ढगांची लगीनघाई
ढगांची लगीनघाई
बघा ढगांची लगीनघाई
मंडळी आतुर बघायला
खुशीत लागले गरजायला हो...
खुशीत लागले गरजायला....
सण ऋतूंचा पावसाळी
रश्मींचीही वाजली टाळी
संपता हा खेळ उन्हाळी
वारा पाहतोय डोलायला हो...
खुशीत लागले गरजायला....
गोडवा हा भरून ओठी
थेंबांचीही वाढली दाटी
भेटीची गं मनी चिकाटी
ओढ मातीशी बिलगायला हो...
खुशीत लागले गरजायला....
हळूच धरता वेग सरींनी
स्वागत केले गर्द दिशांनी
एकरूप होता मृदा पाणी
सुगंध तयार माखायला हो...
खुशीत लागले गरजायला....
सरली आता कोरड सारी
हिरवाईचं लेणं दारी
पावसाची किमया न्यारी
मन लागले भिजायला हो...
खुशीत लागले गरजायला....