शीर्षक :- जात्यावर दळताना...!
शीर्षक :- जात्यावर दळताना...!
जात्यावर दळताना
पीठ दाण्याचे पडते
अनुभवी दाण्यांतून
आपोआप ओघळते
जुने दाणे क्षीण होत
वाजतात भरडत
सौभाग्याचे भाळ तसे
गडदते गोंदणात
येता उन्हाची तिरीप
जात्यावर ती पडते
रेघ पीठाची दिसत
चांदण्यात ती विरते
अशा वाकून सावल्या
विरताना चांदण्यात
जात्यावर दळताना
मिसळती त्या सूर्यात
देह झिजतो चंदनी
घर्मबिंदू उरतात
पोट भरण्या तमेची
तिची काया झिजवत
श्वास शिंपत प्राणात
पाते फिरवत जाते
उतरत्या पिठातून
जणू तारे खुणावते
जात्यावर दळताना
निघे दाण्यांची वरात
घर सुखांच्या जाणिवा
पूर मायेचा कळत
प्रज्ञा घोडके,पुणे©®
