कसे जगावे
कसे जगावे
(वर्ण:- १६, यती:- आठ वर)
कसा निसर्ग कोपला? काय खावे,प्यावे?
खरं सांग देवा आता, कसे मी जगावे?।।धृ।।
तुझ्या विश्वासे बियाणे मातीत फेकले
मुखी घास येता, पीक पावसाने नेले
बायको मुलांना काय,खायला घालावे?।।१।।
केले काम अतोनात, ऊन पावसात
पिकविला माल, सारा नेला बाजारात
मालाला का माती मोल भावाने विकावे?।।२।।
कधी ओला, कधी सुका, पडतो दुष्काळ
बळीराजाच्या नशिबी सदा महाजाळ
कशासाठी शरीराला व्यर्थ शिणवावे?।।३।।
जगामध्ये कोरोनाची, महामारी आली
हातावर पोट, त्यांची मारामार झाली
काम हाताला मिळेना कुठे त्यांनी जावे?।।४।।