हरहर महादेव
हरहर महादेव
करू शिव आराधना
पूर्ण होईल कामना
बिल्व पत्र,भस्म अंगा
मनी भक्तीची भावना...१!
मास पवित्र श्रावण
शुभदिन सोमवार
शिवस्तुती उधळण
घालू गळा पुष्पहार....२!
पंचामृत घालू स्नान
षोडशोपचार साज
उपवास नि पूजन
शिवामूठ वाहू आज...३!
शिवलीला पारायण
रूद्र महत्व जाणावे
समाधान जीवनात
सुख सदैव मानावे...४!
शिवशक्ती एकरूप
आशीर्वाद मिळे खास
भक्ती भावे लीन होऊ
भेटी शंभो लागे आस....५!
दूर कर संकटाला
घेऊ दे मोकळा श्वास
तुझ्या दरबारी भेट
महादेवा हमखास...६!