आयुष्यात एकदा
आयुष्यात एकदा
आयुष्यात एकदा
इतका पाऊस पडावा
की अहंकार सगळा
वाहून जावा.
आयुष्यात एकदा
इतकं ऊन पडावं
की जवळच्या वटवृक्षाच्या
सावलीच महत्त्व कळावं.
आयुष्यात एकदा
इतकी पानगळती व्हावी
की नवीन पालवी फुटण्यास
बंद मनाची दारे खुली व्हावी.
आयुष्यात एकदा
इतकं स्वतःच्या मनात पहावं
की स्वतःच्याच चुकांशी
हितगुज साधावं.
आयुष्यात एकदा
इतकी मोठी झेप घ्यावी
की आकाशाला गवसणी घालण्याची
पंखात ताकद यावी.
आयुष्यात एकदा
इतकी आव्हाने पेलावी
की जीवन जगण्यात
खरी मजा यावी.