे प्रतल
जिद्द कसोटी कष्टांचा संगम
साकारिती स्वप्ने, कुंचला प्रबल
कधी होईल, विचका अचानक
भंगेल स्वप्न, असेच खळकन्
सावर रे तू, मनुजा चटकन्
घेई उभारी, वेचूनी कण कण
थांबला तो संपला, जाणूनी
कोळ्यापरि, जाळे विणूनी
मुंगीपरि, कण कण वेचूनी
जावे ध्येयाप्रती, पुढे चालूनी
प्रयत्नांती, परमेश्वर असतो
ध्येयपूर्तीचा, आनंद असतो
यशस्वी, स्वप्नशिल्प घडवितो
तोच वास्तव, जीवन जगतो