पर्जन्य किमया
पर्जन्य किमया
मेघ कृष्ण धवल हे आले
सोबत घेवून पर्जन्य
नभी मेघात या शोभे
इंद्रधनुची कमान!!
आले घन ओथंबुनी
चिंब भिजली धरणी
रोमारोमात न्हाऊनी
मोहरली सृष्टी सारी
वसुंधरेवर होई
बरसात जीवनाची !!
निर्जल, तृषार्त झालेली
ओहळ, निर्झर अन तटिनी
रपरप, रिमझिम सरींनी
वाहती दुथडी भरूनी
सुखावला रत्नाकर ही
सरिताच्या मिलनानी !!
कोमेजलेल्या वृक्षवेली
वर्षा सुखात नाहती
पर्जन्याच्या स्पर्शाने
पानोपानी शहारती
प्रसन्न मनी डोलती
नवी लकाकी घेऊनी!!
ओसाड, उजाड माळरान
छान झाले हिरवेगार
गाई, गुरे चरतांना
गोकुळ भासे जणू पठार
धरित्रीनं परिधान केला
सारा हरित हा साज!!